कधीकधी निवांत एकटं असताना आपलं एक मन दुसऱ्या मनाची छान समजूत घालतं. दुखावलेल्या मनावर अलवार फुंकर घालतं. नाराजी विसरायला लावतं. दुसऱ्या कुणाला जरी आपलं आनंदात असणं महत्त्वाचं असलं नसलं तरी आपण स्वतःच्या आनंदासाठी छान हसत खेळत आयुष्य जगावं अशी समजूतही एक मन दुसऱ्या मनाची घालतं. आणि म्हणूनच स्वसंवाद हा खूप गरजेचा असतो बरं.
कधी एकांत क्षणी
.
कधीं एकांत क्षणी
विध्द जाहल्या मनास
हळुवार सावरावंसं वाटतं
होऊनी इवलंसं पाखरु
स्वप्नांगणी विहरावंसं वाटतं
विसरुन साऱ्या अपेक्षा
सहज मुक्त व्हावसं वाटतं
होऊनी नाजूक रातराणी
तिमिरातच गंधाळावं वाटतं
थांबवूनी तडफड सारी
शांत स्तब्ध व्हावंसं वाटतं
होऊन शीत जलाशय
सरोवरी तरंग व्हावसं वाटतं
पुसूनी साऱ्या आठवणी
मन रिक्त करावंसं वाटतं
होऊनी कल्पनेचा कुंचला
भावचित्र रेखावंसं वाटतं
सोडूनी सारेच राग लोभ
निर्विकार व्हावंसं वाटतं
कुणीही नसलं जरी आपलं
स्वानंदातच जगावंसं वाटतं
स्वानंदातच जगावंसं वाटतं
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment