Pages

Showing posts with label Poems (कविता). Show all posts
Showing posts with label Poems (कविता). Show all posts

Friday, July 25, 2025

श्रावण श्रावण

नभमेघात श्रावण दाटतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

     क्षणात सरसर क्षणात उन

     संगे वाजे मेघमल्हाराची धुन

     खेळ उन पावसाचा रंगतो ग

     मनामनात श्रावण फुलतो ग

पर्णात झरती मौक्तिकमाला 

दरवळतो गंध मातीचा ओला

धरेवर अमृतवर्षाव होतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

       हिरव्या पिकात हिरवी लाट

       झुळझुळ वाहती शुभ्र पाट

        रंग पाचूचा सुंदर खुलतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

रंगांच्या रानात स्वप्नांचे पक्षी

नभी खुलते इंद्रधनुची नक्षी

अल्लड वारा चहुकडे घुमतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

        रानफुलांत पायवाटा सजती

        अवखळ सरितेपाशी थांबती

        केकारव मयुराचा घुमतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

- स्नेहल मोडक

Saturday, July 5, 2025

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ

अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ

चालती वारकरी सारे वाट पंढरीची

हाती टाळ अन गळा माळ तुळशीची

सदा करती मुखाने विठ्ठलाचे संकिर्तन

नाचती घेऊन डोईवरी तुळशी वृंदावन

कळत नाही चालताना कसे सरते अंतर

फेर, फुगड्या, रिंगण खेळती दमल्यानंतर

गावोगावी दुमदुमूतो विठ्ठलाचा नामघोष

स्वागत अन पूजनाचा उत्फुल्ल जल्लोष

अवघड दिवे घाटातून पार होती लिलया

जलद होती पाऊले सावळ्यास भेटाया

चंद्रभागे स्नान करुनी दर्शना उभे भक्त

नतमस्तक होता विठुचरणी मन होते तृप्त

- स्नेहल मोडक

Thursday, June 26, 2025

संगत

किलबिल पाखरांची

पहाटसमयी जागवते

उगवत्या दिनकरासंगे

नित्य चहापान ते रंगते

     आसपास येता पाखरे

     दाणापाणी तयास देते

     चिमण्या, बुलबुल, राघू

     दयाळ, नर्तक, चानी येते

टिपून दाणे उडती पाखरे

खेळात त्यांच्या मन रमते

असली जरी भाषा वेगळी 

भावना एकमेकांस कळते

     व्यस्त जीवनी दिनरातीस

     कधी संगतीस कुणी नसते

     एकलेपण मग जरी असले

     साथ पाखरांची सदा असते

आषाढस्य प्रथम दिवसे

जसे मेघदूत सहजच स्मरते

देत आदरांजली कालिदासांसी

संगतीत पाखरांच्या मन रमते

- स्नेहल मोडक

Thursday, June 19, 2025

नक्षी

पाऊस रेशीमधारेत बरसून जातो

रेजांवरती सुंदर खूणा ठेवून जातो

     मला भिजवाया तो खिडकीत येतो

     लोलक थेंबांचे खूपसे देऊन जातो 

जणू सुरेख मोत्याची माळ भासते

मंत्रमुग्ध होऊन मी ती पहात राहते

     मौक्तिकमाला छायाचित्रात साठवते

     काही क्षणांत थेंबांची नक्षी ओघळते

- स्नेहल मोडक



Monday, June 16, 2025

मृग

पाऊस मृगाचा बेधुंद बरसतो

मृदगंधाने सारा आसमंत भरतो

चंचल सौदामिनी नभी लखलखते

मेघमृदुंगासह मग आकाश गर्जते

छतावरी अवखळ पागोळी धावते

अन भुईवरी मग सुंदर तळे साचते

बेभान वाऱ्यात तरुवेल सळसळते

भिरभिरते पर्ण त्या जळात तरंगते

कुठे वळचणीस एक पाखरु थांबते

इवले काळीज मात्र त्याचे थरथरते

मृगधारेत तृषार्त अवनी तृप्त होते

कुशीत तिच्या अलवार बीज रुजते

खेळ हा सारा मी मुग्धपणे पाहते

तुषार झेलत तनुवरी मी मोहरते

ऋतू पावसाळा जरी नेमेची येतो

प्रत्यही नवाच अन हवासा वाटतो 

एकाचवेळी सर्वत्र सारखाच बरसतो

तरी प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो

- स्नेहल मोडक

Wednesday, June 11, 2025

साथ

केशर रंगात पश्चिमा नाहते

सांज अलवार नभी उतरते

सांजसावल्या गडद होती

पाखरे घरट्यात परतती

कोलाहल सारा शांत होतो

एक अनामिक हुरहुर लावतो

मन हळवे कातर कातर होते 

अन त्या राघूसम एकले उरते

थकला रावा जरा विसावतो

एकाकी मनास अबोल साथ देतो

- स्नेहल मोडक

Tuesday, May 27, 2025

आठवण

धुंद पहाटे धुक्याची दाट दुलई ओढताना

पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकताना

  येईल का माझी आठवण 

पूर्वदिशेची सहस्ररश्मीची स्वारी दिसताना

गवतावर चमचमणारे दवबिंदू पहाताना

  येईल का माझी आठवण 

इवली फुलं पहात रानीवनी फिरताना 

विहरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे दिसताना

  येईल का माझी आठवण

शुभ्र मोगऱ्याचा मादक गंध अनुभवताना

नाजूक रातराणीच्या गंधाने रात्र मोहरताना

  येईल का माझी आठवण

शांत बसूनी गीत झऱ्याचे ऐकताना

चित्र मनातले कुंचल्याने रेखताना

  येईल का माझी आठवण

सागरतीरी फेसाळत्या लाटा बघताना

ओल्या वाळूवर पावलांचे ठसे उमटताना

  येईल का माझी आठवण

कधी अतीव आनंदाच्या क्षणी फुलताना

कधी अव्यक्त एकाकीपण जाणवताना

  येईल का माझी आठवण

  येईल का माझी आठवण

- स्नेहल मोडक

Friday, May 16, 2025

नभांगण

निसर्ग कुंचला

आकाश कागद

कुंचला फिरतो

सप्तरंग सांडतो

गुलाबी जांभळा 

पांढरा निळा

केशर पिवळा 

सुंदर रंगछटा

आभाळ रंगते

रंगरेषा बदलते

मन रंगविभोर

तरल भावरंग

मनमोहक मेघ

रंगमय नभांगण

- स्नेहल मोडक


 

  

Saturday, May 3, 2025

सोहळा

उमलती पहाट

कोवळा प्रकाश

सकाळचे सहा

मी माझ्या खिडकीत

आतुरता आगमनाची 

उगवतीवर केशर

तळाशी मेघसावळा

खगांची उडती नक्षी

किंचित केशरकोर

अलवार कोर वरती

केशरवर्तुळ पूर्ण 

मी फक्त मंत्रमुग्ध 

तरल मेघातून वर

क्षणांत कनकगोल

सोहळा सृजनाचा

नित्य नवा अनुभव 

नित्य नवा अनुभव 

- स्नेहल मोडक



Wednesday, April 23, 2025

पहाटवारा

काजळ निशेचे फिकट जाहले
झुंजूमुंजू झाले ग झुंजूमुंजू झाले
घरट्यातूनी सारे विहग जागले
किलबिलाटे सृष्टीस जागविले
पहाटवारा शीतल झुळकला
आसमंत अवघा शिरशिरला
पूर्वेस किंचित केशर उजळले
कुजन कोकिळेचे सुरु जाहले
रविराज आकाशी अवतरले
सोनकिरण सृष्टीवर पसरले
चराचर अवघे जागे जाहले
पहाटवारा पिऊनी सुखावले
पहाटवारा पिऊनी सुखावले
स्नेहल मोडक

Thursday, March 21, 2024

जागतिक कविता दिन

        आज जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं ही खूपच आधी सुचलेली कविता. आपल्याला निसर्गात रममाण व्हायला नेहमीच आवडतं. खरंतर सृष्टीचं हे निसर्गचक्र अव्याहत फिरत असतं. पण प्रत्येक दिवसाचं चित्र वेगळं असतं. त्यामुळेच ते नित्य हवंहवंसं असतं. मुग्धपणे पहात रहावं असंच असतं.

.

सृष्टी

आवडतं मला पहायला

पहाट अलवार उमलताना

     आवडतं मला पहायला

     सृष्टी कण कण जागताना

आवडतं मला पहायला

शांत नीरव रात्र सरताना

     आवडतं मला पहायला

     तारका अलगद विझताना

आवडतं मला पहायला

उषप्रभा सोनवर्खी होताना

     आवडतं मला पहायला

  ‌   सहस्त्ररश्मी अवतरताना

आवडतं मला पहायला

शुभ्र धुकं विरघळताना

 ‌    आवडतं मला पहायला

     सृष्टी सप्तरंग उधळताना

आवडतं मला पहायला

विहग नभी झेपावताना

     आवडतं मला पहायला

     कोमल कलिका फुलताना

आवडतं मला पहायला

पहाट अलवार उमलताना

.

- स्नेहल मोडक

Saturday, February 17, 2024

पूर्णविराम

            आंतरजालाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी अनेक सुविचार, उतारे, छान छान वाक्यं वाचायला मिळतात. त्यातले बरेचसे विचार आपल्याही अनुभवांशी निगडित असतात त्यामुळे आपल्याला ते फारच भावतात. असे विचार, वाक्य वाचताना क्षणभर का होईना आपल्याही  काळजात कळ येतेच. असंच नुकतंच एक वाक्य माझ्या वाचनात आलं, 'नात्यालाही expiry असते'. वाचलं आणि तत्क्षणी असह्य अशा मनोवेदनेनं मन कळवळलं.

           नाती आपल्याला जन्माने मिळतात. फक्त एकच नातं आपल्या वाढत्या वयाबरोबर आणि आपल्या स्वभावानुसार मिळतं ते म्हणजे मैत्रीचं. मिळतं अंहं जुळतं. कधी सारख्या स्वभावाच्या दोन व्यक्तींचं मैत्र जुळतं तर कधी विरुद्ध स्वभाव असूनही मैत्र जुळतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मैत्रीचं, नात्याचं रुपही बदलतं. काही नाती, मैत्री अतिशय कठीण परिस्थितीतही बरोबरीने खंबीर साथ देतात आणि त्या कठीण काळातून आपण सुखरुप बाहेर येतो. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अशी काही नाती, मैत्री टिकून असतात. उत्तरोत्तर अशी नाती दृढ होत जातात.

            कधी नात्यातील किंवा घट्ट मैत्री असलेलं कुणी शिक्षणाच्या, व्यवसायाच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात, परदेशात स्थायिक होतात. सुरुवातीच्या काळात सतत संपर्कात असतात. मग वाढत्या जबाबदाऱ्या, वेळेचा अभाव यामुळे हळूहळू संपर्क कमी होत जातो. कालांतराने अशा नात्यातील संबंध अगदी कारणापुरतेच उरतात. मात्र मनात कुठलीही कटूता, किल्मिष  नसल्यानं क्वचित काही निमित्तानं भेट झाली तर अगदी पूर्वीच्याच हक्काने, प्रेमाने भेटतात.

             कधी कधी मात्र क्वचित परिस्थितीवश पण बहुतेक वेळा हेतूपुरस्सर व्यक्तीचं वागणं, बोलणं बदलतं. समोरच्या व्यक्तीला टाळलं जातं, दुर्लक्ष केलं जातं किंवा गृहित धरलं जातं. अशावेळी त्यांना समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचारही करावासा वाटत नाही. साहजिकच समोरची व्यक्ती किंचित का होईना दुखावतेच. आणि वारंवार जेव्हा असंच काहीसं घडू लागतं तेव्हा आपल्याला नात्यातून, मैत्रीतून वगळलं जातंय, अंतर निर्माण होतय याची जाणीव समोरच्या व्यक्तीला होते. मग मात्र नातं संपुष्टात यायला सुरुवात होते. आणि अशाच एखाद्या प्रसंगानंतर ते नातं कायमचं संपतं. खरंतर खूप वेदना होतात मनाला पण वारंवार आपल्याला बाजूला सारलं जातंय, गृहित धरलं जातंय याची जाणीव प्रत्येक प्रसंगात सोसण्यापेक्षा नातं संपवण्याचा निर्णय घेतला जातो. अशावेळी हे नातं, मैत्री सावरण्यासाठी त्या व्यक्तीकडून प्रयत्नही केला जात नाही. अशावेळी मनोमन भुमिकांची अदलाबदल करुन समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेता येऊ शकतात. पण असा विचारही केला जात नाही. आणि चुकून असं झालं तरी पुन्हा हे नातं पूर्वीसारखं सांधणं शक्यच नसतं. कारण आपली ही माणसं हक्काची, प्रेमाची माणसं आहेत हा आपला विश्वास किती अयोग्य होता या जाणीवेनं समोरच्या  व्यक्तीचं मन कायमचं दुखावतं. आणि मग पुन्हा कुणावर विश्वास ठेवायची हिंमतही होत नाही. खरंतर घटना कधी कधी लहानशा असतात, क्वचित कधी महत्त्वाच्या, मोठ्या असतात. जिव्हेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिव्हेमुळे झालेली जखम मात्र कधीच बरी होत नाही. अगदी काळाचं औषधही त्यावर उपयुक्त ठरत नाही. फक्त काही काळानंतर अशी व्यक्ती त्या जखमांसहित जगायला शिकते. आणि म्हणूनच जेव्हा हे नेहमी घडू लागतं तेव्हा अगदी स्थितप्रज्ञ व्यक्तीचंही मनोबल उरत नाही. आणि मग अशा नात्याला पूर्णविरामच मिळतो. 

              हे वाचताना तुमच्याही मनात काही घटना, व्यक्तींनी फेर धरला असेल, हो नं?  सगळीच नाती, मैत्री जन्मभर साथ देत नाहीत हेच सत्य आहे. औषधं, खाद्यपदार्थ आणि इतर काही वस्तू यांना अंतिम मुदत असते, पण नात्याला अंतिम मुदत? मात्र दुर्दैवानं 'नात्यालाही expiry असते' हे अगदी शब्दशः खरंय. 


मैत्री शैशवातली

निरागस असणारी

मैत्री कुमारवयीन

कट्टीबट्टी करणारी

मैत्री यौवनातली

जीवाला जीव देणारी

मैत्री वार्धक्यातली

जीवापाड जपणारी

मैत्री आयुष्यभराची

स्वप्नातच लाभणारी

- स्नेहल मोडक

Friday, January 19, 2024

दवबिंदू

दवबिंदू पानावरी विसावला

आकाशदर्पणी न्याहाळू लागला

काया तयाची जरी पारदर्शी

छायेत नभाच्या झाली नीलवर्खी

येताच सुरेख सोनसळी उन

सुंदरसा रंगाविष्कार आला जमुन

आसन तयाचे हिरव्या पाचूचे

तनमन सोननिळ्या मखमालीचे

- स्नेहल मोडक





Monday, January 8, 2024

कवडसा

रात काजळी सरली

सृष्टीला जाग आली

दव हलकेच पडले

तरुवेलही सुखावले

शुभ्र अभ्र सरकला

उदयास मित्र आला

कोवळी किरणे आली

सोनवर्खी धरा झाली

एक कवडसा सानुला

धरणीवरती उतरला

तरुवेलीस बिलगला

पानोपानी चमकला

कवडसा आला भूवरी

जणू आरसाच बिलोरी 

जणू आरसाच बिलोरी 

- स्नेहल मोडक

    

Thursday, December 21, 2023

सख्य

कधी शांत नीरव रात्री मिटल्या नेत्री

स्वप्नांच्या दुनियेत फेर धरती नातीमैत्री

आकाशीचा चांदवा मीच मजला भासे

चमचमत्या चांदण्यांची सुंदर साथ असे

जाग येताच उघड्या नयनी उमगे सत्य

तारका होती विलग चंद्र एकलाच नित्य

कधी सांजवेळी मन हळवे कातर होते

अलगदच आठवांच्या गुंत्यात अडकते

कडुगोड आठवांचे पदर सोडवू पाहते

परि मनोवेदनेने गंगायमुनाच अवतरते

कधी निवांत क्षणी उलगडतो स्नेहमेळ

रंगतो सुरेख भावबंधांचा तयात खेळ

मनास लागता अवचित चाहूल कुठली

जाणवते हाती रिक्त ओंजळच उरली

अतीव जिव्हाळ्याचे सगेसोयरे असती

वाटे सुखदुःखात सारे सदैव साथ देती

परि आठवण आपली कुणासच नसते

परकेपणाच्या जाणीवेतच सख्य सरते

- स्नेहल मोडक

Wednesday, December 6, 2023

शब्द

शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी

भावनांचे अमृतकण गंधाळल्या शब्दावरी

कधी घालिती शब्द घाव हळव्या भावनांवरी

कधी घालिती शब्दच फुंकर विध्द मनावरी

शब्दातूंन शब्द वाढतो पडते नात्यात अंतर

शब्दांवीणच संवाद घडतो अन जुळते मैतर

कोलाहलातच शब्दांच्या मन होतसे व्याकूळ

कुजबुजती शब्दच अन मन होतसे घननीळ 

कधी शब्दच होती लाह्या अन तडतड उडती

कधी होती शब्द प्राजक्त हळूच सडा घालती

कधी शब्दच विद्युल्लता मनभावना जाळती

कधी होती शब्दच वीणा सप्तसूर झंकारती

शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी

भावनांचे अमृतकण गंधाळल्या शब्दावरी

- स्नेहल मोडक

Monday, November 20, 2023

दर्या

             समुद्र असा शब्द जरी ऐकू आला तरी आपल्या नजरेसमोर अवतरतो तो अथांग निळा सागर आणि त्याच्या शुभ्र फेसाळत्या लाटा. प्रत्यक्षातही आपल्याला समुद्र एवढाच दिसत असला तरी त्याच्या तळाशी मात्र अफाट खजिना दडलेला असतो. विविध प्रकारचे असंख्य जलचर या सागरात आपल्याला आढळतात. या सगळ्यांना आपल्यात सामावून घेत असतानाच नकोशा गोष्टी मात्र आपल्या लाटांबरोबर किनाऱ्यावर ढकलून देण्याचं काम मात्र समुद्र सातत्यानं करत असतो. हे असंच वागायचं आपल्या मनानही ठरवलं तर ?


आपल्या मनातही एक दर्या असावा

   सुखाच्या शुभ्र लाटांनी उसळणारा

   दु:खाला लाटेसरशी नाहीसं करणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   किनाऱ्यावर अवखळ खळखळणारा

   अंतर्यामी अथांग खोल गूढ असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   कधी नीलरंगी कधी केशररंगी दिसणारा

   परी अंतरी निर्मळ नितळ जल असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

   अंधारराती गूढ गंभीर अशांत भासणारा

   परि मनास भेटीची नित्य ओढ लावणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या सुखदुःखाना सहज सामावणारा

   फेसाळ लाटांनी निखळ आनंद देणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या आठवणी अंतर्यामी साठवणारा

   अन नात्यांचे रेशीमबंध सदैव जपणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

आपल्या मनातही एक दर्या असावा 

- स्नेहल मोडक

Wednesday, October 11, 2023

आठवणी

सुखद आठवणीच जमा करायच्या

नकोशा आठवणी मात्र विसरायच्या

छानशा आठवणींचा गोफ विणायचा

अन स्मितहास्याचा गोंडा लावायचा

वाईट आठवणी मनी खोल ठेवायच्या

अन मनोबंधनाच्या कड्या लावायच्या

सदैव साथ देणाऱ्याना नित्य जपायचं

बाकी कोण कसं वागलं हे विसरायचं

एकांतात आठवांची कवाडं उघडतात

मिटल्या पापण्यांतून आसू ओघळतात

मनमुक्त बोलायला कुणीच साथ नसतं

मग स्वतःच स्वतःला सावरायचं असतं

क्षणी आनंदाच्याही आठवणी दाटतात

अन भावनांच्या हिंदोळ्यावर झुलतात

मन जणू आठवांचा खोल डोह असतो

हलक्या स्पर्शानेही त्यावरी तरंग उठतो

- स्नेहल मोडक

Wednesday, September 27, 2023

मोरपीस

 कपाटात काहीतरी शोधताना

 जपलेलं गाठोडं हाती लागतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

 जपून ठेवलेल्या पुस्तकातलं

 सुकलेलं पिंपळपान दिसतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

 कधी माळ्यावरच्या रद्दीत

 जुन्या गीतांचं पुस्तक मिळतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

 शुभ्र खळाळत्या निर्झरात 

 हलकेच पाऊल पडतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

 अथांग निळ्या सागरतीरावर

 शंखशिंपल्यांचं शिंपण दिसतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

 गर्द हिरव्या वनराईमधून

 सुरेख कौलारु घर दिसतं

 अन आठवणींचं मोरपीस

 अलगद मनावर फिरतं

- स्नेहल मोडक

Thursday, August 17, 2023

आला श्रावण श्रावण

               श्रावण हा शब्द जितका लयदार तितकाच सारा महिना. वर्षाऋतूमधला एक महत्त्वाचा महिना. या काळात सतत उनपावसाचा सुंदर खेळ सुरु असतो. श्रावण जसा व्रतवैकल्यांचा तसाच भटकंतीचाही. या दिवसात कोकणातील भटकंती म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी अनमोल नजराणाच. शुभ्र खळाळते निर्झर, गर्द हिरवी वनराई, दरीडोगंरातील दाट धुकं आणि उनपावसाचा सुंदर खेळ हे सारं मनात आणि छायाचित्रात साठवण्यासाठी कोकणात भटकणं गरजेचंच. विविध रंगांनी सजलेला श्रावण सर्वांना हवाहवासाच. कुणी या महिन्यातल्या व्रतवैकल्यांवर खुश असतं, कुणाला या महिन्यात केल्या जाणाऱ्या गोडधोड पदार्थांची आवड असते तर कुणाला निसर्ग सौंदर्य पहात भटकायला आवडतं. पण प्रत्येक जण आपापल्या परीने श्रावण साजरा करतोच. 


रिमझिम रिमझिम श्रावणधारा

नभी उमटे इंद्रधनुचा पिसारा

पाचुच्या वनी धुंद ऋतू गंधाळला

निर्झरी अनाहत नाद झंकारला

रानफुलांनी पाऊलवाटा सजल्या

जलबिंदूनी तरुवेली मोहोरल्या

सर येताच अवचित तळी साचती

सोनकिरणांत सुंदर चमचमती

मुक्त विहरती वनात स्वप्नांचे पक्षी

कुसुमांवरी फुलपाखरांची नक्षी

मखमली साजात सृष्टी सुखावली

माहेरा लेक लाडकी विसावली

श्रावण हा सारा जणू धून मुरलीची

ऐकून नादती पैंजणे त्या राधेची

ऐकून नादती पैंजणे त्या राधेची 

 - स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...