दोन घडीचा हा डाव
तयाला आयुष्य हे नांव
प्रत्येकाच्या आयुष्याची दुलई ही थोड्याफार फरकाने पण सुखदुःखाच्या धाग्यानेच विणलेली आहे.
जसा प्रत्येक साडीचा पोत वेगळा , रंग अन काठ पदरही वेगळा अगदी तसंच आयुष्याच्या दुलईच्या दु:खाची किनारही कमी अधिक रुंद.
आपण आपल्याबरोबरच दुसऱ्यांच्या मनाचा विचार करुन जर आपली कृती केली तर मला वाटतं नक्कीच प्रत्येकाच्या दु:खाची किनार नाहिशी जरी झाली नाही तरी जरतारी नक्कीच होईल.
आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारावर जर आपल्या माणसांची साथ लाभली तर यशाचे शिखर सहजसाध्य होईलच आणि स्वप्नपूर्तीही होईल.
साधूसंतांप्रमाणे आपण जरी षडरिपू मुक्त होऊ शकत नसलो तरी आपल्या भावभावनांवर नियंत्रण नक्कीच ठेवू शकतो. आणि स्वता: बरोबरच सर्वाच्या सौख्यासाठी प्रयत्न करु शकतो.
गीत सुरेल आयुष्याचे चला गाऊया
मिळूनी सारे आयुष्यावर काही बोलूया
कूजन पक्ष्यांचे गीत झऱ्याचे ऐकूया
चिंता काळजी सारे विसरुन जाऊया
सुगंधात फुलांच्या धुंद सारे होऊया
तरुलते सम जणू एकरुप सारे होऊया
रंग सौख्याचे आयुष्यात चला भरुया
अन दुःखालाही हलकेच वाळूवर रेखूया
कधी आयुष्यात आलाच अंधार अवसेचा
ठेवूया विश्वास येईल प्रकाशही पौर्णिमेचा
यत्न षडरिपूंच्या त्यागाचा आपण करुया
आयुष्याच्या ऊनपावसात एक इंद्रधनू फुलवूया
गीत सुरेल आयुष्याचे चला गाऊया
मिळूनी सारे आयुष्यावर काही बोलूया
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment