Pages

Tuesday, April 27, 2021

कधी कधी वाटतं...

                आपलं मन कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलतं तर कधी निराशेच्या डोहात शिरतं. आपली तब्येत, आजूबाजूच्या घटना, इतर परिस्थिती यानुसार आपल्या मनात भावतरंग उमटत असतात. मनसोक्त भटकावं, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हावं आणि सदैव आपल्या माणसांचा सहवास लाभावा ही प्रत्येक मनातली इच्छा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतच असतो.


कधी कधी वाटतं

  पहाटसमयी घनदाट जंगलात फिरावं

  पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकून मन प्रसन्न व्हावं


कधी कधी वाटतं

   दिवसभर शुभ्र निर्झराजवळ बसावं

   स्पर्श होता शीतजळाचा मन तृप्त व्हावं


कधी कधी वाटतं

   वेगवेगळ्या छोट्यामोठ्या गिरीशिखरांवर चढावं

   आपल्या क्षमता अन जिद्दीला आपणच जाणावं


कधी कधी वाटतं

   साऱ्या गड किल्ल्यांवर इतिहास आठवत फिरावं

   शिवराय अन मावळ्यांसमोर नतमस्तक व्हावं


कधी कधी वाटतं

   फेसाळत्या लाटा पहात सागरतीरी बसावं

   मनभावनांचे चित्र अलगद वाळूवर रेखावं


कधी कधी वाटतं

   धुवांधार बरसणाऱ्या पावसात चिंब भिजावं

   ओघळणाऱ्या थेंबांनी मन शांत शुध्द व्हावं


कधी कधी वाटतं

   नात्यांच्या अन मैत्रीच्या साऱ्यांना सहज भेटावं

   अन घट्ट गळाभेटीने विरहाचं मळभ दूर व्हावं


कधी कधी वाटतं

   कधी कधी वाटणाऱ्या या भावनांना मूर्तरुप द्यावं

   अन वेगवेगळ्या अनुभवांनी आपण समृध्द व्हावं


- स्नेहल मोडक

Friday, April 16, 2021

श्रीमंत गल्ली


              श्रीमंत आणि तीही गल्ली? हो अगदी बरोबरच आहे. श्रीमंती जशी आर्थिक असते तशीच मनाची, बुध्दीची, विचारांची, नात्यांची अशा अनेक प्रकारांची असते. आणि अगदी तशीच निसर्गाचीही असते श्रीमंती. या वनसंपदेनंच श्रीमंत समृद्ध आहे आमच्या घराजवळची एक गल्ली.

                या एका गल्लीत एवढे विविध पुष्पवृक्ष आहेत की रोज त्या गल्लीतून गेल्याशिवाय मला राहवत नाही. घराबाहेर गेलं की माझी पावलं आपोआपच त्या गल्लीत वळतात.



                गल्लीत प्रवेश केला की सात - आठ पावलांवरच आपल्या स्वागताला दुतर्फा उभे असतात दोन - दोन बकुळ वृक्ष. सदाहरित असा हा बकुळ वृक्ष घुमटाकार वाढतो. या डेरेदार वृक्षाची फुलं आणि फळं मात्र नाजूक असतात. मार्च ते मे हा बकुळीच्या बहराचा काळ. तिन्हीसांज सरताना किंवा सकाळी लवकर या बकुळीच्या चांदणफुलांची मस्त पखरण झालेली असते. आणि सुगंध दरवळत असतो. या वृक्षाचा औषधांमधे उपयोग होतो. याची साल हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. याच्या साल व फळांपासून दंतधावन बनवतात. तर सुंगधी फुलाचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी होतो.


          


                यातल्या एका बाजूच्या दोन बकुळ वृक्षांना लागूनच अजून एक सुंदर वृक्ष उभा असतो स्वागताला. खूपच कमी प्रमाणात आढळणारा असा हा वृक्ष कैलासपती किंवा नागचाफा या नावाने ओळखला जातो. हा ऊंच वाढणारा सदाहरित वृक्ष आहे. याच्या पानांचा आकारही भाल्याच्या टोकदार पात्यासारखा असतो. याच्या खोडालाच फळं फुलं येतात. १५-२० कळ्यांचे झुमके येतात. कैलासपतीची फुलं मात्र मोठी आणि चार पाकळ्यांची असतात. फुलाच्या आतला भाग म्हणजे शंकराची पिंड समजतात. आणि याचं रक्षण करण्यासाठी म्हणून बाजूला जो केसराचा भाग असतो ते म्हणजे या फुलातले श्रीकेसर. हे केसर म्हणजेच औषधांमध्ये मौल्यवान समजले गेलेले नागकेशर होय. या फुलांनाही खूप छान सुगंध असतो. ही फुलं श्री महादेवाला अतिशय प्रिय आहेत. याची फळंही आकाराने खूप मोठी असतात. यालाही मार्च ते जून या काळात बहर येतो.


                पुढे काही पावलांवरच आपल्याला सामोरे येतात दोन गुलमोहोर. गुलमोहोर साधारण एप्रिल पासून बहरायला सुरुवात होते. याच्या लालकेशरी फुलांचा बहर रणरणत्या उन्हातही डोळ्यांना सुखावतो. याच्या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर पाकळ्यांहून वेगळी असलेली एक पाकळी. ही पांढऱ्या रंगाची आणि त्यावर नाजूक लाल रेषा असलेली पाकळी असते. महाराष्ट्रातील सातारा इथे दरवर्षी एक मे रोजी गुलमोहोर दिन साजरा केला जातो. लोकांचा निसर्ग आणि पर्यावरण रक्षण, संवर्धन यातील सहभाग वाढावा म्हणून हा गुलमोहोर दिन साजरा केला जातो.


                 गुलमोहोरांच्या पुढे अगदी लगेच काही पावलांवर दिसायला लागतो बहावा. याचं त्याच्या बहराइतकंच सुंदर असं अजून एक नांव आहे अमलताश. बहाव्याचा बहर म्हणजे पिवळ्या पुष्पांची जणू लटकती झुंबरे. जितका सुंदर तितकाच औशधी असा हा वृक्ष. याच्या गराचा उपयोग काविळीवरील औषधात केला जातो. मार्च महिन्यात हा बहरायला सुरुवात होते.



                  या देखण्या बहाव्याच्या वृक्षाच्या बाजूलाच ऊभा आहे एक वेगळाच वृक्ष, पद्मक किंवा पद्मकाष्ठ ( Wild Himalayan Cherry ). याला फिकट गुलाबी रंगाची पाच पाकळ्यांची मोठ्या आकाराची फुलं येतात. खूप औषधी गुणधर्म असलेलं हे झाड. याचा उपयोग त्वचारोग, केसांच्या समस्या, पोटाच्या विकारांवर होतो. चूर्ण, तेल या स्वरुपात या वृक्षापासून आयुर्वेदिक औषधे बनविली जातात.  फिक्ट गुलाबी रंगांच्या फुलांनी बहरलेला हा वृक्षही खूप सुंदर दिसतो.


                   रस्त्याच्या एका बाजूला बहावा आणि पद्मकाचे झाड तर दुसऱ्या बाजूला आहे पांढरा चाफा. यालाच देवचाफा किंवा खुरचाफा या नावानेही ओळखतात. मार्च महिन्यातच याच्या बहराला सुरुवात होते. मात्र त्यावेळी या झाडाची संपूर्ण पानगळ झालेली असते. संपूर्ण झाड पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरलेले असते. याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांच्या मध्यभागी अगदी थोडासा पिवळा रंग असतो.


                   यानंतर लगेचच दिसतात ते सोनमोहोराचे वृक्ष. रस्त्याच्या दुतर्फा ओळीने उभे असलेले हे वृक्ष सदैव हिरवेगार असतात. आणि पिवळ्या पुष्पांनी बहरले की अधिकच सुंदर दिसतात. या झाडांच्या मध्येच आहेत अजून दोन गुलमोहोर. सोनमोहोराच्या पाच-सहा झाडांनंतर ही गल्ली मुख्य रस्त्याला मिळते.


                     इतके विविध औषधी पुष्पवृक्ष आणि या सगळ्यांच्या मधेमधे असलेली कडुनिंबाची झाडं यामुळे ही गल्ली निसर्ग समृद्ध म्हणेजच श्रीमंत आहे असंच म्हणायला हवं.

