या वर्षातलं अखेरचं ग्रहण नेमकं कोजागिरी पौर्णिमेला आलं. आणि मग कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण कलांनी विलसणारा शीतल शशिकर आणि चमचमतं पुनवचांदणं यांच्या साक्षीने दुग्धप्राशन करायचं की वेधारंभापासून ग्रहणाचे नियम पाळून निर्जल उपवास करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात प्रत्येकानी त्यावर आपापल्या परीने मार्ग काढला.
आम्हालाही नेहमीप्रमाणे पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी जायची इच्छा होतीच. पण काही अपरिहार्य कारणास्तव जायला मिळेल की नाही हे आधीच ठरवता येत नव्हतं. अखेर ऐनवेळी गिरनारला जायला मिळणार हे नक्की झालं म्हणून मग घरच्या गाडीनेच जायचं ठरवून रात्री उशिरा प्रवासाची तयारी केली. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पहाटे निघालो. मध्ये मध्ये थांबत रात्री तलेटीला मुक्कामी पोहोचलो.
पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकरच आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ पोहोचलो. तिथे पोहोचलो आणि क्षणात मन खट्टू झालं. तिथे ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटांच्या दोन भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आमचं जाणं ऐनवेळी ठरल्यामुळे आम्हाला ऑनलाईन तिकीटं मिळाली नव्हती. पहिल्यांदाच असं झालं होतं आणि नेमकी ऑफलाईन तिकिटांसाठी खूपच मोठी रांग होती. आता आपल्याला तिकीट कधी मिळणार आणि आपण रोपवे ने अंबाजी मंदिरापर्यंत कधी पोहोचणारी याची काळजीच निर्माण झाली. पण सदैव आमच्या बरोबर असणाऱ्या याच्या मित्राने आमच्या स्वानुभवावरुन कुणाकडे जास्तीची ऑनलाईन तिकिटं आहेत का अशी चौकशी करायला सुरुवात केली. आणि एका ग्रुपकडे ५-६ जास्तीची तिकीटं असल्याचं कळलं. त्यांच्या ग्रुपमधल्या काही जणांनी ऐनवेळी चढून जायचं ठरवल्यामुळे तिकीटं उरली होती. आम्हाला चारच तिकिटं हवी असल्याने त्यांनी ती ताबडतोब आम्हाला देऊ केली आणि आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. दत्तगुरुंच्या कृपेने आमची काळजी मिटली आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचलो.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गिरनार दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. तरीही आम्ही नेहमीपेक्षा जरा आधीच मंदिरात पोहोचलो. एवढी गर्दी असूनही प्रत्यक्ष मंदिरात दर्शनासाठी बिलकुल गर्दी नव्हती. आम्हाला मंदिरात अतिशय शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. मी दत्तगुरुंसमोर नतमस्तक झाले आणि क्षणार्धात असं वाटलं की समोर साक्षात स्वयं दत्तात्रेय आणि नतमस्तक मी, आजूबाजूला कुणीच नाही, आहे ती फक्त प्रसन्न शांतता .अवघ्या काही क्षणांची ही जाणीव एक वेगळीच अनुभूती देऊन गेली.
दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. नित्याप्रमाणे आधी वाचन करुन दर्शन घेतलं. बाहेर भाविकांची खूप गर्दी असूनही प्रसादालयात मात्र गर्दी कमी होती. भाविकांची प्रचंड गर्दी आणि ग्रहण या दोन्ही कारणांमुळे भोजनप्रसादाऐवजी शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद देण्यात येत होता. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परत निघालो. गोरक्षनाथ आणि अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. परतीची तिकीटं काढण्यासाठी बिलकुल गर्दी नसल्याने लगेच तिकीटं मिळाली आणि १५-२० मिनिटांतच रोपवे ने आमही पायथ्याशी पोहोचून मुक्कामी गेलो. भोजन आणि थोडा आराम करुन लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
खरंतर गिरनारला दत्तगुरुंनी अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. त्यामुळे मन तृप्त होतंच पण तरीही मनात किंचितशी रुखरुख होती. गिरनारला आम्ही जेव्हा जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा तेव्हा परत येताना काही मंदिर दर्शनं आणि स्थलदर्शन करुनच येतो. त्याचप्रमाणे यावेळीही फिरत फिरत यायचं होतंच. नेहमी आम्ही वडोदरा ला मुक्काम करुन तिथून फिरत फिरत घरी येतो. यावेळी माझ्या मनात जरा वेगळं, जिथे जावंसं वाटत होतं ते मी प्रवासाला निघायच्या आधीच याला सांगितलं. पण का कुणास ठाऊक, कारणं सांगत त्याने माझा बेत उडवून लावला होता. पण घरुन निघताना मात्र मी श्री दत्तगुरुंना तशी प्रार्थना केली होती. आणि आता परतीच्या प्रवासात मला तीच रुखरुख लागली होती. पण मी दत्तगुरुंची इच्छा असा विचार करुन शांत होते. साधारण ४ तासांच्या प्रवासानंतर अचानक याने मला कर्नाळीला मुक्कामाला जायचं ना असं विचारलं आणि मला आश्चर्यच वाटलं. लगेचच आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये फोन करुन रुम उपलब्ध आहेत का याची चौकशी केली आणि रात्री उशिरा तिथे मुक्कामाला येत असल्याचं सांगितलं. माझी इच्छा पूर्ण होणार म्हणून खूप खुश झाले होते मी. रात्री ११ वाजल्यानंतर आम्ही कर्नाळी ला रुमवर पोहोचलो.
पहाटे लवकर उठून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानासाठी निघालो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून जवळच हा संगम आहे. वडोदरा जिल्ह्यातलं डभोई तालुक्यातलं हे कर्नाळी गांव. इथे नर्मदा, गुप्त सरस्वती आणि ओरसंग या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमावर स्नान करणं अतिशय पुण्यप्रद मानलं जातं. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच ग्रहण होतं. आणि रात्री उशिरा ग्रहण समाप्ती होती. त्यानंतर एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानतात. आणि म्हणूनच या योगावर त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळावं अशी माझी इच्छा होती.
आम्ही स्नानासाठी निघालो तेव्हा पहाट हलकेच उमलत होती. सहस्त्ररश्मीचं आगमन होण्यापूर्वीच उषा सोनकेशरी झाली होती. संगमावरचं दृश्य अप्रतिम होतं. एकीकडे सोनकेशरी उषा, दुसरीकडे अस्ताचलास जाणारा शशिकर आणि समोर पसरलेलं चमचमतं नर्मदाजल. आणि हे अप्रतिम दृश्य नेत्रात साठवण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी संगमावर गेलेलो आम्ही चौघंच. खूपच सुंदर अनुभव होता. हवेत चांगलाच गारवा होता, पण मैयाच्या जलात पाऊल टाकलं आणि अतिशय उबदार स्पर्शाने तनमन मोहोरलं. स्नानासाठी पाण्यात शिरलो आणि बाहेर पडावसंच वाटेना. पण वेळेअभावी तिथून निघावच लागलं. ग्रहणसमाप्तीनंतर मैयाच्या जलात स्नान करण्याचा योग आल्याने खूप समाधान वाटत होतं.
रुमवर येऊन सामान घेऊन आम्ही कुबेर भंडारी च्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिरही आम्ही राहिलो तिथून अगदी जवळच आहे.
कुबेर भंडारीचं हे मंदिर साधारण २५०० वर्षं पुरातन आहे. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा देव दिक्पाल आणि यक्षांचा अधिपती आहे. त्याने ब्रम्हदेवाची उपासना केली तेव्हा ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन त्याला अमरत्व, लंकेचं राज्य आणि पुष्पक विमान बहाल केलं. नंतर रावणाने कुबेरावर स्वारी करुन लंका आणि पुष्पक विमानावर कब्जा केला. मग कुबेराने भगवान शिवाची आराधना केली असता शंकराने प्रसन्न होऊन कुबेराला देवांचा खजिनदार केलं. तेव्हापासून त्याला कुबेर भंडारी या नावानंही ओळखतात. अशा या कुबेराचं मंदिर इथं आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. तसंच गणपती, महाकाली, हनुमान आणि रणछोडराय यांचीही मंदिरं आहेत. इथे प्रत्येक अमावास्येला दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. आम्ही या मंदिरात सकाळी लवकरच गेल्याने बिलकुल गर्दी नव्हती. कुबेर भंडारी आणि इतर देवदेवतांचं छान दर्शन आम्हाला मिळालं. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो.
कुबेर भंडारीच्या मंदिरापासून साधारण ३७ किमी अंतरावर असलेल्या गरुडेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो. गरुडेश्वर - वासुदेवानंद सरस्वती यांचं हे समाधी स्थान. इथे प्रशस्त असं दत्तमंदिर आणि त्यापुढे स्वामींचं समाधी मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे स्थान अतिशय सुंदर, शांत, पवित्र असंच आहे. या मंदिरातही सुंदर दर्शन घडलं. दत्तगुरुंचं आणि समाधी स्थानी स्वामींचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला थोडं खाली गेलो. इथे मैयाचं पात्र विशाल आहे. त्याच पात्रात एक बंधाराही बांधलेला आहे. दर्शन घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला. साधारण सव्वा तासानी आम्ही भालोद येथे पोहोचलो.
भालोदचं दत्तमंदिर एकमुखी दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. १४०० व्या शतकातील ही शाळिग्रामातील दत्त मूर्ती उजेडात किंवा अंधारातही पाहिली असता पोटावरील गोमुख स्पष्ट दिसतं. हे मंदिर प्रतापे महाराजांनी बांधलंय. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्वप्न दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद इथे रहाण्याचा आदेश मिळाला. याचदरम्यान बडोदा येथील काशिताई निरखे यांच्याकडील ही दत्तमूर्ती पू. प्रतापे महाराजांच्याकडे आली. आणि त्यानंतर भालोदला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधण्यात आलं. तसंच नर्मदा परिक्रमावासी आणि दत्तभक्त यांच्यासाठी आश्रम बांधण्यात आला. मंदिर आणि आश्रम परिसर अतिशय रमणीय आहे समोरच नर्मदा मैयाचं विशाल पात्र आहे. सदैव मयुरांचा वावर असणाऱ्या या आश्रमात कन्यापूजन हा विधी केला जातो. तसंच गुरुचरित्र पारायण आणि परिक्रमावासी यांच्या वास्तव्याची व्यवस्था इथे केली जाते. इथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून नावेने श्रीक्षेत्र नारेश्वर इथं जाता येतं.
आम्ही या मंदिरात जाऊन श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं आणि पू. प्रतापे महाराजांना भेटण्यासाठी थांबलो. ते आश्रमात कुठेच नव्हते. आम्ही त्यांची वाट पहात मंदिरातच थांबलो. सोज्वळ, सात्विक आणि प्रचंड उर्जेने भरलेल्या पू.साधक प्रतापे महाराजांना भेटणं हा प्रसन्न अनुभव असतो. थोड्या वेळाने आम्हाला ते नर्मदा तीरी गेले असल्याचं कळलं म्हणून आम्ही तिथे जायला निघालो असता ते स्वतःच समोर आले. त्यांच्याशी बोलतच आम्ही मंदिरात आलो. त्यांना नमस्कार करुन थोडं बोलून निघणार तेवढ्यात त्यांनी आम्हाला प्रसाद घेऊन जायला सांगितलं. गेल्यावेळी आम्ही सायंकाळी इथं आलो होतो तेव्हाही त्यांनी प्रसाद घेऊन जायला सांगितलं होतं पण तेव्हा वेळेअभावी आम्ही थांबू शकलो नव्हतो. यावेळी मात्र आम्ही थांबलोच. त्यांनी सांगितलं आज कन्यापूजन आहे तर आधी कन्यांचं भोजन होऊदे मग आपण भोजन करु. मी हे ऐकलं आणि मला खूपच आनंद झाला. मी मलाही कन्यापूजन करायचय असं महाराजांना सांगितलं. आणि आम्ही त्यांचं भोजन होईपर्यंत नर्मदा तीरावर गेलो. मुलींच भोजन झाल्यावर महाराज स्वतः मला कन्यापूजनासाठी बोलवायला आले. आम्ही वर आलो तर मंदिरात साऱ्या कन्यका बसल्या होत्या. आमचं अचानक जाणं झाल्याने मी पूजनासाठी कुठलीही तयारी नेली नव्हती. पण ऐनवेळी आलेला हा योग खूपच मोठा होता. त्यामुळे फक्त दक्षिणा देऊन का होईना मी साऱ्या कन्यांचं पूजन केलंच. एकाचवेळी १९-२० कुमारिकांचं पूजन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं. कन्यापूजन करुन आम्ही भोजनप्रसाद घेतला. मधल्या वेळेत आम्हालाही मंदिराबाहेर मयुराचं छान दर्शन झालं होतं. प्रसाद घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला आणि रात्री वेळेत घरी पोहोचलो.
यावेळी अगदी ऐनवेळी गिरनार यात्रा ठरली होती. त्यामुळे गाडीने जावं लागलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी गिरनार दर्शन घडावं ही आमची प्रार्थना श्री दत्तगुरुंनी ऐकली होती आणि आम्हाला सुंदर दर्शन घडवलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या सगळ्या इतर इच्छाही पूर्ण केल्या होत्या. त्रिवेणी संगमावर स्नान, कुबेर भंडारी, गरुडेश्वर यांच दर्शन, भालोदला श्री दत्तात्रेयांचं दर्शन आणि महाराजांची भेट आणि या सर्वावर कळस म्हणजे भालोदला एवढ्या मोठ्या कन्यापूजनाचं लाभलेलं भाग्य सारंच अनुभूतीपूर्ण. यावेळची कोजागिरी पौर्णिमा ग्रहणातही आमच्यावर दत्तकृपेचं चांदणं बरसून गेली.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
.
दत्तच माझे आनंदनिधान
दत्तनामात हरपते भान
दैवत माझे दत्तदिगंबर
ब्रम्हा विष्णू सवे महेश्वर
दत्तनामाची लागता गोडी
क्रोध मोह सारे बंध तोडी
दत्तनामाचा करता जागर
पार होईल हा भवसागर
दिठीतूनी करता प्रार्थना
पूर्ण होतसे मनोकामना
श्वासासंगे गुरुनाम घ्यावे
दत्त कृपेने पावन व्हावे
दत्त कृपेने पावन व्हावे
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment