'महाकुंभमेळा' १४४ वर्षांनी आलेली ही महापर्वणी. दि. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या काळात 'प्रयागराज' इथं होणाऱ्या महाकुंभाची तयारी सरकारने खूप महिने आधीपासून सुरु केली होती. आंतरजालावरुन आपल्याला याबद्दलची माहिती मिळत होती. प्रत्यक्ष कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधीच वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू संत, अघोरी साधू, नागा साधू, किन्नर यांच्या आखाड्यातले साधू यांचं मिरवणुकीनं आगमन होऊ लागलं. आणि हळूहळू या महाकुंभाची भव्यता जाणवू लागली. महाकुंभाविषयी आंतरजालावरुन सतत सामोऱ्या येणाऱ्या बातम्या आणि अनेक चित्रफिती यामुळं याची व्याप्ती, अतिभव्यता आणि त्याचवेळी तिथं साधूसंतांच्या खूप मोठ्या लवाजम्यासह येणाऱ्या करोडो भाविकांसाठी करण्यात आलेली उत्तम व्यवस्था याची माहिती मिळत होती. प्रत्यक्ष महाकुंभ मेळा सुरु झाला, पहिलं शाही स्नान झालं आणि त्यादिवशी त्रिवेणी संगमावर करोडो भाविकांनी साधुसंतांसमवेत कुंभस्नान केलं आणि हळूहळू आपणही या पर्वकाळातच कुंभस्नानाला जावं अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. मधल्या काळात अतिप्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी यामुळं संगमावर पोहोचण्यासाठी भाविकांंना लागणारा खूपच वेळ, कितीतरी किलोमीटर पायी चालावं लागणं अशा बातम्या सातत्यानं येत होत्या. पण आपणही जायचच ही माझी ठाम इच्छा होती.
शाही स्नान आणि अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्याच होत्या. या तारखांच्या दरम्यान भाविकांची होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी हे सारं टाळून मधल्या काळात आपण कुंभ स्नानाला जायचं असं ठरवलं. मी लगेच विमान प्रवासाच्या तिकिटांची माहिती घेतली. त्यादिवशी विमानाचे तिकिटदर फार वाढलेले नव्हते. तिथली सगळी परिस्थिती पाहता सुरुवातीला आम्ही फक्त पाच सहा जणांनीच कुंभस्नानाला जायचं ठरवलं होतं. आम्ही लेकीसह तिघंजणं नक्की जाणार होतो पण बरोबरच्या दोघा-तिघांचं जायचं नक्की होईपर्यंतच्या दोन दिवसात विमानाच्या तिकिटांचे दर एकदम वाढले. प्रयागराजमधली एकूण परिस्थिती पाहता पाच-सहा जणांनी कारने एवढ्या लांबचा प्रवास करणं याला जरा अवघडच वाटत होतं. त्याचवेळी त्या दोन दिवसांत याच्या ऑफिस मधील काही सहकारी मित्रांनी कुंभ स्नानाला जाण्याविषयी विचारणा केली. असंही विमानाची तिकीटं महाग झालीच होती. मग दुसऱ्या पर्यायचा विचार आम्ही सुरू केला. रेल्वेचीही तिकीटं उपलब्ध होत नव्हती. मग १७ सीटर ट्रॅव्हलर घेऊन एवढा मोठा प्रवास करायचा असा विचार सुरू झाला. सारं ठरवत असतानाच अजूनही काही जणांनी कुंभ स्नानाला येण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात आम्ही पाच सहा जणांनीच कुंभ स्नानाला जायचं असं ठरवलं होतं पण मग गिरनार परिक्रमेसारखंच 'कारवाॅ बनता गया' आणि अखेर ४० सीटर बस घेऊन प्रयागराजला जायचं नक्की केलं. प्रवासाची तारीख आणि बसही ठरवली, प्रयत्नांती वाराणसी आणि प्रयागराज मध्ये मुक्कामासाठी व्यवस्था ही केली.
ठरल्याप्रमाणं ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता 'श्री दत्तात्रेय' आणि 'श्री गणराया' यांच्या आशीर्वादानं साऱ्या भाविकांसह आम्ही 'प्रयागराज' ला प्रस्थान केलं. दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण सव्वा बारा वाजेपर्यंत आमचा प्रवास अतिशय सुरळीत पार पडला. सव्वा बारा वाजता मात्र आमची बस वाहतूक कोंडीत अडकली. अखेर दोन तासानं पुढे प्रवास सुरू झाला आणि आम्ही सायंकाळी साडेतीन पावणेचारला 'वाराणसी' येथे पोहोचलो. प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळं मोठ्या बसेसना शहरात प्रवेश नव्हता. आम्ही आमची बस पार्किंग लॉटमध्ये उभी केली आणि तिथून रिक्षानं ४ किमी अंतरावर असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. एव्हाना सायंकाळचे ४.१५ वाजून गेले होते. हाॅटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आम्हा सगळ्यांना सुगंधी गजरा, पाणी आणि सरबत देऊन अतिशय छान स्वागत केलं. रुममध्ये जाऊन सारं आवरुन लगेच दर्शनासाठी निघायचं असं ठरवलं.
साऱ्यांचं आवरून निघेपर्यंत सव्वा सहा वाजले. मग आधी 'गंगा आरती' पहायची ठरवून रिक्षानं 'अस्सी घाटा'वर गेलो. घाटावर पोहोचलो आणि कळलं की प्रचंड गर्दीमुळे 'गंगा आरती' स्थगित करण्यात आली आहे. या वेळपर्यंत पूर्ण अंधार पडला होता. घाटावर विद्युत दिवे होते मात्र 'गंगामैया'च्या काठावर बऱ्यापैकी अंधारच होता त्यामुळं पाण्याचा अंदाज येणं थोडं कठीण होतं. म्हणून प्रत्यक्ष पाण्यात न उतरता गंगाजलानं प्रोक्षण केलं, तीर्थ प्राशन केलं, काही जणांनी गंगामैयाच्या जळात दिवे सोडले आणि तिथून निघायचं ठरवलं. श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. पण रस्त्यावरुन जायचं तर किमान ३ किमी चालावं लागणार होतं. वेळ जास्त जाणार होता. त्याऐवजी घाटावरुनच चालत गेलो तर लवकर पोहोचता येणार होतं. म्हणून तसं चालायला सुरुवात केली. मात्र दर्शनासाठी किती वेळ लागेल याची कल्पना नसल्यानं आधी पोटपूजा करावी असं काहीजणांचं मत होतं. दुपारी ट्रॅफिक जॅम मुळे व्यवस्थित भोजन झालं नव्हतं. बरोबर नेलेल्या थेपल्यांचाच आस्वाद सगळ्यांनी घेतला होता. त्यामुळं आता आधी भोजन करुन दर्शनासाठी गेलो तर उशीर झाला तरी चिंता नाही असा विचार पुढे आला. मग घाटावरुन परत वर चढून जेवायला हाॅटेलमध्ये गेलो. तिथे असलेली गर्दी आणि आमचा मोठा ग्रुप यामुळं जेवणासाठी फारच वेळ गेला. मग एवढ्या उशीरा दर्शनासाठी जायचं, गर्दी मुळं दर्शनासाठी काही तास लागणार, व्हिआयपी पासेसची व्यवस्था बंद आहे हा सारा विचार करता अखेर मंदिरात न जाता मुक्कामी परत आलो. दोन दिवस सलग प्रवास झाल्यानं सारेच थकले होते. त्यामुळं रुमवर आल्यावर सारेच लगेच निद्राधीन झाले.
१३ तारखेला सकाळी ७ वाजता आम्ही आमच्या बसने 'अयोध्येला' 'श्री रामरायाच्या' दर्शनासाठी निघालो. प्रवास सुरु झाला अन तासाभरात बसमध्येच नाश्ता केला. जेमतेम १०० किमी पर्यंतचा प्रवास सुरळीत झाला आणि बस थांबली. अयोध्येला जाणारी सारी वाहतूक पुढे थांबवून ठेवण्यात आली होती. कारण अयोध्येमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने १०० किमी आधीच वाहतूक थांबवून ठेवली होती. सुरुवातीला थोडावेळ आम्ही बसमध्येच बसलो होतो. मात्र वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हं दिसेनाशी झाली आणि आम्ही बसमधून उतरलो. आमची बस जिथं थांबली होती तिथं २-३ छोटी हाॅटेल्स होती. पण तिथं 'वाॅशरुम' ची सोय असण्याची शक्यता नव्हती. पण निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली होती. अखेर तिथेच रस्त्यापासून थोडं आत असलेल्या एका घरात आम्ही गेलो. तिथं आमची ती सोय तर लगेच झाली. पण त्यानंतरचा बराच वेळ तिथं कसा गेला कळलच नाही. अतिशय साधा आणि आतिथ्यशील असा कुटुंब परिवार होता तो. त्यांच्या घराला लागूनच मोठी शेती होती. पिवळ्या मोहरीची पिवळ्या फुलांनी बहरलेली रोपं अतिशय सुंदर दिसत होती. मोहरीबरोबरच मटार, बटाटे यांचंही शेत होतं. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांच्या मुलींनी शेतातून ताजे मटार आणून आम्हाला खायला दिले. अगदी गोड आणि रसरशीत ताजे मटार खायला खूपच छान वाटलं. ताजे मटार, बटाटे आम्हाला घेऊन जायचा आग्रह ते करत होते. मात्र विनामुल्य असं काही घेणं आम्हाला पटलं नाही. पाणी प्यायला देण्याआधीही त्यांनी आम्हाला घरचा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला गुळ खायला दिला. त्यांच्या घरी आम्ही फक्त महिलाच गेलो होतो. मग बाकी सगळ्यांसाठी थोडा गुळ बांधून दिला. ट्रॅफिक सुटण्याचं बिलकुल चिन्ह नव्हतं. त्यांना याची कल्पना असल्यानं आधी त्यांनी आम्हाला जेवणाचाच आग्रह केला. मात्र आम्ही त्याला ठाम नकार दिल्यावर चहा करुन दिला. त्यांचं अतिशय प्रेमळ निरपेक्ष आदरातिथ्य आमच्यासाठी खरंच विशेष होतं. त्यांना मात्र हे सवयीचंच होतं. चहा पिऊन त्या सर्वांबरोबर फोटो काढून आम्ही परत बसजवळ आलो. थोड्या वेळानं तिथल्याच एका हाॅटेलमध्ये जेवणाची व्यवस्था झाली. मग तिथे जेवून आलो. थोड्या वेळानं म्हणजे जवळपास साडेतीन तासांनी वाहतूक सुरु झाली. जेमतेम अर्धा तास प्रवास झाला आणि पून्हा वाहतूक बंद झाली. पुन्हा दिड दोन तास एका ठिकाणी थांबल्यावर मुंगीच्या पावलांनी मध्ये मध्ये वाहतूक सुरु झाली. थोड्या वेळानं तेही बंद झालं आणि पुन्हा एकाच जागी वाहनं खोळंबली. असाच खेळ काही तास सुरु राहीला अखेर आम्ही वाराणसीला परत फिरायचा निर्णय घेतला. अर्थात निर्णय घेतला तरी लगेच अमलात येणं शक्य नव्हतं. कारण बस ला यू टर्न घेऊन परत फिरणंही अशक्य होतं. अखेर पाउण एक तासानं आम्हाला ही संधी मिळाली आणि यू टर्न घेऊन आम्ही परत वाराणसीला निघालो. या सगळ्या गोंधळात रात्रीचे आठ वाजले होते. तासभर प्रवास करुन वाटेतच एका हाॅटेलमध्ये जेवून पुढे निघालो. थोड्या वेळातच पुन्हा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. ११ वाजता ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो ते रात्री २ वाजता कोंडीमधून सुटलो. पहाटे ३.४५ वाजता 'वाराणसी'ला पोहोचलो. संपूर्ण दिवस म्हणजे १३ तास फक्त वाहतूक कोंडीत अडकून अखेर श्री रामरायाचं दर्शन न मिळताच परत फिरावं लागलं. परतीच्या मार्गातही तीन तास अडकून पडावं लागलं. आणि इतके दिवस आंतरजालावर सतत पहात असलेल्या तासंतास होणाऱ्या वाहतूक कोंडींचा प्रयक्ष अनुभव घेतला.
'वाराणसी'ला पोहोचल्यावर बस पार्किंग लॉट मध्ये उभी करुन रिक्षाने अखेर पहाटे ४ वाजता श्री काशी विश्वेश्वर मंदिराजवळ गेलो. तिथून पुढं चालत दर्शनासाठी रांगेत उभं रहाण्यासाठी गेलो तर प्रचंड मोठी रांग जी घाटावरुन सुरु होऊन खूप लांबून फिरुन मंदिराजवळ पोहोचत होती. या रांगेतून दर्शनासाठी किमान ८-९ तास लागणार होते. व्हिआयपी दर्शनही प्रचंड गर्दीमुळं बंदच होतं. आणि रांगेतून दर्शन घेण्यासाठी आमच्याजवळ एवढा वेळच नव्हता. आम्ही ज्या मुख्य गोष्टीसाठी आलो त्यासाठी आम्हाला त्याच दिवशी 'प्रयागराज'ला पोहोचायचं होतं. आम्ही मंदिराजवळ रिक्षानी आल्यामुळं सारा ग्रुप वेगळा झाला होता. त्या साऱ्यांना एकत्र येण्यात वेळ गेला. मग तिथं ४ नंबर गेटजवळच लावलेल्या स्क्रीनवरच श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. त्या मधल्या वेळेत काही जणं परस्पर तिथल्या पंडितांना पैसे देऊन इतर कुणाला न सांगता दर्शनासाठी निघूनही गेले. खरंतर जेव्हा आपण कुठल्याही ग्रुपबरोबर जातो तेव्हा सगळे निर्णय हे सर्वांचा, परिस्थितीचा विचार करुन एकत्र घ्यायचे असतात. आपल्या मनासारखं फिरायला आपण स्वतंत्रपणे जातच असतो. ग्रुपबरोबर असताना आपल्या वागण्यामुळं इतरांचा वेळ वाया जाणार नाही, इतर काही त्रास होणार नाही याची काळजी घेणं ही आयोजकांइतकीच प्रत्येकाची जबाबदारी असते. अखेर आम्ही बाकी सर्वजणं दर्शन न घेताच रुमवर परत आलो. अर्थात श्री रामरायाचं आणि श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग नव्हता. कारण हे दर्शन कधीही घेता येऊ शकतं. आणि आमच्यासह काही जणांचं हे दर्शन आधीही झालेलं असल्यानं आम्हा कुणालाच फारसं वाईट वाटलं नाही. रुमवर येऊन सारं आवरुन दर्शनासाठी गेलेले मेंबर्स आल्यावर रुम सोडून सामानासह आम्ही ११ वाजता रिक्षाने आमची बस जिथे थांबली होती तिथं जाण्यासाठी निघालो.
आम्हाला श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलं नव्हतं. म्हणून आम्ही सर्वांनी 'बनारस हिंदू विद्यापीठा'च्या श्री विश्वनाथ मंदिरात जायचं ठरवलं. त्यानुसार आम्ही रिक्षानं आधी त्या मंदिरात गेलो. 'बनारस हिंदू विद्यापीठ' हे भारतानं घोषित केलेल्या आठ प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे. या विद्यापीठाच्या आवारात जगातील सर्वात उंच असं हे श्री विश्वेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं आहे. १९६६ मध्ये हे मंदिर संकुल बांधण्यात आलंय. या शिवमंदिराचा अडीचशे फूट उंचीचा कळस हा जगातील सर्वात उंच कळस आहे. अशा या अप्रतिम मंदिराच्या गर्भगृहात आम्ही प्रवेश केला आणि मी जागच्या जागी खिळून उभी राहीले. काही क्षणांनी मी याला म्हटलं आपण या मंदिरात या आधी आलो आहोत. मात्र याने तत्काळ या गोष्टीला नकार दिला. कारण मंदिरात प्रवेश करेपर्यंत आम्हाला या आधी या मंदिराबद्दल काहीच माहिती नव्हती. पण मला मात्र त्या शिव पिंडीच्या दर्शनाने या मंदिरात आधी आल्याची जाणीव होत होती. आपल्याला असा भास का होतोय याचा विचार मी करत असताना अचानक मला जाणवलं की हे मंदिर मी स्वप्नात पाहिलय. होय, हिच शिवपिंडी जशीच्या तशी मी स्वप्नात पाहिली होती. मला मंदिर किंवा परिसर काही आठवलं नाही पण पिंडी पहाताक्षणीच खूण पटली होती. आणि एका अनामिक ओढीने मी पिडीला स्पर्श करुन नतमस्तक झाले. नैवेद्य अर्पण केला. श्री दत्तगुरुंनी मला स्वप्नात घडवलेलं शंभू महादेवाचं दर्शन आज प्रत्यक्षात घडवलं होतं. श्री काशी विश्वेश्वराचं मुख्य मंदिरात दर्शन न घडल्याची लागलेली रुखरुख क्षणात नाहीशी झाली. विश्वेश्वराच्या दर्शनाची माझी इच्छा दत्तगुरुंनी अगदी सुंदर रितीने पूर्ण केली.
हे दर्शन घेऊन आम्ही सारे परत रिक्षाने बसजवळ गेलो. आणि नंतर लगेच म्हणजे १४ तारखेलाच प्रयागराजला प्रस्थान केलं. तिथंही 'प्रयागराज' च्या आधी काही किमी अंतरावर मोठ्या बसेसना प्रवेश बंद केला होता. पण आम्ही ज्याठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली होती त्यांचा एक माणूस तिथं आला आणि त्यानं वेगळ्या मार्गानं फिरवून आमची बस मुक्कामाच्या ठिकाणी नेली. तोपर्यंत सायंकाळचे पाच वाजले होते. तिथंच भोजनासाठी आम्ही येणार असल्याचं सांगून ठेवल्यानं आधी कुठं भोजन केलं नव्हतं. त्यामुळं पाच वाजता पोहोचल्यावर जेवलो. जेवून लगेच संगम घाटावर कुंभस्नानासाठी निघालो.
मुक्कामाच्या ठिकाणापासून संगम घाट किमान आठ ते दहा किलोमीटर दूर होता. तिथं जाण्यासाठी सर्वांना रिक्षा मिळण्याची शक्यता फारच कमी होती. अखेर चालायला सुरुवात करायची आणि जशा रिक्षा मिळतील तसं पुढे जायचं असं ठरवलं. आम्ही पाच-सहा जण तिथून जवळच उभ्या असलेल्या पोलिसां जवळ संगमावर कसं जायचं याची चौकशी करायला गेलो. त्यांनी 'इथून रिक्षा मिळणं कठीण आहे' असं सांगितलं. पण तुम्ही किमान तीन-चार किलोमीटर अंतरापर्यंत बसने जाऊ शकता असं सांगितलं. त्यांच्याशी हे बोलत असतानाच समोरून एक बस आली, पोलिसांनीच ती बस थांबवली आणि बसचा कंडक्टर नाही म्हणत असतानाच आम्हाला त्या बसमध्ये चढायला लावलं. त्यांनं आम्हाला 'झुसी रेल्वे स्टेशन' जवळ उतरा असं सांगितलं. तो स्टाॅप येताच त्यानं बस थांबवली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं आम्हाला विनामुल्य तिथपर्यंत सोडलं. तिथं उतरुन विचारत विचारत आम्ही पुढं निघालो तर तिथल्या एका पोलिसांनी तुम्हाला इ- रिक्षाने संगमावर जाता येईल असं सांगितलं. अन्यथा ७-८ किमी चालावं लागेल असं म्हणाला. इथंही त्याच्याशी बोलत असतानाच रिक्षा मिळाली. त्यानं आम्हाला ४-५ किमी अंतरावर असलेल्या 'ऐरावत गेट'जवळ सोडलं. आम्ही सतत बाकी सगळ्या ग्रुपच्या संपर्कात होतो त्यामुळं त्यांनाही आमच्या मागोमाग बस मिळाली. पुढं मात्र सगळ्यांना रिक्षा मिळू शकली नाही. आम्ही झुसी स्टेशन पासून पुढे थोडसं आलो आणि अक्षरशः भान हरपून पाहत राहिलो.
आंतरजालावर दिसणाऱ्या चित्रफिती, बातम्या यातून दिसणाऱ्या महाकुंभमेळ्याचं प्रत्यक्ष दर्शन आम्ही या क्षणी घेत होतो. रिक्षानं अम्ही संगमावर जात असताना दोन्ही बाजूला केलेली अप्रतिम विद्युत रोषणाई, वेगवेगळ्या आखाड्यांचे मोठमोठे मंडप आणि राहुट्या मध्ये मध्ये असणारी वेगवेळी प्रवेशद्वारं सारंच अतिभव्य आणि डोळे दिपवणारं होतं. याच बरोबर कुठलीही माहिती देण्यासाठी, मदतीसाठी जागोजागी सदैव सावध, तत्पर असलेलं पोलिसदल, इतर कर्मचारीवृंद, भाविकांच्या क्षुधा शांतीसाठी उभारण्यात आलेले लंगर आणि नजरेच्या पल्याड असलेला अवाढव्य परिसर सातत्यानं स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करणारा सफाई कर्मचारीवर्ग सारंच कौतुकास्पद. हे सारं पहात ,नजरेत साठवत आम्ही रिक्षानं ऐरावत द्वाराजवळ पोहोचलो. तिथून प्रत्यक्ष त्रिवेणी संगमावर स्नानाला जाण्यासाठी परत ३-४ किमी चालावं लागलं. संगमावर पोहोचण्यासाठी चौकशी करतच आम्ही ६ नंबरच्या पिपापुलावर पोहोचलो. आम्ही तिथपर्यंत जात असताना मधल्या संपूर्ण घाटांवर भाविक स्नान करतच होते. मात्र तिथं थोडी कमी गर्दी होती. 'अरेल घाटा'वरुन त्रिवेणी संगमावर जाणाऱ्या बोटी बंद करण्यात आल्या होत्या. त्या बोटींच्या मालकांनी संगमावर जाण्यासाठी प्रत्येकी अडिच हजार रु. आकारायला सुरुवात केली म्हणून सरकारनेच ही बोट सेवा बंद केली होती. त्यामुळं पिपापुलावरुनच संगमावर जावं लागत होतं. आणि आम्हाला मुख्य त्रिवेणी संगमावरच स्नान करायचं होतं. जसं आम्ही ६ नंबरच्या पिपापुलाजवळ जाऊ लागलो तशी गर्दी फारच वाढली. त्या गर्दीतूनच एकमेकांचे हात घट्ट धरुन आम्ही त्या पिपापुलावरुन पलिकडे गेलो. तिथून अजून थोडं पुढे चालत प्रत्यक्ष त्रिवेणी संगमावर पोहोचलो.
इथं स्नानासाठी खूपच गर्दी होती. त्याचबरोबर किनाऱ्यावर अत्यंत अस्वच्छता होती. काठावर होणारा चिखल आणि त्यात लोकांनी फेकलेला सगळ्या प्रकारचा कचरा अगदी किळसवाणं दृश्य. पण नाईलाजानं त्याकडे दुर्लक्ष केलं. गंगामैयाला प्रार्थना करुन आम्हा सहा जणांपैकी तिघंजणं आधी स्नानासाठी पाण्यात उतरले. त्यांचं तीन डुबक्या मारुन स्नान झाल्यावर ते काठावर आले आणि आम्ही त्यातल्या त्यात जरा बरी जागा बघून तिथंच विकत घेतलेला एक प्लास्टिक कागद पसरला आणि त्यावर आमचं सामान ठेवलं. आणि आम्ही तिघीजणी परत काठावर गेलो. गंगामैयाची ओटी भरुन प्रार्थना केली आणि जळात उतरलो. आमच्यासाठी पाण्यात उतरणं ही सुद्धा कसरतच होती. काठावर वाळूची पोती रचून पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्यांसारखी व्यवस्था केली होती. पण त्यावरुन पावलं सरकत होती. अगदी जपूनच आम्ही पाण्यात उतरलो आणि त्या बर्फागत गार पाण्यानं अंगावर सर्रकन काटा आला. काही क्षणांनी तो गारवा सहन होऊ लागला. मग थोडं पुढं जात आखिरकार हमने भी 'आस्था की डुबकी' लगाई. अर्थात अतिथंड पाण्यामुळं आणि खूप पुढं जायला न मिळाल्यानं पूर्ण डोकं पाण्याखाली गेलं नाही. थोडावेळ छान डुंबून थंडीनं कुडकुडत आम्ही तिघीही काठावर आलो. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता आमचं कुंभस्नान झालं होतं आणि मन एका वेगळ्याच आनंदानं भरुन गेलं होतं. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभमेळ्याच्या पर्वकाळात आम्हाला स्नान करण्याचा योग आला होता. केवळ आणि केवळ श्री दत्तात्रेय आणि गंगामैया यांच्या कृपेमुळेच हे भाग्य आम्हाला लाभलं. ज्याक्षणी माझ्या मनात कुंभस्नानाला जायचा विचार आला त्याक्षणी मी दत्तगुरुंनाच माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. अगदी खरं सांगायचं तर नुसती प्रार्थनाच नाही तर थोडा हट्टच केला होता. कारण प्रयागराज मधली एकूण परिस्थिती पाहता आपल्याला हे भाग्य मिळेल का याबद्दल जरा साशंकता होती. पण अखेर माझी इच्छा पूर्ण झाली होती. सहचराने आणि लेकीनेही सुरुवातीपासून माझ्या इच्छेला साथ दिली. सहचराने यात्रेची सारी तयारी, जबाबदारी त्याच्या मित्रांच्या साथीने पूर्ण केली आणि आम्हा सर्वांनाच कुंभस्नान करायला मिळालं.
आमचं स्नान झाल्यावर काही वेळानंतर आमचा मागं राहिलेला बाकी सगळा ग्रुप आला. मग त्या सर्वांचं सामान आम्ही आमच्याजवळ ठेवून त्यांना स्नानासाठी जायला सांगितलं. त्या सर्वांचं स्नान होईपर्यंत आम्ही तिथं वाफाळत्या लेमन टी चा आस्वाद घेत आजूबाजूचा परिसर पहात थांबलो. कडाक्याच्या थंडीत लेमन टी पिण्याची मजाही वेगळीच होती. सगळ्यांचं आवरेपर्यंत खूप वेळ लागला. तेवढ्यात आमचा दोनदा लेमन टी पिऊन झाला. सगळ्यांचं आवरल्यावर थोडं छायाचित्रण करुन अतिशय तृप्त मनानं आम्ही परत निघालो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जवळजवळ रात्रीचा एक वाजला होता. मग फ्रेश होऊन सामान बसमध्ये ठेवून आम्ही रात्री दिड वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
जबलपूर जवळ 'नर्मदा मैया' वरच्या पूलावरुन पलीकडं जावं लागतं. त्यानिमित्तानं मैयाचं छान दर्शन घडतं. आमच्या मनात इथं थोडी वाकडी वाट करुन मैया किनारी जाऊन प्रत्यक्ष दर्शन घ्यावं असं होतं. आम्ही जबलपूरला पोहोचल्यावर वेळेचा अंदाज घेऊन ऐनवेळी एखाद्या मंदिरात दर्शनासाठी जायचं ठरवलं. सगळा विचार करता तिथल्याच 'भेडाघाट' जवळच्या 'चौसष्ट योगिनी मंदिरात' जायचं ठरवलं. एव्हाना बस तिथून साधारण २५ किमी पुढे आली होती. मग परत बस फिरवली आणि मंदिरात गेलो.
जबलपूर जवळच्या भेडाघाट जवळचं हे 'चौसष्ट योगिनी मंदिर' याला 'गोलकी मठ' (वर्तुळाकार) असंही म्हणतात. प्रत्यक्षात मात्र इथं ६४ ऐवजी ८१ योगिनींची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे १२५ फूट व्यासाचं हे वर्तुळाकार मंदिर सर्वात भव्य आणि सर्वात प्रसिद्ध आहे. दहाव्या शतकात कलचुरी वंशाच्या शासकांनी हे मंदिर बांधलय. साऱ्या योगिनींच्या पाषाण मूर्ती आहेत. आणि सध्या त्या पूर्वी केलेल्या तोडफोडीमुळे भग्नावस्थेत आहेत. याच्या मध्यभागी शिव मंदिर आहे. यात भगवान शिव आणि पार्वती माता नंदीवर आरुढ आहेत. हि सुद्धा काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. चौसष्ट योगिनींची साधना अतिशय प्रभावशाली मानली जाते. एका कथे नुसार या योगिनी 'कालिमाते'ला समर्पित आहेत. कालिमातेने 'घोर' नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ६४ योगिनींचं रुप धारण केलं होतं. तर दुसऱ्या आख्यायिके नुसार दुर्गामातेने आपल्या देहातून ६४ योगिनींची उत्पत्ती केली होती. योगिनी मंदिर हे तंत्र विद्येचं केंद्र मानलं जातं. सायंकाळनंतर या मंदिरांमध्ये प्रवेश बंद असतो. अतिशय सुंदर असं मंदिर पाहून, दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या नर्मदा मैयाच्या घाटावर गेलो.
एव्हाना सायंकाळ झाली होती. रवीराज अस्ताचलास चालले होते. पश्चिमा सुंदर अशा केशररंगात रंगली होती. आणि त्या केशर रंगात मैयाचं जल ही छान चमचमत होतं अतिशय सुंदर, चित्रासासारखं, भारावलेलं वातावरण होतं. खरंतर त्यावेळी नर्मदा स्नानाची तीव्र इच्छा झाली पण कपडे बरोबर नेले नसल्यानं स्नान करणं अशक्य होतं. मग पायऱ्यांवरुन थोडं पाण्यात उतरुन मावळत्या दिनकराला अर्घ्य देऊन प्रोक्षण केलं. थोडावेळ तिथं थांबून मैयाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद घेतला. आणि मग मात्र परत फिरलो.
रविवारी १६ तारखेला दुपारी २.३० वाजता सारा प्रवास संपवून घरी पोहोचलो. रामरायाचं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन हा भाग आम्हा सर्वांसाठी तिथल्या एकूण परिस्थितीचा विचार करता फार महत्त्वाचा नव्हता. तरीही आम्ही प्रयत्न केला. अर्थात अतिरेकी गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळं ते दर्शन घडलं नाही. पण ज्या कुंभ स्नानासाठी अट्टाहास केला होता तो मात्र सुंदर रितीनं पूर्ण झाला. वाहतूक कोंडी आणि प्रचंड गर्दी यांची आम्ही मानसिक आणि प्रत्यक्ष तयारी ठेवली असल्यानं त्याचाही बिलकुल त्रास झाला नाही. बरोबर भरपूर खाद्यपदार्थ आणि पाणी यांचा साठा ठेवल्यानं आम्हाला कुठेच कसलाच त्रास झाला नाही. आयोजक त्यांचे सहकारी मदतनीस आणि सारे यात्रेकरु यांच्या परस्पर सामंजस्य, सहकार्य यामुळं ही खूप मोठी धार्मिक यात्रा उत्तम रितीनं सुफळ संपूर्ण झाली.
- स्नेहल मोडक