Pages

Showing posts with label Girnar Experience. Show all posts
Showing posts with label Girnar Experience. Show all posts

Saturday, March 28, 2026

नर्मदे हर

           'नर्मदा मैया'ची 'उत्तर वाहिनी परिक्रमा' गुढी पाडव्यापासून सुरु होते. त्या परिक्रमेची तयारी खूप आधीच करावी लागते. त्यानुसार आमचीही सारी तयारी आधीच करुन झाली होती. वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पौर्णिमेपर्यंत न थांबता यावर्षी आम्ही पाडव्यानंतर लगेच परिक्रमा करायचं ठरवलं होतं. 

              ठरल्याप्रमाणे २२ मार्च रोजी रात्री आम्ही परिक्रमेसाठी प्रस्थान केलं. २३ तारखेला पहाटे वडोदऱ्याला पोहोचलो. तिथून आधीच ठरवलेल्या दोन ट्रॅव्हलर्स आणि मोठ्या कारने आम्ही सकाळी साडेसात वाजता मुक्कामी पोहोचलो. सारं आवरुन लगेच नेहमीप्रमाणं मुक्काम स्थानापासून जवळच असलेल्या 'त्रिवेणी संगमा'वर स्नानासाठी गेलो. इथं 'नर्मदा मैया', 'ओरसंग नदी' आणि 'गुप्त सरस्वती' असा 'त्रिवेणी संगम' आहे. इथं स्नान करण्याचा अनुभव नेहमीच अतिशय सुंदर असतो. मैयाजळात उतरल्यावर क्षणातच अगदी आईच्या कुशीत शिरल्याचा आभास होतो. लेकराला माय जशी आंदुळते अगदी तस्से मैया जळाचे हलके तरंग आपल्या भोवती उठतात. आणि त्या तरंगांसारखंच आपलं मनही उत्फुल्ल होतं. आम्ही स्नानाला जळात उतरलो तेव्हा पूर्वेला नुकताच 'वासरमणी' अवतरला होता. मग स्नान करतानाच त्यालाही अर्घ्य अर्पण केलं. थोडावेळ मैयाचा सहवास अनुभवून आम्ही मुक्कामी परत आलो. सारी तयारी करुन 'उत्तर वाहिनी परिक्रमे'ची संकल्प पूजा केली. त्यानंतर तिथंच भोजन केलं.

               दुपारच्या भोजनानंतर अगदी थोडा आराम करुन लगेच पुढील दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी जवळच असलेल्या 'कुबेर भंडारी' मंदिरात गेलो. तिथं दर्शन घेऊन पुढे 'भालोद'ला पोहोचलो. आमच्या प्रत्येक परिक्रमेत आणि एरवीही जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही इथं येतोच. इथं 'एकमुखी श्री दत्तात्रेय', 'वासुदेवानंद सरस्वती' यांचं दर्शन घेतलं. आणि तिथल्या 'प्रतापे महाराजां'ना नमन करुन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो. दरवेळी आम्हाला त्याच्याकडून नवनवीन माहिती मिळते. त्यामुळं त्यांना भेटणं ही आमच्यासाठी पर्वणीच असते. त्यांच्या नुसत्या दर्शनानं, थोडंसं बोलण्यानंही एक वेगळीच आंतरिक उर्जा आम्हाला जाणवते. यावेळी खरंतर ते दोन दिवसांपूर्वीच परगावी जाणार होते. पण काही कारणास्तव त्यांचं जाणं स्थगित झालं. आणि आम्ही जेव्हा आश्रमात गेलो तेव्हाही ते एका कामासाठी बाहेर जाणारच होते. पण काही भक्त दर्शनासाठी आल्यानं ते थांबले आणि तेवढ्यातच आम्ही तिथं पोहोचलो. एकूण महाराजांच्या भेटीचा योग होता. अन्यथा आम्हाला फारच रुखरुख लागली असती हे नक्की. अतिशय साधं, प्रेमळ आणि प्रसन्न असं हे महारांजांचं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच अध्यात्मिक उर्जा देतं आलंय. त्यांच्याशी बराच वेळ वार्तालाप करुन वेळेच्या बंधनामुळं तिथून निघालो.

                भालोदहून आम्ही 'शूलपाणी' मंदिरात दर्शनासाठी गेलो. अर्थातच तोपर्यंत सायंकाळ झाली होती. मग तिथंच थांबायचं असं ऐनवेळी ठरवलं आणि नर्मदा मैयाच्या घाटावर गेलो. खरंतर तिथं बराच वेळ थांबल्यावर इतरत्र कुठंही न जाता मुक्कामी परतावं लागणार होतं. पण तिथं होणारी अप्रतिम अशी मैयाची आरती आम्हाला पहायचीच होती. अखेर त्यांच्या ठरलेल्या वेळी म्हणजे रात्री ८ वाजता प्रत्यक्ष आरतीला सुरुवात झाली. आणि क्षणार्धात सारं वातावरण चैतन्यमय झालं. आम्ही तर अगदीच जवळ बसलो होतो. धूप आणि कापूर यांच्या सुगंधानं मनही प्रसन्न झालं. मैयाची अतिशय सुंदर अशी आरती सुरु होती. आणि समोर प्रवाहातून प्रत्यक्ष मैया जणू सगुण साकार झाली होती. तनमनात वेगळीच स्पंदनं जाणवत होती. आरती संपली आणि नर्मदाष्टक सुरु झालं. नर्मदा अष्टक संपलं आणि अत्यंत देखणा असा 'लेझर शो' सुरु झाला. शिवतांडव स्तोत्र त्या लेझर शो मधून उलगडलं. अगदी मंत्रमुग्ध करणारा असा हा कार्यक्रम होता. सारा कार्यक्रम संपल्यावर मैयाचं दर्शन, आरती आणि तीर्थ घेऊन आम्ही मुक्कामी परतलो. आरती संपायला ९ वाजून गेले होते. त्यानंतर तिथून निघून वाटेत जेवून मुक्कामी पोचायला ११.३० वाजले होते. 

                   परिक्रमेसाठी (२४ तारखेला) पहाटे ३ वाजता आम्हाला निघायचं होतं. आमच्या मुक्कामापासून आम्ही जिथून परिक्रमा उचलणार होतो तिथं पोचायला एक तास लागणार होता. सारी आन्हिकं आवरुन निघायला अखेर साडेतीन वाजले. काही भक्तांच्या उशीरा येण्यानं बाकी सर्वांनाच ताटकळावं लागलं. अखेर पावणे पाच वाजता आम्ही परिक्रमा जिथून उचलणार होतो तिथं म्हणजे 'रामपुरा' गावात 'धनेश्वर मंदिरा'जवळ पोहोचलो. याआधीच्या परिक्रमा आम्ही 'तिलकवाडा'- 'रामपुरा'- 'तिलकवाडा' अशाच केल्या होत्या. पण पूर्वीच आम्हाला श्री प्रतापे महाराजांनी या उत्तर वाहिनी परिक्रमेबद्दल माहिती दिली होती. मुळात नर्मदा मैया रामपुरा इथं उत्तर वाहिनी होते ती तिलकवाडा पर्यंत उत्तर दिशेने वाहते. आणि तिलकवाड्यापासून परत ती पश्चिम वाहिनी होते. त्यामुळं खरी परिक्रमा 'रामपुरा'- 'तिलकवाडा'- 'रामपुरा' अशी करायची आहे. पण भाविक दोन्ही बाजूंनी ही परिक्रमा करतात. फार पूर्वी पासून सुरु असलेली ही परिक्रमा काही काळ बंद झाली होती. श्री प्रतापे महाराजांनी पून्हा ही परिक्रमा सुरु केली आणि शास्त्रानुसार ती रामपुराच्या धनेश्वर मंदिरापासून सुरु केली. गतवर्षी आम्ही परिक्रमेत धनेश्वर मंदिरात गेलो असताना तिथल्या साधकांनीही परिक्रमा याच मार्गानं होते असं सांगितलं. पण आम्ही सारा कार्यक्रम ठरवताना तिलकवाडाहूनच परिक्रमा करायचं ठरवलं होतं. मात्र आम्ही परिक्रमेला घरुन प्रस्थान करायच्या ५-६ दिवस आधी मला अचानक मैयाकडून रामपुराहून परिक्रमा सुरु करण्याचा संकेत मिळाला. मनात थोडी चलबिचल झाली. पण आमच्या मुक्कामापासून जेमतेम एक तासावरच 'धनेश्वर मंदिर' आहे हे पहाताच यावेळी मैयाच्या संकेतानुसार रामपुराहूनच परिक्रमा उचलायचं नक्की केलं. 

               धनेश्वर मंदिरात दर्शन प्रसाद घेऊन पहाटे साडेपाच वाजता परिक्रमा सुरु केली. मार्गातीलं साऱ्या मंदिरांचं कधी आत जाऊन कधी बाहेरुन दर्शन घेत होतो. 'नर्मदा मैया' कुमारीका असल्यानं इथं 'कन्यापूजना'ला अतिशय महत्व आहे. पूर्ण परिक्रमा मार्गावर या काळात अनेक कन्यका मुखानं 'नर्मदे हर' चा गजर करत उपस्थित असतात. सारे परिक्रमावासी आपापल्या परीने त्यांना दक्षिणा, खाऊ, शालेय साहित्य, शृंगार साहित्य असं देऊन एक प्रकारे मैयाची सेवा करतात. आम्हीही मार्गातील अशा कन्यकांना दक्षिणा खाऊ देत चाललो होतो. भल्या पहाटे अंधारात अशा कुमारिकांना तिथं पाहून मनात विचारांची गर्दी होतेच. एका ठिकाणी अशीच एक अगदी लहान कन्या एकटीच बसली होती. थोडं उजाडलं होतं. मी तिला खाऊ दिला आणि ती चटकन 'नर्मदे हर' म्हणाली. मीही 'नर्मदे हर' म्हणताच एकदम गोड निर्व्याज हसली आणि त्या क्षणीच माझ्या तनमनावर एक शिरशिरी उमटली. तिचं ते लाघवी हास्य पहाताच मला प्रत्यक्ष नर्मदा मैयाच हसत असल्याचा भास झाला. मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. क्षणातच भानावर आले त्या कन्येच्या गालाला हलकासा स्पर्श केला आणि मी पुढे निघाले. मग मनात विचार आला तिचं गोड हसतानाचं छायाचित्र घ्यायला हवं होतं. पण लगेच दुसऱ्या क्षणी जाणवलं की माझ्या मन:पटलावर तर तिचा गोड चेहरा उमटलाय तो तर पुसला जाणार नाही. मग माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. 

                 आम्ही पुढे चालत राहिलो आणि नंतर तात्पुरत्या बांधलेल्या पुलावरुन 'तट परिवर्तन' केलं. किनाऱ्यावर थोडं चालत एक उंच चढण चढून गेलो. इथं याचवर्षी पायऱ्या बांधल्या आहेत. यापूर्वी ही चढण चढायला थोडी अवघडच होती. वर येऊन 'वासुदेव कुटीर' मध्ये गेलो. तिथं 'मारुतीराया' आणि 'शंभु महादेवाचं' दर्शन घेऊन थोडंसं नर्मदाजल अर्पण करुन‌ त्या किनाऱ्यावरुन परत चालायला सुरुवात केली. मार्गात ठिकठिकाणी सेवा म्हणून चहा, पाणी, ताक, नाश्ता, भोजन देणाऱे, मुक्कामाची व्यवस्था करणारे काही आश्रम आहेत. एखाद्या ठिकाणी ताक पिऊन आम्ही पुढे चालत होतो. चालत 'नंदी घाटा'वर पोहोचलो आणि सर्वांनी एकत्र एकाच नावेतून पून्हा 'तट परिवर्तन' केलं. नावेतून जात असतानाच आमच्या जवळचं थोडंसं 'नर्मदाजल' प्रवाहात अर्पण करुन प्रवाहातलं जल आमच्या कुपीमध्ये भरुन घेतलं. याला 'तीर्थ मिलन' म्हणतात.  नावेतून उतरुन वर आलो आणि तिथल्या 'तीर्थेश्वर महादेवा'च्या मंदिरात गेलो. महादेवाला थोडं जल चढवून परत चालायला सुरुवात केली. पून्हा धनेश्वर मंदिरात पोहोचून धनेश्वराला थोडं जल चढवलं आणि आमची परिक्रमा पूर्ण झाली.अलवार उमलणाऱ्या पहाटेला साक्षी ठेवून, मार्गात होणारा नर्मदे हर चा गजर, मनात सुरु असणारं नामस्मरण आणि बाजून संथ, शांत वाहणारी नर्मदा मैया या सर्वांबरोबर केलेली परिक्रमा म्हणजे अतिशय सुंदर अशीच अनुभूती. 

                परिक्रमा पूर्ण करुन आम्ही परत मुक्कामी आलो. यावेळी पहिल्यांदाच आम्हाला परिक्रमा पूर्ण झाल्यावर २१ कुमारिकांना 'कन्यापूजना'साठी बोलावण्याचं भाग्य लाभलं होतं. अर्थात आम्ही जिथे राहिलो होतो त्यांनीच ही व्यवस्था केली होती. तिथे जवळच असलेल्या शाळेत शिकणाऱ्या छोट्या छोट्या कुमारिका आल्या होत्या. आम्ही त्यांचं पूजन करुन दक्षिणा, खाऊ आणि इतर वस्तू दिल्या. आणि लगेचच भोजनासाठी पानं वाढली. साऱ्याजणी भोजन करुन दिलेल्या वस्तू घेऊन आनंदानं परत गेल्या आणि आम्ही सारे तृप्त झालो. आमच्या उत्तर वाहिनी परिक्रमेची सांगता अगदी छान अशा कन्यापूजनानं झाली.

                   आम्हीही जेवून सारं आवरुन मुक्काम सोडून निघालो. २३ तारखेला वेळेअभावी 'गरुडेश्वरा'चं दर्शन राहिलं होतं. त्यामुळं आधी गरुडेश्वराचं दर्शन घेतलं. आणि वडोदरा स्टेशन वर निघालो. आमचा पुढचा प्रवासाचा टप्पा परत वडोदऱ्याहून सुरु होणार होता. आमच्यापैकी जवळपास अर्धे भाविक वडोदऱ्याहून परत जाणार होते. आणि आमच्यासह अर्धे भाविक वडोदऱ्याहून 'गिरनार'ला जाणार होते.

                      त्यानुसार रात्री प्रवास सुरु करुन २५ तारखेला पहाटे आम्ही 'जूनागढ'ला पोहोचलो. मुक्कामी पोचून सारं आवरुन लगेच दर्शनाला गेलो. कुठलाही महत्त्वाचा दिवस नसतानाही दर्शनासाठी पौर्णिमेसारखीच गर्दी होती. रोपवेनं अंबामाता मंदिरापर्यंत पोचून पुढे पायऱ्या चढून गुरु शिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन नतमस्तक झाले. अतिशय सुंदर दर्शन घडलं. पुन्हा खाली उतरुन नेहमीच्या ठिकाणी बसून गुरुचरित्र वाचन केलं. नंतर अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवे ने पायथ्याशी गेलो. थोडा आराम करुन परत दर्शनासाठी निघालो. नेहमीप्रमाणं 'नाग मंदिर', 'भालका तीर्थ', 'गीता मंदिर',  'त्रिवेणी संगम' ही सारी दर्शनं घेत 'सोमनाथ' ला पोहोचलो. सोमनाथ दर्शन घेऊन जेवून रात्री उशिरा मुक्कामी परत आलो. 

                       २६ तारखेला सकाळी लवकर आवरुन दर्शनाला निघालो. त्या दिवशी 'श्री राम नवमी' असल्यानं आधी 'श्री रामरायाचं' दर्शन घेऊन 'भवनाथ महादेवा'चं दर्शन घेतलं. मुक्कामी परत येऊन सामान घेऊन मुक्काम सोडून परतीच्या प्रवासाला लागलो. 

                        प्रवासाला निघायच्या दिवसापासूनच माझ्या तब्येतीनं असहकार पुकारला होता. जोरदार कसकस, डोकेदुखी, घसादुखी सुरु झाली होती. औषंधं घेऊनच सारी यात्रा केली. अर्थातच श्री दत्तात्रेयांच्या आणि नर्मदा मैयाच्या कृपेनंच माझी ही यात्रा पूर्ण झाली. 

                    पूर्ण श्रध्देनं केलेली नर्मदा परिक्रमा नेहमीच अतिशय सुंदर अनुभूती देते. गिरनार दर्शनही श्री दत्तात्रेयांच्या कृपेनंच सुंदर रित्या घडतं. 

|| नर्मदे हर||      ||जय गिरनारी||

                              - स्नेहल मोडक






Wednesday, February 4, 2026

माघ पौर्णिमा

             माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म्हणजेच १ फेब्रुवारीला 'गिरनार' दर्शनासाठी जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं ३१ जानेवारीला दुपारी आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

            १ फेब्रुवारीला भल्या पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षानं तलेटीला मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. आदल्या दिवशी प्रवासातच १ तारखेलाच गिरनारला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याचं कळलं होतं. त्यासाठी ३१ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून ते १ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत गिरनारच्या पायऱ्या चढून दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. ही स्पर्धा पहिल्या पायरीपासून अंबाजी मंदिर ते परत पहिली पायरी अशी असल्यानं भाविकांना या काळात पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश नव्हता. त्यामुळं साहजिकच रोप वे साठी प्रचंड गर्दी झाली होती. खरंतर दर पौर्णिमेला उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढतच आहे. आणि याच दिवशी मॅरेथॉन आयोजित करुन भाविकांना पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश बंदी करणं हे अगदी त्रासदायक आहे. यापूर्वीही पौर्णिमेलाच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा गोष्टींचा भाविकांना नक्कीच त्रास होतो. आम्ही त्या गर्दीतून रांगेतूनच साधारण पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर रोपवे नं अंबाजी मंदिरापर्यंत पोहचलो. अंबा मातेचं दर्शन घेऊन पुढे गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरु शिखरावर निघालो. गर्दी प्रचंड होती तरी भाविक एकत्र समुहानं वर चढत असल्यानं दर्शनाला रांग नव्हती. 

            मंदिरातले भाविक दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुदैवानं त्यावेळी मंदिरात आमच्यासह आणि २-३ भाविकच होते. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकांसमोर नतमस्तक होऊन आम्हाला पादुकांसमोरच दिड दोन मिनिटं शांत बसायला मिळालं. लगेचच भाविक दर्शनासाठी आल्यानं लगेच उठलोच. पण ती दिड दोन मिनिटं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती. वाढत्या गर्दीमुळं पौर्णिमेला दर्शन जरी छान होत असलं तरी तिथं बसायला मिळणं अवघड असतं. दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन वाचन करुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवेनं पायथ्याशी पोहोचलो. 

            यावेळी नेहमीप्रमाणं सोरटी सोमनाथच्या दर्शनाला न जाता दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं लगेच दुपारी एक वाजता कारने निघालो. मला जिथं जायचं होतं तिथं आधी बाकी तिघंही आधी जाऊन आले होते. मात्र माझा योग आता आला होता.

             'जांबुवंत गुहा' - जूनागढ पासून १०५ किमी अंतरावर आणि पोरबंदर पासून १७ किमी अंतरावर असलेली ही गुहा पौराणिक, धार्मिक आणि पुरातत्वीयऋ दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. 'पोरबंदर' मधील 'राणावाव' तालुक्यातील 'आदित्याणा' गावाजवळ प्रसिद्ध 'बरडा टेकड्यां'च्या पायथ्याशी ही गुहा आहे. ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. जमिनीवरुन पाहताना एखादी छोटी विहिर असल्यासारखं भासतं. आत उतरण्यासाठी एका खांबाभोवती गोल फिरणाऱ्या अगदी अरुंद दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरताना आधारासाठी मजबूत दोर बांधला आहे. या गुहेत छतामधून सतत टपकणाऱ्या पाण्यामुळं नैसर्गिक रितीनं शिवलिंग तयार झाली आहेत. अजूननही ही निर्मिती सुरुच आहे. यातलं 'पाताळेश्र्वर' हे नैसर्गिक रितीनं तयार झालेलं एकमेव असं 'रुद्राक्ष शिवलिंग' आहे. 'अमरनाथ' ला जसं 'बर्फाचं स्वयंभु शिवलिंग' तयार होतं तसंच हे 'स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग' इथं तयार झालं आहे. जांबुवंतानं भगवान शिवांसाठी इथं तपश्चर्या केली होती. त्यामुळं इथं स्वयंभू शिवलिंग तयार होतात. या सर्व शिवलिंगावर गुहेच्या छतातून नैसर्गिकपणे सतत जलाभिषेक होत असतो. अतिशय भव्य आणि लांबलचक अशा या गुहेत दोन बोगदे आहेत. त्यातला एक बोगदा जूनागढला पोहोचतो आणि दुसरा द्वारकेला पोहोचतो. मात्र आता काही अंतरावर ते बुजले आहेत. नैसर्गिक हवा आणि प्रकाशासाठी गुहेत दोन मोठे झरोके आहेत. जमिनीवरुन खाली एवढी मोठी गुहा असेल याची तिळमात्रही कल्पना येत नाही. 

            'भगवान श्रीकृष्ण' आणि वानरांचा 'राजा जांबुवंत' यांच्यात 'स्यमंतक मण्या'साठी २८ दिवस युद्ध चाललं होतं ते स्थान म्हणजे ही गुहा. अर्थातच 'जांबुवंतां'चा या युद्धात पराजय झाला होता. पण जेव्हा त्यांना कळलं की प्रत्यक्ष 'भगवान श्रीकृष्ण' आपल्या बरोबर युद्ध करत होते तेव्हा त्यांनी ते 'रत्न' म्हणजे 'स्यमंतक मणी' तर 'श्रीकृष्णांना' दिलाच पण त्याचबरोबर आपली कन्या 'जांबुवंती' हिचा विवाहही श्रीकृष्णाबरोबर केला. जांबुवंत हे 'प्रभू श्रीरामां' च्या वानरसेनेचे सेनापती होते पण त्यांना युद्धात सहभागी होता आलं नव्हतं आणि त्याची खंत त्यांना होती म्हणून 'प्रभू श्रीरामां'नी त्यांना 'मी पुढील 'श्रीकृष्ण' अवतारात तुझ्याशी युद्ध करेन' असा आशीर्वाद दिला होता. 'राजा सत्यजिता'नं 'सूर्यदेवा'ची आराधना आणि तपश्चर्या केली होती तेव्हा 'सूर्या'नं त्यांना 'स्यमंतक मणी' प्रसाद म्हणून दिला होता. तो त्याच्या भावाने पळवला पण सिंहाच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी सिंहाला हरवून जांबुवंतानं तो मणी हस्तगत केला होता. आणि या मण्यासाठीच इथं हे युद्ध झालं होतं. 

          या गुहेतील खडक आणि पायाखालची माती मध्ये मध्ये सोन्यासारखी चमकते. याच कारण पुरातत्व विभागाच्या दृष्टीनं इथं नैसर्गिक खनिजं आणि 'बाॅक्साईट' चं प्रमाण जास्त आहे. ही गुहा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळं इथून माती किंवा इतर कुठलीही वस्तू नेण्यासाठी परवानगी नाही. 

            आम्ही गुहेत उतरण्याआधीच किमान २०-२५ जणं गुहेत उतरले होते. पण गुहा अतिशय प्रशस्त आणि लांबलचक असल्यानं गर्दीचा त्रास नव्हता. १०-१५ मिनीटातच ते सारे गुहेतून बाहेर पडले. आम्ही गुहेत उतरलो तेव्हाच गुहा पहायला गुजरातचे एक मोठे वन अधिकारी आणि त्यांच्या बरोबर एक माहितगार पोलीस असे दोघं आले होते. त्यांच्याशी गुहेच्या पौराणिक कथेबद्दल, गुहेत तयार होणाऱ्या शिवलिंगांबद्दल आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल बोलणं झालं. ते दोघं सारं पाहून बाहेर गेले आणि आम्ही चौघंच तिथं राहिलो. मग परत नीटपणे सारी गुहा पाहून, परत 'पाषाणेश्वरा'चं दर्शन घेऊन, तिथली अपार शांतता अनुभवून, सारी शिवलिंग पाहून एक वेगळीच अनुभूती घेऊन आम्ही गुहेतून बाहेर आलो.  ही गुहा वर्षभरात सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत कधीही पहाता येते. 

            'श्रीहरी मंदिर' - 'पोरबंदर' मधलं हे अजून एक सुंदर स्थान. जांबुवंत गुहेपासून १८ किमी अंतरावर आणि पोरबंदर विमानतळापासून ४-५ किमी. अंतरावर हे मंदिर आहे. 'श्रीहरी मंदिर' हे 'सांदिपनी विद्यानिकेतन' म्हणूनही ओळखले जाते. सुप्रसिद्ध भागवताचार्य 'रमेशभाई ओझा' यांच्या प्रेरणेतून  मंदिर उभारण्यात आलं आहे. २००६ साली याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अतिशय अवाढव्य परिसरात भव्य मंदिर आणि बगिचा तयार केला आहे. भगवान श्रीकृष्णांना हे मंदिर समर्पित आहे. मंदिरात राधा कृष्ण, शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, गणपती, हनुमान, सूर्य नारायण, माता करुणामयी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत आहेत. अतिशय भव्य असं हे मंदिर संकुल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या बाजूलाच सांदिपनी संस्कृत विद्यापीठ आहे. एकूण सारा परिसर आणि मंदिर दर्शन चित्तवृत्ती प्रसन्न करणारं आहे. 

            'जांबुवंत गुहा' आणि 'श्रीहरी मंदिर' पाहून आम्ही परत तलेटीला मुक्कामी गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळीच 'भवनाथ महादेवा'च्या मंदिरात गेलो. सुंदर दर्शन घडलं. येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या आवारात जोरदार तयारी सुरु होती. या मंदिराच्या आवारात असलेलं मृगी कुंड अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं आहे. याच कुंडात महाशिवरात्रीला अनेक नागा साधू, संत स्नानासाठी उतरतात मात्र त्यातील एक साधू परत कुंडाबाहेर येत नाही. ते स्वयं भगवान शिव असतात अशी मान्यता आहे. 

            भवनाथाचं दर्शन घेऊन मुक्काम सोडून दुपारच्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

- स्नेहल मोडक




    





Thursday, November 6, 2025

गिरनार परिक्रमा

नि:शंक हो निर्भय हो मना रे |

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ||

      या तारकमंत्राची प्रत्येक दत्तभक्ताला अगदी ठायी ठायी प्रचिती येत असते. आपण पूर्ण श्रद्धेने घातलेली प्रत्येक साद, केलेली प्रार्थना 'श्री दत्तात्रेयां'पर्यंत पोहोचते आणि त्वरित ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या चिंतेचं निवारण करुन आश्वस्त करतात. म्हणूनच तर त्यांना 'स्मर्तृगामी' म्हणतात. त्यामुळेच 'श्री दत्तात्रेयांचं' 'गिरनार' हे अक्षयस्थान दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचं स्थान. प्रत्येक भक्त गिरनार दर्शनाबरोबरच वर्षातून एकदाच करता येणाऱ्या 'गिरनार परिक्रमेची' अतिशय आसुसून वाट बघत असतो. 

         आम्हीही दरवर्षी प्रमाणे या वर्षीही परिक्रमेची ४-६ महिने आधीपासूनच तयारी सुरु केली होती. यावेळी तीन वेगवेगळ्या तारखांना मिळून जवळपास दिडशेच्या वर भाविक आमच्याबरोबर परिक्रमेला येणार होते. त्यानुसार जय्यत तयारीनिशी ३१ ऑक्टोबरला पहिला ५४-५५ भाविकांचा ग्रुप घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान केलं.

        खरंतर यावर्षी दीपावलीनंतरही पावसाचा मुक्काम संपला नव्हता. त्यात भर म्हणून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ आणि त्याचवेळी अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळं भारतातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला होता. महाराष्ट्रासह संपूर्ण गुजरात मध्ये हीच परिस्थिती होती. त्यामुळं यावर्षीच्या गिरनार परिक्रमेवर पावसाचं, वादळाचं सावट होतं. 31 तारखेला प्रवास सुरू केला तेव्हा मार्गात मध्ये पाऊस पडत होता. एक तारखेला पहाटे जेव्हा आम्ही जुनागढ ला पोहोचलो तेव्हा मात्र पाऊस थांबला होता. जुनागढला उतरुन रिक्षाने तलेटीला मुक्कामी पोहोचलो. त्यावेळी पाऊस नुकताच पडून गेला होता पण अतिशय जोरदार वारा सुटला होता. प्रवासात असतानाच गिरनार वरच्या एकूण परिस्थितीची खात्रीशीर माहिती मिळाली होतीच. 

       मुक्कामी पोहोचल्यावर भराभर आन्हिकं आवरुन सगळेच गिरनार दर्शनासाठी निघालो. चार दिवसांपासून वादळी हवेमुळे रोपवे बंदच होता. त्यामुळे रोपवेची तिकिटं आधीच काढलेली असूनही उपयोग नव्हता. तुफान वारा आणि पाऊस यामुळं रोपवे सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. म्हणून आम्ही सगळेच भाविक श्री दत्तात्रेयांच्या दर्शनला दहा हजार पायऱ्या चढून उतरुन जायच्या तयारीनेच निघालो होतो. संपूर्ण गिरनार पर्वत खालपर्यंत उतरलेल्या शुभ्र ढगांमध्ये हरवला होता. वारा आणि पाऊस असल्यानं जास्तीच्या आधारासाठी म्हणून यावेळी इतरांबरोबरच आम्ही दोघांनीही काठी घेतली. नेहमीप्रमाणं लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना करुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. भाविकांच्या अतिशय गर्दीतच आम्हीही चढत होतो. सुदैवानं पाऊस नव्हता पण वारा मात्र जोरदार होता. अर्थात आम्हाला या परिस्थितीची थोडी सवय असल्यानं काळजी नव्हती. पण बऱ्याच भाविकांना या परिस्थितीत एवढं चढण्या उतरण्याची थोडं काळजी वाटत होती. पण रोपवे सुरु नसल्यानं चढून जाणं किंवा डोली ने जाणं एवढेच पर्याय होते. 

      साधारण ५०-६० पायऱ्या चढून गेलो आणि अचानक आम्हाला रोपवे सुरु होणार असल्याची बातमी कळली. मग होतो तिथंच थांबून बातमीची खात्री करुन घेतली. रोपवे आणि पायऱ्या हे दोन्ही मार्ग वेगवेगळे असल्यानं पूर्ण खात्री केल्याशिवाय परत फिरुन उपयोग नव्हता. रोपवे सुरु होण्याची खात्री झाल्यावर मात्र सगळ्यांना संपर्क करुन रोपवे जवळ यायला सांगितलं. जाता जाता वाटेत घेतलेल्या काठ्या परत केल्या. रोपवे जवळ गेल्यावर कळलं ज्यांनी आधीच तिकिटं काढली आहेत त्यांनाच फक्त रोपवेने सोडणार आहेत. त्यामुळं पुढल्या १०-१५ मिनीटांतच आमचा नंबर लागला आणि आम्ही अगदी अनपेक्षितपणे रोपवेने 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ पोहोचलो. दहा हजार पायऱ्या चढून उतरायची मानसिक तयारी केलेली असताना अचानक रोपवे ने जायला मिळालं म्हणून सारेच खुष झाले. अर्थात जाताना रोपवे ने जाता आलं तरी परत येताना रोपवे मिळेलच याची शाश्वती नव्हती. 'अंबा मातेचं' दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. सन्नाट वारा सुटला होता. संपूर्ण गिरनारने शुभ्र मेघांची दुलई लपेटली होती. अतिशय अप्रतिम दृश्य दिसत होतं. ८-१० फुटांपलिकडे काहीच दिसत नव्हतं. अगदी जुलै, ऑगस्ट मध्ये असते तशीच परिस्थिती होती. सन्नाट वाऱ्यात स्वतः ला सावरत पुढे जाणं म्हणजे कसरतच होती. पण एकूणच नयनरम्य अशा वातावरणात चढताना किंचितही श्रम जाणवत नव्हते.

       काही मिनीटांतच आम्ही 'गोरक्षनाथ' मंदिरात पोहोचलो. 'गोरक्षनाथांचं' दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करुन पुढे निघालो. थोड्या पायऱ्या उतरलो आणि तिथूनच दर्शन रांग सुरु झाली. दरवर्षी पेक्षा यावर्षी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. खरंतर परिक्रमेच्या काळात बहुसंख्य भाविक हे चार दिवस जंगलात वास्तव्य करुन परिक्रमा पूर्ण करुन अखेरच्या दिवशी दर्शनाला जातात. पण एक तारखेला परिक्रमा वादळी पावसामुळे सुरु न झाल्यानं सारेच भाविक दर्शनासाठी आले होते. साहजिकच त्यामुळे दर्शन रांग प्रचंड मोठी होती. त्याच रांगेतून आम्ही कमानी पर्यंत पोहोचलो. तिथे नतमस्तक होऊन त्याच रांगेतून प्रत्यक्ष मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिरात प्रवेश केला आणि मी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांसमोर नतमस्तक झाले.‌ त्याक्षणी मनाची पाटी अगदी कोरी होती. कुठलाच विचार, प्रार्थना मनात नव्हती. अतिशय शांत तृप्त मनानं नैवेद्य अर्पण करुन पाणावलेल्या डोळ्यांनी परत एकवार नमस्कार करुन मी पुढे प्रदक्षिणा घालून मंदिराबाहेर आले. एरवी सतत श्री दत्तगुरुंशी संवाद करणारं मन प्रत्यक्ष दर्शन घेताना मात्र नि:शब्द होतं. काही मागणं उरतच नाही. 

      चरण पादुकांचं दर्शन घेऊन परत निघालो तेही रांगेतूनच. नेहमीच्या ठिकाणी बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं आणि अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन घेऊन, देणगी देऊन भोजनप्रसाद घेतला. परत रांगेतूनच खाली उतरायला सुरुवात केली. 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ आलो आणि तिथे अलोट गर्दीत अडकलो. पायथ्यापासून चढून येणारे, रोपवे ने येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे यांची प्रचंड गर्दी झाली होती. एकमेव पोलिस तिथे उभा होता. त्याला एकट्याला या गर्दीवर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. त्या चेंगराचेंगरीत काहीही होऊ शकलं असतं. अखेर २०-२५ मिनिटांनी आम्हाला रोपवे कडे जायला वाट मिळाली. परत येतानाही रोपवे सुरु होता आणि गर्दीही नव्हती. त्यामुळं आम्ही पुढल्या १५-२० मिनिटांतच पायथ्याशी पोहोचलो. तिथेच असलेल्या उपाहारगृहात थोडं खाऊन मुक्कामी परत आलो. रोपवे सुरु झाल्यानं एवढ्या प्रचंड गर्दीतही आम्ही दुपारी १२.३० वाजताच दर्शन घेऊन परत आलो होतो. साधारण साडेतीन चार च्या दरम्यान कळलं की मधल्या वेळेत रोपवे बंद झाला होता. पुन्हा सुरु होईल याची शाश्वती नव्हती. पण आम्हाला मात्र दोन्ही वेळा रोपवेने जायला मिळालं. तुफान वारा असला तरी पाऊस बिलकुल पडला नाही ही  केवळ दत्तगुरुंची कृपाच. चार दिवस बंद असलेला रोपवे जणू आमच्या साठीच सुरु झाला होता. कारण त्यानंतर २-३-४ तारखेलाही परत रोपवे बंद केला होता. फक्त परत येण्यासाठी रोपवे सुरु ठेवला होता तोही हवामानुसार मधेमधेच. 

      ज्या परिक्रमेसाठी गिरनारला भाविकांनी अलोट गर्दी केली होती ती परिक्रमा मुळात एक तारखेला रात्री सुरु होणार होती. पण पाऊस पूर्ण थांबला नव्हता. आणि आधी चार दिवस झालेल्या धुवांधार पावसाने परिक्रमा मार्ग पूर्ण क्षतिग्रस्त झाला होता. प्रचंड चिखल झाला होता, मध्ये मध्ये मार्ग वाहून गेला होता जेवढ्या मार्गापर्यंत वाहने जातात तीही चिखलात रुतून बसण्याची शक्यता होती. त्यामुळं नाईलाजास्तव एक तारखेला परिक्रमा रद्द करण्यात आली. नंतर जर तिथली परिस्थिती सुधारणं शक्य झालंच तर परिक्रमा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल असा निर्णय झाला. आम्ही दोन तारखेलाच भल्या पहाटे परिक्रमा सुरु करणार होतो पण परिक्रमाच रद्द केल्यानं दोन तारखेला आम्ही सगळे मोकळे होतो. मग संध्याकाळी आम्ही 'भवनाथ' च्या दर्शनाला गेलो आणि परत येऊन दोन तारखेला द्वारका, बेट द्वारका इथं दर्शनाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध होतील का याची बरीच चौकशी केली. सगळ्या नेहमीच्या ट्रॅव्हल्स कडे चौकशी केल्यावर अखेर तीन बसेस उपलब्ध झाल्या. 

        दोन तारखेला पहाटे सारं आवरुन आमचा ५४-५५ जणांचा ग्रुप घेऊन द्वारकेला निघालो. चहा नाश्त्यासाठी वाटेत थांबून ट्रॅफिक जॅम मधून द्वारकेला पोचायला खूपच वेळ लागला. मंदिर दर्शनासाठी १२ ते ५ यावेळेत बंद असतं. म्हणून त्या आधी दर्शन मिळणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आधीच तिथल्या एका पंडितजींबरोबर बोलणं केलं होतं. त्यामुळं दर्शन रांगेत उभं रहायला मिळालं. इथंही अलोट गर्दी होती दर्शनासाठी. आणि अतिशय चीड आणणारी गोष्ट म्हणजे दर्शनाला रांग, शिस्त याचा संपूर्ण अभाव होता. प्रचंड लोटालोट सुरु होती. 'द्वारकाधीशा' ला नैवेद्य अर्पण करेपर्यंत जवळपास अर्धा तास दर्शन बंद होतं. त्यानंतर दर्शन सुरु झालं आणि अक्षरशः धक्काबुक्की करत भाविक दर्शन घेत होते. अर्थातच नाईलाजाने आम्हालाही असंच दर्शन घ्यावं लागलं. पण प्रत्यक्षात अतिशय छान दर्शन झालं. मन अगदी तृप्त झालं. काही क्षण का होईना 'द्वारकाधीशा'समोर उभं राहून नतमस्तक होता आलं. 

