माघ पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं पण रेल्वे आरक्षण मिळालं नव्हतं. त्यामुळे घरच्या गाडीनेच जायचं नक्की केलं आणि निवांत झालो.
पौर्णिमेला दोनच दिवस असताना अचानक उडन खटोलाच्या कार्यालयातून फोन आला , तुमचं पौर्णिमेचं उडन खटोलाचं तिकीट आहे पण त्यादिवशी दुपारी बारा वाजल्यानंतरच तुम्हाला जाता येईल. कारण त्यादिवशी अंबामातेच्या मंदिरापर्यंत कसल्याशा स्पर्धा आहेत. आम्हाला नीट काही कळलं नाही म्हणून आम्ही त्यांना, आम्हाला पुढे जायचंय असं सांगितलं. मग मात्र, तुम्हाला गुरुदत्तात्रेयांच्या दर्शनाला जायचंय तर तुम्ही सकाळी जाऊ शकता असं सांगितलं. पण काहीतरी गडबड आहे एवढंच आम्हाला कळलं.
पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. पोहोचायच्या आधी आम्ही जिथे रहाणार होतो तिथल्या कार्यालयात फोन केला. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे गोंधळात अजूनच भर पडली. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री बारा ते दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पायी चढून किंवा रोपवे ने जाणं सारंच बंद रहाणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला रात्री बारा वाजण्यापुर्वी चढायला सुरुवात करावी लागेल किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर जाता येईल.
वाटेत ३-४ ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे खूपच वाहनकोंडी झाली होती. त्यामुळे तलेटीला पोचायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे रात्री चढायला सुरुवात करणं शक्य नव्हतं. पण तिथे गेल्यावर रोपवे सकाळी बहुतेक सुरु असेल असं कळलं. आम्ही पहाटे लवकर आवरुन निघायचं ठरवलं कारण रोपवे सुरु नसेल तर चढून जावं लागणार होतं.
आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी येत असतानाच स्पर्धेची जोरदार तयारी सुरु असलेली दिसली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली सगळी टपरीवजा दुकानं हटवली होती. रस्त्याच्या दुतर्फा बांबूचं कुंपण करुन स्पर्धकांसाठी रस्ता पूर्ण मोकळा ठेवला होता. स्पर्धेकरता खूप मोठी तयारी केलेली दिसत होती. चौकशीअंती कळलं तिथं राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धा होणार होती. गिरनारच्या पायथ्यापासून अंबामातेच्या मंदिरापर्यंतच्या पाच हजार पायऱ्या कमीत कमी वेळात धावत चढून उतरायच्या असं त्या स्पर्धेच स्वरूप होतं. विजयी स्पर्धकांना मोठ्या रकमेची बक्षिसं मिळणार होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून एक हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते.
आम्ही ठरवल्याप्रमाणे पहाटे लवकर आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायला गेल्यावर पोलिसांनी अडवलं पण आम्ही रोपवे जाणार हे कळल्यावर पहिल्या पायरीचं दर्शन घेऊ दिलं. पायरीचं दर्शन घेऊन रोपवे साठी गेलो आणि लगेच आम्हाला रोपवेने वर जायला मिळालं. अंबमाता, गोरक्षनाथ यांचं दर्शन घेऊन गुरुशिखरी पोहोचलो. गुरुचरणी नतमस्तक झाले आणि अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. दर्शन घेऊन खाली उतरुन अखंड धुनीचंही दर्शन प्रसाद घेतला.
माघ पौर्णिमा ही गंगास्नानासाठी अतिशय पवित्र मानली जाते. प्रयागराजला या दिवशी गंगास्नान आणि आरतीचा मोठा सोहळा असतो. यादिवशी सर्व देवता गंगास्नान, दान करण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे. म्हणूनच यादिवशी गंगास्नानाला महत्त्व आहे. गिरनार पर्वतावरही गंगा अवतीर्ण झालेली आहे. श्री दत्तात्रेयांचं कमंडलू पडलं आणि त्याचे दोन भाग झाले. ते भाग जिथे पडले त्या एका ठिकाणी अग्नी उत्पन्न झाला आणि दुसऱ्या ठिकाणी गंगा अवतीर्ण झाली. या गंगेच्या तीर्थजल प्राशनाचा योग माघ पौर्णिमेलाच गिरनार दर्शनाच्या निमित्ताने आम्हाला आला ही भाग्याचीच गोष्ट.
खरंतर पौर्णिमा आणि गिरनार हा एक अध्यात्मिक असा अतूट बंध आहे. चंद्र हा मानवी मनाचा कारक आहे. पौर्णिमेला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे जसं सागराला उधाण येतं तसंच त्याचा आपल्या तनमनावरही दृश्य परिणाम होतो. पौर्णिमेच्या दिवशी वातावरण अतिशय सकारात्मक उर्जेनं भारलेलं असतं. म्हणूनच पौर्णिमेला पूजापाठ, होमहवन, ध्यानधारणा, सामुहिक साधना करण्याची प्रथा आहे. या सर्वांचा खूप चांगला परिणाम या दिवशी होतोच आणि आपलं मनही शांत आणि खंबीर होतं. आयुष्यातले चढ उतार स्वीकारणं सोपं होतं. अखेर आपलं मनच आपल्या जीवनरथाचा सारथी असतं. आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात.
गिरनार दर्शन करुन आम्ही रोपवेने परत यायला निघालो. मात्र रोपवेचा वेग थोडा कमी होता त्याचं कारण म्हणजे वाढलेला वारा. सकाळपेक्षा वाऱ्याचा वेग वाढलेला सहज कळत होता. गिरनार पर्वतावरचं वातावरण हे सततच बदलत असतं. वारा वाढलेला बघूनच मनात विचार आला होता की रोपवे बंद होणार नाही ना. पण त्यादिवशी रोपवे कमी वेगाने का होईना सुरु होता. मात्र दुसऱ्या दिवशी वाढलेल्या वाऱ्यामुळे रोपवे बंद ठेवावा लागला होता. आम्ही गेलो तेव्हा मॅरेथॉन स्पर्धा असूनही कुठलीही अडचण न येता, कुठेही थांबावं न लागता आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं ही दत्तगुरुंचीच कृपा.
मुक्कामाच्या ठिकाणी परत येऊन आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला लागलो. खोली पहाटे दर्शनाला जातानाच रिकामी करुन सामान गाडीत ठेवलं होतं. कारण त्यादिवशी सकाळनंतर खोली उपलब्ध होणार नव्हती. तसंच आम्हालाही दुसऱ्या दिवशी पावागडला महाकालीमातेच्या दर्शनाला जायचं होतं. जुनागढ पासून पावागड ४०० किलोमीटर पेक्षा थोड्या जास्त अंतरावर आहे. आणि वडोदरा पासून ५० किमी. अंतरावर आहे. त्यामुळे वेळेनुसार वडोदरा किंवा पावागडच्या पायथ्याशी कुठेतरी मुक्काम करायचा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे पावागडच्या थोडं जवळच आम्हाला रहाण्यासाठी खोल्या मिळाल्या.
गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील हलोल तालुक्यातील हा पावागड म्हणजे एक शक्तीपीठ. याच्या पायथ्याशी चंपानेर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पावागडचा उल्लेख जुन्या शिलालेखात पावकगड असा आढळतो. याचा पहिला उल्लेख बाराव्या शतकात आढळतो. हनुमंत द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्याचा एक भाग इथे पडला तो हा गड अशी स्थानिक संकल्पना आहे. पावागडची अजून एक आख्यायिका सांगितली जाते. अतिशय दुर्गम असा हा गड चढणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. चारही बाजूंनी खोल दऱ्या असलेल्या या गडावर अतिवेगवान वारे वहात असल्याने याला पावागड असं नांव पडलं.
प्रजापती दक्षाच्या यज्ञप्रसंगी झालेला भगवान शिवांचा अपमान शिवपत्नी सतीदेवी ला सहन झाला नाही. त्या अपमानाने योगबलाने सतीने प्राणत्याग केला. भगवान शिव सतीच्या आत्मसमर्पणाने क्रोधित होऊन तिचं कलेवर घेऊन ब्रम्हांडात सैरावैरा पळू लागले. त्यावेळी सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. तेव्हा तिचे अवयव , आभुषणं जिथं जिथं पडली तिथं तिथं शक्तीपीठं निर्माण झाली. पावागडावर सतीचं वक्षस्थल पडलं आणि तिथे शक्तीपीठ निर्माण झालं. मातेचं वक्षस्थल पडलं असल्याने हे शक्तीपीठ अतिशय पवित्र आणि पुजनीय आहे. पावागडावर वैशिष्ट्यपूर्ण अशी दक्षिणमुखी कालीमातेची मूर्ती आहे. त्यामुळे या देवीची तांत्रिक पूजा केली जाते. हे मंदिर दहाव्या आणि अकराव्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आलं आहे. इथं महर्षी विश्वामित्र यांनी कालीमातेची घोर तपश्चर्या केली होती. या मंदिरातील कालीमातेची स्थापना ही विश्वामित्र ऋषींनीच केली असल्याचं मानतात.
या मंदिरात दर्शनासाठी पायथ्यापासून १८०० पायऱ्या चढून जावं लागत असे. खूपच अवघड असा हा मार्ग होता. पायऱ्याही काही ठिकाणी खड्या, अरुंद, उंच असल्यामुळे वयोवृद्ध भाविकांना दर्शनासाठी जणं अशक्य होतं. मात्र सर्वांना गडावर जाऊन मातेचं दर्शन घेता यावं म्हणून १९८६ सालापासून इथे रोपवेची व्यवस्था करण्यात आली आहे. माछी गावातून हा रोपवे सुरु होतो. रोपवेने गडावर गेल्यावर २५० पायऱ्या चढून मंदिरात पोहोचता येतं. तसंच आता पूर्वीच्या पायऱ्यांऐवजी नवीन पायऱ्या बांधल्या आहेत. त्या अगदी कमी उंचीच्या आणि चढायला सोपं जाईल अशा बांधल्या आहेत. पण त्यामुळे १८०० ऐवजी ३०००पायऱ्या चढाव्या लागतात.
आम्ही पहाटेच दर्शनासाठी निघालो. या रोपवेचंही तिकीट आधीचं काढलं होतं. परंतु भाविकांची संख्या थोडी वाढेपर्यंत रोपवेसाठी थांबावं लागलं. मात्र रोपवे सुरु झाल्यावर पहिल्याच ट्राॅलीने आम्ही गडावर पोहोचलो. पुढे २५० पायऱ्या चढून मुख्य मंदिरात पोहोचलो. महाकाली मातेचं सुंदर दर्शन घडलं आणि मन तृप्त झालं. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाने नटलेलं हे मंदिर प्रशस्त आहे. आजूबाजूचा परिसरही मोठा आहे. या भागातील हे अतिशय जागृत देवस्थान मानलं जातं. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला इथे मोठी यात्रा भरते. गडावर तीन मोठे तलाव आहेत. तसंच विश्वामित्री नदीचा उगमही या डोंगरातूनच होतो. हे सारं पाहून, मातेची मूर्ती डोळ्यात साठवून आम्ही परत निघालो.
चंपानेर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथल्या काही वास्तूंना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानं म्हणून घोषित केलंय. मंदिरातून परत आल्यावर आम्ही हे सारं पहायचं ठरवलं होतं. आम्ही जिथे मुक्काम केला होता ते ठिकाणही किल्ल्याच्या अंतर्भागातच होतं. किल्लयात आता फक्त दोन ऐतिहासिक मशीदी आणि इतर लोकवस्ती आहे. किल्ल्यात बाकी पहाण्यासारखं काही नाही. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि तटबंदी मात्र अजूनही सुस्थितीत आहे. हे सगळं बघून आम्ही परत निघालो.
आमचा प्रवास सुरु असताना सायंकाळ झाली. केशररंगाची उधळण करत रवीराज अस्ताचलास निघाले. आणि चालत्या गाडीतूनच मी त्या मावळत्या दिनकराची छायाचित्रं घेण्यात दंग झाले. एका क्षणी तो केशरगोल डोंगराआड गेला आणि दूरवर दिसणारी ती सावळी पर्वतरांग केशरकडेनी चमकू लागली. पुढच्या काही मिनिटांतच रवी पूर्ण अस्ताला गेला आणि सावळी पर्वतरांग गडद झाली. अचानक मनात विचार आला माझे दत्तगुरु गिरनारीच राहिले. त्याच क्षणी दुसरा विचार आला सारं चराचर व्यापून दशांगुळे उरलेत ते माझे दत्तगुरु. हे मात्र योग्यच. कारण क्षणोक्षणी ते आपल्या बरोबरच असतात. आपण साद घालायचा अवकाश, क्षणात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. गाडीत त्यावेळी दोघांची चर्चा सुरु होती, आज श्रीगुरुप्रतिपदा. या तिथीला श्री नृसिंह सरस्वती निजानंदास गेले. गाणगापूरला यादिवशी मोठा सोहळा असतो. पण माझ्या मनात विचार आला की त्यादिवशी ते गुप्त झाले तरी अजूनही आपल्या बरोबरच आहेत. आणि म्हणूनच श्री दत्तात्रेयांना स्मर्तृगामी म्हटलं जातं. बहुधा हिच जाणीव त्यांनी मला करुन देऊन आश्वस्त केलं.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
- स्नेहल मोडक








No comments:
Post a Comment