Pages

Thursday, November 30, 2023

परिक्रमा

              जून महिन्याच्या सुरुवातीला जशी सगळेजणं वर्षाऋतूच्या आगमनाची चातकासारखी वाट पहात असतात तशीच जुलै महिना सुरु होताच साऱ्या दत्तभक्तांना ओढ लागते ती गिरनार परिक्रमेची

             दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही जून महिन्याअखेर पासूनच गिरनार दर्शन आणि परिक्रमेला जाण्यासाठी दत्तभक्त याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधू लागले. प्रत्यक्ष परिक्रमा ही दीपावली नंतर कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीतच असली तरीही रेल्वेचं रिझर्व्हेशन चार महिने आधीच होतं. त्यामुळे जुलै महिन्यात हे रिझर्व्हेशन करावं लागतं. यावेळी आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांची संख्या जरा जास्तच झाली होती. एवढ्या भाविकांची सारी व्यवस्था करणं परिक्रमा काळात थोडं कठीण काम असतं. कारण या परिक्रमेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे तलेटीमधील साऱ्याच साधनांवर खूपच ताण येतो. एवढ्या साऱ्या भाविकांची रहाण्याची, जेवणखाण्याची उत्तम व्यवस्था होणं अशक्य असतं. त्यामुळे आम्ही आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांसाठी ही व्यवस्था वर्षभर आधीपासूनच करण्याच्या प्रयत्नात असतो. यावर्षी आमच्या बरोबर एकूण दोनशे भाविक येणार होते. जुलैमध्येच त्या साऱ्यांचं रेल्वेचं रिझर्व्हेशन केलं होतं. जुनागढला जाणारी एकमेव ट्रेन असल्याने अक्षरशः पाचव्या मिनिटाला रिझर्व्हेशन फुल होतं. यावेळी आमच्या बरोबर येणारे भाविक चार वेगवेगळ्या तारखांना येणार होते. त्यामुळे ज्यांना थेट जुनागढची तिकीटं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी दोन टप्प्यांत तिकीटं काढावी लागली.

             कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशीच एक गट जुनागढ तलेटीला पोहोचला. आम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशीच पहाटे जुनागढला पोहोचलो. परिक्रमा काळात होणाऱ्या अतिप्रचंड गर्दीमुळे वाहनं जुनागढहून तलेटीपर्यंत थेट जाऊ शकत नाहीत. एका ठराविक अंतरावर सारी वाहनं थांबवून परत पाठवतात. तिथून पुढे आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी २-३ किमी अंतर पायी जावं लागतं. ही सारी कसरत करत आम्ही रुमवर पोहोचलो. आन्हिकं आवरुन लगेचच गुरुशिखर दर्शनासाठी निघालो. रिवाजानुसार लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे कडे गेलो. रोपवे ला बिलकुल गर्दी नसल्याने पाच मिनिटांतच आम्हाला रोपवे ने निघता आलं. अंबाजी टुकवर पोहोचलो तर तिथे मात्र प्रचंड गर्दी होती. शिखर दर्शन करुन येईपर्यंत ही गर्दी वाढतच होती. आम्ही कमानीपासून थोडं वर पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगच सुरु झाली. रांगेतून हळूहळू पुढे जात मंदिरात प्रवेश केला. अतिशय गर्दीमुळे तिथले पंडितजी, पोलिस सारखं 'पुढे चला' चा गजर करत होते. पण का कुणास ठाऊक आम्ही दत्तात्रेयांसमोर येताच ते पंडितजी नेहमीप्रमाणेच शांत झाले. आम्ही पादुकांसमोर नतमस्तक झालो, नैवेद्य अर्पण केला आणि तृप्त मनाने पुढे सरकलो. एवढ्या गर्दीतही अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. दर्शन घेऊन खाली उतरुन अखंड धुनीजवळ आलो. तिथेही सुंदर दर्शन घडलं. दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवे जवळ आलो. पायथ्याशी पोहोचण्यासाठी मात्र मोठी रांग होती. पण आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलावलं त्यामुळे लगेचच रोपवेने जायला मिळालं.‌ रुमवर येऊन थोडा आराम केला. सायंकाळी भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन थोडं फिरुन आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे परिक्रमेसाठी जायचं असल्याने जरा लवकरच निद्रा देवीची आराधना केली. 

               कार्तिकी एकादशीला आम्हाला गुरुशिखर दर्शन घडलं होतं. दुसऱ्याच दिवशी आमची परिक्रमा होती. रात्री अडीच वाजताच उठून सारं आवरुन गटातील इतर साऱ्या भाविकांसह परिक्रमेसाठी निघालो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून परिक्रमेचं प्रवेशद्वार जवळपास दोन किमी वर होतं. सारेजणं एकत्र जमून तिथे पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे वेळ गेलाच. त्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमेसाठी सुरुवात करायला साडेचार वाजून गेलेच. परिक्रमेला सुरुवात केली आणि नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचं लक्षात आलं. गर्दीमुळे सुरुवातीपासूनच थोडं हळूहळू चालावं लागत होतं. मिट्ट काळोखात टाॅर्चच्या उजेडात एवढ्या गर्दीत सगळ्यांना एकत्र चालणं अशक्य होतं. साहजिकच सगळे हळूहळू मागेपुढे झाले. परिक्रमेच्या सुरुवातीचा ६-७ किमी. चा मार्ग गाडीरस्ताच आहे. पण चांगला चढाव आणि मग एकदम तीव्र उतार आहे. गर्दी आणि अंधार यामुळे हे चालणं थोडं त्रासदायक असतं. पण सवयीमुळे असेल कदाचित आम्हाला अजिबात त्रास न होता आम्ही हा टप्पा सहज पार करुन पुढच्या मातीच्या रस्त्याला लागलो. वाढत्या गर्दीमुळे भरभर चालण्यासाठी कसरतच करावी लागत होती. उजाडल्यावर गर्दीतून चालणं थोडं सोपं होईल असं वाटत होतं पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. 

               उजाडल्यावर साधारण ७.३० वाजता आम्ही थोडं बाजूला थांबून बरोबर नेलेला थोडासा कोरडा खाऊ खाल्ला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. गर्दी बिलकुल कमी होत नव्हती. आमच्या मागून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच होती. आम्ही जीनाबाबा की गढीच्या आधी साधारण दिड किमी अंतरावर पोहोचलो आणि दिसली ती अजिबात पुढे न सरकणारी प्रचंड गर्दी. साहजिकच आम्हीही त्या गर्दीचा एक भाग झालो आणि गर्दी पुढे सरकण्याची वाट पहात, इकडून तिकडून काही मार्ग मिळतोय का पहात थांबलो. किमान अर्धा तास यात गेल्यावर गर्दी हळूहळू पुढे सरकू लागली. थोडं पुढे येताच नेहमीच्या जागेवर नागा साधू बसलेले दिसले. त्यांना चुकवत चुकवत कसंबसं पुढे गेलो. परिक्रमेच्या काळात खूप मोठ्या संख्येनं हे नागा साधू परिक्रमा मार्गात त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन बसतात. त्यांना चुकवत पुढे जाणं हे जरा कठीणच काम असतं. तिथून पुढे निघालो पण एकूणच गर्दी किंचितही कमी होत नव्हती. या गढीच्या पुढचा सारा रस्ता पूर्ण घनदाट जंगलातून जातो. मोठमोठ्या दगडधोंड्यातून मार्गक्रमण करावं लागतं. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि इथेही तीच परिस्थिती होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अलोट गर्दी होती. चालणं अशक्य होतं. मग आमच्या सह बऱ्याचजणांनी मुख्य पायवाट सोडून डोंगरात वरवर चढायला सुरुवात केली. अर्थात हा मार्ग अतिशय अवघड होता. वर चढताना वाटेतले दगडधोंडे चुकवत, मातीतून पाऊल घसरणार नाही याची काळजी घेत, काठीचा आणि वाटेतल्या झाडाझुडुपांचा आधार घेत आम्ही वर जात होतो. जिथे अजून वर चढणं अशक्य होतं तिथे कसरत करत खाली उतरत होतो. परत मुळ मार्गावरील गर्दीत सामील होत होतो. पण ती गर्दी पुढे सरकेनाशी झाली की परत डोंगरावर चढून भलत्याच मार्गाने प्रयत्नपूर्वक पुढे जात होतो. कितीतरी वेळ आम्ही फक्त वर चढतच होतो. डोंगर चढून उतरायला कधी सुरुवात करणार काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्या प्रचंड आणि दाट जंगलात जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. अतिशय अवघड अशी चढण चढत चढत अखेर एकदाचे आम्ही डोंगर उतारावरच्या मार्गावर पोहोचलो.  पण गर्दी हलतच नसल्याने पुन्हा तिथेही असंच अवघड मार्गाने खाली उतरु लागलो. अशातच एका ठिकाणी पायऱ्या सुरु झालेल्या आम्हाला कळल्या आणि आम्ही त्या गर्दीत पायऱ्या उतरायचा प्रयत्न केला पण तिथेही उतरणं कठीणच होतं. हळूहळू कसंबसं तिथून निघून पुढे आलो. 

               दुसऱ्या डोंगरावर चढायलाही अलोट गर्दी होती. ती गर्दीही पुढे सरकत नसल्यानं पुन्हा द्राविडी प्राणायाम करत अतिशय अवघड मार्गाने वर पोहोचलो आणि तिथेच साऱ्या गर्दीला पोलिसांनी अडवलं. पुढेही अफाट गर्दी असल्याने किमान दोन तास थांबायला सांगितलं. पण जरावेळ थांबून लोकांनी  हळूहळू जमेल तसं पुढे जायला सुरुवात केली. आम्हीही त्यांच्याबरोबर पुढे जात पुन्हा पायऱ्यांजवळ पोहोचलो. त्या पायऱ्या गर्दीच्या रेट्याबरोबरच कशाबशा उतरलो. पुन्हा मुख्य मार्ग सोडून वरवर चढत उतरत पुन्हा मुख्य मार्गावर आलो. परत अवघड वाटेने चढत पुढच्या पायऱ्यांजवळ गर्दीत शिरलो. तासभर थांबूनही गर्दी इंचभरही पुढे सरकेना मग पुन्हा अवघड वाटेने त्या पायऱ्या जिथे उतरायला सुरुवात होते त्याच्या जवळ पुन्हा गर्दीत शिरलो. त्या गर्दीत शिरलो आणि पायऱ्यांवर पूर्णपणे अडकलो. पुढचे चार तास एकाच जागी उभं रहावं लागलं. पुढे पोलिसांनी लोकांना पूर्ण अडवून थांबवून ठेवलं होतं. श्वास घेणंही मुश्किल होत होतं. जवळपास सगळ्यांकडचं पिण्याचं पाणी संपलं होतं. घशाला कोरड पडत होती पण पाणी कुठेच मिळत नव्हतं. या परिस्थितीतच एका माणसाला श्वासाचा खूपच त्रास होऊ लागला म्हणून त्याला उपचारासाठी त्या गर्दीतून कसंबसं बाहेर नेलं. त्याचवेळी त्या गर्दीतल्या लोकांकडून कळलं की सकाळीच परिक्रमेच्या मार्गात‌ एका बिबट्याने दर्शन दिलं होतं. त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण होतं. आम्हाला त्या गर्दीत होऊ शकणाऱ्या चेंगराचेंगरीची भिती वाटायला लागली होती. चार तास इंचभरही पुढे न सरकता आम्ही उभे होतो. सगळ्यांंचीच मनस्थिती बिघडली होती. अशातच थोडंसं जरी इकडे तिकडे झालं असतं तरी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता होती. अखेर चार तासांनी जेव्हा हळूहळू चालायला सुरुवात करता आली तेव्हा प्रयत्नपूर्वक आम्ही त्या गर्दीतून बाहेर पडलो. पून्हा पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने झाडांच्या आधाराने वर चढत गेलो. नंतर मात्र एका ठिकाणी वर चढायची मला हिंमत होईना मग पुन्हा त्या गर्दीत घुसलो. पण तोपर्यंत लोकं हळूहळू पुढे सरकायला लागले होते. त्यातूनच थोडं पुढे जाऊन पून्हा सारी लोकं अडकली. दोन पावलंही पूढे जाणं शक्य नव्हतं. अशातच लोकांचा आरडाओरडा सुरु झाला. चेंगराचेंगरीच्या भीतीने पून्हा आम्ही हळूहळू बाजूला होत कसंबसं कठड्यावर बसलो. आणि आता गर्दी पूर्ण पूढे सरकून कमी झाल्याशिवाय इथून हलायचं नाही असं ठरवलं. एव्हाना सांजावलं होतं. रात्री गर्दी कमी होईल अशी आशा आम्हांला वाटत होती. 

              पण आम्ही तिथे बसलो आणि पाचच मिनिटांत एका पोलिसांनी आम्हाला तिथून उठायला सांगीतलं , थांबायचं असेल तर एकदम बाजूला जाऊन थांबायला सांगितलं. पण जिथे तो जायला सांगत होता तिथे चढून जायची मला हिंमत होत नव्हती. अतिशय खडा चढ तोही मातीचा चढून जाणं मला शक्य नव्हतं. आणि पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने मातीचा तीव्र उतार उतरायचीही मला भिती वाटत होती. त्याक्षणी मला अक्षरशः रडू येत होतं. अखेर याच्या आधाराने मी जीव मुठीत धरुन थोडं खाली उतरले. नंतर तिथे  आमच्या पुढे उतरत असलेली लोकं पुन्हा गर्दीत घुसत होती मग आम्हीही तेच केलं. पण सुदैवाने तोपर्यंत लोकं हळूहळू का होईना पुढे सरकत होती. अखेर तसंच हळूहळू चालत पायऱ्या पूर्ण संपून उताराचा रस्ता लागला आणि आम्ही अक्षरशः सुटकेचा निःश्वास सोडला. आता त्या गर्दीतूनच पण पुढे सरकता येत होतं. एव्हाना रात्रीचे ८.३० वाजून गेले होते. परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यातील ८-९ किमी अंतर सरळ रस्ता आहे. त्यामुळे गर्दी असली तरी काही अपघात घडण्याची भिती वाटत नव्हती. अखेरचं ४-५ किमी अंतर राहिलं असताना आम्हांला कलिंगड, उसाचा रस प्यायला मिळाला. मग मात्र पुढे न थांबता गर्दी बरोबर चालत राहीलो आणि रात्री ११ वाजता परिक्रमा पूर्ण करुन गेटमधून बाहेर आलो. 

              मुळात ३८-४० किमीची परिक्रमा आमच्या साठी त्याहून खूप जास्त अंतराची झाली होती. आमच्या शारीरिक क्षमतेचा अंत पहाणारी ही परिक्रमा केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच पूर्ण झाली होती. आमच्या गटातील बऱ्याच जणांना ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पहाटेचे  ४ वाजले. सगळेचजणं वेगवेगळ्या वेळी ही परिक्रमा पूर्ण करुन रुमवर परतले.

              तिसऱ्या दिवशी दुपारी आमची परतीची ट्रेन होती. त्या प्रवासाला सुरुवात केली आणि एवढ्या अफाट गर्दीचं खरं कारण कळलं‌ आणि आम्ही हादरलोच. एक अतिशय दुःखद आणि भितीदायक घटना घडली होती. आम्ही जेव्हा परिक्रमेला सुरुवात केली होती तेव्हा काही वेळानंतर परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यावरील बोरदेवी मंदिराजवळ रात्री वस्ती केलेल्या परिक्रमावासींपैकी एका अकरा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. सकाळी ६ वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर ८ वाजता ती मुलगी सापडली. पण तोपर्यंत ती मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे त्या भागात परिक्रमा थांबवण्यात आली होती. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्याला पकडण्यात आलं. आम्ही परिक्रमेत असताना बिबट्या दिसला एवढंच कळलं होतं. याच कारणामुळे शब्दात वर्णनही करता येणार नाही अशी गर्दी झाली होती. त्याच बरोबर ज्या माणसाला श्वासाचा त्रास होत होता म्हणून उपचारासाठी बाहेर नेलं त्याचा आणि अजून एका अगदी लहान बाळाचाही मृत्यू झाल्याचं कळलं. तसंच अजून २-३ लोकांनाही डोली करुन घाईघाईने उपचारासाठी नेल्याचं आम्ही स्वतःच बघितलं होतं.इतक्या वर्षात पहिल्यांदाच अशा भितीदायक आणि दुःखद घटना परिक्रमेच्या दुसऱ्याच दिवशी घडल्या होत्या. 

             यावरुन पुढील वर्षापासून परिक्रमेवर काही निर्बंध आणणं, काही नियमावली तयार करणं आणि ते कसोशीनं पाळणं ही आत्यंतिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात जंगली श्वापदांच्या हक्काच्या अधिवासावर आपण अतिक्रमण करत असू तर अशा काही घटना यापुढेही घडणं स्वाभाविकच आहे. त्यासाठीच परिक्रमावासींच्या संख्येवर , जंगलातील वास्तव्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या दोन दिवसांची परिक्रमा भाविकांसाठी अतिशय अवघड ठरली होती. तिसऱ्या दिवशी मात्र भाविकांना दरवर्षी प्रमाणे सहज परिक्रमा करता आली.  चौथ्या दिवशी पहाटे खूप पाऊस पडल्याने परिक्रमा उशिरा सुरु करण्यात आली. आणि पाचव्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची परिक्रमा पावसामुळे रद्दच करण्यात आली. 

               आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी घरी पोहोचलो. आणि पुन्हा सारं आवरुन दुपारी लगेचच घरच्या गाडीने गावाला निघालो. गावाला टिळक पंचांगानुसार त्याचदिवशी श्री दत्त जयंती होती. त्यामुळे श्री दत्तात्रेयांच्या जन्मसोहळ्यासाठी आम्ही गावाला निघालो. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. श्री दत्तात्रेय जन्म सोहळा आमच्या गावाला रात्री १२ वाजता साजरा केला जातो. आम्ही घरी पोहोचल्यावर जेवून थोडा आराम करुन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंदिरात गेलो. डोळ्यांचं पारणं फिटेल अशा या सुंदर जन्मसोहळ्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्हाला केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच सहभागी होता आलं होतं. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री १ वाजता आम्ही घरी परतलो. पहाटे लवकर उठून आवरुन पुढील प्रवासाला लागलो.

               आम्ही पहाटे प्रवासाला सुरुवात केली ती गोव्याला जाण्यासाठी. गोव्याला आमच्या घरच्याच एका विवाहसमारंभासाठी आम्हाला जायचं होतं. गोव्याला दुपारी पोहोचलो. थोडा आराम करुन श्री शांतादुर्गा देवीचं दर्शन घ्यायला गेलो. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. तिथून श्री मंगेश मंदिरात जाऊन तेही दर्शन घेतलं. तिथून विवाहसमारंभासाठी गेलो. सायंकाळी काही कार्यक्रम होते त्याला उपस्थित राहिलो. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष विवाहसमारंभ होता. समारंभ पार पडल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. सुशेगाद गोव्यात आम्ही जेमतेम २४ तासच होतो त्यामुळे आमची मात्र खूप धावपळ झाली.

                गोव्यापासून साधारण दोन अडीच तासावर असलेल्या माणगांव ला आम्हाला जायचं होतं. परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचं हे जन्मस्थान. श्री दत्तात्रेयांचे प्रात: स्मरणीय चतुर्थावतार म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. वेदशास्त्रसंपन्न हरिभट्टांचे पुत्र श्री गणेशभट्ट आणि त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दांपत्य माणगांवी वास्तव्यास होते. त्यावेळी श्री गणेशभट्ट आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच श्री दत्तात्रेयांची सेवा करण्यासाठी गाणगापूरला १२ वर्षं जाऊन राहिले. एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यात श्री दत्तगुरुंनी आम्ही तुमच्याकडे पुत्ररुपाने जन्माला येणार आहोत म्हणून त्यांनी माणगांवी परत जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा असं सांगितलं. त्यानुसार ते माणगांवला परतले. श्रावण कृ.५ ई.सन १८५४ यादिवशी त्यांना पुत्ररत्न झालं. त्याचं वासुदेव असं नामकरण करण्यात आलं. त्यानीही दत्तभक्तीचा वारसा पुढे चालवत नृसिंहवाडीस जाणं, वास्तव्य करणं वाढवलं. काही काळानंतर त्यांना नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली की माणगांवी जाऊन दत्तमंदिर स्थापन करावे. त्यानुसार माणगांवला जाताना वाटेत कागल येथील एका मूर्तीकाराकडे ही दत्तमूर्ती मिळाली. मंदिर बांधून त्यात याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लाकडी खांब आहेत. ते महाराजांनी अभिमंत्रित केले आहेत. त्यांच्या स्पर्शानेही बाहेरची बाधा दूर होते. 

               या मंदिरासमोरच पुरातन यक्षिणी मंदिर आहे.यक्षिणी महात्म्यात महाराजांनी दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी वासुदेवांचा जन्म माणगांवी झाला. हे यक्षिणी मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला वासुदेवानंदांचे जन्मस्थान आहे. तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तसंच अहिल्यादेवी होळकर यांनी वासुदेवानंदांच्या पायाच्या मापाच्या योगचिन्हांकित पादुका स्थापन केल्या आहेत. वासुदेवानंद सरस्वती यांचं कर्तृत्व आणि महत्व खूपच मोठं आहे. पीठापूर, कुरवपूर, कारंजा ही स्थानं शोधून ती भक्तांसाठी त्यांनी खुली केली आहेत. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र त्यांनी जगाला दिलाय. अतिशय विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलीय. सप्तशतीगुरूचरित्र, श्रीदत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्री घोरात्कष्टोधरण स्तोत्र, करुणात्रिपदी ही त्यातीलच ग्रंथसंपदा. 

               अशा या परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन घ्यायची कधीपासूनची आमची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती. अतिशय शांत प्रसन्न आणि उर्जेने भरलेल्या या मंदिरात आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तिथे देणगी देऊन प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 

                यावर्षीची गिरनार परिक्रमा आमच्यासाठी अतिशय वेगळा अनुभव देणारी ठरली. गिरनार गुरुशिखर दर्शन, अत्यंत अवघड अशी परिक्रमा, श्री दत्तात्रेयांचा जन्मसोहळा आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठी पर्वणी ठरली. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच हे सारं भाग्य आम्हाला लाभलं. श्री दत्तात्रेयांची अशीच कृपा सर्वांनाच कायम लाभावी हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Monday, November 20, 2023

दर्या

             समुद्र असा शब्द जरी ऐकू आला तरी आपल्या नजरेसमोर अवतरतो तो अथांग निळा सागर आणि त्याच्या शुभ्र फेसाळत्या लाटा. प्रत्यक्षातही आपल्याला समुद्र एवढाच दिसत असला तरी त्याच्या तळाशी मात्र अफाट खजिना दडलेला असतो. विविध प्रकारचे असंख्य जलचर या सागरात आपल्याला आढळतात. या सगळ्यांना आपल्यात सामावून घेत असतानाच नकोशा गोष्टी मात्र आपल्या लाटांबरोबर किनाऱ्यावर ढकलून देण्याचं काम मात्र समुद्र सातत्यानं करत असतो. हे असंच वागायचं आपल्या मनानही ठरवलं तर ?


आपल्या मनातही एक दर्या असावा

   सुखाच्या शुभ्र लाटांनी उसळणारा

   दु:खाला लाटेसरशी नाहीसं करणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   किनाऱ्यावर अवखळ खळखळणारा

   अंतर्यामी अथांग खोल गूढ असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   कधी नीलरंगी कधी केशररंगी दिसणारा

   परी अंतरी निर्मळ नितळ जल असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

   अंधारराती गूढ गंभीर अशांत भासणारा

   परि मनास भेटीची नित्य ओढ लावणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या सुखदुःखाना सहज सामावणारा

   फेसाळ लाटांनी निखळ आनंद देणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या आठवणी अंतर्यामी साठवणारा

   अन नात्यांचे रेशीमबंध सदैव जपणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

आपल्या मनातही एक दर्या असावा 

- स्नेहल मोडक

Wednesday, November 1, 2023

कोजागिरी

            या वर्षातलं अखेरचं ग्रहण नेमकं कोजागिरी पौर्णिमेला आलं. आणि मग कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण कलांनी विलसणारा शीतल शशिकर आणि चमचमतं पुनवचांदणं यांच्या साक्षीने दुग्धप्राशन करायचं की वेधारंभापासून ग्रहणाचे नियम पाळून निर्जल उपवास करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात प्रत्येकानी त्यावर आपापल्या परीने मार्ग काढला.

            आम्हालाही नेहमीप्रमाणे पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी जायची इच्छा होतीच. पण काही अपरिहार्य कारणास्तव जायला मिळेल की नाही हे आधीच ठरवता येत नव्हतं. अखेर ऐनवेळी गिरनारला जायला मिळणार हे नक्की झालं म्हणून मग घरच्या गाडीनेच जायचं ठरवून रात्री उशिरा प्रवासाची तयारी केली. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पहाटे निघालो. मध्ये मध्ये थांबत रात्री तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

            पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकरच आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ पोहोचलो. तिथे पोहोचलो आणि क्षणात मन खट्टू झालं. तिथे ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटांच्या दोन भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आमचं जाणं ऐनवेळी ठरल्यामुळे आम्हाला ऑनलाईन तिकीटं मिळाली नव्हती. पहिल्यांदाच असं झालं होतं आणि नेमकी ऑफलाईन तिकिटांसाठी खूपच मोठी रांग होती. आता आपल्याला तिकीट कधी मिळणार आणि आपण रोपवे ने अंबाजी मंदिरापर्यंत कधी पोहोचणारी याची काळजीच निर्माण झाली. पण सदैव आमच्या बरोबर असणाऱ्या याच्या मित्राने आमच्या स्वानुभवावरुन कुणाकडे जास्तीची ऑनलाईन तिकिटं आहेत का अशी चौकशी करायला सुरुवात केली. आणि एका ग्रुपकडे ५-६ जास्तीची तिकीटं असल्याचं कळलं. त्यांच्या ग्रुपमधल्या काही जणांनी ऐनवेळी चढून जायचं ठरवल्यामुळे तिकीटं उरली होती. आम्हाला चारच तिकिटं हवी असल्याने त्यांनी ती ताबडतोब आम्हाला देऊ केली आणि आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. दत्तगुरुंच्या कृपेने आमची काळजी मिटली आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. 

            कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गिरनार दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. तरीही आम्ही नेहमीपेक्षा जरा आधीच मंदिरात पोहोचलो. एवढी गर्दी असूनही प्रत्यक्ष मंदिरात दर्शनासाठी बिलकुल गर्दी नव्हती. आम्हाला मंदिरात अतिशय शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. मी दत्तगुरुंसमोर नतमस्तक झाले आणि क्षणार्धात असं वाटलं की समोर साक्षात स्वयं दत्तात्रेय आणि नतमस्तक मी, आजूबाजूला कुणीच नाही, आहे ती फक्त प्रसन्न शांतता .अवघ्या काही क्षणांची ही जाणीव एक वेगळीच अनुभूती देऊन गेली. 

            दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. नित्याप्रमाणे आधी वाचन करुन दर्शन घेतलं. बाहेर भाविकांची खूप गर्दी असूनही प्रसादालयात मात्र गर्दी कमी होती. भाविकांची प्रचंड गर्दी आणि ग्रहण या दोन्ही कारणांमुळे भोजनप्रसादाऐवजी शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद देण्यात येत होता. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परत निघालो. गोरक्षनाथ आणि अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. परतीची तिकीटं काढण्यासाठी बिलकुल गर्दी नसल्याने लगेच तिकीटं मिळाली आणि १५-२० मिनिटांतच रोपवे ने आमही पायथ्याशी पोहोचून‌ मुक्कामी गेलो. भोजन आणि थोडा आराम करुन लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

            खरंतर गिरनारला दत्तगुरुंनी अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. त्यामुळे मन तृप्त होतंच पण तरीही मनात किंचितशी रुखरुख होती. गिरनारला आम्ही जेव्हा जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा तेव्हा परत येताना काही मंदिर दर्शनं‌ आणि स्थलदर्शन करुनच येतो. त्याचप्रमाणे यावेळीही  फिरत फिरत यायचं होतंच. नेहमी आम्ही वडोदरा ला मुक्काम करुन तिथून फिरत फिरत घरी येतो. यावेळी माझ्या मनात जरा वेगळं, जिथे जावंसं वाटत होतं ते मी प्रवासाला निघायच्या आधीच याला सांगितलं. पण का कुणास ठाऊक, कारणं सांगत त्याने माझा बेत उडवून लावला होता. पण घरुन निघताना मात्र मी श्री दत्तगुरुंना तशी प्रार्थना केली होती. आणि आता परतीच्या प्रवासात मला तीच रुखरुख लागली होती. पण मी दत्तगुरुंची इच्छा असा विचार करुन शांत होते. साधारण ४ तासांच्या प्रवासानंतर अचानक याने मला कर्नाळीला मुक्कामाला जायचं ना असं विचारलं आणि मला आश्चर्यच वाटलं. लगेचच आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये फोन करुन रुम उपलब्ध आहेत का याची चौकशी केली आणि रात्री उशिरा तिथे मुक्कामाला येत असल्याचं सांगितलं. माझी इच्छा पूर्ण होणार म्हणून खूप खुश झाले होते मी. रात्री ११ वाजल्यानंतर  आम्ही कर्नाळी ला रुमवर पोहोचलो. 

            पहाटे लवकर उठून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानासाठी निघालो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून जवळच हा संगम आहे. वडोदरा जिल्ह्यातलं  डभोई तालुक्यातलं हे कर्नाळी गांव. इथे नर्मदा, गुप्त सरस्वती आणि ओरसंग या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमावर स्नान करणं अतिशय पुण्यप्रद मानलं जातं. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच ग्रहण होतं. आणि रात्री उशिरा ग्रहण समाप्ती होती. त्यानंतर एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानतात. आणि म्हणूनच या योगावर त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळावं अशी माझी इच्छा होती. 

            आम्ही स्नानासाठी निघालो तेव्हा पहाट हलकेच उमलत होती. सहस्त्ररश्मीचं आगमन होण्यापूर्वीच उषा सोनकेशरी झाली होती. संगमावरचं दृश्य अप्रतिम होतं.  एकीकडे सोनकेशरी उषा, दुसरीकडे अस्ताचलास जाणारा शशिकर आणि समोर पसरलेलं चमचमतं नर्मदाजल.  आणि हे अप्रतिम दृश्य नेत्रात साठवण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी संगमावर गेलेलो आम्ही चौघंच. खूपच सुंदर अनुभव होता. हवेत चांगलाच गारवा होता, पण मैयाच्या जलात पाऊल टाकलं आणि अतिशय उबदार स्पर्शाने तनमन मोहोरलं. स्नानासाठी पाण्यात शिरलो आणि बाहेर पडावसंच वाटेना. पण वेळेअभावी तिथून निघावच लागलं. ग्रहणसमाप्तीनंतर मैयाच्या जलात स्नान करण्याचा योग आल्याने खूप समाधान वाटत होतं.

            रुमवर येऊन सामान घेऊन आम्ही  कुबेर भंडारी च्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिरही आम्ही राहिलो तिथून अगदी जवळच आहे. 

            कुबेर भंडारीचं हे मंदिर साधारण २५०० वर्षं पुरातन आहे. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा देव दिक्पाल आणि यक्षांचा अधिपती आहे. त्याने ब्रम्हदेवाची उपासना केली तेव्हा ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन त्याला अमरत्व, लंकेचं राज्य आणि पुष्पक विमान बहाल केलं. नंतर रावणाने कुबेरावर स्वारी करुन लंका आणि पुष्पक विमानावर कब्जा केला. मग कुबेराने भगवान शिवाची आराधना केली असता शंकराने प्रसन्न होऊन कुबेराला देवांचा खजिनदार केलं. तेव्हापासून त्याला कुबेर भंडारी या नावानंही ओळखतात. अशा या कुबेराचं मंदिर इथं आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे.  तसंच गणपती, महाकाली, हनुमान आणि रणछोडराय यांचीही मंदिरं आहेत. इथे प्रत्येक अमावास्येला दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. आम्ही या मंदिरात सकाळी लवकरच गेल्याने बिलकुल गर्दी नव्हती. कुबेर भंडारी आणि इतर देवदेवतांचं छान दर्शन आम्हाला मिळालं. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो. 

            कुबेर भंडारीच्या मंदिरापासून साधारण ३७ किमी अंतरावर असलेल्या गरुडेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो. गरुडेश्वर - वासुदेवानंद सरस्वती यांचं हे समाधी स्थान. इथे प्रशस्त असं दत्तमंदिर आणि त्यापुढे स्वामींचं समाधी मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे स्थान अतिशय सुंदर, शांत, पवित्र  असंच आहे. या मंदिरातही सुंदर दर्शन घडलं. दत्तगुरुंचं आणि समाधी स्थानी स्वामींचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला थोडं खाली गेलो. इथे मैयाचं पात्र विशाल आहे. त्याच पात्रात एक बंधाराही बांधलेला आहे. दर्शन घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला. साधारण सव्वा तासानी आम्ही भालोद येथे पोहोचलो.

            भालोदचं दत्तमंदिर एकमुखी दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. १४०० व्या शतकातील ही शाळिग्रामातील दत्त मूर्ती उजेडात किंवा अंधारातही पाहिली असता पोटावरील गोमुख स्पष्ट दिसतं. हे मंदिर प्रतापे महाराजांनी बांधलंय. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्वप्न  दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद इथे रहाण्याचा आदेश मिळाला.  याचदरम्यान बडोदा येथील काशिताई निरखे यांच्याकडील ही दत्तमूर्ती पू. प्रतापे महाराजांच्याकडे  आली. आणि त्यानंतर भालोदला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधण्यात आलं. तसंच नर्मदा परिक्रमावासी आणि दत्तभक्त यांच्यासाठी आश्रम बांधण्यात आला. मंदिर आणि आश्रम परिसर अतिशय रमणीय आहे समोरच नर्मदा मैयाचं विशाल पात्र आहे. सदैव मयुरांचा वावर असणाऱ्या या आश्रमात कन्यापूजन हा विधी केला जातो. तसंच गुरुचरित्र पारायण आणि परिक्रमावासी यांच्या वास्तव्याची व्यवस्था इथे केली जाते.  इथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून नावेने श्रीक्षेत्र नारेश्वर इथं जाता येतं.

            आम्ही या मंदिरात जाऊन श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं आणि पू. प्रतापे महाराजांना भेटण्यासाठी थांबलो. ते आश्रमात कुठेच नव्हते. आम्ही त्यांची वाट पहात मंदिरातच थांबलो. सोज्वळ, सात्विक आणि प्रचंड उर्जेने भरलेल्या पू.साधक प्रतापे महाराजांना भेटणं हा प्रसन्न अनुभव असतो. थोड्या वेळाने आम्हाला ते नर्मदा तीरी गेले असल्याचं कळलं म्हणून आम्ही तिथे जायला निघालो असता ते स्वतःच समोर आले. त्यांच्याशी  बोलतच आम्ही मंदिरात आलो. त्यांना नमस्कार करुन थोडं बोलून निघणार तेवढ्यात त्यांनी आम्हाला प्रसाद घेऊन जायला सांगितलं. गेल्यावेळी  आम्ही सायंकाळी इथं आलो होतो तेव्हाही त्यांनी प्रसाद घेऊन जायला सांगितलं होतं पण तेव्हा वेळेअभावी आम्ही थांबू शकलो नव्हतो. यावेळी मात्र आम्ही थांबलोच. त्यांनी सांगितलं आज कन्यापूजन आहे तर आधी कन्यांचं भोजन होऊदे मग आपण भोजन करु. मी हे ऐकलं आणि मला खूपच आनंद झाला. मी मलाही कन्यापूजन करायचय असं महाराजांना सांगितलं. आणि आम्ही त्यांचं भोजन होईपर्यंत नर्मदा तीरावर गेलो. मुलींच भोजन झाल्यावर महाराज स्वतः मला कन्यापूजनासाठी बोलवायला आले. आम्ही वर आलो तर मंदिरात साऱ्या कन्यका बसल्या होत्या. आमचं अचानक जाणं झाल्याने मी पूजनासाठी कुठलीही तयारी नेली नव्हती. पण ऐनवेळी आलेला हा योग खूपच मोठा होता. त्यामुळे फक्त दक्षिणा देऊन का होईना मी साऱ्या कन्यांचं पूजन केलंच. एकाचवेळी १९-२० कुमारिकांचं पूजन करण्याचं भाग्य  आम्हाला लाभलं होतं.  कन्यापूजन करुन आम्ही भोजनप्रसाद घेतला. मधल्या वेळेत आम्हालाही मंदिराबाहेर मयुराचं छान दर्शन झालं होतं. प्रसाद घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला आणि रात्री वेळेत घरी पोहोचलो.

            यावेळी अगदी ऐनवेळी  गिरनार यात्रा ठरली होती. त्यामुळे गाडीने जावं लागलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी गिरनार दर्शन घडावं ही आमची प्रार्थना श्री दत्तगुरुंनी ऐकली होती आणि आम्हाला सुंदर दर्शन घडवलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या सगळ्या इतर इच्छाही पूर्ण केल्या होत्या. त्रिवेणी संगमावर स्नान, कुबेर भंडारी, गरुडेश्वर यांच दर्शन, भालोदला श्री दत्तात्रेयांचं दर्शन आणि महाराजांची भेट आणि या सर्वावर कळस म्हणजे भालोदला एवढ्या मोठ्या कन्यापूजनाचं लाभलेलं भाग्य सारंच अनुभूतीपूर्ण. यावेळची कोजागिरी पौर्णिमा ग्रहणातही आमच्यावर दत्तकृपेचं चांदणं बरसून गेली.

            || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

.

दत्तच माझे आनंदनिधान

दत्तनामात हरपते भान

   दैवत माझे दत्तदिगंबर

   ब्रम्हा विष्णू सवे महेश्वर

दत्तनामाची लागता गोडी

क्रोध मोह सारे बंध तोडी

   दत्तनामाचा करता जागर

   पार होईल हा भवसागर

दिठीतूनी करता प्रार्थना

पूर्ण होतसे मनोकामना

   श्वासासंगे गुरुनाम घ्यावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...