       दोन तारखेला म्हणजेच 'कार्तिकी एकादशीला' आम्हाला 'द्वारकाधीशाचं' दर्शन घडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. 'आषाढी एकादशीला' 'भगवान विष्णू' योग निद्रेत जातात आणि 'चातुर्मास' संपल्यावर म्हणजे 'कार्तिकी एकादशीला' योग निद्रेतून बाहेर येऊन सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात. म्हणून या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी', 'देव उठनी एकादशी' असंही म्हणतात. अशा या अतिशय महत्वाच्या एकादशी दिवशीच आम्हाला 'द्वारकाधीशाच्या' दर्शनाचा सुंदर योग आला. 

       द्वारकेहून आम्ही पुढे निघालो. वाटेत जेवून आम्ही 'बेट द्वारकेला' निघालो. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्घाटन झालेल्या २३२० मीटर लांबीच्या 'सुदर्शन सेतु' वरुन आम्ही द्वारका बेटावर पोहोचलो. हा द्वारका बेटा ते ओखा यांना जोडणारा सेतु आहे. इथल्या मंदिरातही प्रचंड आणि बेशिस्त अशी गर्दी होती. दर्शन सायंकाळी ४.३० वाजता सुरु होणार असल्याने बराच वेळ वाट बघावी लागली. दर्शन सुरु झाल्यावर आधी सारखंच ढकलाढकली करतच पण इथंही अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. मुख्य मंदिर आणि आजूबाजूची दर्शनं घेऊन आम्ही परत निघालो. द्वारका आणि बेट द्वारका या दोन्ही मंदिरात नेहमीच भाविकांची प्रचंड गर्दी असते. आम्हाला या बेशिस्त गर्दी चा वारंवार अनुभव आला आहे. परंतु या बेशिस्त बेदरकार गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही सुरक्षा यंत्रणा इथं नाही.  या गर्दीत चेंगराचेंगरीत काहीही दुर्दैवी घटना घडल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचीही कुठलीही व्यवस्था इथं उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासनानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. परंतु या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं जात असल्याचं खेदानं म्हणावं लागतय. 

         तिथून परतीच्या प्रवासात मार्गातच 'नागेश्वर' मंदिरात दर्शनासाठी गेलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक 'नागेश्वर ज्योतिर्लिंग'. इथं मात्र फार गर्दी नव्हती. आणि इथं कितीही जास्त गर्दी असली तरी दर्शन अगदी शिस्तीत रांगेतून घेतलं जातं. इथलं दर्शन घेऊन आम्ही रात्री उशिराने तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

          तीन तारखेला सकाळी लवकरच सारं आवरुन मुक्काम सोडून सगळेजणं आधीच ठरवलेल्या बसने 'सोरटी सोमनाथ' ला निघालो. वाटेत नाश्ता करुन 'सोमनाथ' ला पोहोचलो. सोमवार असल्यानं दर्शनाला बऱ्यापैकी गर्दी होती. पण इथंही व्यस्थित रांगेतून दर्शन होत असल्यानं फार वेळ न लागता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत फिरुन वाटेतच असलेल्या 'भालका तीर्थ' चं दर्शन घेतलं. त्यानंतर नेहमीच्या हाॅटेलमध्ये जेवण करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. राजकोटहून आमची परतीची ट्रेन होती. त्यामुळं वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. सोमनाथ ते राजकोट रस्त्याचं काम अजूनही सुरु असल्यानं खूप वाहतूक कोंडी होते. त्यामुळं प्रवसाचा वेळ वाढतो. म्हणून मग इतर कुठं न जाता सरळ राजकोटला वेळेतच पोहोचलो. 

         'गिरनार परिक्रमा' रद्द झाल्यामुळं खरतर प्रत्येकालाच रुखरुख लागली होती. कारण आता एकदम पुढल्या वर्षी ही परिक्रमा करता येणार आहे. पण तरीही कार्तिकी एकादशीला घडलेलं 'द्वारकाधीशाचं' दर्शन आणि सोमवारी घडलेलं 'सोमनाथाचं दर्शन' यामुळं मनाला खूप समाधानही वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेतच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

          माझा सहचर जरी सेवा म्हणूनच या यात्रेचं आयोजन करीत असला तरी त्याच्या सहकारी मित्रांची त्याला लाभणारी साथ ही अतिशय महत्वाची असते. त्यांच्या सहकार्यामुळे आणि 'श्री दत्तात्रेयांच्या' कृपेनेच ही यात्रा यशस्वी होते.  आणि प्रत्येक यात्रेत एक नवीन ऊर्जा प्रत्येकाला लाभते. 

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Tuesday, January 30, 2024

नित्य गिरनार वेगळा

तम निशेचा सरला

प्रात:समय आला

उधळित सोनकेशर

पूर्वदिशी रवी आला

दिसे गिरनार सावळा

तेजोवलय सोनसळा

भासे गिरनार तपस्वी

रवी होई तो ओजस्वी

पसरे चौफेर सोनरंग

पाहता मन होई दंग

दर्शन होतसे सोहळा 

नित्य गिरनार वेगळा

नित्य गिरनार वेगळा 

- स्नेहल मोडक








Friday, December 29, 2023

दत्तजयंती

                 मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती, साऱ्या दत्तभक्तांसाठी पर्वणी.  या जन्मसोहळ्याची आतुरतेनं वाट पहात असतात सारे दत्तभक्त. यावर्षी आलेल्या अधिक महिन्यामुळे आम्हाला दोन वेळा दत्तजयंतीला दर्शन घडलं. आमच्या गावाला टिळक पंचांग वापरत असल्यानं तिथला दत्तजन्मसोहळा एक महिना आधीच नोव्हेंबरमध्ये संपन्न  झाला होता. आणि निर्णयसागर पंचांगानुसार दत्तजयंती डिसेंबर महिन्यात नुकतीच संपन्न झाली. त्यामुळे आम्हाला यावर्षी आधी गावाला आणि आता गिरनारला दत्तजयंतीला जाण्याचं भाग्य लाभलं. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये गिरनार गुरुशिखर दर्शन, परिक्रमा, दत्तजयंती आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन एवढं एकत्र मोठं भाग्य आम्हाला लाभलं होतं. 

                  गिरनारसाठी ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही रेल्वेने जुनागढला निघालो. यावेळी आम्हा सर्वांचीही तिकीटं RAC होती. त्यामुळे पूर्ण प्रवास थोडासा त्रासदायकच झाला. पहाटे नेहमीच्या वेळेत जुनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला मुक्कामी गेलो. 

                  नित्याप्रमाणे पहिली पायरी आणि लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे रोपवे साठी प्रचंड मोठी रांग लागली होती. रोपवे च्या प्रवेशद्वाराच्या बाहेर रस्त्यावर एक मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात दिडशे-दोनशे लोकांना रांगेत बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तो मंडप पूर्ण भरुन बाहेर भलीमोठी रांग होती. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही बरंच फिरुन मग ती रांग ट्राॅलीजवळ पोहोचत होती. हे सारं पाहून आम्हाला रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचायला किती वाजणार अशी काळजी वाटत असतानाच आमचे काही परिचित रांगेत खूप पुढे उभे होते त्यांच्याबरोबर जायची परवानगी आम्हाला मिळाली आणि आम्ही लवकरच अंबाजी टुकवर पोहोचलो.

                  नेहमीप्रमाणेच यावेळीही गिरनार अप्रतिम सौंदर्याने सजला होता.  उदयाचली आदित्यराजाचं नुकतच आगमन झालं होतं. सारी पर्वतशिखरं सोनकिरणानी चमचमत होती. क्षितिजरेखा आणि पर्वतांच्या मध्ये एक दाट पांढराशुभ्र पट्टा तयार झाला होता. अतिशय वेगळं दृश्य होतं ते. हा अद्भुत नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवतच 

अंबामातेचं दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली.

                   गेल्या महिन्यातील परिक्रमेनंतर याची तब्येत तितकीशी ठिक नव्हती. वाढलेल्या रक्तदाबामुळे सरळ रस्त्याने चालतानाही अधुनमधून झोक जात होता. इथे तर पायऱ्या चढा-उतरायच्या होत्या. त्यामुळे पायऱ्यांच्या बाजूचा कठडा आणि माझा आधार घेत सावकाश पायऱ्या चढायला सुरुवात केली. अगदीच झेपत नाही असं वाटलं तर डोली करायची असही ठरवलं. पण हळूहळू चढत गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. तिथे दर्शन घेऊन पुढे पायऱ्या उतरायला लागलो. थोड्या पायऱ्या उतरल्यानंतर उतरताना त्रास कमी होतोय असं त्याच्या लक्षात आलं आणि मग नेहमीसारखं सहज पायऱ्या उतरु लागलो. अंबामाता मंदिरापासून गोरक्षनाथ मंदिरापर्यंत पायऱ्या चढताना जो त्रास होत होता त्यामुळे माझ्या मनात मात्र त्रास असाच सुरु असेल तर पुढल्या पौर्णिमेला यावं की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. या विचारातच मी चालले होते. आणि अचानक समोरच्या दृश्याने माझं मन क्षणात भानावर आलं. माझ्या पुढेच एक नेत्रविहिन भाविक एका हातात त्यांची विशेष ओळख असलेली धातूची काठी आणि दुसरा हात सहचराच्या हाती धरुन अगदी सहजतेने पायऱ्या उतरत होती. मी अक्षरशः खिळून पायरीवरच थांबले. मी किती व्यर्थ चिंता करत होते याची क्षणात जाणीव झाली आणि माझी मलाच लाज वाटली. स्वयं श्री दत्तात्रेय काळजी घेत असताना आपण चिंता करायची बिलकुल गरज नाही याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी मी त्या भक्तांशी बोलून आदर व्यक्त करुन आणि मनोमन नमस्कार करुन पुढे गेले. केवळ कल्पनेनेच आणि थोडंसं स्पर्शाने सारं जग पहात असणारी ती गिरनारला एवढ्या पायऱ्या चढून केवळ मन:चक्षूंसमोर दिसणाऱ्या श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आली होती. आपल्याला पादुका आणि त्रिमूर्तीचं दर्शन तर प्रत्यक्ष घडतं. पण मला वाटतं अशा व्यक्तींना घडणारं निर्गुण निराकार दर्शन हे जास्त सुंदर असतं कारण ते त्यांच्या अंतर्चक्षुंना दिसत असतं. केवळ अपार श्रद्धा, भक्ती आणि आनंद याच भावना त्यात असतात. आजवर गिरनारला अनेक वयोवृद्ध, अधू, अपंग भक्त दर्शनासाठी येताना पाहिले होते. पण नेत्रहिन भक्त याचवेळी पाहिला आणि खरंच आपण किती अकारण चिंता करतो, श्री दत्तगुरु सारी काळजी घेत असतानाही, या जाणीवेने क्षणभर अपराधीच वाटून गेलं. अध्यात्म आणि भक्तीच्या महासागरातील एक थेंब तरी आपण आहोत का हा प्रश्नच मनात आला.

                याच विचारात आम्ही कमानीच्या थोडं पुढे गेलो आणि दर्शनासाठी रांग लागली. रांगेतून हळूहळू पुढे चढून जात होतो. साधारण पाऊण तासातच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आत प्रवेश केला आणि मी पाणावलेल्या डोळ्यांनींच नतमस्तक झाले. बरोबर नेलेला नैवेद्य, पितांबर आणि अष्टगंध अर्पण केलं प्रसाद घेतला आणि क्षणार्धात आम्हाला एक गोष्ट जाणवली. श्री दत्तात्रेयांच्या पादुका नेहमीच अष्टगंध विलेपित असतात. यावेळी मात्र पादुकांना अष्टगंध विलेपन केलेलं नव्हतं. मी जेव्हा दत्तगुरुंना अर्पण करण्यासाठी पितांबर घेतला तेव्हा मला अष्टगंधही घ्यावं अशी मनात जाणीव झाली आणि मी तेही अर्पण करण्यासाठी घेतलं होतं. त्यादिवशी असलेल्या अष्टगंध विरहित पादुका आणि मी अर्पण केलेलं अष्टगंध याचा परस्परसंबंध आम्हा दोघांनाही जाणवला आणि अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं. अशीच सेवा सदैव आमच्याकडून करुन घ्या अशी दत्तगुरुंना प्रार्थना करतच आम्ही बाहेर आलो. खरंतर अष्टगंध विलेपन करायचं राहून गेलं होतं. कारण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एक छोटीशी शिला आहे त्यासमोरच एक प्लास्टिक बाटली कापून त्यात थोडं अष्टगंध ठेवलेलं होतं. आणि अखंड धुनीजवळही भक्तांसाठी अष्टगंध आणि भस्म नेहमीप्रमाणे ठेवलेलं होतंच. पण मला जेव्हा ते घेऊन जायची आतून जाणीव झाली तेव्हा असं काही असेल अशी तीळमात्रही कल्पना नव्हती. 

                    दर्शन घेऊन थोड्या पायऱ्या उतरुन मध्ये एका ठिकाणी थोडीशी बसण्यासाठी जागा आहे तिथे गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. नंतर अखंड धुनीजवळ पोहोचलो. दत्तजयंतीच्या निमित्ताने इथली श्री दत्तात्रेयांची मूर्ती  भव्य आणि अप्रतिम अशा रजतसिंहासनी आसनस्थ झाली आहे. इथे दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही परत गोरक्षनाथ मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. कमानीपर्यंत चढून आल्यावर याला पायऱ्या चढताना होणारा त्रास खूप कमी झाल्याचं जाणवलं. मग जरा भरभरच पायऱ्या चढून गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. दर्शन घेऊन अंबाजी टुकवर आलो. पायथ्याशी जाण्यासाठी रोपवे ला गर्दी कमी होती त्यामुळे फार वेळ थांबावं न लागता लवकरच पायथ्याशी पोहोचलो. मात्र आम्ही दर्शन घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली तेव्हा दर्शन रांग कमानीच्या आधीच सुरु झाली होती आणि नंतर ती अंबामातेच्या मंदिरापासूनच सुरु झाली होती. 

                      पायथ्याशी पोहोचल्यावर भोजन करुन, रुमवर जाऊन थोडा आराम करुन सायंकाळीच परतीच्या प्रवासाला लागलो.

                       वर्षानुवर्षं दर पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी असंख्य दत्तभक्त जात असतात. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच आमचंही जाणं होत आहे. तब्येतीच्या किंवा इतर कुठल्याही कारणाने यात खंड न पडता गिरनार दर्शन असंच घडत रहावं, नित्य सेवा घडावी हीच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Thursday, November 30, 2023

परिक्रमा

              जून महिन्याच्या सुरुवातीला जशी सगळेजणं वर्षाऋतूच्या आगमनाची चातकासारखी वाट पहात असतात तशीच जुलै महिना सुरु होताच साऱ्या दत्तभक्तांना ओढ लागते ती गिरनार परिक्रमेची

             दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही जून महिन्याअखेर पासूनच गिरनार दर्शन आणि परिक्रमेला जाण्यासाठी दत्तभक्त याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधू लागले. प्रत्यक्ष परिक्रमा ही दीपावली नंतर कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीतच असली तरीही रेल्वेचं रिझर्व्हेशन चार महिने आधीच होतं. त्यामुळे जुलै महिन्यात हे रिझर्व्हेशन करावं लागतं. यावेळी आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांची संख्या जरा जास्तच झाली होती. एवढ्या भाविकांची सारी व्यवस्था करणं परिक्रमा काळात थोडं कठीण काम असतं. कारण या परिक्रमेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे तलेटीमधील साऱ्याच साधनांवर खूपच ताण येतो. एवढ्या साऱ्या भाविकांची रहाण्याची, जेवणखाण्याची उत्तम व्यवस्था होणं अशक्य असतं. त्यामुळे आम्ही आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांसाठी ही व्यवस्था वर्षभर आधीपासूनच करण्याच्या प्रयत्नात असतो. यावर्षी आमच्या बरोबर एकूण दोनशे भाविक येणार होते. जुलैमध्येच त्या साऱ्यांचं रेल्वेचं रिझर्व्हेशन केलं होतं. जुनागढला जाणारी एकमेव ट्रेन असल्याने अक्षरशः पाचव्या मिनिटाला रिझर्व्हेशन फुल होतं. यावेळी आमच्या बरोबर येणारे भाविक चार वेगवेगळ्या तारखांना येणार होते. त्यामुळे ज्यांना थेट जुनागढची तिकीटं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी दोन टप्प्यांत तिकीटं काढावी लागली.

             कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशीच एक गट जुनागढ तलेटीला पोहोचला. आम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशीच पहाटे जुनागढला पोहोचलो. परिक्रमा काळात होणाऱ्या अतिप्रचंड गर्दीमुळे वाहनं जुनागढहून तलेटीपर्यंत थेट जाऊ शकत नाहीत. एका ठराविक अंतरावर सारी वाहनं थांबवून परत पाठवतात. तिथून पुढे आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी २-३ किमी अंतर पायी जावं लागतं. ही सारी कसरत करत आम्ही रुमवर पोहोचलो. आन्हिकं आवरुन लगेचच गुरुशिखर दर्शनासाठी निघालो. रिवाजानुसार लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे कडे गेलो. रोपवे ला बिलकुल गर्दी नसल्याने पाच मिनिटांतच आम्हाला रोपवे ने निघता आलं. अंबाजी टुकवर पोहोचलो तर तिथे मात्र प्रचंड गर्दी होती. शिखर दर्शन करुन येईपर्यंत ही गर्दी वाढतच होती. आम्ही कमानीपासून थोडं वर पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगच सुरु झाली. रांगेतून हळूहळू पुढे जात मंदिरात प्रवेश केला. अतिशय गर्दीमुळे तिथले पंडितजी, पोलिस सारखं 'पुढे चला' चा गजर करत होते. पण का कुणास ठाऊक आम्ही दत्तात्रेयांसमोर येताच ते पंडितजी नेहमीप्रमाणेच शांत झाले. आम्ही पादुकांसमोर नतमस्तक झालो, नैवेद्य अर्पण केला आणि तृप्त मनाने पुढे सरकलो. एवढ्या गर्दीतही अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. दर्शन घेऊन खाली उतरुन अखंड धुनीजवळ आलो. तिथेही सुंदर दर्शन घडलं. दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवे जवळ आलो. पायथ्याशी पोहोचण्यासाठी मात्र मोठी रांग होती. पण आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलावलं त्यामुळे लगेचच रोपवेने जायला मिळालं.‌ रुमवर येऊन थोडा आराम केला. सायंकाळी भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन थोडं फिरुन आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे परिक्रमेसाठी जायचं असल्याने जरा लवकरच निद्रा देवीची आराधना केली. 

               कार्तिकी एकादशीला आम्हाला गुरुशिखर दर्शन घडलं होतं. दुसऱ्याच दिवशी आमची परिक्रमा होती. रात्री अडीच वाजताच उठून सारं आवरुन गटातील इतर साऱ्या भाविकांसह परिक्रमेसाठी निघालो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून परिक्रमेचं प्रवेशद्वार जवळपास दोन किमी वर होतं. सारेजणं एकत्र जमून तिथे पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे वेळ गेलाच. त्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमेसाठी सुरुवात करायला साडेचार वाजून गेलेच. परिक्रमेला सुरुवात केली आणि नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचं लक्षात आलं. गर्दीमुळे सुरुवातीपासूनच थोडं हळूहळू चालावं लागत होतं. मिट्ट काळोखात टाॅर्चच्या उजेडात एवढ्या गर्दीत सगळ्यांना एकत्र चालणं अशक्य होतं. साहजिकच सगळे हळूहळू मागेपुढे झाले. परिक्रमेच्या सुरुवातीचा ६-७ किमी. चा मार्ग गाडीरस्ताच आहे. पण चांगला चढाव आणि मग एकदम तीव्र उतार आहे. गर्दी आणि अंधार यामुळे हे चालणं थोडं त्रासदायक असतं. पण सवयीमुळे असेल कदाचित आम्हाला अजिबात त्रास न होता आम्ही हा टप्पा सहज पार करुन पुढच्या मातीच्या रस्त्याला लागलो. वाढत्या गर्दीमुळे भरभर चालण्यासाठी कसरतच करावी लागत होती. उजाडल्यावर गर्दीतून चालणं थोडं सोपं होईल असं वाटत होतं पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. 

               उजाडल्यावर साधारण ७.३० वाजता आम्ही थोडं बाजूला थांबून बरोबर नेलेला थोडासा कोरडा खाऊ खाल्ला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. गर्दी बिलकुल कमी होत नव्हती. आमच्या मागून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच होती. आम्ही जीनाबाबा की गढीच्या आधी साधारण दिड किमी अंतरावर पोहोचलो आणि दिसली ती अजिबात पुढे न सरकणारी प्रचंड गर्दी. साहजिकच आम्हीही त्या गर्दीचा एक भाग झालो आणि गर्दी पुढे सरकण्याची वाट पहात, इकडून तिकडून काही मार्ग मिळतोय का पहात थांबलो. किमान अर्धा तास यात गेल्यावर गर्दी हळूहळू पुढे सरकू लागली. थोडं पुढे येताच नेहमीच्या जागेवर नागा साधू बसलेले दिसले. त्यांना चुकवत चुकवत कसंबसं पुढे गेलो. परिक्रमेच्या काळात खूप मोठ्या संख्येनं हे नागा साधू परिक्रमा मार्गात त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन बसतात. त्यांना चुकवत पुढे जाणं हे जरा कठीणच काम असतं. तिथून पुढे निघालो पण एकूणच गर्दी किंचितही कमी होत नव्हती. या गढीच्या पुढचा सारा रस्ता पूर्ण घनदाट जंगलातून जातो. मोठमोठ्या दगडधोंड्यातून मार्गक्रमण करावं लागतं. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि इथेही तीच परिस्थिती होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अलोट गर्दी होती. चालणं अशक्य होतं. मग आमच्या सह बऱ्याचजणांनी मुख्य पायवाट सोडून डोंगरात वरवर चढायला सुरुवात केली. अर्थात हा मार्ग अतिशय अवघड होता. वर चढताना वाटेतले दगडधोंडे चुकवत, मातीतून पाऊल घसरणार नाही याची काळजी घेत, काठीचा आणि वाटेतल्या झाडाझुडुपांचा आधार घेत आम्ही वर जात होतो. जिथे अजून वर चढणं अशक्य होतं तिथे कसरत करत खाली उतरत होतो. परत मुळ मार्गावरील गर्दीत सामील होत होतो. पण ती गर्दी पुढे सरकेनाशी झाली की परत डोंगरावर चढून भलत्याच मार्गाने प्रयत्नपूर्वक पुढे जात होतो. कितीतरी वेळ आम्ही फक्त वर चढतच होतो. डोंगर चढून उतरायला कधी सुरुवात करणार काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्या प्रचंड आणि दाट जंगलात जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. अतिशय अवघड अशी चढण चढत चढत अखेर एकदाचे आम्ही डोंगर उतारावरच्या मार्गावर पोहोचलो.  पण गर्दी हलतच नसल्याने पुन्हा तिथेही असंच अवघड मार्गाने खाली उतरु लागलो. अशातच एका ठिकाणी पायऱ्या सुरु झालेल्या आम्हाला कळल्या आणि आम्ही त्या गर्दीत पायऱ्या उतरायचा प्रयत्न केला पण तिथेही उतरणं कठीणच होतं. हळूहळू कसंबसं तिथून निघून पुढे आलो. 

               दुसऱ्या डोंगरावर चढायलाही अलोट गर्दी होती. ती गर्दीही पुढे सरकत नसल्यानं पुन्हा द्राविडी प्राणायाम करत अतिशय अवघड मार्गाने वर पोहोचलो आणि तिथेच साऱ्या गर्दीला पोलिसांनी अडवलं. पुढेही अफाट गर्दी असल्याने किमान दोन तास थांबायला सांगितलं. पण जरावेळ थांबून लोकांनी  हळूहळू जमेल तसं पुढे जायला सुरुवात केली. आम्हीही त्यांच्याबरोबर पुढे जात पुन्हा पायऱ्यांजवळ पोहोचलो. त्या पायऱ्या गर्दीच्या रेट्याबरोबरच कशाबशा उतरलो. पुन्हा मुख्य मार्ग सोडून वरवर चढत उतरत पुन्हा मुख्य मार्गावर आलो. परत अवघड वाटेने चढत पुढच्या पायऱ्यांजवळ गर्दीत शिरलो. तासभर थांबूनही गर्दी इंचभरही पुढे सरकेना मग पुन्हा अवघड वाटेने त्या पायऱ्या जिथे उतरायला सुरुवात होते त्याच्या जवळ पुन्हा गर्दीत शिरलो. त्या गर्दीत शिरलो आणि पायऱ्यांवर पूर्णपणे अडकलो. पुढचे चार तास एकाच जागी उभं रहावं लागलं. पुढे पोलिसांनी लोकांना पूर्ण अडवून थांबवून ठेवलं होतं. श्वास घेणंही मुश्किल होत होतं. जवळपास सगळ्यांकडचं पिण्याचं पाणी संपलं होतं. घशाला कोरड पडत होती पण पाणी कुठेच मिळत नव्हतं. या परिस्थितीतच एका माणसाला श्वासाचा खूपच त्रास होऊ लागला म्हणून त्याला उपचारासाठी त्या गर्दीतून कसंबसं बाहेर नेलं. त्याचवेळी त्या गर्दीतल्या लोकांकडून कळलं की सकाळीच परिक्रमेच्या मार्गात‌ एका बिबट्याने दर्शन दिलं होतं. त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण होतं. आम्हाला त्या गर्दीत होऊ शकणाऱ्या चेंगराचेंगरीची भिती वाटायला लागली होती. चार तास इंचभरही पुढे न सरकता आम्ही उभे होतो. सगळ्यांंचीच मनस्थिती बिघडली होती. अशातच थोडंसं जरी इकडे तिकडे झालं असतं तरी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता होती. अखेर चार तासांनी जेव्हा हळूहळू चालायला सुरुवात करता आली तेव्हा प्रयत्नपूर्वक आम्ही त्या गर्दीतून बाहेर पडलो. पून्हा पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने झाडांच्या आधाराने वर चढत गेलो. नंतर मात्र एका ठिकाणी वर चढायची मला हिंमत होईना मग पुन्हा त्या गर्दीत घुसलो. पण तोपर्यंत लोकं हळूहळू पुढे सरकायला लागले होते. त्यातूनच थोडं पुढे जाऊन पून्हा सारी लोकं अडकली. दोन पावलंही पूढे जाणं शक्य नव्हतं. अशातच लोकांचा आरडाओरडा सुरु झाला. चेंगराचेंगरीच्या भीतीने पून्हा आम्ही हळूहळू बाजूला होत कसंबसं कठड्यावर बसलो. आणि आता गर्दी पूर्ण पूढे सरकून कमी झाल्याशिवाय इथून हलायचं नाही असं ठरवलं. एव्हाना सांजावलं होतं. रात्री गर्दी कमी होईल अशी आशा आम्हांला वाटत होती. 

              पण आम्ही तिथे बसलो आणि पाचच मिनिटांत एका पोलिसांनी आम्हाला तिथून उठायला सांगीतलं , थांबायचं असेल तर एकदम बाजूला जाऊन थांबायला सांगितलं. पण जिथे तो जायला सांगत होता तिथे चढून जायची मला हिंमत होत नव्हती. अतिशय खडा चढ तोही मातीचा चढून जाणं मला शक्य नव्हतं. आणि पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने मातीचा तीव्र उतार उतरायचीही मला भिती वाटत होती. त्याक्षणी मला अक्षरशः रडू येत होतं. अखेर याच्या आधाराने मी जीव मुठीत धरुन थोडं खाली उतरले. नंतर तिथे  आमच्या पुढे उतरत असलेली लोकं पुन्हा गर्दीत घुसत होती मग आम्हीही तेच केलं. पण सुदैवाने तोपर्यंत लोकं हळूहळू का होईना पुढे सरकत होती. अखेर तसंच हळूहळू चालत पायऱ्या पूर्ण संपून उताराचा रस्ता लागला आणि आम्ही अक्षरशः सुटकेचा निःश्वास सोडला. आता त्या गर्दीतूनच पण पुढे सरकता येत होतं. एव्हाना रात्रीचे ८.३० वाजून गेले होते. परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यातील ८-९ किमी अंतर सरळ रस्ता आहे. त्यामुळे गर्दी असली तरी काही अपघात घडण्याची भिती वाटत नव्हती. अखेरचं ४-५ किमी अंतर राहिलं असताना आम्हांला कलिंगड, उसाचा रस प्यायला मिळाला. मग मात्र पुढे न थांबता गर्दी बरोबर चालत राहीलो आणि रात्री ११ वाजता परिक्रमा पूर्ण करुन गेटमधून बाहेर आलो. 

              मुळात ३८-४० किमीची परिक्रमा आमच्या साठी त्याहून खूप जास्त अंतराची झाली होती. आमच्या शारीरिक क्षमतेचा अंत पहाणारी ही परिक्रमा केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच पूर्ण झाली होती. आमच्या गटातील बऱ्याच जणांना ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पहाटेचे  ४ वाजले. सगळेचजणं वेगवेगळ्या वेळी ही परिक्रमा पूर्ण करुन रुमवर परतले.

              तिसऱ्या दिवशी दुपारी आमची परतीची ट्रेन होती. त्या प्रवासाला सुरुवात केली आणि एवढ्या अफाट गर्दीचं खरं कारण कळलं‌ आणि आम्ही हादरलोच. एक अतिशय दुःखद आणि भितीदायक घटना घडली होती. आम्ही जेव्हा परिक्रमेला सुरुवात केली होती तेव्हा काही वेळानंतर परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यावरील बोरदेवी मंदिराजवळ रात्री वस्ती केलेल्या परिक्रमावासींपैकी एका अकरा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. सकाळी ६ वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर ८ वाजता ती मुलगी सापडली. पण तोपर्यंत ती मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे त्या भागात परिक्रमा थांबवण्यात आली होती. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्याला पकडण्यात आलं. आम्ही परिक्रमेत असताना बिबट्या दिसला एवढंच कळलं होतं. याच कारणामुळे शब्दात वर्णनही करता येणार नाही अशी गर्दी झाली होती. त्याच बरोबर ज्या माणसाला श्वासाचा त्रास होत होता म्हणून उपचारासाठी बाहेर नेलं त्याचा आणि अजून एका अगदी लहान बाळाचाही मृत्यू झाल्याचं कळलं. तसंच अजून २-३ लोकांनाही डोली करुन घाईघाईने उपचारासाठी नेल्याचं आम्ही स्वतःच बघितलं होतं.इतक्या वर्षात पहिल्यांदाच अशा भितीदायक आणि दुःखद घटना परिक्रमेच्या दुसऱ्याच दिवशी घडल्या होत्या. 

             यावरुन पुढील वर्षापासून परिक्रमेवर काही निर्बंध आणणं, काही नियमावली तयार करणं आणि ते कसोशीनं पाळणं ही आत्यंतिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात जंगली श्वापदांच्या हक्काच्या अधिवासावर आपण अतिक्रमण करत असू तर अशा काही घटना यापुढेही घडणं स्वाभाविकच आहे. त्यासाठीच परिक्रमावासींच्या संख्येवर , जंगलातील वास्तव्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या दोन दिवसांची परिक्रमा भाविकांसाठी अतिशय अवघड ठरली होती. तिसऱ्या दिवशी मात्र भाविकांना दरवर्षी प्रमाणे सहज परिक्रमा करता आली.  चौथ्या दिवशी पहाटे खूप पाऊस पडल्याने परिक्रमा उशिरा सुरु करण्यात आली. आणि पाचव्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची परिक्रमा पावसामुळे रद्दच करण्यात आली. 

               आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी घरी पोहोचलो. आणि पुन्हा सारं आवरुन दुपारी लगेचच घरच्या गाडीने गावाला निघालो. गावाला टिळक पंचांगानुसार त्याचदिवशी श्री दत्त जयंती होती. त्यामुळे श्री दत्तात्रेयांच्या जन्मसोहळ्यासाठी आम्ही गावाला निघालो. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. श्री दत्तात्रेय जन्म सोहळा आमच्या गावाला रात्री १२ वाजता साजरा केला जातो. आम्ही घरी पोहोचल्यावर जेवून थोडा आराम करुन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंदिरात गेलो. डोळ्यांचं पारणं फिटेल अशा या सुंदर जन्मसोहळ्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्हाला केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच सहभागी होता आलं होतं. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री १ वाजता आम्ही घरी परतलो. पहाटे लवकर उठून आवरुन पुढील प्रवासाला लागलो.

               आम्ही पहाटे प्रवासाला सुरुवात केली ती गोव्याला जाण्यासाठी. गोव्याला आमच्या घरच्याच एका विवाहसमारंभासाठी आम्हाला जायचं होतं. गोव्याला दुपारी पोहोचलो. थोडा आराम करुन श्री शांतादुर्गा देवीचं दर्शन घ्यायला गेलो. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. तिथून श्री मंगेश मंदिरात जाऊन तेही दर्शन घेतलं. तिथून विवाहसमारंभासाठी गेलो. सायंकाळी काही कार्यक्रम होते त्याला उपस्थित राहिलो. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष विवाहसमारंभ होता. समारंभ पार पडल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. सुशेगाद गोव्यात आम्ही जेमतेम २४ तासच होतो त्यामुळे आमची मात्र खूप धावपळ झाली.

                गोव्यापासून साधारण दोन अडीच तासावर असलेल्या माणगांव ला आम्हाला जायचं होतं. परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचं हे जन्मस्थान. श्री दत्तात्रेयांचे प्रात: स्मरणीय चतुर्थावतार म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. वेदशास्त्रसंपन्न हरिभट्टांचे पुत्र श्री गणेशभट्ट आणि त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दांपत्य माणगांवी वास्तव्यास होते. त्यावेळी श्री गणेशभट्ट आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच श्री दत्तात्रेयांची सेवा करण्यासाठी गाणगापूरला १२ वर्षं जाऊन राहिले. एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यात श्री दत्तगुरुंनी आम्ही तुमच्याकडे पुत्ररुपाने जन्माला येणार आहोत म्हणून त्यांनी माणगांवी परत जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा असं सांगितलं. त्यानुसार ते माणगांवला परतले. श्रावण कृ.५ ई.सन १८५४ यादिवशी त्यांना पुत्ररत्न झालं. त्याचं वासुदेव असं नामकरण करण्यात आलं. त्यानीही दत्तभक्तीचा वारसा पुढे चालवत नृसिंहवाडीस जाणं, वास्तव्य करणं वाढवलं. काही काळानंतर त्यांना नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली की माणगांवी जाऊन दत्तमंदिर स्थापन करावे. त्यानुसार माणगांवला जाताना वाटेत कागल येथील एका मूर्तीकाराकडे ही दत्तमूर्ती मिळाली. मंदिर बांधून त्यात याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लाकडी खांब आहेत. ते महाराजांनी अभिमंत्रित केले आहेत. त्यांच्या स्पर्शानेही बाहेरची बाधा दूर होते. 

               या मंदिरासमोरच पुरातन यक्षिणी मंदिर आहे.यक्षिणी महात्म्यात महाराजांनी दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी वासुदेवांचा जन्म माणगांवी झाला. हे यक्षिणी मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला वासुदेवानंदांचे जन्मस्थान आहे. तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तसंच अहिल्यादेवी होळकर यांनी वासुदेवानंदांच्या पायाच्या मापाच्या योगचिन्हांकित पादुका स्थापन केल्या आहेत. वासुदेवानंद सरस्वती यांचं कर्तृत्व आणि महत्व खूपच मोठं आहे. पीठापूर, कुरवपूर, कारंजा ही स्थानं शोधून ती भक्तांसाठी त्यांनी खुली केली आहेत. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र त्यांनी जगाला दिलाय. अतिशय विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलीय. सप्तशतीगुरूचरित्र, श्रीदत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्री घोरात्कष्टोधरण स्तोत्र, करुणात्रिपदी ही त्यातीलच ग्रंथसंपदा. 

               अशा या परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन घ्यायची कधीपासूनची आमची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती. अतिशय शांत प्रसन्न आणि उर्जेने भरलेल्या या मंदिरात आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तिथे देणगी देऊन प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 

                यावर्षीची गिरनार परिक्रमा आमच्यासाठी अतिशय वेगळा अनुभव देणारी ठरली. गिरनार गुरुशिखर दर्शन, अत्यंत अवघड अशी परिक्रमा, श्री दत्तात्रेयांचा जन्मसोहळा आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठी पर्वणी ठरली. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच हे सारं भाग्य आम्हाला लाभलं. श्री दत्तात्रेयांची अशीच कृपा सर्वांनाच कायम लाभावी हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Wednesday, November 1, 2023

कोजागिरी

            या वर्षातलं अखेरचं ग्रहण नेमकं कोजागिरी पौर्णिमेला आलं. आणि मग कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण कलांनी विलसणारा शीतल शशिकर आणि चमचमतं पुनवचांदणं यांच्या साक्षीने दुग्धप्राशन करायचं की वेधारंभापासून ग्रहणाचे नियम पाळून निर्जल उपवास करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात प्रत्येकानी त्यावर आपापल्या परीने मार्ग काढला.

            आम्हालाही नेहमीप्रमाणे पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी जायची इच्छा होतीच. पण काही अपरिहार्य कारणास्तव जायला मिळेल की नाही हे आधीच ठरवता येत नव्हतं. अखेर ऐनवेळी गिरनारला जायला मिळणार हे नक्की झालं म्हणून मग घरच्या गाडीनेच जायचं ठरवून रात्री उशिरा प्रवासाची तयारी केली. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पहाटे निघालो. मध्ये मध्ये थांबत रात्री तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

            पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकरच आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ पोहोचलो. तिथे पोहोचलो आणि क्षणात मन खट्टू झालं. तिथे ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटांच्या दोन भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आमचं जाणं ऐनवेळी ठरल्यामुळे आम्हाला ऑनलाईन तिकीटं मिळाली नव्हती. पहिल्यांदाच असं झालं होतं आणि नेमकी ऑफलाईन तिकिटांसाठी खूपच मोठी रांग होती. आता आपल्याला तिकीट कधी मिळणार आणि आपण रोपवे ने अंबाजी मंदिरापर्यंत कधी पोहोचणारी याची काळजीच निर्माण झाली. पण सदैव आमच्या बरोबर असणाऱ्या याच्या मित्राने आमच्या स्वानुभवावरुन कुणाकडे जास्तीची ऑनलाईन तिकिटं आहेत का अशी चौकशी करायला सुरुवात केली. आणि एका ग्रुपकडे ५-६ जास्तीची तिकीटं असल्याचं कळलं. त्यांच्या ग्रुपमधल्या काही जणांनी ऐनवेळी चढून जायचं ठरवल्यामुळे तिकीटं उरली होती. आम्हाला चारच तिकिटं हवी असल्याने त्यांनी ती ताबडतोब आम्हाला देऊ केली आणि आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. दत्तगुरुंच्या कृपेने आमची काळजी मिटली आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. 

            कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गिरनार दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. तरीही आम्ही नेहमीपेक्षा जरा आधीच मंदिरात पोहोचलो. एवढी गर्दी असूनही प्रत्यक्ष मंदिरात दर्शनासाठी बिलकुल गर्दी नव्हती. आम्हाला मंदिरात अतिशय शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. मी दत्तगुरुंसमोर नतमस्तक झाले आणि क्षणार्धात असं वाटलं की समोर साक्षात स्वयं दत्तात्रेय आणि नतमस्तक मी, आजूबाजूला कुणीच नाही, आहे ती फक्त प्रसन्न शांतता .अवघ्या काही क्षणांची ही जाणीव एक वेगळीच अनुभूती देऊन गेली. 

            दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. नित्याप्रमाणे आधी वाचन करुन दर्शन घेतलं. बाहेर भाविकांची खूप गर्दी असूनही प्रसादालयात मात्र गर्दी कमी होती. भाविकांची प्रचंड गर्दी आणि ग्रहण या दोन्ही कारणांमुळे भोजनप्रसादाऐवजी शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद देण्यात येत होता. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परत निघालो. गोरक्षनाथ आणि अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. परतीची तिकीटं काढण्यासाठी बिलकुल गर्दी नसल्याने लगेच तिकीटं मिळाली आणि १५-२० मिनिटांतच रोपवे ने आमही पायथ्याशी पोहोचून‌ मुक्कामी गेलो. भोजन आणि थोडा आराम करुन लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

            खरंतर गिरनारला दत्तगुरुंनी अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. त्यामुळे मन तृप्त होतंच पण तरीही मनात किंचितशी रुखरुख होती. गिरनारला आम्ही जेव्हा जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा तेव्हा परत येताना काही मंदिर दर्शनं‌ आणि स्थलदर्शन करुनच येतो. त्याचप्रमाणे यावेळीही  फिरत फिरत यायचं होतंच. नेहमी आम्ही वडोदरा ला मुक्काम करुन तिथून फिरत फिरत घरी येतो. यावेळी माझ्या मनात जरा वेगळं, जिथे जावंसं वाटत होतं ते मी प्रवासाला निघायच्या आधीच याला सांगितलं. पण का कुणास ठाऊक, कारणं सांगत त्याने माझा बेत उडवून लावला होता. पण घरुन निघताना मात्र मी श्री दत्तगुरुंना तशी प्रार्थना केली होती. आणि आता परतीच्या प्रवासात मला तीच रुखरुख लागली होती. पण मी दत्तगुरुंची इच्छा असा विचार करुन शांत होते. साधारण ४ तासांच्या प्रवासानंतर अचानक याने मला कर्नाळीला मुक्कामाला जायचं ना असं विचारलं आणि मला आश्चर्यच वाटलं. लगेचच आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये फोन करुन रुम उपलब्ध आहेत का याची चौकशी केली आणि रात्री उशिरा तिथे मुक्कामाला येत असल्याचं सांगितलं. माझी इच्छा पूर्ण होणार म्हणून खूप खुश झाले होते मी. रात्री ११ वाजल्यानंतर  आम्ही कर्नाळी ला रुमवर पोहोचलो. 

            पहाटे लवकर उठून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानासाठी निघालो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून जवळच हा संगम आहे. वडोदरा जिल्ह्यातलं  डभोई तालुक्यातलं हे कर्नाळी गांव. इथे नर्मदा, गुप्त सरस्वती आणि ओरसंग या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमावर स्नान करणं अतिशय पुण्यप्रद मानलं जातं. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच ग्रहण होतं. आणि रात्री उशिरा ग्रहण समाप्ती होती. त्यानंतर एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानतात. आणि म्हणूनच या योगावर त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळावं अशी माझी इच्छा होती. 

            आम्ही स्नानासाठी निघालो तेव्हा पहाट हलकेच उमलत होती. सहस्त्ररश्मीचं आगमन होण्यापूर्वीच उषा सोनकेशरी झाली होती. संगमावरचं दृश्य अप्रतिम होतं.  एकीकडे सोनकेशरी उषा, दुसरीकडे अस्ताचलास जाणारा शशिकर आणि समोर पसरलेलं चमचमतं नर्मदाजल.  आणि हे अप्रतिम दृश्य नेत्रात साठवण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी संगमावर गेलेलो आम्ही चौघंच. खूपच सुंदर अनुभव होता. हवेत चांगलाच गारवा होता, पण मैयाच्या जलात पाऊल टाकलं आणि अतिशय उबदार स्पर्शाने तनमन मोहोरलं. स्नानासाठी पाण्यात शिरलो आणि बाहेर पडावसंच वाटेना. पण वेळेअभावी तिथून निघावच लागलं. ग्रहणसमाप्तीनंतर मैयाच्या जलात स्नान करण्याचा योग आल्याने खूप समाधान वाटत होतं.

            रुमवर येऊन सामान घेऊन आम्ही  कुबेर भंडारी च्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिरही आम्ही राहिलो तिथून अगदी जवळच आहे. 

            कुबेर भंडारीचं हे मंदिर साधारण २५०० वर्षं पुरातन आहे. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा देव दिक्पाल आणि यक्षांचा अधिपती आहे. त्याने ब्रम्हदेवाची उपासना केली तेव्हा ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन त्याला अमरत्व, लंकेचं राज्य आणि पुष्पक विमान बहाल केलं. नंतर रावणाने कुबेरावर स्वारी करुन लंका आणि पुष्पक विमानावर कब्जा केला. मग कुबेराने भगवान शिवाची आराधना केली असता शंकराने प्रसन्न होऊन कुबेराला देवांचा खजिनदार केलं. तेव्हापासून त्याला कुबेर भंडारी या नावानंही ओळखतात. अशा या कुबेराचं मंदिर इथं आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे.  तसंच गणपती, महाकाली, हनुमान आणि रणछोडराय यांचीही मंदिरं आहेत. इथे प्रत्येक अमावास्येला दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. आम्ही या मंदिरात सकाळी लवकरच गेल्याने बिलकुल गर्दी नव्हती. कुबेर भंडारी आणि इतर देवदेवतांचं छान दर्शन आम्हाला मिळालं. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो. 

            कुबेर भंडारीच्या मंदिरापासून साधारण ३७ किमी अंतरावर असलेल्या गरुडेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो. गरुडेश्वर - वासुदेवानंद सरस्वती यांचं हे समाधी स्थान. इथे प्रशस्त असं दत्तमंदिर आणि त्यापुढे स्वामींचं समाधी मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे स्थान अतिशय सुंदर, शांत, पवित्र  असंच आहे. या मंदिरातही सुंदर दर्शन घडलं. दत्तगुरुंचं आणि समाधी स्थानी स्वामींचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला थोडं खाली गेलो. इथे मैयाचं पात्र विशाल आहे. त्याच पात्रात एक बंधाराही बांधलेला आहे. दर्शन घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला. साधारण सव्वा तासानी आम्ही भालोद येथे पोहोचलो.

            भालोदचं दत्तमंदिर एकमुखी दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. १४०० व्या शतकातील ही शाळिग्रामातील दत्त मूर्ती उजेडात किंवा अंधारातही पाहिली असता पोटावरील गोमुख स्पष्ट दिसतं. हे मंदिर प्रतापे महाराजांनी बांधलंय. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्वप्न  दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद इथे रहाण्याचा आदेश मिळाला.  याचदरम्यान बडोदा येथील काशिताई निरखे यांच्याकडील ही दत्तमूर्ती पू. प्रतापे महाराजांच्याकडे  आली. आणि त्यानंतर भालोदला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधण्यात आलं. तसंच नर्मदा परिक्रमावासी आणि दत्तभक्त यांच्यासाठी आश्रम बांधण्यात आला. मंदिर आणि आश्रम परिसर अतिशय रमणीय आहे समोरच नर्मदा मैयाचं विशाल पात्र आहे. सदैव मयुरांचा वावर असणाऱ्या या आश्रमात कन्यापूजन हा विधी केला जातो. तसंच गुरुचरित्र पारायण आणि परिक्रमावासी यांच्या वास्तव्याची व्यवस्था इथे केली जाते.  इथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून नावेने श्रीक्षेत्र नारेश्वर इथं जाता येतं.

            आम्ही या मंदिरात जाऊन श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं आणि पू. प्रतापे महाराजांना भेटण्यासाठी थांबलो. ते आश्रमात कुठेच नव्हते. आम्ही त्यांची वाट पहात मंदिरातच थांबलो. सोज्वळ, सात्विक आणि प्रचंड उर्जेने भरलेल्या पू.साधक प्रतापे महाराजांना भेटणं हा प्रसन्न अनुभव असतो. थोड्या वेळाने आम्हाला ते नर्मदा तीरी गेले असल्याचं कळलं म्हणून आम्ही तिथे जायला निघालो असता ते स्वतःच समोर आले. त्यांच्याशी  बोलतच आम्ही मंदिरात आलो. त्यांना नमस्कार करुन थोडं बोलून निघणार तेवढ्यात त्यांनी आम्हाला प्रसाद घेऊन जायला सांगितलं. गेल्यावेळी  आम्ही सायंकाळी इथं आलो होतो तेव्हाही त्यांनी प्रसाद घेऊन जायला सांगितलं होतं पण तेव्हा वेळेअभावी आम्ही थांबू शकलो नव्हतो. यावेळी मात्र आम्ही थांबलोच. त्यांनी सांगितलं आज कन्यापूजन आहे तर आधी कन्यांचं भोजन होऊदे मग आपण भोजन करु. मी हे ऐकलं आणि मला खूपच आनंद झाला. मी मलाही कन्यापूजन करायचय असं महाराजांना सांगितलं. आणि आम्ही त्यांचं भोजन होईपर्यंत नर्मदा तीरावर गेलो. मुलींच भोजन झाल्यावर महाराज स्वतः मला कन्यापूजनासाठी बोलवायला आले. आम्ही वर आलो तर मंदिरात साऱ्या कन्यका बसल्या होत्या. आमचं अचानक जाणं झाल्याने मी पूजनासाठी कुठलीही तयारी नेली नव्हती. पण ऐनवेळी आलेला हा योग खूपच मोठा होता. त्यामुळे फक्त दक्षिणा देऊन का होईना मी साऱ्या कन्यांचं पूजन केलंच. एकाचवेळी १९-२० कुमारिकांचं पूजन करण्याचं भाग्य  आम्हाला लाभलं होतं.  कन्यापूजन करुन आम्ही भोजनप्रसाद घेतला. मधल्या वेळेत आम्हालाही मंदिराबाहेर मयुराचं छान दर्शन झालं होतं. प्रसाद घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला आणि रात्री वेळेत घरी पोहोचलो.

            यावेळी अगदी ऐनवेळी  गिरनार यात्रा ठरली होती. त्यामुळे गाडीने जावं लागलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी गिरनार दर्शन घडावं ही आमची प्रार्थना श्री दत्तगुरुंनी ऐकली होती आणि आम्हाला सुंदर दर्शन घडवलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या सगळ्या इतर इच्छाही पूर्ण केल्या होत्या. त्रिवेणी संगमावर स्नान, कुबेर भंडारी, गरुडेश्वर यांच दर्शन, भालोदला श्री दत्तात्रेयांचं दर्शन आणि महाराजांची भेट आणि या सर्वावर कळस म्हणजे भालोदला एवढ्या मोठ्या कन्यापूजनाचं लाभलेलं भाग्य सारंच अनुभूतीपूर्ण. यावेळची कोजागिरी पौर्णिमा ग्रहणातही आमच्यावर दत्तकृपेचं चांदणं बरसून गेली.

            || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

.

दत्तच माझे आनंदनिधान

दत्तनामात हरपते भान

   दैवत माझे दत्तदिगंबर

   ब्रम्हा विष्णू सवे महेश्वर

दत्तनामाची लागता गोडी

क्रोध मोह सारे बंध तोडी

   दत्तनामाचा करता जागर

   पार होईल हा भवसागर

दिठीतूनी करता प्रार्थना

पूर्ण होतसे मनोकामना

   श्वासासंगे गुरुनाम घ्यावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

- स्नेहल मोडक

Thursday, October 5, 2023

गिरनार आणि उपरकोट - सप्टेंबर २०२३

             भाद्रपद पौर्णिमा - ज्या दिवसाची आम्ही दोघं आसुसून वाट पहात होतो ती ही पौर्णिमा. या आधीच्या सलग तीन पौर्णिमांना केवळ माझ्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आम्हाला गिरनार गुरुशिखर दर्शन घडलं नव्हतं. त्यामुळे ही पौर्णिमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. यावेळीही तब्येतीचा थोडा त्रास होणार हे माहित असूनही जायचंच असं ठरवलं होतं. 

             रेल्वेचं आरक्षण आधीच केलं असल्याने ती चिंता नव्हती. नेहमीसारखं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 'यावेळी निर्विघ्न आणि सहजसुंदर दर्शन घडवा' अशी श्री दत्तगुरुंना प्रार्थना करुन निघालो. जूनागढला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढून स्थानापन्न झालो.  प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ट्रेनमध्ये गिरनारला जाणारे दत्तभक्तच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे रेल्वेच्या बहुतेक सर्वच डब्यांमध्ये अतिशय छान वातावरण असतं. यावेळीही आमच्या बाजूच्या लोकांशी आमचा संवाद सुरु झाला आणि कळलं ते सगळेजण याच्याच ऑफिसमधील एका सहकारी मित्राबरोबर गिरनारला निघाले आहेत. मात्र ते सहकारी मित्र त्यावेळी इतर लोकांची व्यवस्था बघण्यासाठी दुसरीकडे फिरत होते. 

             साधारण १५-२० मिनिटांनी आमच्या गप्पा सुरु असतानाच सदैव आमच्या समवेत असणारे याचे मित्र आणि ते सहकारी मित्र असे दोघंही अचानक आमच्या समोर आले आणि 'तुम्हाला काहीतरी द्यायचंय' असं म्हणत त्या सहकारी मित्रांनी आमच्या दोघांच्याही हातात एक-एक माळ दिली. आणि या माळा गिरनारचे पीठाधिपती महंत श्री महेश गिरी बापूंनी पूजा करुन, गुरुपादुकांना स्पर्श करुन दिल्या आहेत असं सांगितलं. मला बोलायला शब्दच सुचत नव्हते. डोळ्यांत येणारं पाणी अडवत माळ भाळी लावली.

              हा दिवस होता अनंत चतुर्दशीचा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं म्हणजेच श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने चौदा विश्वं निर्माण केली होती. या विश्वाच्या देखभाल आणि संरक्षणासाठी तो चौदा रुपात प्रकट झाला म्हणजे अनंत रुपात प्रकट झाला म्हणून अनंत चतुर्दशीला श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस जसा गणेशोत्सवाचा अखेरचा, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस तसंच श्री विष्णूंच्या पूजनाचा दिवस.

              भगवान श्री विष्णू -देवी श्री लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांना अतिशय प्रिय असलेली एक वस्तू म्हणजे वैजयंती माळ. भगवान श्रीकृष्ण नेहमीच ही माळ धारण करीत. वैजयंती  म्हणजे विजय मिळवून देणारी, यश संपादन करुन देणारी माळ. वैजयंती ही एक वनस्पती आहे. यावर लाल आणि पिवळ्या रंगाची सुंदर आणि सुंगधी फुलं येतात. याच्या बियांपासून ही माळ तयार करण्यात येते. चकचकीत अशा या बिया कधीही सडत किंवा तुटत नाहीत. काही विद्वानांच्या मते या माळेत पाच प्रकारचे मणी गुंफले जातात, जे पंचमहाभूतांचे प्रतिक असतात. ही माळ धारण करणं अतिशय शुभ फलदायी असतं. आणि आम्हाला प्रसाद म्हणून अशी वैजयंती माळच मिळाली होती. भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली ही वैजयंती माला अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी आम्हाला प्रसाद स्वरूपात मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे .स्वप्नातही न येता, न मागता स्वयं श्री दत्तात्रेयांनी आम्हाला एवढी मोठी प्रसाद भेट दिली होती. गिरनार प्रवासाची सुरुवातच शुभ संकेताने झाली होती.

              पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला गेलो. मुक्काम स्थानी जाऊन सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं, लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोप वे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. तिथून पुढे पायऱ्या चढून गुरुशिखरावर गेलो. मंदिरात प्रवेश करुन गुरुपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि डोळ्यात पाणी आलंच. सलग तीन पौर्णिमेनंतर श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे दर्शन घडल्यावरही मन शांत व्हायला काही क्षण लागलेच. दर्शन घेऊन परत खाली कमंडलू कुंडाजवळ गेलो. पोथीचं वाचन, दर्शन, प्रसाद घेऊन परत खाली निघालो. गोरक्षनाथ, अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोप वे जवळ पोहोचलो. आमच्या बरोबर असलेले काही जणं थोडं मागे राहिले होते. त्यामुळे त्यांची वाट पहात थांबलो. कारण रोप वे ने एकत्रच जायचं होतं. 

              १५-२० मिनिटं झाली आणि रोपवे चे अधिकारी येऊन सांगू लागले की ज्यांना रोपवेने पायथ्याशी जायचं आहे त्यांनी लगेच चला. वातावरण बिघडलं आहे , त्यामुळे रोपवे कुठल्याही क्षणी बंद करावा लागेल. झालं, आमची काळजी वाढली.  मागे राहिलेल्यांना लवकर बोलावण्यासाठी सतत फोन करु लागलो. अखेर ते रोप वे जवळ आले आणि आम्ही निघालो. ट्राॅलीमध्ये बसलो आणि जेमतेम २-३ मिनिटं ट्राॅली नेहमीच्या वेगाने पुढे गेली आणि अचानक वेग एकदम कमी झाला. इतका की नक्की आपली ट्रॉली पुढे जातेय कि नाही असं वाटत होतं. ट्राॅली ५-७ मिनिटं अशीच हळूहळू सुरु असतानाच एका क्षणी पूर्ण थांबली. आणि बाहेरच्या वाऱ्यामुळे हेलकावे घेऊ लागली. आम्हाला याचा पूर्वानुभव असल्याने फारशी काळजी वाटली नाही. काही मिनिटांतच ट्राॅली पून्हा हळूहळू सुरु झाली. आणि परत एकदा पूर्णपणे थांबली. परत आधीसारखे हेलकावे घेऊ लागली. आता मात्र आमच्या बरोबर असलेल्यांना किंचित काळजी वाटली. काही मिनिटांतच पून्हा ट्राॅली सुरु झाली. आणि आता मात्र नेहमीच्या वेगाने पायथ्याशी निघाली. जेमतेम १० मिनिटांत पायथ्याशी पोहोचणारी ट्राॅली यावेळी २५-३० मिनिटांनी पोहोचली होती.

              मुक्कामी येऊन थोडी विश्रांती घेऊन सोमनाथला निघालो. नेहमीसारखंच आधी भालका तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. यावेळीही मंदिराच्या आवारात खूपच गर्दी होती. नुकताच कुठलातरी कार्यक्रम संपला तरी होता किंवा पावसामुळे थांबवावा लागला होता. त्यामुळे गर्दी होती पण मंदिरात दर्शनासाठी मात्र फार लोकं नव्हती. त्यामुळे सुंदर दर्शन घडलं. या मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे. खूप सुंदर दर्शन झालं पण माझं मन तृप्त झालं नव्हतं. इथून पुढे आम्ही गीता मंदिरात दर्शनासाठी गेलो.

              हिरण्या नदीतीरी वसलेलं हे गीता मंदिर. इथे काही मंदिरांचं संकुल आहे. मुख्य मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि भिंतींवर गीतेतील अध्याय श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगासह चितारले आहेत. बाजूला श्रीराम -सीता , लक्ष्मी- नारायण अशी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेऊन लक्ष्मी - नारायण मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून उभीच राहिले. काही क्षणांनी नतमस्तक झाले आणि मन एकदम तृप्त, शांत झालं. गिरनारला येण्याआधी काही दिवसांपूर्वी मला राधाकृष्णाचं सुंदर असं स्वप्नदर्शन घडलं होतं. तेव्हापासून प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली होती. गिरनारला गेल्यावर भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोमनाथ या साऱ्या स्थानी दर्शनासाठी आम्ही जातोच. पण तरीही स्वप्नदर्शन झाल्यापासून प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली होती ती अखेर पूर्ण झाली. तिथून पुढे सोमनाथांचं दर्शन घेऊन परत मुक्कामी आलो.

              दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सारं आवरुन भवनाथ मंदिरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. लवकर गेल्यामुळे मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. तरी इथेही मन थोडं बेचैन होतं. दर्शन घेऊन मृगी कुंडाजवळ गेलो. गर्दी नसल्याने मृगी कुंडाभोवती प्रदक्षिणा घालता आली. आणि त्या मार्गात असलेल्या मोठ्या शिवपिंडीचं दर्शन स्पर्श करुन घेता आलं. त्यावेळी मात्र अर्पण करण्यासाठी बिल्वदल नसल्याची मला फारच रुखरुख लागली. शिवपिंडीवर जल चढवून नमस्कार करुन मंदिराबाहेर आलो. बाहेर आलो आणि मी अक्षरशः थक्क झाले. मंदिराबाहेर फुलवाला नुकताच येऊन फुलं विक्रीसाठी लावत होता. बिल्वदलंही अजून पिशवीतच होती. मी लगेच खूपशी बिल्वदलं विकत घेतली आणि आम्ही पून्हा मंदिरात गेलो. मृगी कुंडाच्या बाजूला असलेल्या शिवपिंडीवर बिल्वदलं अर्पण करुन नतमस्तक झाले आणि पुन्हा माझे डोळे ओलावले. तिथून परत मुख्य मंदिरात आलो तोपर्यंत तिथे आरती सुरु झाली होती. हाही सुंदर योग होता. इतक्या सुंदर रितीने माझी दुसरी इच्छाही पूर्ण झाली होती.

               राधाकृष्णाचं स्वप्नदर्शन होण्याआधी दोन दिवस २४ तासांच्या आत मला शंभू महादेवांनी तीन वेळा अतिशय सुंदर स्वप्नदर्शन दिलं होतं. त्यातील एका स्वप्नात मी खूप सारी बिल्वदलं अर्पण केल्याचं मला दिसलं होतं. म्हणूनच प्रत्यक्षात जेव्हा मला बिल्वदलं अर्पण करता आली तेव्हा डोळे पाणावलेच. त्या स्वप्नांमुळेच शंभू महादेवांनाही प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि इथे माझी तीही इच्छा पूर्ण झाली होती. खरंतर स्वप्नात घडलेल्या दर्शनानेच मन खूप सुखावलं होतं आणि नंतर प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडलं हे फारच भाग्याचं, मन अगदी प्रसन्न झालं होतं.

              भवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन नाश्ता करुन आम्ही, गेली ४ वर्षं ज्याची प्रतिक्षा केली होती तो जुनागढचा उपरकोट किल्ला बघायला गेलो. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या किल्ल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि त्या दिवसापासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेली ४ वर्ष हा किल्ला दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. 

             मौर्य साम्राज्याच्या काळात गिरनार पर्वताच्या पायथ्याशी एक किल्ला आणि शहर वसवले गेले. गुप्त काळापर्यंत याचा वापर केला जात होता. नंतर जूनागढहून राजधानी वल्लभी येथे हलविण्यात आल्यावर या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. नंतर १० व्या शतकातील चुडासामा राजा ग्रहरिपु यानी हा किल्ला जंगलापासून मुक्त केला. त्यानंतर १८९३-९४ मध्ये जुनागढ राज्याचे दिवाण हरिदास विहिरीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.

             उपरकोट किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शहराच्या पलीकडे पूर्वेकडील भिंतींमध्ये या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. एकात एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या भिंती ६०-७० फुट उंचीच्या आहेत. याच्या आतील बाजूस खोल खंदक सुरक्षेसाठी खणलेले होते. तर या उंच भिंतीवर टेहळणी बुरूज आहेत. या किल्ल्यात 'अडी वाव' आणि 'कडी वाव' अशा दोन मोठ्या आयताकृती विहिरी आहेत. जवळपास ७०-७५ पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर या विहिरी पहाता येतात. तसंच गोलाकार पायऱ्या उतरुन खाली एक 'नवघन कुवा' आहे. दुसऱ्या - तिसऱ्या शतकातील बौद्ध लेणीही या किल्ल्यात आहेत. ही दुमजली गुंफा आहे, प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी या गुंफांचा उपयोग केला होता. या गुंफा पहाण्यासाठी नाममात्र प्रवेशफी आहे. 

             राणी राणक देवीचा प्रशस्त महालही सुंदर आहे. खूप मोठा बगीचाही इथे आहे. नवाबी तलावही मोठा आणि पहाण्यासारखा आहे. खूप जून्या काळातील काही तोफा इथे ठेवल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या तोफा नीलम आणि माणेक या नावाने ओळखल्या जातात. किल्ल्यात लेझर शो आणि वस्तुसंग्रहालयही सुरु करण्यात येणार आहे. तसंच हा भव्य किल्ला पहाण्यासाठी बॅटरी कार ही सुरु करण्यात येणार आहे. 

             ४ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या किल्ल्यात आता जागोजागी पिण्याचे पाणी, उपहारगृह, स्वच्छतागृहं, या साऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण किल्ला पायी फिरून पहाण्यासाठी किमान ३ तासांचा अवधी आवश्यक आहे. 

             जुनागढ आणि आसपासच्या इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये आता या उपरकोट किल्ल्याचा समावेश नक्कीच करावा लागेल. आवर्जून एकदा तरी पहावा असा हा किल्ला आहे. इथे पूर्ण एक दिवसही थांबता फिरता येईल एवढा हा किल्ला भव्य आणि प्रेक्षणीय आहे. जागोजागी सविस्तर माहिती फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे सारा किल्ल्याचा इतिहास आपल्याला सहज जाणून घेता येतो. 

             किल्ला बघून रुमवर परत येऊन आवरुन पुन्हा ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागलो.

- स्नेहल मोडक

     

    
    






        


कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...