सहज बोलता बोलता अचानक लेक म्हणाली 'आई आपण झिम्मा बघुया'. क्षणभर ती काय म्हणतेय ते मला कळलंच नाही. मग तिने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्याची झलक असलेली चित्रफितही दाखवली आणि मलाही हा चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली. खरंतर चित्रपट आणि मालिका यांच्याशी माझं सख्य जरा कमीच. मात्र खास विषयांवर आधारित चित्रपट मी नक्की पाहते. ठरवल्यानुसार हा चित्रपट पाहिला आणि त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं.
इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट 'झिम्मा'. यातील उत्तम कलाकार आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर असा अभिनय आणि संपूर्ण चित्रपटात असलेली नयनरम्य अशी लंडनची पार्श्वभूमी यामुळे जणू आपणही या चित्रपटाबरोबर लंडनचा प्रवास करुन येतो.
इरावती कर्णिक यांचं , 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो' हे एक वाक्यच संपूर्ण चित्रपटाचं सार सांगून जातंं. स्वतः ला किंवा इतरांना समजून घेण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी पर्यटन हे अतिशय सुंदर माध्यम आहे. एकट्याने प्रवास करताना आपण स्वताच स्वताला नव्याने गवसतो. तर बरोबर कुणी असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाबरोबर त्या व्यक्तीला अतिशय जवळून ओळखताही येतं. कधी कधी आपणच आपल्यावर विनाकारण अनेक बंधनं घालून घेतलेली असतात. कधी काही घटनांचा खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून आपण आपलं अस्तित्वही विसरुन गेल्यासारखं जगत असतो. या साऱ्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी पर्यटन हा एक छान उपाय आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वताला थोडं बाहेर काढून सात स्त्रिया लंडन प्रवासाला निघतात. या साऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातल्या , वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या अशा आहेत. इंग्लंड सहलीच्या निमित्ताने या सगळ्या जणी एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट या सहलीदरम्यान घडणाऱ्या धमाल, मजामस्तीच्या चित्रांनी सजलाय अर्थात त्या सगळ्या चित्रांना प्रत्येकीच्या आयुष्यातील हळव्या घटनांची किनारही आहे.
कुठल्याही स्त्रीला बाहेर पडताना खूप वेगवेगळ्या पातळ्या ओलांडाव्या लागतात. मुळात तिने स्वतावर जी बंधनं घालून घेतलेली असतात त्यातून मार्ग काढणं तिला जरा कठिणच होतं. पण कधीतरी तिलाच या बंधनातून मुक्त व्हावसं वाटतं आणि मग मात्र ती 'स्व' च्या शोधासाठी नक्की बाहेर पडते. आणि यासाठी पर्यटन हा एक सुंदर मार्ग आहे. अशा प्रवासातच तिला स्वतः ची नव्याने ओळख होते. सगळ्यांबरोबरच स्वताच्या मनाचाही विचार ती आवर्जून करु लागते. कधी एखाद्या घटनेचा आपण किती खोलवर विचार करत असतो, विनाकारण एखाद्या गोष्टीची अतिकाळजी करत असतो, कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या जबाबदारीत नको इतके अडकलेले असतो या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला होते. आणि त्यातून ती स्वतःच्या मनाला हळूहळू पण निश्चितपणे बाहेर काढते. अशा प्रवासात नव्या मैत्रीणी मिळवते. तर प्रवासात बरोबर एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. अशा पर्यटनाला निघताना जरी तिची द्विधा मनस्थिती असली तरी नंतर मात्र ती प्रवासातल्या अनुभवातून अतिशय उत्साहात, आनंदात आपल्या रोजच्या कामात दंग होते.
माझ्यासाठीही पर्यटन हा नेहमीच एक आनंदानुभव असतो. अर्थात एकटीने प्रवास करायची वेळ सहसा माझ्यावर येत नाही. कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी बरोबर असतातच. पण प्रत्येकवेळी मी माझी मलाच नव्याने उलगडत जाते. एखाद्या गोष्टीबद्दलचं अज्ञान, भिती, समज गैरसमज दूर होतात. स्वत: च्या क्षमतेची जाणीव होते.
या प्रवासाचाच 'झिम्मा' या चित्रपटात अतिशय सहज सुंदर खेळलाय. मनमुक्त हसवणारा पण मध्येच हळवं करणारा, अगदी आवर्जून पहावा आणि आपल्यातल्या 'स्व' ला आपणही असंच जपावं याची सहज जाणीव करुन देणारा हा चित्रपट आहे.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment