Pages

Saturday, December 25, 2021

वर्ष सरताना...

              आपल्या आयुष्यातलं हे वर्ष सरत आलय. एक जानेवारीला सध्याच्या दिनदर्शिकेच्या जागी एक नवीन दिनदर्शिका येईल. आणि पुन्हा दर महिन्याला त्या दिनदर्शिकेचं एक-एक पान उलटलं जाईल. आपलं आयुष्य ही इतकं सहजसोपं असतं का हो?

              सरत्या वर्षाबरोबरच आपलं अनुभवांचं, सुखदु:खाचं गाठोडंही मोठं होत असतं. त्यातूनच आपण नवीन वर्षाचे काही संकल्प करतो. अर्थात काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण...


अजून एक वर्ष सरत आलय

आठवणी साऱ्या ठेवून जातय

मोती खास मैत्रीचे काही विखुरले

नव मैत्रीचे बंध ते अलगद जुळले

सुटले काही दूरच्या नात्यांचे बंध

जुळले काही नवागतांशी संबंध

आले रागरुसवे झाले गैरसमज

जाणले कुणी भाव मनीचे सहज

घडल्या भेटी कुणी झाले मनमुक्त

टाळूनी भेट राहिले कुणी अव्यक्त

स्वप्नफुले काही सहजच उमलली

असूनी निगराणी काही कोमेजली

सरत्या वर्षाचा हा आलेखच असे

मनी नववर्षाचे कल्पनाचित्र वसे

चुका अन गैरसमज ते विसरुया

अन नात्यांचे भावबंध घट्ट विणूया

स्वप्नपंख लेऊनी नभी विहरुया

नववर्षाचा हाच संकल्प करुया

- स्नेहल मोडक


Monday, December 6, 2021

झिम्मा

              सहज बोलता बोलता अचानक लेक म्हणाली 'आई आपण झिम्मा बघुया'. क्षणभर ती काय म्हणतेय ते मला कळलंच नाही. मग तिने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्याची झलक असलेली चित्रफितही दाखवली आणि मलाही हा चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली. खरंतर चित्रपट आणि मालिका यांच्याशी माझं सख्य जरा कमीच. मात्र खास विषयांवर आधारित चित्रपट मी नक्की पाहते. ठरवल्यानुसार हा चित्रपट पाहिला आणि त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं.

              इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट 'झिम्मा'. यातील उत्तम कलाकार आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर असा अभिनय आणि संपूर्ण चित्रपटात असलेली नयनरम्य अशी लंडनची पार्श्वभूमी यामुळे जणू आपणही या चित्रपटाबरोबर लंडनचा प्रवास करुन येतो.

             इरावती कर्णिक यांचं , 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो' हे एक वाक्यच संपूर्ण चित्रपटाचं सार सांगून जातंं. स्वतः ला किंवा इतरांना समजून घेण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी पर्यटन हे अतिशय सुंदर माध्यम आहे. एकट्याने प्रवास करताना आपण स्वताच स्वताला नव्याने गवसतो. तर बरोबर कुणी असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाबरोबर त्या व्यक्तीला अतिशय जवळून ओळखताही येतं. कधी कधी आपणच आपल्यावर विनाकारण अनेक बंधनं घालून घेतलेली असतात. कधी काही घटनांचा खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून आपण आपलं अस्तित्वही विसरुन गेल्यासारखं जगत असतो. या साऱ्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी पर्यटन हा एक छान उपाय आहे.

               रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वताला थोडं बाहेर काढून सात स्त्रिया लंडन प्रवासाला निघतात. या साऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातल्या , वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या अशा आहेत. इंग्लंड सहलीच्या निमित्ताने या सगळ्या जणी एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट या सहलीदरम्यान घडणाऱ्या धमाल, मजामस्तीच्या चित्रांनी सजलाय अर्थात त्या सगळ्या चित्रांना प्रत्येकीच्या आयुष्यातील हळव्या घटनांची किनारही आहे.

              कुठल्याही स्त्रीला बाहेर पडताना खूप वेगवेगळ्या पातळ्या ओलांडाव्या लागतात. मुळात तिने स्वतावर जी बंधनं घालून घेतलेली असतात त्यातून मार्ग काढणं तिला जरा कठिणच होतं. पण कधीतरी तिलाच या बंधनातून मुक्त व्हावसं वाटतं आणि मग मात्र ती 'स्व' च्या शोधासाठी नक्की बाहेर पडते. आणि यासाठी पर्यटन हा एक सुंदर मार्ग आहे. अशा प्रवासातच तिला स्वतः ची नव्याने ओळख होते. सगळ्यांबरोबरच स्वताच्या मनाचाही विचार ती आवर्जून करु लागते. कधी एखाद्या घटनेचा आपण किती खोलवर विचार करत असतो, विनाकारण एखाद्या गोष्टीची अतिकाळजी करत असतो, कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या जबाबदारीत नको इतके अडकलेले असतो या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला होते. आणि त्यातून ती स्वतःच्या मनाला हळूहळू पण निश्चितपणे बाहेर काढते. अशा प्रवासात नव्या मैत्रीणी मिळवते. तर प्रवासात बरोबर एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. अशा पर्यटनाला निघताना जरी तिची द्विधा मनस्थिती असली तरी नंतर मात्र ती प्रवासातल्या अनुभवातून अतिशय उत्साहात, आनंदात आपल्या रोजच्या कामात दंग होते. 

               माझ्यासाठीही पर्यटन हा नेहमीच एक आनंदानुभव असतो. अर्थात एकटीने प्रवास करायची वेळ सहसा माझ्यावर येत नाही. कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी बरोबर असतातच. पण प्रत्येकवेळी मी माझी मलाच नव्याने उलगडत जाते. एखाद्या गोष्टीबद्दलचं अज्ञान, भिती, समज गैरसमज दूर होतात. स्वत: च्या क्षमतेची जाणीव होते.

               या प्रवासाचाच 'झिम्मा' या चित्रपटात अतिशय सहज सुंदर खेळलाय. मनमुक्त हसवणारा पण मध्येच हळवं करणारा, अगदी आवर्जून पहावा आणि आपल्यातल्या 'स्व' ला आपणही असंच जपावं याची सहज जाणीव करुन देणारा हा चित्रपट आहे.

- स्नेहल मोडक

Saturday, December 4, 2021

मनोमनी

              कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही एखादी घटना घडते किंवा कधी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि आपली मनस्थिती द्विधा होते. आजूबाजूला सारं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असतं, आपणही यांत्रिकपणे वावरत असतो पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसतं. या सगळ्यांपासून कुठतरी दूर जावं एकटं शांत बसावं असं काहीसं वाटत असतं. कुणाला त्रास होऊ नये, काही जाणवू नये म्हणून आपण सहज वावरायचा प्रयत्न करत असतो पण मन मात्र भावनांचा गोफ विणतच रहातं.


कधी वाटते एकलेच तळ्याकाठी बसावे

शांत जलाशयासम स्तब्ध नि:शब्द रहावे

        जसे पर्ण तरंगे संथ नितळ जळावरी

        उठती भावनांचे तरंग जणू मनावरी

कधी वाटते एकलेच फिरावे काजळ राती

होऊनी अंधारसावली विसरावी सारी भीती

        जावे विसरुन सारी जणू फसवी नातीगोती

        विणावा कोष हा निर्विकारतेचा मनाभोवती

कधी वाटते एकलेच पावसात भिजावे

कुणास नकळत आसवांचे पाट वहावे

        भिजूनी पाऊसधारात तनमन शांतवावे

        कल्लोळ भावनांचे हृदयातून संपवावे

कधी वाटते फिरावे घनदाट अरण्यात

हलके ओघळावे दु:ख दाटल्या पापण्यांत

        वाढली जरी किती ऊंची स्पर्श धरेचा असावा

        पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

             पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...