                                     - स्नेहल मोडक

Sunday, April 11, 2021

आरसा बिलोरी

              तसं पहायला गेलं तर आरसा एक साधी अचेतन निर्जीव वस्तू. पण त्याच आरशात कुणी डोकावून पाहिलं की मात्र तो आरसा अगदी सचेतनच होतो जणू.

              आपल्या सगळ्या भावभावनांचं प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसतं.

               एखाद्या आनंदाच्या क्षणी जेव्हा आपण आरशात डोकावतो तेव्हा तो आरसाही आपल्या आनंदात सामील होतो. 

               कधी काही मनाविरुद्ध अकल्पित असं काही घडतं पण सर्वांसमोर आपल्या भावनांना बांध घालावा लागतो. अशातच अनावधानाने आपण आरशासमोर आलो की मात्र पापण्यांचा बांध झुगारून दोन आसू तरी नक्कीच ओघळतात. त्यावेळी आपलं मन शांत करायचं काम हाच आरसा करतो.

                सणासुदीला, शुभकार्याला आपल्याला सारा साजशृंगार करायला आरसा लागतोच. आणि मनाजोगतं नटल्यावर आपल्याबरोबर आरसाही खुलतो.


प्रियसख्यासम साथ देतो बिलोरी आरसा

अव्यक्त मन जाणण्याचा जणू घेतलाय वसा

         कधी होते मन उदास वाटते सारे व्यर्थ

         पाहताच आरशात कळतो त्यामागचा अर्थ

कधी आसू पापणीआड लपवता येतात

आरशासमोर मात्र दोन मोती ओघळतात

           कधी मन कुणाच्या आठवणीत रमते

           पाहता आरशात जणू तेच चित्र उमटते

कधी सजते मोहक वस्त्राभुषणे घालून

निरखिते आरशात स्वत:लाच भान हरपून

             प्रिय सख्यासम साथ देतो बिलोरी आरसा

             अव्यक्त मन जाणण्याचा जणू घेतलाय वसा

 

- स्नेहल मोडक

hgv

Monday, April 5, 2021

ऋतू वसंत

                    'ऋतूनां कुसुमाकर' असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलंय. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे.

                     चैत्र-वैशाख हे दोन महिने उन्हाळा आणि वसंत ऋतू यांचे जणू समीकरणच.

                     सहस्ररश्मीच्या तेजाची दाहकता वाढत असतानाच  वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी मात्र विविध रंगांनी बहरते आणि आपल्या दृष्टीसमोर रंगमयी उधळण होते.

                     वसंत ऋतू म्हणजे जणू निसर्गाची मानवाला एक शिकवण. पर्णहिन झालेल्या तरुवेलींही काही काळानंतर पुन्हा पालवतात, रंगगंधी फुलांनी बहरतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभं राहिलं तर वादळं नक्की शमतील आणि आपल्या आयुष्यातही पुन्हा पुन्हा वसंत फुलेल.


येता कुसुमाकर होई अवनी रंगगंधी

येई सुरेख दरवळ आसमंती मधुगंधी

        वृक्ष बहाव्याचा जरी जाहला निष्पर्ण

        लटकती झुंबरे पुष्पांची जणू सुवर्ण

पर्णसंभार जरी तयाचा कमी जाहला

लालकेशरात हा गुलमोहोर बहरला

        वृक्ष ताम्हिणीचा इतकीच प्रतिमा उरे

        वसंतसमयी फुलती त्यावरी जांभळे तुरे

पानगळीतही ठाम उभा वृक्ष पलाशाचा

येई ज्वाळेसम त्यास बहर सोनकेशराचा

        शीतलछाया देत हा वृक्ष‌ असे उरला

        पिवळ्या पुष्पांनी सोनमोहोर फुलला

गाळूनी सारी पर्णे उभी काटेसावर

काटयातच येई लाल गुलाबी बहर

        शुभ्र मोगरा अन मादक सुरंगी पिवळी

        दरवळे जाईजुई अन नाजूक बकुळी

कूजिती कोकिळ मोहरल्या आम्रवनी

अन फुलतो अलवार वसंत मनोमनी

                                              - स्नेहल मोडक


      

                    


कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...