२४ तारखेला सकाळी लवकरच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या दिवशी आम्ही ज्या दर्शनासाठी आसुसलेले होतो ते दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. नापलच्यु गावाहून आदि कैलासचा बेस कॅम्प असलेल्या 'जोलिंगकाॅंग' या गावात आम्हाला पोचायचं होतं. रस्ता अतिशय खडतरच होता. त्या अवघड रस्त्याने प्रवास करुन आम्ही जोलिंगकाॅंगला पोहोचलो. जीपमधून उतरलो आणि भान हरपून पहातच राहिलो. पावलं जणू जागच्या जागी खिळून राहिली. समोर संपूर्ण बर्फाच्छादित शुभ्र धवल 'आदि कैलास' अप्रतिम दर्शन घडवत होता.
'आदि कैलास' हे पर्वत शिखर 'उत्तराखंड' राज्यातील 'पिथौरागढ' जिल्ह्यात 'भारत'- 'तिबेट' सीमेवर 'कुमाऊँ' प्रांतात आहे. आदि कैलास हे 'पंच कैलास' मधलं दुसरं महत्त्वाचं शिखर. कैलास पर्वतासारखाच हा पर्वतही पिरॅमिड सारखा दिसतो. याच कारणामुळं याला 'छोटा कैलास' असंही म्हणतात. हे 'भगवान शिव' आणि 'माता पार्वती' यांच्या पूर्ण परिवाराचं ('कार्तिकेय' आणि 'गणपती') अतिप्राचीन निवासस्थान आहे. या शिखराच्या पायथ्याशी पार्वती सरोवर, पार्वती मंदिर आणि गौरी कुंड आहे. अनेक ऋषीमुनींची ही तपोभूमी आहे. अतिशय दिव्य अशी आध्यात्मिक उर्जा इथं अनुभवायला मिळते.
अशा या अत्यंत पवित्र अशा 'आदि कैलासा'चं प्रथम दर्शन घेऊन, तिथंच नतमस्तक होऊन जरावेळ थांबुन पुढं ट्रेकला निघालो. साधारण तीन किमी. अंतरावर पार्वती सरोवर आणि पार्वती मंदिर आहे. अंतर कमी असलं तरी अतिशय खडी चढाई आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जवळजवळ १५,००० फुट उंचीवरचा हा ट्रेक आहे. त्यामुळं अति उंची आणि ऑक्सिजनची कमतरता या कारणांमुळं हा कमी अंतराचा ट्रेक करणंही अवघड असतं.
आम्ही हळूहळू चालायला सुरुवात केली. थोडं सरळ वाटेनं चालूनही दमायला होत होतं. पुढे खडी चढाई सुरु झाली आणि सगळ्यांचीच दमछाक होऊ लागली. मग अगदी सावकाश चालत, थांबत थांबत ही चढाई पूर्ण करुन अखेर आम्ही पार्वती सरोवराजवळ पोहोचलो. पार्वती सरोवर पाहून पुढं पार्वती मंदिराकडे निघालो. खरंतर इथपर्यंत येईपर्यंत अतिशय थकवा आला होता. पण प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला आणि क्षणात सारा थकवा नाहीसा झाला. नैवैद्य अर्पण करुन मी 'पार्वती माते'समोर नतमस्तक झाले आणि एक अनामिक जाणीव झाली. सारा देह पिसासारखा हलका होऊन आदि कैलासाच्या पायथ्याला स्पर्श करुन नतमस्तक झाला असल्याचं जाणवलं. अगदी काही क्षणांची ही जाणीव अतिशय विलक्षण अनुभूती देऊन गेली. नंतर मंदिरातच बसून आम्ही थोडं नामस्मरण आणि स्तोत्र पठण केलं. भाविकांची गर्दी वाढायला लागली म्हणून मंदिराबाहेर आलो. २४ तारखेलाच 'प्रदोष' होता. आणि प्रदोष काळात 'भगवान शिव शंकराचं' दर्शन घेणं अत्यंत शुभ फलदायी मानलं गेलं आहे. त्यामुळं या प्रदोष काळातच आम्हाला 'शंभु महादेवा'चं म्हणजे आदि कैलास सारख्या अतिशय महत्त्वाच्या शिखराचं दर्शन घडलं ही स्वयं महादेवांची आणि श्री दत्तात्रेयांचीच कृपा.
इथून पुढं गौरी कुंडाच्या दर्शनासाठी जायचं होतं. त्यासाठीही अजून तीन किमी.ची खडी चढाई चढावी लागणार होती. मात्र माझ्या सहचराची तब्येत आधीच बिघडली असल्यानं आम्हाला पुढं जाणं जमणार नव्हतं. त्याला अति थंडी, अति उंची आणि अवघड ट्रेक मुळे खूप त्रास होत होता. अखेर पार्वती सरोवर आणि मंदिर दर्शन घेऊन आम्ही तिथंच थांबलो. आमच्या ग्रुपमधील २-३ जणं पुढं गौरी कुंडाचं दर्शन घ्यायला गेले. याच्या तब्येतीच्या त्रासामुळं आमच्या जीपच्या ड्रायव्हरला जीप वरपर्यंत आणायला परवानगी मिळाली. आणि आम्ही बेस कॅम्प पर्यंत जीपनेच परत आलो. सकाळी बेस कॅम्पला उतरल्यापासून पूर्ण वेळ सातत्यानं आदि कैलासाचं अप्रतिम दर्शन घडत होतं. अर्थात कितीही पाहिलं तर मन भरतच नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त आदि कैलास पर्वतावरच शुभ्र बर्फ होता. आजुबाजूच्या कुठल्याही पर्वत शिखरावर बिलकुल बर्फ नव्हता. यामुळं आदि कैलास साऱ्या पर्वत रांगेत अतिशय अप्रतिम दिसत होता. थोडावेळ थांबून, भोजन करुन, पाणावलेल्या डोळ्यांनीच आम्ही नापलच्युला निघालो. अति उंचीवरुन थोडं खाली आल्यावर याच्या तब्येतीचा त्रास कमी झाला होता. होम स्टे ला पोहोचून आम्ही आराम केला.
२५ तारखेला सकाळी लवकर आम्ही पुढील दर्शनासाठी निघालो. हा प्रवास ही आधीसारखाच अवघड खडतर रस्त्यावररुन होता. हा प्रवास करुन आम्ही 'नाभीढांग' या १४,००० फुट उंचीवर असलेल्या गावात बेस कॅम्प ला पोहोचलो. गाडीतून उतरलो आणि पुन्हा एकदा मंत्रमुग्ध झालो. समोर ओम पर्वताचा अप्रतिम नजारा दिसत होता.
ओम पर्वत - भारत, नेपाळ आणि तिबेट या तिन्ही देशांच्या सीमारेषेजवळ हा अतिशय पवित्र आणि रहस्यमय पर्वत आहे. 'आदि कैलास' आणि 'ओम पर्वत' हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हा पर्वतही महादेवांचं निवासस्थान म्हणून ओळखला जातो. इथं बर्फ, आणि शिखरावर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या आकारातून ओम हा आकार अतिशय स्पष्ट दिसतो. अशी मान्यता आहे की एकुण आठ ओम पर्वत भारतात आहेत. पण आतापर्यंत या एकाच पर्वताचा शोध लागला आहे. अतिशय अप्रतिम नयनरम्य असं हे पर्वत शिखर आहे. इथंही शिव मंदिर आहे. तिथं जाण्यासाठीही थोडी खडी चढण चढावी लागते. मंदिर परिसर शिखराच्या थोडा अजून जवळ आहे.
आम्ही चढ चढून मंदिरात गेलो. या छोट्याशा मंदिरात शिवपिंडी आहे. त्यावर जल अर्पण करता येतं. ओम पर्वताचं अत्यंत नयनरम्य दृश्य इथून पहाता येतं. थोडावेळ इथं थांबून डोळे भरुन दर्शन घेऊन आम्ही खाली परत आलो. आम्ही सकाळी निघायच्या आधीपासूनच ढगाळ हवामान होतं. त्यामुळं दर्शन छान होईल की त्यासाठी थांबावं लागेल अशी साशंकता होती. पण महादेवांच्या आणि श्री दत्तात्रेयांच्या कृपेनं अतिशय सुंदर दर्शन घडलं. अनंत चतुर्दशी दिवशीच ओम पर्वताचं दर्शन घडणं ही आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट होती.
'काली मंदिर' - नाभीढांग पासून ९ किमी. अंतरावर कालापानी इथं हे 'काली माता' मंदिर आहे. या मंदिराच्या मागेच असलेल्या हिमनद्यांमधून काली नदीचा उगम होतो. या मंदिराच्या परिसरातून काली नदीचा प्रवाह सतत वहात असतो. त्याला स्थानिक लोकं पवित्र आणि चमत्कारिक प्रवाह मानतात. या मंदिराच्या समोरच पर्वतांमध्ये 'व्यास गुंफा'आहे. जिथं महर्षी व्यासांनी तपश्चर्या केली होती. सध्या या कालीमंदिराची देखरेख भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून केली जाते. सारा परिसर अतिशय रमणीय आहे. आम्ही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिरात कालीमातेची अतिशय रेखीव मूर्ती आहे. आणि बाजूलाच काली नदीच्या प्रवाहाचं छोटंसं कुंड आहे. सध्या इथं मराठा रेजिमेंट कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना भेटून आम्हाला खूप समाधान वाटलं. इथं त्यांनी गणेश चतुर्थी निमित्त श्री गणरायाचीही प्राणप्रतिष्ठा केली होती. अनंत चतुर्दशी च्या दिवशी ओम पर्वता बरोबरच आम्हाला इथल्या बाप्पाचंही दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं. मन अगदी प्रसन्न झालं होतं. हे दर्शन घेऊन पुढं थोड्याच अंतरावर असलेलं 'शिवधारा' हे गरम पाण्याचं कुंड बघितलं आणि मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. लगेच सारं आवरुन मुक्काम सोडून परत निघालो. आमची दोन्ही मुख्य दर्शन अतिशय सुंदर, अगदी निर्विघ्न झाली होती. आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. थोडासा पाऊस पडून गेला. त्याच अत्यंत खराब रस्त्यानं प्रवास करुन सायंकाळी धारचुला इथं पोहोचलो. मधल्या दिड दिवसात त्याच मार्गावर अजून दरडी कोसळल्यानं रस्ता अतिशयच अवघड झाला होता. मात्र आमच्या दोन्ही ड्रायव्हरनी अत्यंत कौशल्यानं आणि काळजीपूर्वक गाडी चालवत आम्हाला सुखरूप धारचुला ला परत आणलं होतं. त्या दिवशी आमचा मुक्काम धारचुला इथंच होता. आम्ही इथं पोहोचलो तोपर्यंत जोरदार पाऊस सुरु झाला होता.
२६ तारखेला सकाळी अगदी लवकर आवरुन आम्ही नेपाळला निघालो. २५ तारखेला सायंकाळी आम्ही आमच्या जीप सोडल्या होत्या. आता परतीचा प्रवास ट्रॅव्हलर ने करायचा होता. त्या गाडीने आम्ही भारत नेपाळ सीमारेषेवर गेलो. तिथं प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन काली नदीवरच्या झुलत्या पुलावरुन चालत पलिकडे नेपाळमध्ये गेलो. अर्थात भल्या सकाळी तिथं अगदी ५-६ दुकानंच उघडलेली होती. आणि पाऊसही जोरदार पडत होता. काली नदीची पातळी खूप वाढली होती. पाऊस थांबला नाही तर पुल जाण्यायेण्यासाठी बंद करावा लागणार होता. आम्ही तिथं अगदी थोडंसं फिरुन परत आलो. तिथून परत मुक्कामी येऊन सामान घेऊन परत पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे हल्दवानीला निघालो. आमचा प्रवास सुरु होता त्यामध्येच आमच्या ड्रायव्हरला पिथौरागढजवळ मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन रस्ता बंद झाला असल्याची माहिती मिळाली. मग खूप लांबून जवळपास १०० किमी. चा वळसा घालून आम्ही कैची धामच्या जवळ पोहोचलो आणि वाहतूक कोंडीत अडकलो. कैची धामच्या थोडं आधीही दरड कोसळली होती. एक कार त्यात दबली होती. साधारण दिड तासानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आणि आम्ही पुढं गेलो. रात्री उशीरा आम्ही मुक्कामी पोहोचलो. श्री दत्तात्रेयांच्या कृपेनं आमची सगळी दर्शनं अतिशय सुंदर, निर्विघ्न झाली. त्यानंतर मात्र सगळीकडे जोरदार पाऊस सुरु झाला होता.
२७ तारखेला सकाळी आम्ही हल्दवानी हून मुक्काम सोडून दिल्लीला निघालो. दिल्ली हून सायंकाळी आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता.
२७ तारखेलाच आदि कैलास आणि ओम पर्वतावर बर्फवृष्टी झाली. पायथ्याशी पाऊस पडतच होता. त्यामुळं २६ ते २८ तारखेला यात्रा थांबवण्यात आली होती. आम्ही यात्रेला निघण्याआधीही अशीच परिस्थिती होती. खूप पाऊस पडत होता. धारचुला ते तवाघाट मार्गावरचा मुख्य 'कुलागाडा पुल' १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाहून गेला होता. त्यामुळं १५ सप्टेंबर पासून सुरु होणारी ही यात्रा थांबवण्यात आली होती. ती पुल बांधून झाल्यावर २० सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली. आमची यात्रा मात्र नेहमीप्रमाणं श्री दत्तात्रेयांच्या आणि शंभू महादेवांच्या कृपेनं अतिशय उत्तम झाली.
खरंतर मी या यात्रेऐवजी कैलास मानसरोवर यात्रेला जायचं ठरवलं होतं. सगळी माहिती काढून बुकिंग करायचं ठरलं आणि अचानक ट्रॅव्हल्स च्या आयोजकांचाच मला फोन आला. त्यांनी मला सध्या या यात्रेला जाऊ नये असं सुचवलं. ते स्वतः दोन दिवसांपूर्वी कैलास मानसरोवर यात्रा करुन आले होते आणि तिथं खूप बर्फवृष्टी झाली होती आणि त्यात १-२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यामुळं ती यात्राही तात्पुरती थांबवली होती. तसंच तिथं भारतीयांची सारी कागदपत्रे असूनही अडवणूक करत आहेत. त्यामुळं या परिस्थितीत यात्रेला जाणं टाळावं असा सल्ला दिला. याच बरोबर अजूनही दोन ठिकाणाहून आम्ही ही यात्रा सध्या करु नये असा सल्ला मिळाला. मग मात्र मी माझा विचार बदलून यात्रेला जायच नाही असं ठरवलं. आणि मग कैलास मानसरोवर नाही तर आदि कैलास चं तरी दर्शन घडवा अशी दत्तगुरुंना प्रार्थना करुन ही यात्रा केली. आमची वेळ आली होती का नव्हती माहीत नाही पण श्री दत्तात्रेयांनीच आम्हांला कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यापासून परावृत्त करुन रक्षण केलं हीच आमची धारणा आहे. कारण आम्ही ज्यावेळी यात्रेला जायचं ठरवलं होतं त्याचवेळी नेपाळमध्ये महाभयंकर प्रलय आला होता. त्यामुळं आपली कितीही इच्छा असली तरी एखाद्या स्थानाचं दर्शन घडणं न घडणं हे स्वयं श्री दत्तात्रेयांच्या इच्छेवरच अवलंबून असतं. त्यांच्या चरणी आपण संपूर्ण शरणागत असलो तर पूर्णपणे ते आपली काळजी घेतात हे खरंच आहे.
- स्नेहल मोडक













