Pages

Friday, July 18, 2025

जय बाबा बर्फानी - १

          '८ जुलै २०२५' आमच्यासाठी अजून एक विशेष दिवस. याच दिवशी आमची अजून एक इच्छा पूर्ण झाली. गतवर्षी काही कारणाने रहित करावी लागलेली 'अमरनाथ यात्रा' या वर्षी 'श्री दत्तात्रेय' आणि स्वयं 'श्री बाबा अमरनाथ' यांनी आमच्या कडून पूर्ण करवून घेतली. 

           याच्या ऑफिस मधील एक सहकारी दरवर्षी अमरनाथ यात्रा आयोजित करतात. यावर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमाची रुपरेषा आम्हाला कळली आणि लगेचच याने त्यांच्याबरोबर जायचं नक्की केलं. 'अमरनाथ श्राईन बोर्डाने' जाहिर केलेल्या तारखेला नेमून दिलेल्या रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट मिळवलं त्यानंतर बोर्डाने जाहिर केलेल्या तारखेला नेमून दिलेल्या बॅंकेत जाऊन बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केलं. हे सारे सव्यापसव्य केवळ आयोजकांमुळे सहजतेने पूर्ण झाले. 

          पण खरं सांगायचं तर मी मात्र या यात्रेला जायला बिलकुल तयार नव्हते. याचं एकमेव कारण म्हणजे यात्रा मार्गात ३ रात्री सामुहिक निवास व्यवस्थेत तंबूत रहावं लागणार होतं. आणि त्याहीपेक्षा अवघड गोष्ट म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणं भाग होतं. हे सारं टाळण्यासाठी मला यात्रेला हेलिकॉप्टरनेच जायचं होतं. अखेर आपण हेलिकॉप्टरचं तिकिट काढायचं पण यात्रेला जायचं असं ठरवलं. 

           या सगळ्यात दोन महिने गेले. आणि अचानक 'पहलगाम' मध्ये हिंदू पर्यटकांवर अतिशय भीषण असा आतंकी हल्ला झाला आणि सारं वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर सतत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य आणि अतिशय तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अमरनाथ यात्रेचा मुख्य बेस कॅम्प हा पहलगामच असल्यानं यात्रेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यात्रा होणार की नाही, आपण जावं की नाही असे प्रश्न सुरु झाले. आम्ही यात्रेसाठीचे सारे सोपस्कार पूर्ण केले होते पण या गोंधळामुळे विमानाची तिकिटं काढली नव्हती. आम्ही दोघंच जम्मूला विमानानं जाणार होतो. बाकी आमच्या बरोबरचे सारे यात्रेकरु रेल्वेने येणार होते. अखेर जेमतेम २०-२५ दिवस आधी आम्ही विमानाची रिफंडेबल तिकिटं काढली. आणि आमच्या 'अमरनाथ यात्रे'वर शिक्कामोर्तब झालं. 

          यात्रेला हेलिकॉप्टरने जायचं ठरवलं होतं पण एवढ्या सहजतेनं 'बाबा अमरनाथांचं' दर्शन आम्हाला घडावं हे त्यांना आणि दत्तगुरुंना बहुतेक मान्य नव्हतं. त्यामुळे ज्या दिवशी हेलिकॉप्टरचं बुकिंग सुरु होणार होतं त्या दिवशी ते सुरु न होता सुरक्षिततेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रे साठी पहलगाम ते अमरनाथ आणि बालताल  ते अमरनाथ या दोन्ही ठिकाणांना' नो फ्लाय झोन' म्हणून घोषित करण्यात आलं आणि माझी हेलिकॉप्टरने दर्शनासाठी जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. हेलिकॉप्टरचा पर्याय रद्द झाल्यावर मी परत यात्रेला जायला नकार दिला. 'हवंतर तू एकटा जा' मी येणार नाही असाच घोष मी लावला होता. पण मी यात्रेला जावं हे दत्तगुरुंनीच ठरवलं असल्यानं माझ्या इच्छेविरुद्ध मला जावंच लागलं. 

          अखेर ५ तारखेला सकाळच्या विमानाने निघून दुपारपर्यंत आम्ही जम्मूला पोहोचलो. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन थोडा आराम केला. तोपर्यंत आमच्याबरोबरचे सारे यात्रेकरु आयोजकांसह मुक्कामी आले. जम्मू मध्येच यात्रेसाठी अत्यावश्यक असं RFID Card काढून झालं.‌ संध्याकाळी फिरायला म्हणजे आधी श्री रामरायाच्या दर्शनासाठी 'रघुनाथ मंदिरात' गेलो. तिथे गर्दी कमी असल्यानं छान दर्शन झालं. मग थोडं फिरुन जेवून परत मुक्कामी आलो. दुसऱ्या दिवशी आमची प्रत्यक्ष यात्रा सुरु होणार होती.

          ६ तारखेला सकाळी लवकरच सारं आवरुन आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरनं पहलगामला निघालो. सुरक्षिततेच्या दृष्टीने जागोजागी उभारण्यात आलेल्या सुरक्षा चौकीमध्ये तपासणी होत, नाश्ता जेवणासाठी थांबत अखेर आम्ही संध्याकाळी पहलगामला पोहोचलो. त्यादिवशी आषाढी एकादशीचा आमचा उपवास असल्यानं आमच्या जेवणाचा प्रश्न नव्हता. त्यासाठी आम्ही बरोबर कोरडा फराळ नेलाच होता. आणि  आमचं सारं‌ पहलगाम आधीच फिरुन झाल्यानं पुन्हा फिरायची इच्छा नव्हती. त्यामुळं पहलगामला पोहोचून आम्ही आराम केला.

           ७ तारखेला भल्या पहाटे आम्ही सगळे गाडीने 'चंदनवारी'ला निघालो. हा यात्रेचा पहलगाम मार्गातला बेस कॅम्प आहे. इथून प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा तिथे यात्रेकरुंची प्रचंड गर्दी होती. तिथं प्रत्येक व्यक्तीची आणि बरोबर नेलेल्या सामानाची कसून तपासणी होते. ती तपासणी करुन पुढे आल्यावर यात्रा सुरु होते. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अमरनाथ यात्रेच्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरक्षा अत्यंत कडक करण्यात आली आहे. अगदी कडेकोट बंदोबस्तात ही यात्रा सुरु आहे. जम्मू पासूनच ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. यात्रेकरुंच्या वाहनांच्या मागेपुढे सैनिकांच्या गाड्या आहेत. मार्गात अक्षरशः अगदी काही पावला पावलांवर सैनिक तैनात करण्यात आले आहेत. अगदी डोळ्यात तेल घालून यात्रेकरुंची काळजी आपले हे सारे सैनिक घेतायत. आणि त्यामुळंच सारे भाविक निर्धास्तपणे यात्रेला जातायत. 

           आमची सारी तपासणी होऊन आम्ही पुढे गेलो. आधीच्या कार्यक्रमानुसार आमचा पहिला मुक्काम 'शेषनाग' ला होता. पण आम्ही चेकींग करुन पुढे आल्यावर ठरलं की शेषनाग ऐवजी आमचा दुसरा मुक्काम जिथं ठरला होता तिथं म्हणजे 'पंचतरणी' ला च पहिल्या दिवशीच पोहोचायचं. 'चंदनवारी' ते 'शेषनाग'  हे अंतर १४ किमी आणि 'शेषनाग' ते 'पंचतरणी' हे ८ किमी अंतर आहे. शेषनाग ला न राहता पुढं पंचतरणीला मुक्काम करायचा ठरवल्यानं आमचा एक मुक्काम कमी होणार होता. माझ्यासाठी ही छानच गोष्ट होती. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एकुण बारा जणं होतो. त्यातल्या आम्ही ५ जणांनी घोड्यावरुन पंचतरणीला जायचं ठरवलं. बाकीचे ७ जणं थोड चालत थोडं घोड्यावरुन असं येणार होते.

          आम्ही आमच्यासाठी घोडे ठरवले, पर्ची काढली. थोडं चालत पुढे गेल्यावर काही मिनीटांनी घोडेवाले घोडे घेऊन आले. आणि घोड्यावरुन आमची प्रत्यक्ष चढाईला सुरुवात झाली.

           'अमरनाथ' जम्मू - काश्मीर मधलं एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध असं तीर्थस्थान. हे तीर्थस्थान म्हणजे एक भव्य अशी नैसर्गिक गुहा आहे. श्रीनगरपासून १३५ किमी अंतरावरची ही भव्य गुहा समुद्र सपाटीपासून १३,६०० फूट उंचीवर आहे. या गुहेत टपकणाऱ्या पाण्यामुळं शिवलिंग तयार होते. साधारण दिडशे फूट परिघाच्या या गुहेत तयार होणारं हे ८-१० फूट उंचीचं हे शिवलिंग घन बर्फानं तयार होतं.  याच्या बाजूला अजून लहान हिमखंड आहेत त्यांना ‌पार्वती, गणेश स्वरुप समजतात. मुख्य शिवलिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे त्यातून पाणी टपकून हे शिवलिंग तयार होतं. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राखी पौर्णिमेपर्यंत असा हा अमरनाथ यात्रेचा कालावधी असतो.‌ याच गुहेमध्ये 'भगवान शंकरांनी' 'पार्वती मातेला' अमरत्वाची कथा सांगितली. त्यांनी सगळ्यांपासून दूर एकांत ठिकाणी ही कथा सांगितली पण तरी ती दोन कबुतरांनी ऐकली आणि तीही अमर झाली अशी आख्यायिका आहे. या शिवलिंगाला अमरत्वाची कथा सांगितली म्हणून 'बाबा अमरनाथ' तसंच बर्फाचं शिवलिंग आहे म्हणून 'बाबा बर्फानी' ही दोन्ही नावं प्रचलित आहेत. 

           इथं येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे 'बालताल' ते 'अमरनाथ'. यात बालताल - बराडी - संगम - गुहा असा एकुण १४ किमी.चा पण अतिशय अवघड मार्ग आहे. चढाईसाठी हा मार्ग जास्त अवघड आहे. त्यामुळं बरेचसे भाविक दर्शन घेऊन परतताना या मार्गानं जातात. कारण तुलनेनं उतरणं थोडं सोपं आहे. पण ज्यांना एक दिवसात यात्रा करायची आहे ते जाता-येता या मार्गाचा उपयोग करतात.

          दुसरा मार्ग म्हणजे पहलगाम ते अमरनाथ गुहा. यात पहलगाम - चंदनवारी - पिसू टॉप - शेषनाग - पोषपत्री - गणेश टाॅप - पंचतरणी - संगम - गुहा असा एकूण ४० ते ४५ किमी. असा मार्ग आहे. हा मार्गही खडतरच आहे. या मार्गाने जाताना किमान दोन रात्र  मार्गात मुक्काम करावा लागतो. यातील पिसू टॉप आणि गणेश टॉप या मार्गावरची चढाई अत्यंत अवघड आहे. परंतु अमरकथा सांगण्यासाठी 'भगवान शिव - पार्वती' याच मार्गानं गुहेत गेले होते अशी मान्यता आहे. त्यामुळं बरेचसे भाविक दर्शनासाठी जाताना पहलगाम मार्ग आणि परतताना बालताल मार्गाची निवड करतात. 

          ज्यांना फार चालायची सवय नाही, किंवा श्वसनाचा त्रास आहे अशांसाठी हे दोन्ही मार्ग अतिशय अवघडच आहेत. परंतु इथं पालखी, घोडे हेही उपलब्ध असतात. तसंच हेलिकॉप्टरचीही सोय आहे. ज्यायोगे यात्रा सुसह्य होते. गुहा अतिशय उंचीवर असल्यानं चालताना ऑक्सिजन कमी पडतो , त्यामुळे त्रास होऊ लागल्यास मात्र त्वरित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जागोजागी व्यवस्था केलेली असतेच. संपूर्ण यात्रा मार्गात ठिकठिकाणी निःशुल्क खानपान सेवा म्हणजेच लंगर किंवा भंडारा उपलब्ध असतात. रात्री मुक्काम करण्यासाठी पहलगाम, चंदनवारी, शेषनाग, पंचतरणी आणि बालताल या ठिकाणी मुबलक तंबू व्यवस्था असते. या तंबूंच्या जवळच स्वच्छतागृहंही असतातच. जम्मू काश्मीर चा भाग अतिशय संवेदनशील असल्यानं इथं दरवर्षी यात्रेकरुसाठी अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. 

          आम्ही ५ जणांनी चंदनवारी पासून घोड्यावरुन आणि बाकीच्यांनी चालत यात्रेला प्रारंभ केला. यात्रा मार्ग अतिशय खडतर असल्यानं पायी जाणं आमच्यासाठी अवघडच होतं. अतितीव्र चढ-उतार, मध्ये मध्ये उंच पायऱ्या, अरुंद मार्ग यामुळे घोड्यावर तोल सावरत बसणं हीसुद्धा फार मोठी कसरतच होती. मधेमधे तपासणी केंद्रावर तपासणीसाठी थांबत आम्ही पुढे जात होतो. नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षा अतिशयच कडक करण्यात आली आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी तपासणीसाठी घोड्यावरुन उतरावं लागत होतं. प्रत्येक वेळी घोड्यावरुन उतरुन परत चढणं फारच त्रासदायक होतं. चंदनवारी पासून पहिला येणारा 'पिसू टॉप' याचीच चढाई अती कठिण आहे. तीव्र चढ चढावे लागतात. मला मुळातच चढ-उताराची खूप भिती वाटते. आणि इथं तर अती तीव्र चढाई होती. त्यामुळं पायी किंवा घोड्यावरुन जाणं ही माझ्यासाठी फारच कठीण गोष्ट होती. सतत नामस्मरण करत मी घोड्यावर बसले होते. पाऊस बिलकुल नसल्यानं रस्ता कोरडा होता. चिखल नसल्यानं घोडे घसरण्याची भिती कमी होती. पण त्यामुळं प्रचंड धुळ मात्र उडत होती. अशातच आमचा प्रवास सुरु होता. कठीण चढाई आणि मधेच उंच पायऱ्या असा प्रवास होता. हळूहळू पिसू टॉप ची कठीण चढाई पार करुन आम्ही पुढे 'शेषनाग'ला पोहोचलो. इथं विस्तिर्ण असा तलाव आहे. आणि अधुनमधून इथं प्रत्यक्ष शेषनागाचं दर्शन घडतं अशी मान्यता आहे. त्यापुढे मधे थोडा रस्ता ठिक होता. मग परत कठिण अशा 'गणेश टाॅप'ची चढाई सुरु झाली. इथं ऑक्सिजनची कमतरता जास्त जाणवते. त्यामुळं इथं फार वेळ कुणालाच थांबायला परवानगी नाही. इथं आम्हाला ३-४ किमी अंतर घोड्यावरुन उतरुन पायी किंवा पालखीनं जावं लागणार होतं. खूप कठीण चढ आणि पायऱ्या होत्या. पायी जाणं अवघड होतं म्हणून आम्ही तेवढं अंतर पालखीनं गेलो. मग परत घोड्यावर बसून उरलेली चढण पार करुन 'पोषपत्री' ला पोहोचलो. मग परत जरा बरा रस्ता होता. परत चढाई करुन अखेर दिवसभराचा प्रवास करुन सायंकाळी आम्ही पंचतरणीला घोडेतळावर पोहोचलो. दिवसभराच्या खडतर प्रवासानं आमची अतिशय वाईट अवस्था झाली होती. मार्गात आम्ही अगदी कमी खाणंपिणं केलं होतं. त्यामुळं घोड्यावरुन उतरुन आम्हाला मिळालेल्या तंबूपर्यंत दिड दोन किमी चालणंही नकोसं झालं होतं. अखेर एकदाचं आम्ही आमच्या तंबूपर्यंत पोहोचलो. तंबूत पोचेपर्यंत साडेचार वाजले होते. 

          आम्ही पंचतरणीला पोहोचायच्या आधी साधारण ४ किमी अंतरावर असतानाच अचानक जोरदार गडगडाट सुरु झाला आणि एकदम वातावरण बदललं. पावसाळी हवा निर्माण झाली. आमचे घोडेवाले घोड्यांना पाऊस येण्याआधी पोचण्यासाठी त्या अवघड रस्त्यावरही पळवू लागले होते. त्यामुळं तंबूत पोचल्यावर सामान ठेवून आम्हीही पाऊस येण्याआधी रस्त्यापलिकडे असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन फ्रेश होऊन तंबूत परत आलो. आम्ही जेमतेम तंबूत पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस आणि गडगडाट सुरु झाला. आमच्या बरोबरचे बाकीचे अजून पंचतरणीला पोचले नव्हते. चालत आणि घोड्यावर असं करत ते रात्री साडेनऊ नंतर पावसातून कसेबसे तंबूत पोहोचले. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पाऊस सुरु झाला आणि थोड्याच वेळात लाईट गेले. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला. त्या अंधारातून बाकीचे कसेबसे तंबूत पोहोचले. पाऊस कोसळतच होता. आणि तो नुसता पाऊस नव्हता तर हलकं बर्फ पडत होतं. त्या अंधारात आणि धुवांधार पावसात आम्ही पाच जणं तंबूतच थांबलो होतो. कुठल्याही कारणासाठी बाहेर जाणं अशक्य होतं. उशिरा आलेले आमचे बाकी यात्रेकरु वाटेत लंगर मध्ये खाऊन आले होते. वाटेत बरेच लंगर असल्यानं मी फक्त पाणी आणि एक लहान बिस्कीट पुडा जवळ ठेवला होता. तंबुतून बाहेर जाणं अशक्य असल्यानं आम्हाला अखेर बिस्किटंच खाऊन रहावं लागलं. अपरात्री एकदाचे लाईट आले. पाऊस मात्र सुरुच होता. एकूण परिस्थिती थोडी काळजीची होती. दोन तंबूत आम्हा सगळ्यांची व्यवस्था होती. तंबूत झोपायला लोखंडी लहान काॅट होत्या. पण पावसानं जमीन सारी ओली होती. जवळपास पहाटे पाऊस पूर्ण थांबला. आम्हालाही भल्या पहाटेच आन्हिकं आवरुन दर्शनासाठी निघायचं होतं. स्वच्छता गृहात नंबर लावून एकदाचं सारं आवरुन पुढे निघालो.

          पंचतरणी ते संगम टाॅप हा टप्पा आम्ही साऱ्यांनीच घोड्यावरुन जाऊन पूर्ण केला. संगम टाॅपला घोडेतळावर उतरलो. इथच एका ओळखीच्या लंगरमध्ये आमच्या सॅक ठेवल्या. फक्त मोबाईल पहिल्या पायरीशी जमा करायचे म्हणून जवळ ठेवले. इथून पुढं दोन किमी. चढ चालत आणि पुढे दिड दोनशे पायऱ्या चढून गुहेत दर्शनासाठी जावं लागत. घोड्यावरुन उतरुन सगळ्यांबरोबर आम्हीही चढायला सुरुवात केली. पण अति उंचीमुळे थोडा चढ चढलं की दमायला होत होतं. अखेर आम्ही दोघं पालखी करुन वर गेलो. पायऱ्या सुरु होण्यापूर्वी परत तपासणी केली जाते. तिथून पुढे आपल्याबरोबर पैशांव्यतिरिक काहीही बरोबर नेता येत नाही. त्यामुळं तिथं मोबाईल जमा करुन, तपासणी करुन परत पालखीत बसलो. अगदी वरच्या ५०-६० पायऱ्या उरल्या असताना पालखी थांबली. मग त्या पायऱ्या चढून आम्ही गर्दीतूनच दर्शन रांगेत पोचलो. आम्ही रांगेत असतानाच बाजूनं दर्शन घेऊन परतणाऱ्या एकानं अचानक आम्हाला डाव्या बाजूच्या रांगेतच रहा,छान दर्शन होईल असं सांगितलं. रांगेतून पुढं सरकत एका क्षणी आम्ही प्रत्यक्ष शिवलिंगासमोर पोचलो आणि भान हरपून उभं  राहीलो. याचसाठी केला होता अट्टाहास या जाणिवेनं पापण्यांचे बंध झुगारून आसू ओघळलेच. शिवलिंग अंतर्धान पावायला आधीच सुरुवात झाली असल्यानं आम्हाला खूपच कमी उंचीच्या आणि पारदर्शक अशा शिवलिंगाचं दर्शन घडलं. आम्ही डाव्या बाजूच्या रांगेत होतो ती रांग अगदी समोर आणि उंचीवर सहज दर्शन घडेल अशी होती. त्यामुळं अतिशय सुंदर असं 'बाबा अमरनाथांचं' दर्शन आम्हाला घडलं. मी माझ्या समोर असलेल्या पंडितजीना विचारलं 'शिवजी इतने जल्दी अंतर्धान हो गये?'  त्यावर ते 'हां, आपको इतना तो दर्शन हुआ है' असं म्हणाले. आणि परत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी नतमस्तक झाले, नंतर पंडितजींनी तिलक लावला आणि आम्ही तिथल्या चार सहा पायऱ्या उतरुन खाली आलो. मन अगदी तृप्त तृप्त झालं होतं‌. पूर्ण स्वरुपात जेव्हा हे बर्फाचं शिवलिंग तयार होतं तेव्हा ते ८-१० फूट उंचीचं असतं. २९ जूनच्या दरम्यान हे पूर्ण स्वरुप तयार झालं होतं. मात्र नंतर पडलेल्या पावसामुळं आणि एकुणच बदलत्या हवामानामुळं यात्रेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ३ जुलैला हे शिवलिंग जेमतेम दिड फुट राहिलं होतं‌. आणि हे आम्ही पहलगामहून पहाटे निघालो तेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे ३ जुलै ला दर्शन घेऊन परतलेल्या एका भाविकानं आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही ८ जुलैला दर्शन घेईपर्यंत शिवलिंगाचा आकार अजूनच कमी झाला होता. मात्र आम्हाला एवढं तरी दर्शन घडलं. आता ते पूर्ण अंतर्धान पावलं आहे. अर्थात शिवलिंग जरी अंतर्धान झालं असलं तरी तिथलं स्थानमहात्म्य किंचितही कमी होत नाही. त्यामुळं अजूनही मोठ्या संख्येनं भाविक ही अवघड यात्रा अतिशय भक्तीभावानं आणि उत्साहानं करत आहेत.

           आम्ही दर्शन घेऊन परत संगम टाॅपला जिथं सामान ठेवलं होतं तिथं निघालो. यावेळी मात्र मार्ग उताराचा असल्यानं आम्ही सहजतेन चालत गेलो. लंगरमध्ये पोचून थोडा आराम करुन थोडासा चहा नाश्ता करुन बाकी सगळे आल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. यावेळी आम्ही तिघंच घोड्यावरुन जाणार होतो. बाकीचे चालत येणार होते. कारण आता आम्ही बालतालच्या रस्त्याने जाणार होतो. हा मार्ग चढायला अती कठिण असला तरी उतरायला तुलनेनं सोपा आहे. आम्ही घोडे ठरवले. आणि जिथे घोडे होते तिथे निघालो. तो रस्ता बघून मी तिथून जायला आधी नकारच दिला. कारण दोन डोंगरांच्या मध्ये सखल भागात ते घोडे होते. अनेक घोडे तिथंच उभे होते. आणि त्यांच्या पर्यंत पोचायला आधी एक तीव्र उतार उतरुन मग परत चढून जावं लागणार होतं. सगळ्यात वाईट म्हणजे ते सारा मार्ग म्हणजे बर्फाचं ग्लेशियर होतं. अखेर हो-नाही करत आधार घेत कसबसं ते दिव्य पार पाडून आम्ही घोड्यांजवळ पोहोचलो. आणि मग तिथून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

          बालतालचा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असाच होता त्यामुळे आमचा हा प्रवासही अतिशय खडतर असाच होता. तीव्र उतारावरही घोड्यावर तोल सावरत बसणं फार कठीणच होतं. परतीच्या प्रवासातही माझं नामस्मरण सुरुच होतं. आदल्या दिवशीच अती कठिण रस्ता पार केला असला तरी हा रस्ताही त्याहून जरा अवघड असल्यानं भिती, काळजी कमी होतच नव्हती. मधेमधे थांबत अखेर ४.३० वाजता बालताल ला घोडेतळावर पोहोचलो. तिथून दोन अडीच किमी.चालत जाऊन एकदाचं तंबूत पोहोचलो. उतरल्यावर चहा पिऊन, थोडं खाऊन मग तंबू मिळून तिथं पोचेपर्यंत तासभर गेला. एवढ्या वेळात गडगडाट सुरु झालाच. तंबूत पोचून थोडा आराम करेपर्यंत परत जोरदार पाऊस सुरु झाला. चालत येणारे सारे आजही पावसातूनच परत आले. पण इथं मात्र लाईट होते. आणि साडेनऊ च्या दरम्यान पाऊस थांबला. मग मात्र आम्ही सारे बाहेर पडलो. फ्रेश होऊन जेवून तंबूत परत आलो. इथं मात्र आम्हाला एकच तंबू मिळाला होता आणि त्या एकाच तंबूत १२ जणांना झोपणं भाग होतं. अर्थात एका रात्रीचा प्रश्न असल्यानं सारे त्यातच कसेबसे सामावलो. इथं तर जमिनीवरच गादीवर झोपायचं होतं. पावसानं गाद्या भिजू नयेत म्हणून खाली फोम घातलेला होता. पण तरीही अती पाऊस झाला तर सारं भिजायची भिती होतीच. सुदैवानं रात्री पाऊस थांबला होता तो पहाटे परत बारीक बारीक सुरु झाला होता. 

          चंदनवारी ते पंचतरणी या प्रवासाला थांबत थांबत जाऊन साधारण सात तास लागले होते. आणि दुसऱ्या दिवशी संंगम टॉप ते बालताल या प्रवासाला फारसं न थांबता साडेतीन तास लागले होते. पहलगाम मार्गावर अतिशय सुंदर नयनरम्य असं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळतं. उंच उंच पहाड, खोल दऱ्या पहाडांना बिलगून वाहणारी, अधूनमधून दिसणारी नदी सारंच नितांतसुंदर. 'शेषनाग' तलावही अगदी अप्रतिम. खरंतर संपूर्ण मार्गावर बाजूनं आणि पर्वतशिखरांवर खूप सारा बर्फ पहायला मिळतो. यावेळी मात्र असा बर्फ फारच कमी पहायला मिळाला. गुहेच्या जवळपास तेवढा जरा जास्त बर्फ दिसला. त्यामुळं फक्त गुहेजवळ एका ठिकाणीच रस्त्यावर बर्फ होता तिथं बर्फात खेळायला, छायाचित्रं काढायला मिळालं. अर्थात हा सारा वातावरण बदलाचा वाईट परिणाम आहे. रस्ता काही ठिकाणी थोडा रुंद असला तरी बराचसा रस्ता गर्दी च्या मानानं अरुंदच आहे. आणि एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. मला मात्र घोड्यावरुन गेल्यानं तोल सावरत पर्समधला मोबाईल काढत फारसं छायाचित्रण करायला जमलं नाही. 

          बालताल ला रात्रभर एकत्र एका तंबूत राहून सकाळी लवकर उठून सारं आवरुन आम्हाला निघायचं होतं. कारण आमच्या यात्रेचा पुढचा टप्पा तेव्हा म्हणजे ९ तारखेला सुरु होणार होता.

क्रमशः

-स्नेहल मोडक

      

       



    

    



    

No comments:

Post a Comment

कविता

जय बाबा बर्फानी - १

          '८ जुलै २०२५' आमच्यासाठी अजून एक विशेष दिवस. याच दिवशी आमची अजून एक इच्छा पूर्ण झाली. गतवर्षी काही कारणाने रहित करावी लागल...