तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरुन कटराहून आम्ही स्थलदर्शनासाठी धरमशाला इथे निघालो. मार्गात असणारी मंदिरं आणि इतर ठिकाणं पहात धरमशाला ला पोहोचायचं ठरवलं होतं.
त्यानुसार आम्ही एका मंदिरात दर्शनासाठी थांबलो. देवीमातेच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक नाभा माता मंदिर. अतिशय वेगळं आणि सुंदर असं हे मंदिर मिलीटरीच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे अतिशय स्वच्छ, सुरक्षित आणि कमी गर्दी असणारं हे मंदिर आहे. प्राचीन काळी राजा दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ केला होता. त्यावेळी त्याने आपली कन्या सती आणि जावई भगवान श्री शंकर महादेव यांना आमंत्रित केलं नाही. तरीही सती यज्ञस्थानी गेली असता राजा दक्षाने श्री शंकर महादेवांचा उचित सन्मान न केल्याने अपमानित होऊन सतीने त्याच यज्ञात उडी घेतली. महादेवानी क्रोधित होऊन सतीचा जळता देह उचलला आणि ते सैरावैरा पळू लागले. श्री विष्णूनी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी सुदर्शनचक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. हे अवयव जिथं जिथं पडले ती सारी स्थानं मातेची शक्तीपीठं म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी मातेची नाभी पडल्याने या स्थानाला नाभा माता मंदिर ओळखलं जातं. हे मंदिर गुहेत असून इथे १२ ही महिने अखंड जलधारा स्त्रवत असतात. हे जलप्राशन केल्यास अनेक व्याधी दूर होतात अशी मान्यता आहे. इथे मातेच्या दर्शनाआधी शेषनागाचं स्थान आहे. हे दर्शन घेऊन मग चार पायऱ्या चढून वर मातेचं दर्शन घेतात. इथे वारंवार प्रत्यक्ष नागराजाचं दर्शन होतच असतं. इथे पडणाऱ्या जलधारेचं जल शेषनाग, शिवपिंडी आणि नाभा माता यांना चढवलं जातं. आम्हीही दर्शन घेऊन जल चढवून बाहेर आलो. हे जल आपल्याला तीर्थ स्वरूपात बरोबर नेता येतं. आम्हीही ते जल तिथेच विकत मिळणाऱ्या कॅनमध्ये भरुन घेतलं. तिथे कर्तव्य बजावत असेलल्या सैनिकांशी थोडा संवाद साधला आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. आमच्या गाडीच्या पूर्वपरिचित ड्रायव्हरने आम्हाला या मंदिराची माहिती दिली आणि त्यामुळेच आम्हाला हे नाभा मातेच दर्शन घडलं होतं.
आमच्या मार्गातलं दुसरं ठिकाण होतं ते म्हणजे अटल सेतु. पठाणकोट जवळ रावी नदीवर बांधण्यात आलेला ५९२ मीटर लांबीचा हा पुल आहे. हा पुल बशोली (कठुआ) ते दुनेरा (पठाणकोट) या मार्गावर आहे. या पुलामुळे पंजाब, जम्म-कश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य जोडली गेली आहेत. २४ डिसेंबर २०१५ रोजी माजी संरक्षणमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलाय. केबल स्टेड पध्दतीचा हा पुल पहाण्यासाठी आम्ही गाडी थांबवली आणि पायी चालत पुलावरून फिरुन छायाचित्रं काढली आणि मग पुलावरूनच पलीकडे पठाणकोटवरुन पुढे निघालो.
इथून पुढे जाईपर्यंत सूर्यास्ताची वेळ होत आली होती म्हणून आम्ही आधी गेलो ते नड्डी सनसेट पाॅईंटला. आम्ही पोहोचलो आणि पुढच्या १५-२० मिनिटांतच सुंदर असा सूर्यास्त पहायला मिळाला. नड्डी पाॅईंटला जाण्याआधी जवळच दल लेक आहे. साधारण आयताकृती आकाराचा हा सुंदरसा तलाव आहे. सूर्यास्ताची वेळ होत आल्याने तलाव गाडीतून बघितला आणि पुढे नड्डी पाॅईंटला गेलो.
हे सगळं पहात, थांबत, फिरत गेल्यामुळे धरमशाला ला पोहोचेपर्यंत तिन्हीसांज होऊन गेली. मग मात्र मुक्कामाच्या ठिकाणीच गेलो.
चौथ्या दिवशीही सकाळी लवकरच आवरुन आम्ही फिरायला बाहेर पडलो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळचंच स्थलदर्शन करायचं असल्याने चालत निघालो.
जेमतेम ५-७ मिनीटात आम्ही पोहोचलो ते भागसूनाग मंदिरात. हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. याची एक कथा सांगितली जाते ती अशी - द्वापारयुगात मध्य काळात असुरांचा राजा भागसू याची अजमेर ही राजधानी होती. एकदा राज्यात प्रचंड दुष्काळ पडला. पिण्यासाठीही पाणी मिळेनासं झालं तेव्हा प्रजेनं राजाला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही हे गांव सोडून इतरत्र निघून जाऊ असं सांगितलं. राजानं त्याना पाण्याची व्यवस्था करतो असं सांगून तो पाण्याच्या शोधात निघाला असता इथल्या नागदेवांच्या प्रदेशात पोहोचला. या भागसूनाग पासून साधारण १८,००० फूट उंचावर धौलाधार पर्वत शिखरावर एक सरोवर त्या राजाला दिसलं. त्या 'नागडल' नावाच्या एकांत सरोवराचं जल मायावी भागसूने आपल्या कमंडलूमध्ये भरलं आणि तो परत निघाला. चालता चालता अंधार झाला म्हणून या स्थानी तो विश्रांतीसाठी थांबला. इकडे आपलं सरोवर कोरडं पडल्याचं नागांच्या ध्यानी आलं आणि ते शोध घेत भागसूजवळ आले. याठिकाणी नाग आणि भागसू यांच्यात तुबळ युद्ध झालं. त्यात कमंडलु मधील जल खाली पडलं आणि तेव्हापासून या ठिकाणी निरंतर जलधारा वहात आहेत. नागानी भागसूला पराजित केलं. नागही शिवभक्तच आहेत हे भागसूच्या ध्यानात आलं. त्याने पराजय स्वीकारुन शिवाला प्रार्थना केली की माझा मृत्यू निश्चित आहे पण मी हे माझ्या प्रजेसाठी केलंय तेव्हा शिव शांत झाले. भागसूने हे जल प्रजेपर्यंत पोहोचून त्यांचं रक्षण व्हावं आणि शिवाच्या हातून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करुन आपलं आयुष्य संपवलं. मग नागराजांनी जलवर्षा करुन प्रजेचं रक्षण केलं आणि आपल्या नावाआधी भागसूचं नावं जोडून त्याला अमरत्व प्रदान केलं. अशा या सुंदर प्रशस्त मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. जलधारेजवळच असलेल्या शिवपिंडीवर जल चढवलं.
मंदिर दर्शन करुन आम्ही तिथून पुढे असलेला धबधबा पहायला गेलो. पण धबधब्याला पाणी कमी असल्याने फार पुढे न जाता परत निघालो. या संपूर्ण मार्गात अनेक दुकानं आहेत. तिथे थांबून खरेदी केली. खूप सारी खरेदी करुन पुढचं ठिकाण पहाण्यासाठी निघालो.
आम्ही चालतच पोहोचलो ते मॅक्लोडगंजला. मॅक्लोडगंज हे धरमशालेचं उपनगर. तिबेटी लोकांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे याला 'लिटिल ल्हासा' म्हणूनही ओळखलं जातं. धरमशालेपासून ९ किमी अंतरावर हे नगर वसलंय. या गावात बौद्ध धर्मातील काही महत्त्वाचे मठ आहेत. नामग्याल, त्सुग्लागखांग हे त्यातलेच मठ. दलाई लामा जेव्हा भारतात आले तेव्हा वास्तव्यासाठी त्यांनी धरमशालेची निवड केली आणि तेव्हापासून हिमालयाच्या धौलाधार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचा संपूर्ण कायापालट झाला. या गावाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. या दलाई लामांचा मठही मॅक्लोडगंज मध्येच आहे. अतिशय प्रशस्त, देखणा आणि एकदम शांत असा हा मठ आम्ही पहायला गेलो. मठात सर्वत्र असते तशीच गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. दलाई लामांचं वास्तव्य त्याच मठात होतं. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पहाणं, भेटणं अशक्यच होतं. तिथून निघून परत मार्केटमध्ये गेलो. मॅक्लोडगंजचं मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तिबेटियन हस्तकलेच्या वस्तू तसंच कपडे आणि इतर वस्तू मिळतात. तसंच तिबेटियन लोकांच्या खानावळीही इथं आहेत. त्यात मोमोज, ठुक्का असे पदार्थ विशेषकरून मिळतात.
हे सारं फिरुन पाहून आम्ही गाडीने पुढे निघालो आणि पोहोचलो ते चहाच्या मळ्यात. अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेला हा चहाचा मळा खूप मोठ्या परिसरात पसरला होता. चहाची झुडुपं साधारण तीन फुटांवर वाढली की वरच्या पानांची तोडणी केली जाते. मग ही पानं वाळवून त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करुन त्या पानांची पावडर तयार केली जाते. साधारण १०० किलो चहाच्या पानांपासून २० किलो पावडर तयार होते. मग टेस्टर या चहाचा दर्जा ठरवतात. चहाची चव , रंग, वास यावर चहाची प्रत ठरते. आणि किंमत ठरवण्यासाठी चहाचा लिलाव केला जातो. जगभरात एकूण १३ ठिकाणी ही लिलाव केंद्र आहेत. या झुडुपावर पांढऱ्या रंगाची आणि पिवळे केसर असलेली नाजूक छोटी फुलं येतात. आम्ही जो मळा बघायला गेलो होतो त्यातील अर्ध्या भागातील पानांची तोडणी झाली होती. पण फक्त वरच्या भागातीलच पानं तोडली जात असल्याने एकूण मळा अतिशय हिरवागारच दिसतो. मळ्यात थोडं फिरुन समोरच असलेल्या त्यांच्या चहाच्या दुकानात गेलो. त्या फॅक्टरी आउटलेट मध्ये त्यांच्याकडे तयार होणारे चहाचे सर्व प्रकार विक्रीसाठी उपलब्ध होते. तिथे खरेदी करुन आम्ही पुढे निघालो.
आमचं पुढचं ठिकाण होतं हिमाचल प्रदेशचं राज्य युद्ध स्मारक. १९४७, १९६२, १९६५ आणि १९७१ साली झालेल्या युध्दात ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या साऱ्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक बांधण्यात आलंय. इथे प्रत्येक सैनिकाचं नांव आणि त्याची बटालियन कोरण्यात आलंय. तसंच काही तोफा, विमान, लहान रणगाडे, विक्रांत ची प्रतिकृती इ. ठेवण्यात आलंय. हे सारं पाहून आम्ही परत मुक्कामी पोहोचलो. पाचव्या दिवशी सकाळी आरामात आवरुन धरमशालेचा मुक्काम संपवून आम्ही जम्मूला परत निघालो. दुपारीच जम्मूला मुक्कामी पोहोचलो.
थोडा आराम करुन सायंकाळी बाहु किल्ल्यामधील महाकाली मातेच्या दर्शनासाठी जायचं ठरवलं. त्यादिवशी सप्तमी असल्याने मंदिरात दर्शनासाठी खूपच गर्दी असेल अशी माहिती आम्हाला मिळाली होती. पण तरीही आम्ही जायचं ठरवलं खूपच मोठी रांग असेल तर कळसाचं दर्शन घेऊन परत यायचं असं ठरवून निघालोच. मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर प्रचंड गर्दी जाणवली नाही. मग पुढे जाऊन दर्शनासाठी रांगेत उभं राहिलोच. महाकाली माता ही इथे बावे वाली माता या नावानंही ओळखली जाते. हे वैष्णोदेवीच्या नंतरचं दुसरं तीर्थ स्थल मानलं जातं. त्यामुळे इथे भाविकांची सतत अतिशय गर्दी असते. महाराजा गुलाब सिंह यांनी १८२२ साली या मंदिराची निर्मिती केली. पौराणिक कथेनुसार याआधी ३०० वर्षांपूर्वी महाकाली देवीने पंडित जगत राम शर्मा यांना स्वप्न दर्शन दिलं आणि आपण या पर्वतावर शीळेच्या रुपात उपस्थित असल्याचं सांगितलं. त्यानंतर काही काळातच अशी शीळा सापडली आणि याठिकाणीच हे मंदिर महाराजा गुलाब सिंह यांनी बांधलं. मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेली महाकाली मातेची मूर्ती आहे. दर रविवारी आणि मंगळवारी देवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रातही खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. खूप मोठ्या संख्येने यावेळी भाविक उपस्थित असतात. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा तिळमात्रही अंदाज नसताना आम्ही रांगेत उभं राहिलो होतो. मात्र देवीच्या कृपेने अगदी अर्ध्या तासातच आम्हाला मातेचं सुंदर दर्शन घडलं, प्रसादही मिळाला. मनाला अतिशय समाधान लाभलं. दर्शन घेऊन आम्ही बाजूच्या दुसऱ्या मंदिरात गेलो. इथे गर्दी कमी असल्याने दर्शन, प्रसाद घेऊन मातेसमोरच जरावेळ बसलो. मी मनोमन श्रीसुक्त म्हणत डोळे मिटले आणि एका क्षणी माझ्या डोळ्यांसमोर साक्षात महालक्ष्मी उभी राहिली. लाल रंगाची नऊवारी साडी, सुवर्णाची आभुषणं ल्यायलेली देवी महालक्ष्मी मला मिटल्या नेत्री दिसत होती. मी नमस्कार केला आणि जाणवलं देवीचं निर्गुण रुप माझ्यासमोर सगुण साकार झालं होतं. दिवसभर मनात असलेली रुखरुख क्षणात नाहीशी झाली. आणि डोळ्यात आसू तरळलेच. त्यादिवशी सप्तमी होती. सायंकाळी महालक्ष्मी उभी रहाणार होती आणि आम्ही त्यावेळी जम्मू ला असल्याने आम्हाला महालक्ष्मीचं प्रत्यक्ष दर्शन होणार नव्हतं. हिच रुखरुख दिवसभर मनात होती. पण माझी दर्शनाची इच्छा देवी महालक्ष्मीने अतिशय वेगळ्या रितीने का होईना पूर्ण केली होती. मन अगदी प्रसन्न झालं. दर्शन घेऊन आम्ही रुमवर परत आलो.
सहाव्या दिवशीही सकाळी लवकर आवरुन परत रघुनाथ मंदिरात जायचं ठरवलं. आम्ही रघुनाथ मंदिराच्या अगदी जवळच राहिलो होतो. त्यामुळे सकाळी लवकर दर्शनासाठी गेलो. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. अतिशय सुंदर दर्शन घडलं. श्री रामरायाचं दर्शन घेऊन बाजूच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि आरती सुरु झाली. मुख्य मंदिरात आरती सुरु करुन भोवतीच्या सगळ्या मंदिरात ती आरती फिरवतात. झांज आणि घंटेच्या नादात ती आरती पहाण्याचा अनुभव सुंदरच असतो. आरती संपेपर्यंत आमचंही बऱ्याच मंदिरात दर्शन घेऊन झालं होतं. या मंदिरांमध्येच देवीचंही मंदिर आहे. यात देवीची नऊ रुपं साकारली आहेत. त्यादिवशी अष्टमी होती. आणि आम्हाला देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. आरती संपली आणि पंडीतजीनी आम्हाला आरती घ्यायला बोलावलं. आरती घेऊन आम्ही परत मंदिरात दर्शनासाठी गेलो. परत एकदा डोळे आणि मन भरुन श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि पंडितजीनी गरमागरम कढाईप्रसाद हातावर ठेवला. आरतीच्या वेळेस नुकताच नैवेद्य दाखवून झाला होता आणि आम्हाला लगेचच तो प्रसाद मिळाला हा योग आमच्यासाठी खूपच खास होता. अष्टमीच्या दिवशीच सकाळी खूप सुंदर दर्शन घडल्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं होतं. मंदिरातून परत फिरावसंच वाटत नव्हतं. पण परतीच्या प्रवासाची वेळ होत आली होती. त्यामुळे इथेही पून्हा दर्शनाचा योग यावा अशी मनोमन प्रार्थना करुन रुमवर परत आलो.
माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी वर्षभरात केव्हाही गेलं तरी मन अगदी तृप्त होतंच पण नवरात्रीत घेतलेल्या दर्शनाने मनाबरोबरच आपले नेत्रही तृप्त होतात. कारण नवरात्रीत वैष्णोदेवीच्या दर्शनमार्गावर केली जाणारी अतिभव्य आणि अप्रतिम अशी पुष्पसजावट इतरत्र कुठे केली जात नाही.
यात्रा पूर्ण करुन सगळं आवरून सामान घेऊन जम्मू विमानतळावर पोहोचलो. तिथून विमानाने सायंकाळी घरी पोहोचलो.
- स्नेहल मोडक








No comments:
Post a Comment