प्रवासाला सुरुवात केली खरी पण सारा रस्ता धुक्यात हरवला होता जणू. सध्या रोजच आमच्या परिसरात धुकं दाटलेलं असतंच. सारी सृष्टी शुभ्र धुक्याची दाट दुलई ल्यायली होती. अप्रतिम दृश्य होतं. दाट धुक्यातून आमचा प्रवास सुरु झाला आणि त्याबरोबरच छायाचित्र आणि चित्रण करणं ही सुरु झालं. अतिशय सुंदर वातावरण आणि साथीला गाडीत सुरु असलेली जूनी सुंदर गाणी. प्रवास संपूच नये असं वाटत होतं. सहस्त्ररश्मीचं आगमन होऊन बराच वेळ झाला तरी सारी सृष्टी धुक्याची दाट दुलई लपेटूनच बसली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत असंच वातावरण होतं. नंतर मात्र हळूहळू धुकं विरळ होत गेलं आणि सृष्टीवर लख्ख उन पसरलं.
उन्हात आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य उजळून निघालं. आणि आमच्या नजरा नेहमीप्रमाणे बहरलेल्या झाडांचा शोध घेऊ लागल्या. कुठलाही ऋतू असला तरी कोकण सदैव सृष्टीसौंदर्यानं नटलेलच असतं. गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा यांना बहर यायला वेळ असला तरी एव्हाना पांगारा, पळस , गिरीपुष्प ( ग्लिरिसिडीया ) बहरायला सुरुवात झालेली असते. आणि आम्ही तेच पहात होतो. खूप ठिकाणी ही झाडं बहरलेली दिसत होती. पण रस्त्यापासून थोडी दूर असल्याने छायाचित्रं काढणं शक्य होत नव्हतं.
हे सारं पहात जात असताना अचानक एका ठिकाणी अगदी रस्त्याच्या जवळच पळसाचं बहरलेलं झाड दिसलं. लगेच गाडी थांबवून उतरुन झाडाजवळ गेले. फुलांची छायाचित्रं काढली पण उन्हामुळे मनासाखी छायाचित्रं मिळत नव्हती मग अलगद फुलांचा एक तुरा खुडून घेतला जवळून छायाचित्र घेता येण्यासाठी.
उन्हात आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य उजळून निघालं. आणि आमच्या नजरा नेहमीप्रमाणे बहरलेल्या झाडांचा शोध घेऊ लागल्या. कुठलाही ऋतू असला तरी कोकण सदैव सृष्टीसौंदर्यानं नटलेलच असतं. गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा यांना बहर यायला वेळ असला तरी एव्हाना पांगारा, पळस , गिरीपुष्प ( ग्लिरिसिडीया ) बहरायला सुरुवात झालेली असते. आणि आम्ही तेच पहात होतो. खूप ठिकाणी ही झाडं बहरलेली दिसत होती. पण रस्त्यापासून थोडी दूर असल्याने छायाचित्रं काढणं शक्य होत नव्हतं.
हे सारं पहात जात असताना अचानक एका ठिकाणी अगदी रस्त्याच्या जवळच पळसाचं बहरलेलं झाड दिसलं. लगेच गाडी थांबवून उतरुन झाडाजवळ गेले. फुलांची छायाचित्रं काढली पण उन्हामुळे मनासाखी छायाचित्रं मिळत नव्हती मग अलगद फुलांचा एक तुरा खुडून घेतला जवळून छायाचित्र घेता येण्यासाठी.
सध्या सर्वत्र हा वृक्ष बहरलेला दिसतोय. त्याची छायाचित्रं काढून आणि फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.
.
थोडं पुढे गेलो आणि इतका वेळ दूर दिसणारं बहरलेलं गिरीपुष्पचं एक झाड रस्त्याच्या अगदी जवळ दिसलं आणि आम्ही पुन्हा एकदा थांबलो. गिरीपुष्प - याला इंग्लिश मध्ये ग्लिरिसिडीया असं नांव आहे. हे उंच वाढणारं पण फारशा फांद्या नसलेलं झाड आहे. सध्या हे झाड शेताच्या बांधावर, कुंपणावर लावलं जातंय. अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे. याची पानं गळून पडल्यावर याचं उत्तम असं कंपोस्ट खत तयार होतं. यामुळे जमिनीचा कस वाढतो. याच्या बिया उंदरांनी खाल्यास त्यांचा नाश होतो. याची पानं गायीगुरं खात नाहीत म्हणून बांधाच्या कडेने याची लागवड करतात. या झाडाची जानेवारी महिन्यात पानगळ होते आणि मग फांद्यांच्या टोकांवर नाजूक गुलाबी जांभळ्या रंगाची फुलं उमलतात. या फुलांनी बहरलेलं झाडं सुंदर दिसतं. या फुलांतूनही मधमाशांना भरपूर मध मिळतो.
या फुलांचीही छायाचित्रं काढून आणि थोडी फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.
सरळ घरी न जाता थोडं फिरुन जायचं असं ठरवल्यामुळे थोडं वेगळ्या रस्त्याने जाऊन आम्ही आंजर्ल्याला पोहोचलो.
आंजर्ला - कड्यावरचा गणपती. याच्या निर्मितीबद्दलची कागदपत्रं उपलब्ध नसली तरी आख्यायिकेनुसार हे मंदिर बाराव्या शतकातील असावं. मंदिरात काळ्या पाषाणातील पाच फूट उंचीची उजव्या सोंडेची सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणातील भिंतीना गिलावा देऊन संगमरवरासारखं मंदिर केलं आहे. एकूण सोळा कळस असणाऱ्या मंदिरांचे सोळा उपकळस मंदिराच्या गर्भगृहात आहेत. सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या कळसावर अष्टविनायकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दापोली पासून वीस किमीवर असलेल्या या मंदिरापर्यंत आता गाडीने जाता येतं. पूर्वी पूल नव्हता तेव्हा नावेतून पलिकडे कड्याच्या पायथ्याशी जाऊन साधारण दोनशे पायऱ्या चढून मंदिरात जावं लागायचं. या पायथ्याशी पायऱ्यांच्या सुरुवातीला रॅंग्लर परांजपे याचं निवासस्थान होतं.
आम्ही या मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आम्हाला अतिशय छान दर्शन झालं. माघी जयंतीचा या मंदिरात मोठा उत्सव असतो. त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा तिथे कार्यक्रम सुरुच होते. साऱ्या मंदिरात फुलांची सजावट केली होती. मंदिराभोवती मंडप घातले होते. अतिशय उत्साहानं, मांगल्यानं सारा परिसर भारला होता. आम्ही गेलो तेव्हा अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीसंदर्भात कार्यक्रम सुरु होता. आम्ही दर्शन घेऊन थोडा वेळ तिथे थांबून निघालो.
मंदिराजवळच असलेल्या एका उपाहारगृहात भोजनासाठी गेलो. घरगुती गरमागरम साधंच पण चविष्ट जेवण आम्हाला मिळालं. आम्ही जेवत असतानाच अचानक तिथल्या ताईनी पुरणपोळी पानात वाढली आणि आम्हाला आश्चर्यच वाटलं. भाजी, पिठलं, भाकरी अशा जेवणात अचानक पुरणपोळी पानात आली. विचारलं तर त्या म्हणाल्या आत्ताच मंदिरातून हा प्रसाद आलाय. ऐकलं आणि आम्ही चमकलोच. नुकतंच मंदिरात झालेलं गणरायाचं सुंदर दर्शन आणि ध्यानीमनी नसताना मिळालेला हा प्रसाद गणाधिशाच्या अस्तित्वाची आणि त्याचं सदैव आमच्याबरोबर असण्याची जाणीव क्षणातच झाली. आणि पुन्हा एकदा मनोमनी नतमस्तक झाले.
भोजन करुन आम्ही निघालो ते पोहोचलो थेट मुरुडच्या समुद्र किनारी. अतिशय सुंदर , स्वच्छ आणि विस्तिर्ण असा हा समुद्र किनारा. गेल्या काही वर्षांपासून घोडागाडीची रपेट आणि विविध खेळ इथे सुरु झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होते. पण आम्ही थोडं लवकर गेलो असल्याने किनाऱ्यावर जास्त वर्दळ नव्हती.
मुरुड हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं गांव. त्यांचं नांव त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेला दिलं आहे. हिरव्या वनराईनं नटलेलं मुरुड छोटं टुमदार गाव.
समुद्राला ओहोटी असल्याने लाटांशी खेळायला मिळालं नाही मग समुद्र किनारी फिरुन, छायाचित्रं काढून, शंखशिंपले वेचून आम्ही घरी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
दुसरा दिवस गणेश जयंतीचा. अतिशय आनंदात, गडबडीत, तयारीत दिवस गेला. सायंकाळी मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आमचं हे मंदिर रस्त्यापासून थोडं आत आहे. रानातल्या पायवाटेने थोडं चालत जावं लागतं. मंदिराच्या एका बाजूला रान अन दुसऱ्या बाजूला सुपारीच्या सुरेख बागा आहेत. आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथले कार्यक्रम, सहस्त्रावर्तनं संपतच आली होती. नंतर पूजा, आरती यथासांग पूर्ण झाली. सगळे तिथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले, आम्ही तिथेच थांबलो. जवळच्या सुपारीच्या बागेत पाटाचं पाणी झुळझुळ वहात होतं. साऱ्या बागेत पाटाचं पाणी फिरवलं होतं. अशा स्वच्छ नितळ पाण्यात जायचा मोह आवरणं अशक्यच. त्यामुळे लगेचच खाली बागेत उतरुन पाण्याजवळ गेले. पावलांना पाण्याचा थंडगार स्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. किती वेळ झाला तरी त्या पाटाच्या पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं. नंतर तिथून निघालो ते कोळेश्वराच्या दर्शनाच्या ओढीनेच.
कोळथरे येथील हे कोळेश्वराचं पुरातन मंदिर. महादेवाचं मुख्य मंदिर आणि आजूबाजूला इतर छोटी मंदिरं असं याचं स्वरुप आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. कोळेश्वराचं दर्शन घेऊन निघालो ते थेट पोहोचलो तिथल्या समुद्र किनारी. कोळथरचा समुद्र किनाराही अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. इथे पर्यटक फक्त समुद्र अनुभवायला येतात. आम्ही खरंतर सुर्यास्ताच्या वेळेलाच समुद्रावर पोहोचलो होतो. पण ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्त पहाता आला नाही. मात्र आकाशात हलका केशररंग पसरला होता. त्यामुळे छान छायाचित्रं काढता आली. तिथून घरी परत आलो. रात्री नैवेद्य भोजनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून थोडं दूर असलेल्या आमच्या बागेत फिरुन आलो. मग सारं आवरुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
कोकणात गावाला घरी नेहमीच जाणं होत असतं. आजुबाजुच्या गावात फिरणंही नेहमी होत असतं. पण प्रत्येक वेळी वेगळं सृष्टी सौंदर्य पहयला, अनुभवायला मिळतं. आणि एक वेगळीच उर्जा घेऊन घरी परत येणं होतं.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment