साधारण होळी पौर्णिमा झाली की नर्मदा भक्तांना वेध लागतात ते उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचे. अर्थात या परिक्रमेचं नियोजन ३-४ महिने आधीच केलेलं असतं. पण होळी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष तयारीला सुरुवात होते. या परिक्रमेचे वेध यावेळी आम्हालाही लागले होते.
नर्मदा नदी ही मुळात पश्चिमवाहिनी आहे. संपूर्ण मार्गात ती तीन ठिकाणी उत्तरवाहिनी होते. तिलकवाडा, मंडला आणि ओंकारेश्वर जवळील एक स्थान अशा तीन ठिकाणी नर्मदा उत्तरवाहिनी होते. पण ओंकारेश्वर जवळच्या बंधाऱ्यामुळे तीचा मार्ग बदलला आहे. मैया जिथे उत्तरवाहिनी होते त्या भागाची केलेली परिक्रमा म्हणजेच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा. हि परिक्रमा चैत्र महिन्यातच केली जाते. चैत्र महिन्यात केलेली उत्तरवाहिनी परिक्रमा विशेष पुण्यदायी समजली जाते. तिलकवाडा - रामपुरा -तिलकवाडा अशी २१ किमी. ची ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आहे. ज्यांना मैयाची साधारण ३,३०० किमी. अंतराची संपूर्ण परिक्रमा पायी करणं शक्य नाही त्यांनी जरी ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली तरी त्यांना संपूर्ण पायी परिक्रमेचं फल प्राप्त होतं अशी मान्यता आहे.
गतवर्षी आम्ही वाहनाद्वारे संपूर्ण नर्मदा परिक्रमा करुन आलो होतो. खरंतर त्यानंतर लगेचच ही उत्तरवाहिनी परिक्रमा करायची इच्छा होती पण तेव्हा योग आला नाही. यावर्षी मात्र ही परिक्रमा करायचीच असं ठरवलं होतं. मैयाला 'ही उत्तरवाहिनी परिक्रमा तूच आम्हाला घडव' अशी प्रार्थना करतच होते. आमच्या नेहमीच्या पौर्णिमेच्या गिरनार दर्शनानंतर लगेचच ही परिक्रमा करायची ठरवून तसं नियोजन केलं. सुरुवातीला आम्ही नेहमी गिरनार ला जाणाऱ्या चौघांनीच उत्तरवाहिनी परिक्रमेला जायचं ठरवलं होतं. पण मग एक-एक जण वाढत मोठा ग्रुप तयार झाला.
होळी पौर्णिमेला नेहमीप्रमाणे गिरनार ला जाऊन आलो. आणि ५-६ दिवसांनी माझी परत गुडघादुखी सुरु झाली. सरळ चालण्या व्यतिरिक्त गुडघ्याची कुठलीही हालचाल करताना असह्य वेदना होत होत्या. सगळे उपचार सुरु होते. पण वेदना कमीच होत नव्हती. पुढची पौर्णिमा जवळ आली तरी दुखणं तसंच होतं. पण माझा गिरनार दर्शन आणि उत्तरवाहिनी परिक्रमेला जायचा निश्चय दृढ होता. मला दोन्हीही पायी करायचंच होतं म्हणून श्री दत्तगुरु आणि नर्मदा मैयाला प्रार्थना करत होते.
ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आम्ही प्रवास सुरु केला. पहाटे जुनागढला पोहोचलो. तिथून तलेटीला मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. लगेचच सारं आवरुन दर्शनाला निघालो. नित्याप्रमाणे लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवेने अंबाजी टुकवर पोहोचलो.
रोपवेने जाताना बदललेल्या वातावरणाचा अंदाज आला होताच. रोपवेतून उतरुन वर आलो आणि जोरदार गार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. आजूबाजूचे डोंगरमाथे शुभ्रमेघांत हरवले होते. खरंतर रविराजाचं आगमन झालं होतं पण त्याचं दर्शन घडत नव्हतं. मात्र ते शुभ्र मेघ सोनेरी किनारीने सजले होते. अतिशय सुंदर नजारा होता. हे सारं दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली.
गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. मंदिरात पोहोचायला साधारण ५०-६० पायऱ्या असताना थांबलो. आमच्यासारखे बरेचसे भाविक तिथे थांबले होते. याचं कारण म्हणजे पौर्णिमा लागायला अजून थोडा वेळ होता. आणि आम्हाला पौर्णिमेलाच दर्शन घ्यायचं होतं. साधारण अर्धा तासाने पौर्णिमा सुरु झाली आणि आम्ही दर्शनासाठी पुढे निघालो. शेवटच्या १५-२० पायऱ्या उरल्या असतानाच वातावरणातील गारवा वाढला. आणि अचानक पर्जन्यवृष्टी सुरु झाली. जणू सुंदर गुलाबपाणी शिंपडून साऱ्या भक्तांचं स्वागत झालं.
मंदिरात प्रवेश करुन दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन तृप्त झालं पण अश्रू मात्र अनावर झाले होते. साश्रू नयनांनी उठून आधी अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद घेतला आणि जाणवलं की माझ्या अगदी जवळच श्वान उभा आहे आणि त्याला तो प्रसाद हवाय. मी हातातूनच दिलेला प्रसाद त्याने खाल्लाच आणि तसाच माझ्या मागोमाग तो श्वान आला. मी त्याच्यासाठी अजून थोडा प्रसाद तिथे बाजूला ठेवला. गर्दी असल्याने मला तिथे थांबणं अशक्य होतं. त्यामुळे प्रसाद तिथे ठेवून मी निघाले. १०,००० पायऱ्यांवरील दत्तगुरुंच्या मंदिरातील त्या श्वानाचं अचानक येणं आणि माझ्या हातून प्रसाद ग्रहण करणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची घटना होती. इतक्या वेळा दर्शनाला गेलो पण ही घटना पहिलीच. याआधी एका कबुतराने माझ्या हातून प्रसाद ग्रहण केला होता. प्रत्येक वेळी श्री दत्तात्रेयांच्या कृपेने अतिशय सुंदर अशी अनुभूती येते हे मोठं भाग्यच.
चरण पादुकांचं दर्शन घेऊन खाली आलो. अखंड धुनीजवळ पोहोचून वाचन केलं. दर्शन घेऊन शिधा, देणगी अर्पण करुन भोजनप्रसाद घेऊन रोपवेने परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो.
थोडासा आराम करुन सोमनाथला दर्शनासाठी निघालो. वाटेत गीता मंदिर, भालका तीर्थ, त्रिवेणी संगम हे सारं पाहून सोमनाथ ला पोहोचलो. दर्शन घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. लगेचच रात्री जुनागढहून अहमदाबाद साठी निघालो.
पहाटे अहमदाबादला पोहोचलो आणि आम्ही मनाने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेतच रमलो. अहमदाबाद हून पुढे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. कर्नाळी गावात आमचा मुक्काम होता. रुमवर पोहोचून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानाला निघालो.
कर्नाळी गावात आम्ही जिथे रहाणार होतो तिथून जवळच त्रिवेणी संगम आहे. नर्मदा मैया, गुप्त सरस्वती आणि छोटा उदयपूर येथे उगम पावणारी ओरसंग नदी या तिन्ही नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात तो हा त्रिवेणी संगम. अतिशय सुंदर आणि सुरक्षित असा हा संगम आहे. आम्ही मैयाच्या जलात स्नानाला उतरलो आणि त्या शीतजलाच्या नुसत्या स्पर्शानेच आमचा प्रवासाचा शीणवटा क्षणात नाहीसा झाला. पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं. वेळेअभावी आवरतं घेत मुक्कामी परत आलो.
परत येऊन सारं आवरलं आणि पुजेच्या तयारीला लागलो. घरुन निघतांनाच संकल्प पूजेची पूर्ण तयारी नेली होती. परिक्रमा करण्याआधी ती परिक्रमा कधी, कशी, कशासाठी करणार याचा संकल्प करायचा असतो. स्नान करुन येताना प्रत्येकाने छोट्या बाटलीत नर्मदा जल भरुन आणलं होतं. त्या जलाची प्रत्येकाने षोडशोपचार पूजा करुन परिक्रमेचा संकल्प केला. यावेळी मैया सतत नजरेसमोर येत होती.
संकल्प करुन भोजन केलं. आणि मग आम्ही जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कुबेर भंडारी येथे दर्शनासाठी गेलो. कुबेर म्हणजे इंद्राचा कोषाध्यक्ष आणि सर्व दैवी संपत्तीचा मालक. पण त्याच्या सावत्रभावाने म्हणजेच रावणाने कुबेरनगरीवर हल्ला करुन सर्व संपत्ती हिसकावून घेतली. नंतर कुबेराने श्री शंकराची नर्मदा तीरावर कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे शंकर महादेवाने प्रसन्न होऊन कुबेराला पुन्हा संपत्ती भांडार प्राप्त करवून दिले. म्हणून या ठिकाणी कुबेराला कुबेर भंडारी असं म्हटलं जातं. या संपूर्ण परिसराला कर्नाळी म्हणतात. अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे. दर अमावास्येला इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. इथला नर्मदा किनारा सुंदर आणि तपश्चर्येने पावन झालेला आहे.
कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे तिलकवाड्याला गेलो. हे अतिशय प्राचीन ठिकाण आहे. इथे गावात असलेल्या तिलकेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हे तिलकवाड्याचं राजघराणं तिलक यांचं कुलदैवत. तिलकेश्वराला काळे तीळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे पापाचा क्षय होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आम्ही तिलवाड्याहूनच परिक्रमा उचलणार होतो. त्यामुळे तिलकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही प्रत्यक्ष परिक्रमा जिथून सुरु करतात तिथे म्हणजे वासुदेव कुटीर येथे गेलो. तो परिसर पाहून परिक्रमा मार्ग आणि इतर गोष्टी यांबद्दल माहिती घेतली. या कुटिरात छोटसं आणि सुंदर असं समर्थांनी स्थापन केलेलं मारुती मंदिर आहे. हनुमान जयंती निमित्त तिथे उत्सव होता. आम्ही मारुतीरायाचं दर्शन आणि प्रसाद घेतला.
इथून पुढे आम्ही गरुडेश्वर मंदिराकडे निघालो. नर्मदा तीरावर असलेल्या श्रीक्षेत्र गरुडेश्वर इथे प. पू. श्री. वासुदेवनंद सरस्वती महाराजांनी समाधी घेतली आहे. याठिकाणी श्री दत्तात्रेयांचे सुंदर मंदिर असून तिथेच बाजूला समाधी मंदिर आहे. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
यानंतर आम्ही गेलो शूलपाणेश्वराच्या दर्शनासाठी. भगवान शिवाने अंधकासूर राक्षसाला त्रिशुलाने नष्ट केलं. त्यावेळी त्रिशुळाला लागलेल्या रक्ताचे डाग जात नव्हते. म्हणून शिव फिरत फिरत इथे आले त्यावेळी त्यांच्या त्रिशूळाचा भूमीवर आघात झाला आणि त्यातून जलधारा निर्माण झाली. या जळाने त्रिशूळावरील डाग स्वच्छ झाले. म्हणून या स्थानाला शुलपाणेश्वर म्हणून ओळखलं जातं. १९९१ साली सरदार सरोवर प्रकल्पात मुळ मंदिर पाण्याखाली गेलं म्हणून नंतर १९९४ साली १६० फुट उंच पहाडावर नवीन मंदिर बांधण्यात आलं.
शूलपाणीहून आम्ही पुढे भालोदला पोहोचलो. नर्मदा तीरावरचं हे भालोद म्हणजे श्री प्रतापे महाराजांचा आश्रम आणि त्यातील एकमुखी श्री दत्तात्रेयांचं मंदिर, अतिशय सुंदर पवित्र असं हे ठिकाण. काशिताई निरखे यांच्याकडून स्वयं श्री दत्तात्रेयांच्या इच्छेने श्री प्रतापे महाराजांकडे आलेली ही एकमुखी दत्ताची मूर्ती. ही मूर्ती शाळीग्रामाची असून वक्षस्थळावर गोमुख स्पष्ट दिसतं. आश्रमासमोरच मैयाचं विशाल पात्र आहे. या आश्रमात कन्यापूजन विधी केला जातो. परिक्रमा वासींसाठी इथे रहाण्या-जेवण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली जाते.
मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ मयुर येतात. मुक्त विहार करुन त्यांना दिलेले दाणे टिपून निघून जातात. आम्ही आश्रमात पोहोचलो त्याआधी नुकतेच ते येऊन गेल्याने आम्हाला मात्र त्यांचं दर्शन झालं नाही. आम्ही गेल्यावर श्री प्रतापे महाराजांनी स्वतः आमचं अगत्यानं स्वागत केलं. आम्ही त्यांच्यासमोर बसलो आणि संवाद सुरु झाला. आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरवाहिनी परिक्रमा करणार आहोत हे सांगताच त्यांनाही आनंद वाटला. परिक्रमेबद्दल त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं असं आम्ही सांगताच त्यांनी खूप छान माहिती दिली. तेवढ्यातच दुसऱ्या साधकांचे 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' हे शब्द कानावर आले आणि महाराजांसह आम्ही उठलो. सायंआरतीची वेळ झाली होती. श्री दत्तात्रेयांची आणि नंतर नर्मदा मैयाची आरती झाली. या आरतीत आम्हाला सहभागी व्हायला मिळालं हे अगदी अचानक लाभलेलं भाग्य. आरती सुरु असताना माझ्या डोळ्यातून मात्र आसू ओघळत होते.
खरंतर आम्ही जेव्हा भालोदला पोहोचलो तेव्हा आमच्या ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला होता. म्हणून श्री दत्तात्रेयांचं आणि महाराजांचं दर्शन घेऊन लगेच परत निघायचं असं ठरलं होतं. पण मला मात्र तिथं थोडावेळ तरी थांबून महाराजांशी बोलायचंच होतं. आणि श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा अतिशय सुंदर रित्या पूर्ण केली होती म्हणूनच आरतीच्या वेळी माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
भालोदहून निघून वाटेत जेवून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो. एव्हाना रात्रीचे अकरा वाजले होते. खोलीत पोहोचून प्रत्येकाने पहाटे सुरु करायच्या परिक्रमेची पूर्वतयारी केली आणि मग सगळे निद्राधीन झालो. पहाटे दोन वाजेपर्यंतच आराम होणार होता.
सारी आन्हिकं आवरुन, वाचन करुन पहाटे सव्वातीन आम्ही तिलकवाडा इथे जाण्यासाठी निघालो. गाडीने साधारण अर्धा तास लागणार होता. त्याप्रमाणे तिलकवाड्यातील वासुदेव कुटिर येथे पोहोचलो. श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाला प्रार्थना करुन परिक्रमा सुरु केली.
परिक्रमा सुरु केल्यावर लगेचच परत एकदा तिलकेश्वराचं दर्शन घेतलं. यानंतर तिथून जवळच असलेल्या नर्मदा मंदिरात गेलो. इथे मातेला नमन करुन प्रत्यक्ष परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा मार्ग थोडा बाजूचा आहे. नर्मदा मैया उजव्या बाजूला ठेवून आपण चालत असतो. सुरुवातीला थोडा सडक मार्ग आहे मग थोडी पायवाट आहे. साधारण दोन किमी. अंतरावर एक मंदिर दिसतं. हे मणिनागेश्वराचं मंदिर. याठिकाणीही भाविकांची रहाण्या - जेवण्याची व्यवस्था आहे.
मणिनागेश्वराचं दर्शन घेऊन पुढे निघालो. इथून पायवाटेने पुढे जाताना बाजूला घरं आहेत. त्यामुळे इथल्या ग्रामसंस्कृतीचं छान दृश्य पहायला मिळतं.मग पुढे बराचसा रस्ता शेतातून आणि नर्मदा तीरावरुन होतो. मैयाचं सुंदर दर्शन घडत असतं. पहाटे चार वाजता आम्ही परिक्रमा सुरु केल्याने नर्मदा किनाऱ्याने चालताना चंद्र अस्ताचलाला जाताना दिसत होता. आणि अस्ताला जाताना तो किंचित केशररंगी शशांक मैयाच्या जलदर्पणी स्वताला न्याहाळत होता. अतिशय विहंगम दृश्य होतं ते. ते दृष्य नजरेत आणि छायाचित्रात साठवत आमची परिक्रमा पुढे सुरु होती.
मधेच परिक्रमा मार्ग, पुन्हा डांबरी रस्त्यावर वळला होता. तो पार करुन पुन्हा पायवाट सुरु झाली. शेतातून पायवाटेने जाताना उजव्या बाजूला अजून एक मंदिर लागतं ते म्हणजे कपिलेश्वर मंदिर. नाथपथी महाराजांचा इथे आखाडा असून गर्द झाडीतला हा आश्रम सुंदर आहे. इथून पुढला थोडा मार्ग नर्मदा किनाऱ्याने जातो. मैयाचं सुंदर दर्शन घडत रहातं
उत्तरवाहिनी परिक्रमेच्या उत्तर तटावरील शेवटचं गांव रेगण आहे. इथे परिक्रमेचा मार्ग नर्मदा किनाऱ्यावरुन परत थोडा गावातून जात परत तीरावर येतो. हा शेवटचा थोडा मार्ग मात्र पात्रापासून थोडा उंचावर आणि उंचसखल असा आहे. त्याचबरोबर मातीचं प्रमाण जास्त असल्याने जपूनच चालावं लगतं अन्यथा पाय घसरुन आपण खाली पात्राजवळ जाण्याची शक्यता असते. हा मार्ग संपता संपता आपल्या डाव्या बाजूलाच भव्य असा शंभू महादेवाच्या नंदीचा पुतळा आहे. इथे थोडं थांबून आम्ही त्याची छायाचित्रं काढली. लगेचच पुढे आपल्याला पलिकडच्या तीरावर नेण्यासाठी नावा उभ्या असतात. इथून पलिकडच्या तीरावरचं म्हणजे रामपुरा गावाचं छान दृश्य दिसतं.
इथून आम्ही सगळे एकाच नावेतून पलिकडल्या तीरावर निघालो. नाव साधारण मध्यावर येताच आमच्या जवळच्या मैयाजलातील थोडं जल त्या प्रवाहात ओतून त्यातच तिथलं जल परत भरुन घेतलं यालाच तीर्थमीलन करणं असं म्हणतात. जेमतेम ८-१० मीनीटांचा हा प्रवास अतिशय सुंदर होता. मैयाच्या जळात हात घालत खेळत प्रवास कधी संपला ते कळलंही नाही. नावेने पलिकडल्या तीरावर उतरलो आणि आमचा परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. हा साधारण १०-११ किमी. चा मार्ग कधी पूर्ण झाला हे कळलंही नाही. सारेच जण खूपच उत्साहाने चालत होतो.
दक्षिण तटावरील पहिलं गाव म्हणजे रामपुरा. इथे आम्ही पोहोचलो. आणि सर्वप्रथम वाफाळत्या चहाचा आस्वाद घेतला. आदल्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर काहीच खाणंपिणं केलं नव्हतं. कारण सर्वांनाच परिक्रमेची ओढ लागली होती. जेव्हा अर्धा टप्पा पूर्ण झाला तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांना याची जाणीव झाली आणि सगळेच चहा प्यायला थांबलो.
चहा पिऊन समोरच असलेल्या थोड्या पायऱ्या चढून प्रज्ञान आश्रमात गेलो. इथे तीर्थेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात महादेवाला परिक्रमेत आपण आपल्या बरोबर घेतलेलं मैयाजल चढवायचं असतं. परिक्रमा पूर्तीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे अशी मान्यता आहे. त्याप्रमाणे तीर्थेश्वराला थोडं जल चढवून आम्ही पुढे निघालो.
दक्षिण तटावरील परिक्रमेचा बराचसा मार्ग डांबरी रस्त्याने जातो. त्या मार्गाने आम्ही पुढे चालायला लागलो. मार्गावर बऱ्याच ठिकाणी सेवा म्हणून चहा, पाणी, सरबत, ताक इ. दिलं जातं. इथले गावकरी मैयाची सेवा म्हणून परिक्रमावासींना ही मोफत सेवा अगदी आग्रहाने देतात. हे आम्हाला आधीपासूनच माहीत होतं. उत्तर तटावरुन आम्ही भल्या पहाटे परिक्रमा सुरु केल्याने तिथे अशी सेवा देणारं कुणी नव्हतं. पण दक्षिण तटावरही सुरुवातीला तसं कुण दिसलं नाही. एव्हाना सहस्त्ररश्मीचं आगमन झालं होतं. आणि मार्गावर कुठेतर थंड पेय मिळावं असं मनात येत होतं.
आपली इच्छा मैया बरोबर जाणते आणि लगेचच पूर्णही करते हा पूर्वानुभव होताच. अगदी तसंच झालं. थोडंसं चालून पुढे गेलो आणि वाटेत चहा, गोड बुंदी असा प्रसाद देणं सुरु होतं. प्रसाद म्हणून अगदी एकघोट चहा घेऊन पुढे निघालो.
थोडं पुढे गेल्यावर लागलं ते रणछोडरायाचं मंदिर. अगदी रस्त्यालगतच असलेलं अतिशय सुंदर प्रशस्त असं हे मंदिर. शेत नांगरताना सापडलेली श्रीविष्णूची काळ्या पाषाणातील रेखीव मूर्ती इथे आहे. इथे दर्शन घेऊन पुढे निघालो.
थोडं पुढे जाताच पुन्हा सेवेकरी उभे होते. ते मात्र सर्वांना ताक देत होते. ताक प्यायला मिळतय म्हटल्यावर सगळेच खूष. ग्लासभर थंडगार गोड ताक पिऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. मग मात्र बराचवेळ न थांबता चाललो. सगळा मार्ग डांबरी रस्त्यानेच होता. जूना रामपुरा गावातूनच हा मार्ग पुढे धनेश्वर मंदिराकडे जातो. आपल्या उजव्या बाजूला थोडंसं आत असं हे धनेश्वर महादेवाचं मंदिर आहे.
परिक्रमा मार्गावर यानंतरचं ठिकाण म्हणजे गोपालेश्वर मंदिर.
यानंतरचं पुढचं ठिकाण म्हणजे मांगरोल गावातील मंगलेश्वर मंदिर. मंगळ हाही शिवशंकरांचा पुत्र आहे. याचा जन्मही नर्मदा नदी प्रमाणेच शिवशंकराच्या स्वेदापासूनच झाला आहे. उत्तर वाहिनी नर्मदा नदीच्या तीरावर या ठिकाणी त्याने शिवाची तपश्चर्या केली म्हणून या मंदिराचं नांव मंगलेश्वर आणि गावाचं नांव मांगरोल.
इथून थोडं पुढे गेल्यावर आम्ही सगळेच विश्रांती आणि फलाहार करण्यासाठी थांबलो. कारण सूर्योदय होऊन फार वेळ झाला नसला तरी काहिली व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडं थांबून मग परत चालायला लागलो.
मंगलेश्वर मंदिरानंतर मार्गात तीन आश्रम आहेत. तपोवन आश्रम, रामानंद आश्रम आणि शेवटचा सीताराम बाबांचा आश्रम.
आम्ही सीताराम बाबांच्या आश्रमात पोहोचलो. तिथेही परिक्रमावासींना चहा देत सेवेकरी उभे होते. पण चहापेक्षा काही थंड मिळावं असं मनात आलं आणि तिथे बाजूलाच असलेल्या कलिंगडांच्या ढिगाकडे माझं लक्ष गेलं. कलिंगड विकत घ्यावं असा विचार करत मी काही पावलं पुढे गेले आणि मैयाने माझी ही इच्छाही त्वरित पूर्ण केली. समोरच लालबुंद रसदार अशा कलिंगडाच्या फोडी परिक्रमावासींकरता ठेवल्या होत्या. खरंतर असं विनामूल्य कुणाकडून काही घेणं आपल्याला पटत नाही. पण त्यांच्या दृष्टीने ही मैयाची सेवा असल्याने ते आपल्याला आग्रहच करतात. मुळात मैयाची पायी परिक्रमा करताना पैसे जवळ ठेवायचे नसतात असा संकेत आहे. मैया आपल्याला कधीही उपाशी तर ठेवत नाहीच पण आपल्या इच्छा आकांक्षा सहज पूर्ण करते. हा अनुभव आम्हाला वाहनाने केलेल्या परिक्रमेत आणि आताच्या या उत्तरवाहिनी परिक्रमेतही आला.
सीताराम बाबांच्या आश्रमातून थोड्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर मार्ग परत अगदी नर्मदा किनाऱ्याने जातो. हा साधारण तीन किमी.चा मार्ग मात्र पूर्ण दगडगोट्यातून आहे. परिक्रमा करणाऱ्यांना चालणं सुकर व्हावं म्हणून थोडे दगडगोटे बाजूला केले आहेत. मा मार्गावरुन चालत आम्ही परत जिथे नावा थांबलेल्या असतात तिथे पोहोचलो.
इथून नावेने आम्ही तिलकवाड्याला म्हणजेच उत्तर तटावर परत आलो आणि आमची उत्तरवाहिनी परिक्रमा पूर्ण झाली. नावेतून जिथे उतरलो तिथे स्नानासाठी सुरक्षित किनारा नव्हता. तिथे असलेल्या पोलिसांनी आम्हाला उजव्या हाताला थोडं पूढे जाऊन स्नान करायला सांगितलं तिथे काही भाविक आधीच स्नान करत होते. मग आम्हीही तिथे गेलो. तिथेही किनारा दगडगोट्यांनीच व्यापला होता.
माझ्या पुढे आमच्या ग्रुप मधले काही जणं चालत होते. मी थोडी मागून नर्मदेश्वर आणि नर्मद्या गणेशाच्या शोधात सावकाश चालत होते. काही मिळाले ते वेचत असतानांच मला ग्रुपमधल्या एकांनी हाक मारली आणि एक रेखीव नर्मदेश्वर माझ्या हातात दिला. मी तो पाहून त्यांना परत देत असता त्यांनी तो मलाच दिल्याचं सांगितलं आणि मला काय बोलावं तेच कळेना. कारण अतिशय अचानकपणे परिक्रमा पूर्ण झाल्यावर मैयाने माझी ही इच्छाही पूर्ण केली होती. आमचा ग्रुप मोठा असूनही आम्ही एकमेकाशी अगदी गरजेपुरतंच बोलत होतो. बराचसा वेळ नामस्मरण सुरु होतं. ही सेवा मैयाचरणी रुजू झाल्याचा संकेत म्हणजेच मला प्राप्त झालेला नर्मदेश्वर ही माझी धारणा आहे.
स्नान करण्यासाठी मैयाजळात उतरलो आणि सारा थकवा, उन्हाची काहिली नाहीशी झाली. किमान तासभर तरी आम्ही पाण्यातच होतो. पण मग मात्र आणखी उशिर होऊ नये म्हणून पाण्याबाहेर आलो. स्नान करुन आम्ही परत वासुदेव कुटीर येथे निघालो. हा मार्ग मात्र जरा दमवणारा होता. कोरड्या पात्रातून दगडगोट्यातून बरंच चालल्यावर वर बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही कुटिरात पोहोचलो. तिथे परत एकदा श्री मारुतीरायाचं दर्शन घेतलं. वासुदेव कुटीरातच कन्यापूजन केलं. मार्गावरही मध्ये मध्ये कुमारिकांना यथाशक्ती काही अर्पण करत होतोच. परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण झाली या आनंदात गाडीजवळ पोहोचलो. गाडीने परत मुक्कामी आलो. लगेचच पूजेची तयारी करुन संकल्पपूर्ती केली. नर्मदा तीरावर पूजेसाठी योग्य अशी सावलीची जागा ना न मिळाल्याने मुक्कामाच्या ठिकाणीच संकल्पपूर्ती करावी लागली.
सारं आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून पोयचा येथील निळकंठधाम मंदिर पहायला गेलो. विस्तीर्ण आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. मुख्य मंदिर आणि आजूबाजूला अनेक मंदिरं असं याचं स्वरुप आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दुपारचं अतिशय कडक उन होतं. गरम झळा येत होत्या. त्यामुळे भराभर थोडं फिरुन पुढे निघालो.
नंतरचं आमचं ठिकाण होतं ते म्हणजे पावागड. चंपानेर मधलं हे महाकाली मातेचं सुंदर शक्तीपीठ. मात्र इथे पोहोचल्यावर कळलं की वाईट हवामानामुळे रोपवे बंद आहे. आम्हाला इथे जायला सायंकाळ झाली होती. त्यामुळे रोपवे बंद असल्याने तीन हजार पायऱ्या चढून उतरणं वेळेअभावी शक्य नव्हतं. रात्री उशिरा अहमदाबादहून आमची परतीची रेल्वेची तिकिटं होती. त्यामुळे नाईलाजास्तव तिथूनच परत फिरलो. तिथून अहमदाबादला पोहोचलो आणि रात्रीच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.
श्री दत्तात्रेयांच्या कृपेने पौर्णिमेचं गिरनार दर्शन आणि लगेचच नर्मदा मैयाच्या कृपेने घडलेली उत्तर वाहिनी परिक्रमा या आम्हा सर्वांसाठी अतिशय भाग्याच्या घटना आहेत.
| जय गिरनारी | | नर्मदे हर |
- स्नेहल मोडक