कोरोना आणि काही इतर कारणांमुळे गेली दोन वर्षं पुढे पुढे जात राहिलेल्या आम्हा मित्रमैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाला अखेर मुहूर्त मिळाला. तारिख आणि ठिकाण ठरवून रेल्वेचं आरक्षण केलं आणि सगळ्यांमधे उत्साहाची लहर पसरली.
मळवली - लोणावळ्यापासून अगदी जवळ म्हणजे नऊ किमी अंतरवार असलेलं एक छोटंसं शांत पण निसर्गरम्य गांव. आमच्या स्नेहसंमेलनासाठी या मळवलीमधलाच एक सुंदर बंगला आरक्षित केला होता.
खरंतर काही कारणास्तव मी या संमेलनाला न जाण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यामुळे माझे सारे मित्रमैत्रिणी खूपच नाराज झाले होते. त्यांची नाराजी मला सतत जाणवत होती. अखेर संमेलनाच्या आदल्या दिवशी कारणं बाजूला ठेवून मी जीवलगांबरोबर संमेलनाला जायचं ठरवलं. रात्री उशिरा जायची तयारी केली आणि सगळेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भेटीचं स्वप्न पाहातच निद्राधीन झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने सारे निघालो. एका मैत्रिणीने भल्या पहाटे उठून उत्साहाने तयार केलेल्या चविष्ट नाश्त्याने प्रवासाची छान सुरुवात झाली. नाश्त्याबरोबर गप्पाही रंगल्या. आणि त्यात वेळ कसा गेला कळलही नाही. आम्ही लोणावळा स्थानकावर उतरलो. तिथून थोडं दूर असलेल्या पण संमेलन स्थळ म्हणून ठरवलेल्या मळवली गावातील बंगल्यापर्यंत जाण्यासाठी एका मित्राने गाडीची व्यवस्था आधीच केली होती. त्या गाडीने आम्ही संमेलन स्थळी पोहोचलो. काही मित्र मैत्रिणीं दूसरीकडून येणार होते. त्यांना आमच्याबरोबर रेल्वेनं येणं शक्य नसल्यानं एका मित्राच्या गाडीने तेही एकाच वेळी संमेलन स्थळी पोहोचले. बंगला गावापासून थोडा आत होता. पण आवारात सुंदर बाग फुलवलीय. आणि जवळुन एक लहानशी नदी वाहते. एखाद्या छानशा चित्रासारखंच हे ठिकाण आहे.
सारे एकत्र जमलो आणि मग सुरु झाली धमाल मजामस्ती. बंगल्यात पोहोचलो, ताजेतवाने झालो आणि मग सुरु झाला यज्ञ - गप्पांचा अखंड यज्ञ. त्यात वाफाळत्या चहाची पहिली आहुती पडली आणि यज्ञ तेजाळला. नंतर भोजन आहुती अर्पण करेपर्यंत त्यात गप्पा आणि छायाचित्रणाच्या समीधा वाहणं अखंड सुरु होतं. झणझणीत भरली वांगी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी अशा गावरान जेवणाचा आस्वाद घेत गप्पा अधिकच रंगल्या होत्या.
भोजनाच्या आहुतीनंतरही गप्पांच्या समीधा यज्ञात पडतच होत्या. नंतर यज्ञ थोडा बाजूला ठेवून जवळच्या तरणतवावात मनसोक्त खेळून यज्ञाची धग थोडी कमी केली. मग परत आवरुन अंगणातच बसून वाफाळत्या चहाची आहुती यज्ञार्पण केली. मधल्या काळात सकाळपासूनचं स्वच्छ आकाश भरुन यायला लागलं होतं. चहा होईपर्यंत आकाशात मेघ दाटून आले. चहापानानंतर आम्ही जवळच थोडं फिरुन आलो. थोड्याच वेळात वरुणराजाने आमच्यावर गुलाबपाणी शिंपडायला सुरुवात केली. गार वारा आणि पावसाचा हलका शिडकावा वातावरण अतिशय सुंदर झालं होतं. गप्पा गोष्टी आणि छायाचित्रांचा यज्ञ सुरुच होता.
दोन मित्रांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी ते संमेलनाला येऊ शकले नाहीत तर एक मित्र कामाच्या व्यस्ततेमुळे रात्री येणार होता त्याची वाट पहाणं सुरु होते. न आलेल्या मित्रांची उणीव सतत जाणवत होती.
अशातच सांजसावल्या गडद झाल्या आणि पावसाचा शिडकावाही वाढला. मग घरात बसून खेळायचं ठरवलं. एका मित्राने घेतलेल्या या खेळाचा मुख्य उद्देश व्यक्त होणं हाच होता.
खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात. पण त्यासाठी योग्य वेळ आणि आपल्याला समजून घेणारी योग्य व्यक्ती हे दोन्ही असावं लागतं. बहुतेक वेळा आपल्याला कुणी समजून घेणार नाही या भावनेतून आपण अव्यक्त रहातो. आणि मनाच्या तळाशी या मनभावना दडपून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि पर्यायाने तब्येतीवर होतच असतो. मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. इथं आपल्याला समजून घेणारे मित्रमैत्रिणी आहेत याची जाणीव होते आणि मग गप्पांच्या, खेळांच्या माध्यमातून इथं प्रत्येकाला मनापासून व्यक्त होता येतं. आणि मग मनमुक्त झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं.
आम्ही असंच मनमुक्त बोलत असतानाच काम संपवून येणाऱ्या मित्राचं आगमन झालं आणि आमच्या खेळाची रंगत अजूनच वाढली. अखेर खूप उशीराने गप्पांच्या यज्ञात भोजनाची आहुती दिली. आणि पुन्हा नवीन खेळाला सुरुवात केली. उशीरापर्यंत जागरण करुन अखेर थोडीशी विश्रांती घेतली.
लगेच पहाटे ऊठून फिरायला गेलो. साऱा परिसर धुक्याची दुलई पांघरून बसला होता. पूर्वदिशेला पसरत असलेला सोनकेशरी रंग पाहात, छायाचित्र काढत, गार वारा अनुभवत आम्ही फिरत होतो. काही वेळातच सूर्योदयाचं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत परत आलो.
आदल्या दिवसापासून सुरु असलेल्या यज्ञात पून्हा वाफाळत्या चहा आणि चमचमीत मिसळीची आहुती दिली. सारं आवरुन परत गप्पा, गाणी, खेळ, छायाचित्रं यात दंग झालो. अखेर काही वेळातच यज्ञात भोजनाची पूर्णाहुती दिली. आम्हाला दोन दिवस उत्तम चवीचं, आमच्या पसंतीचं, चहा, नाश्ता, भोजन करुन खाऊ घालणाऱ्या पती-पत्नी चा निरोप घेऊन तृप्त मनाने आम्ही निघालो.
मळवलीपासून जवळच भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी आहेत. ही लेणी आणि कार्ल्याच्या एकवीरा देवीचं मंदीर पाहण्यासारखे आहेत. तसंच इथं मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारे लोहगड आणि विसापूर हे किल्लेही पहाण्यासारखे आहेत.
आम्ही जवळच असलेला लोहगड किल्ला बघायला जायचं आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे किल्ल्याजवळ पोहचलो. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेलाय. अतिशय मजबूत आणि बुलंद असा हा किल्ला आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा किल्ला पहाण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. पण गप्पा आणि छायाचित्रणाच्या नादात दमल्याची जाणीव न होता आम्ही वरपर्यंत चढून गेलो. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा हे पहात महादरवाजातून पुढे गेल्यावर एक ध्वजस्तंभ, लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, एक छोटंसं अष्टकोनी तळं हे सारं पहाता येतं. वर पोहोचलो आणि एका वेगळ्याच आनंदानं मन भरुन आलं. नुसतं किल्ला चढतानाही आपल्याला दमायला होतं आणि जाणवतं त्याकाळी कुठलीही सुविधा नसताना बांधलेल्या अशा साऱ्या अभेद्य किल्ल्याचं महत्व. किती विपरीत परिस्थितीत बांधलेत हे सारे गडकिल्ले. कुठून आली असेल एवढी शक्ती त्या लोकांमध्ये. जिद्द, निष्ठा, जीवाची बाजी लावणं या साऱ्या शब्दांचा खरा अर्थ या इतिहासातूनच कळतो. किल्ल्यावर पोहोचून मनोमनी नतमस्तक होऊन, फिरुन, छायाचित्र काढून परत खाली उतरलो.
दोन दिवस सुरु असलेला हा संमलनाचा यज्ञ पुनरागमनायच म्हणून तात्पुरता शांत केला आणि गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन उत्फुल्ल मनाने परतीच्या प्रवासाला लागलो.
जरतारी वस्त्र खास मैत्रीचे
स्नेहाच्या धाग्याने विणायचे
गीत सुमधुर हे आयुष्याचे
द्यायचे स्वरसंगीत मैत्रीचे
स्वप्नचित्र मनी रेखायचे
रंग मैत्रीचे त्यात भरायचे
शांत अव्यक्त मन जपायचे
अन मैत्रीत मनमुक्त व्हायचे
जीवन सारे जरी सुखदुःखाचे
मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे
मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे
- स्नेहल मोडक