पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अष्टमीपासून सुरु होणारं शाकंभरी देवीचं नवरात्र पौर्णिमाला समाप्त होतं.
पृथ्वी वर पडलेल्या प्रचंड दुष्काळापासून जनतेला वाचविण्यासाठी माता पार्वतीने अवतार धारण केला आणि आपल्या तनुवरल्या फळं,भाज्या वनौषधींचा उपयोग करुन जीवसृष्टी वाचवली आणि त्यामुळे तिला शाकंभरी देवी हे नांव मिळालं.
अशा वैशिष्ट्यपूर्ण पौष पौर्णिमेला आम्हाला पुन्हा एकदा गिरनार शिखर दर्शन आणि अखंड धुनी दर्शनाचा योग आला हे खूप भाग्याचंच.
पौष पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं खरं पण नेमकं त्याचदरम्यान काही घरगुती कार्यक्रम आधीच ठरलेले होते. मग कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावून गिरनारला जायचं ठरवलं. जायच्या आधी दोन दिवस पित्तामुळे माझी तब्येत बिघडली. पण शक्य तेवढा आराम करुन आणि औषध घेऊन गिरनारला जायचं नक्की केलं.
पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघून रात्री वेळेत भवनाथ तलेटीला आमच्या रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. खोलीवर जाऊन ताजंतवानं होऊन जेवण्यासाठीसाठी पुन्हा बाहेर पडलो. परंतु वाढत्या निर्बंधांमुळे सारी दुकानं आणि उपहारगृहही दहा वाजत आल्याने बंद होण्याच्या तयारीत होती. फारशी भूक नसल्याने गरमागरम ठेपले आणि त्याबरोबर झणझणीत मिरची लोणचं बांधून घेतलं आणि आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेऊन परत आलो. जेवण करुन गिरनार दर्शनाचं सुखस्वप्न पहातच निद्राधीन झालो.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरुन पुन्हा पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ जाऊन रांगेत उभं राहिलो. भल्या पहाटेपासून उडन खटोलासाठी भाविक रांगेत उभे होते. ठरलेल्या वेळी उडन खटोलाच्या फेऱ्या सुरु झाल्या आणि थोड्या वेळातच आम्ही अंबाजी टुकवर पोहोचलो. नुकताच सूर्योदय झाला होता. एका बाजूला सोनकेशरी रंग पसरला होता तर दुसऱी बाजू अजून धुक्याची दुलई लपेटून बसली होती. अतिशय सुंदर नजारा होता. आकाश सोनकेशरी रंगात रंगलेलं, खाली धुक्याची दुलई आणि अंबाजी टुकवर जमलेले, भक्तीरसाने रसरसलेले सारे भाविक, सारंच अप्रतिम. गिरनारचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्यानं नटलेला आणि भक्तीरसात चिंब भिजलेलाच असतो. गिरनारहून परत यावसंच वाटत नाही इतका तिथला परिसर भारलेला आहे. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या तपोबलाने पावन झालेल्या त्या भूमीवरुन दर्शन घेऊन परत फिरावसंच वाटत नाही.
अंबामातेच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोरक्षनाथ टुकवर पोहोचून दर्शन घेतलं आणि मंदिरासमोरील पापपुण्याच्या छोट्याशा बोगद्यातून (खिडकी) रांगत बाहेर येऊन पुन्हा पुढे गुरुशिखराकडे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. पुढच्या काही क्षणातच मी श्री दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि जाणवली ती अपार तृप्ती. स्वयं श्री दत्तात्रेय सतत आपल्याबरोबर आहेत ही जाणीवच फार विलक्षण आहे. मी घरुन करुन नेलेला नैवेद्य दत्तगुरुंना अर्पण करुन, तीर्थ आणि अष्टगंध लेऊन अखंड धूनीच्या दर्शनाला गेलो.
अखंड धुनी ही दर सोमवारी सकाळी दोन तासांसाठी प्रज्वलित होते. दर सोमवारी तिथले साधूसंत पिंपळवृक्षाची काष्ठं धूनीच्या स्थानी रचतात आणि काही क्षणातच धुनी प्रज्वलित होते. पुढचे साधारण दोन तास धुनी तशीच प्रज्वलित असते. यावेळी पौर्णिमा आणि सोमवार असा विशेष योग आल्यामुळे धुनीच्या दर्शनाला खूपच गर्दी होती. त्यामुळे थोड्या पाय-या उतरुन रांगेत उभं राहिलो. साधारण तासाभरात आम्ही धुनीजवळ पोहोचलो. मला धुनींचं दर्शन झालं आणि मी तिथेच अक्षरशः खिळून उभी राहिले. माझ्या दृष्टीसमोर होत्या धुनीतल्या केशरपिवळ्या ज्वाला आणि दत्तगुरुंची प्रसन्न मूर्ती. काही क्षणांनी भानावर आले आणि अन्नछत्रासाठी नेलेला शिधा, रक्कम गुरुजींच्या हाती अर्पण करुन नतमस्तक झाले. धूनीचं भस्म लेऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. नंतर तिथे लागूनच असलेल्या एका छोट्या समाधीस्थळी जाऊन बसलो. पून्हा एकदा शांतपणे गुरुशिखर आणि अखंड धुनीचं मानसदर्शन केलं. गुरुचरित्राचं थोडं वाचन करुन मार्गस्थ झालो. गोरक्षनाथ टुकवर पोहोचून पून्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक येथे आलो. अंबामातेचही परत एकदा दर्शन घेऊन उडन खटोलाजवळ आलो. काही वेळातच उडन खटोलाने तलेटीला परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी परत येऊन थोडा आराम करुन परतीच्या प्रवासाला लागलो.
कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष सलग तीन पौर्णिमा गिरनार दर्शन श्री दत्तगुरुंनी आम्हाला घडवलं हे आमचं फारच मोठं भाग्य.
कार्तिकी पौर्णिमेला दर्शन आणि परिक्रमा दोन्हीचा योग आला. निर्बंधांमुळे सुरुवातीला परिक्रमेला परवानगी नव्हती. पण श्री दत्तगुरुंनी भक्तांची प्रार्थना ऐकली आणि ऐनवेळी परवानगी मिळाली. आमच्यासारख्या साऱ्या भाविकांना परिक्रमा करता आली म्हणून वेगळंच समाधान लाभलं होतं.
दत्तजयंतीला गिरनारला जायचा आनंद तर विशेषच होता. नेहमी आम्ही दोघं आणि स्नेही असंच दर्शनाला जातो. यावेळी मात्र मुलीही बरोबर होत्या. त्यांना तर दर्शनाला येण्याआधीच श्री दत्तात्रेयाच्या अस्तित्वाची, आमच्या जवळ असण्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दत्तजयंतीलाही उत्तम रितीने गिरनार दर्शन झालं होतं. त्यादिवशीही संपूर्ण गिरनार धुक्यात हरवला होता. चैतन्याने भारलेलं अतिशय सुंदर वातावरण होत. सूर्योदय होऊनही बराच वेळ सारा परिसर धुक्याची दुलई पांघरूनच बसला होता.
भवनाथ तलेटीचा सारा परिसर मला खूप आवडतो. सतत उत्सहाने भरलेल्या आणि भाविकांनी फुललेल्या या ठिकाणी पोहोचलं की आपणही त्या उत्साहाचा भाग होतो, एका वेगळ्याच विश्वात रमतो. गिरनार पर्वताच्या नुसत्या दर्शनानेही लीनता येते. आणि प्रत्यक्ष दर्शनाचं समाधान तर अवर्णनीयच.
खरंतर नोव्हेंबर २०१९ आधी कुणी ज्योतिषांनी जरी मला भविष्य सांगितलं असतं तरी माझा विश्वास बसणंच कठिण होतं की इतका मोठा गिरनार वारीचा विशेष योग आमच्या आयुष्यात येईल. खरंच स्वयं श्री दत्तात्रेयच आम्हाला प्रत्येकवेळी गिरनार वारी घडवत आले आहेत. आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि पूर्तता श्री दत्तगुरु करतात.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
मनी एकच ध्यास एकच आसलाभो निरंतन तव सहवास
मिटल्या नेत्रीही तू नित्य दिसावेपापणीत डोळीयांच्या तू असावे
हृदयमंदिरी तू सदा वसावेअधरावरती तू नित्य रहावे
श्वासागणिक तुजला मी स्मरावेनामातच तुझिया सदा रमावे
कातर हळव्या क्षणी तू असावेझुल्यावर सुखाच्या तुज स्मरावे
सगुण निर्गुण भेदच नुरावे
दत्तचरणी 'मी' पण हे सरावे
मनी एकच ध्यास एकच आसलाभो निरंतन तव सहवास
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment