
हिरवीगार वनराई आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा लाभलेले कोकण ही देवभूमीच , हेच खरंतर कोकणचं सार्थ वर्णन. कोकण म्हटलं की लगेच नजरेसमोर येतात ती कौलारु घरं , स्वच्छ सारवलेली अंगणं आणि माडपोफळीची झाडं.
याच देवभूमीचं हे वर्णन काव्यरुपात ....
वाट ही वळणावळणाची गावाकडच्या घराची
लाल कौलांची आणि चिरेबंदी भिंतीची
सुरेख सारवल्या अंगणात तुळस डोलते
पुजून तिला माय सांजेला दिवा लावते
मेरेवर फुलती शेवंती मोगरा अन जाईजुई
सुगंधाने त्यांच्या आसमंत भरून जाई
विहिरीच्या पाण्याची गोडीच असते वेगळी
आजूबाजूला वाढती केळी अन माड पोफळी
आंबा फणस रतांबे अन जांभूळ काजू
वेगवेगळी झाडे असती घराच्या आजूबाजू
तोरणं बोरं अन करवंद कोकणचा रानमेवा
कुंपणावरच्या जाळीवरुन मनमुराद खावा
शांत रात्री गाज सागराची कानी येते
काजव्यांच्या प्रकाशाने जणू रात्र सजते
वाट ही वळणावळणाची गावाकडच्या घराची
लाल कौलांची आणि चिरेबंदी भिंतीची
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment