Pages

Friday, December 25, 2020

गुलाबी थंडी ...

अहाहा काय थंडी आहे गुलाबी जणू

येताच कानी शब्द रोमांचित होते तनू



         खरंच सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी ही थंडी आणि या गारव्यातलं सृष्टी सौंदर्य. खरंतर प्रत्येक ऋतुमधलं निसर्गाचं रुप वेगळंच असतं. सदैव अनंतहस्ताने सौंदर्याची उधळण करीत असतो हा निसर्ग.  

        अशा गुलाबी थंडीमध्ये कुणाला दुलई लपेटून मस्त झोपायला आवडतं. तर माझ्यासारख्या अजून कुणाला उबदार कपड्यांत बाहेर जाऊन सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला आवडतं. अशावेळी संगतीस कुणी असेल तर जणू दुग्धशर्करा योगच.

         निगर्गाच्या सानिध्यात रममाण होताना मन नि:शब्द होतं. अन पावलांना मात्र रानवाटेवर फिरत राहावंसं वाटतं. गुलाबी थंडीचा एक वेगळा हवाहवासा अनुभव येतो.

         सहस्ररश्मीची स्वारी अवतरल्यावर मात्र हा गुलाबी गारवा आणि शुभ्र धुकं हळूहळू वितळायला लागतं. नि:शब्द मनात हलकेच शब्द फेर धरायला लागतात. आणि मग गुंफली जाते कविता.


    धुक्याची दुलई अन गुलाबी गारवा

    भासे जणू सृष्टी छेडिते सुरेल मारवा

              अवखळ मन हे फुलपंखी होते

              ऐकत मारवा धुक्यातूनी फिरते

    मखमलीवर दवबिंदू विलसती

    अलवार मग पावलांना बिलगती

               गंधाळती फुले आसमंत दरवळते

              धुंदावतो श्वास अन मन मोहरते

     सोनकिरणे ऊधळित रवी येतो

     साज सोनेरी अवनीस लाभतो

     साज सोनेरी अवनीस लाभतो


                                                             - स्नेहल मोडक




No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...