Pages

Wednesday, April 27, 2022

कपाट

               शब्द नुसता वाचूनच डोळ्यासमोर आलं ना आपल्या घरातलं कपाट. प्रत्येक घरात एक तरी मजबूत लोखंडी कपाट ‌असतंच, हो ना? अर्थात त्याबरोबरच लाकडी कपाटंही असतातच घरात. आपल्या साऱ्या चीजवस्तू , कागदपत्रं नीट ठेवण्यासाठी गरजच असते कपाटाची. गरजेनुसार अनेक लहानमोठे कप्पे असलेली कपाटं असतात आपल्याकडे. पण आज मला एका वेगळ्याच कपाटाबद्दल बोलायचंय.

               मनाचं कपाट. हो अगदी बरोबर मनाचं कपाट. आपल्या मनातही भावभावनांचे असंख्य कप्पे असतात. कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार या सगळ्यांसाठीही वेगवेगळे कप्पे असतात आपल्या मनात. सुखद, हळव्या, हव्याहव्याशा आठवणी एका कप्प्यात तर दु:खद, नकोशा आठवणी एका कप्प्यात ठेवतो आपण. पण घरातली कपाटं जशी आपण वेळोवेळी आवरुन नीट ठेवत असतो, निरुपयोगी वस्तू काढून टाकतो अगदी तसंच मनाचं कपाटही वेळोवेळी आवरावं लागतं. त्रासदायक भावना विसराव्या लागतात. त्यासाठी आपल्या माणसांजवळ हक्कानं व्यक्त व्हावं लागतं. मनमोकळ बोलूनच आपण तणावमुक्त होत असतो.


आपल्या मनातले

अदृश्य जगातले

असंख्य कप्पे असलेले

भावभावनांनी भरलेले

एक कप्पा कुटुंबाचा

प्रेम अन काळजीचा

एक कप्पा नात्याचा

प्रेम अन आधाराचा

एक कप्पा परिचितांचा

साथ अन मदतीचा

एक कप्पा मैत्रीचा

निखळ आनंदाचा

एक कप्पा स्वतः चा

आवड अन छंदाचा

मनाचे कपाट कधी भरुन वाहते

सावरणारे कुणीतरी समोर लागते

कधी भरलेले कपाट बंद होते

आतल्याआत तडफडत राहते

होता भावनांचा असह्य भार

उद्वेगाने होतो मग देहावर वार

एका क्षणात एखादं आयुष्य संपतं

आठवणीत जगणं एवढं बाकी उरतं

असंख्य भावबंध असलेले

निरंतर मनातच जपलेले

हे कपाट नित्यनेमाने उघडायचे

व्यक्त होऊनी सहजमुक्त जगायचे

- स्नेहल मोडक

Saturday, April 9, 2022

भावतरंग

              घड्याळाचे काटे जसे निरंतर फिरत असतात अगदी तसंच आपल्या श्वासाबरोबरच आपलं मनही अखंड विचारात दंग झालेलं असतं. मन चंचल असतं असं म्हणतात ते किती खरंय ना क्षणात कुठल्या कुठे पोहोचतं आपलं मन. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा आपल्या मनालाही दोन बाजू असतात बरं का. किंवा आपल्याला दोन मनं असतात असं म्हणता येईल. एखादी गोष्ट करायची असं मनाने ठरवलं की लगेच मनाची दुसरी बाजू किंवा दुसरं मन लगेच विरोध करतं. क्षणाक्षणाला आपले विचार बदलत असतात. हवीशी वाटणारी एखादी गोष्ट दुसऱ्या क्षणी नकोशी वाटू लागते. मनाची अशी संभ्रमावस्था प्रत्येकाच्या अनुभवाला येत असते.


    जसे उमटती तरंग जळामधे

    तसे आवर्त विचारांचे मनामधे

             कधी मनास लागते काही आस

             क्षणात वाटे हा सारा असे भास

    कधी भाव  दाटती सहज मनात

    क्षणात आतुर अन कातर क्षणात

             कधी भावगीत हे मनी उमलते

             क्षणात मन हळवे अबोल होते

    कधी लागे ओढ रानीवनी फिरावे

    क्षणात वाटे परि मंदिरातच रमावे

             कधी सुरावरी सहज पैंजणे नादती

             क्षणात कानी मग टाळही वाजती

    कधी वाटते मैत्रीचा मेळ जमावा

    क्षणात वाटे परि एकांतच असावा

             आयुष्यात जरी बाग स्वप्नांची फुलते

             भावहिंदोळ्यावर मन सदैव झुलते

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...