आंतरजालाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी अनेक सुविचार, उतारे, छान छान वाक्यं वाचायला मिळतात. त्यातले बरेचसे विचार आपल्याही अनुभवांशी निगडित असतात त्यामुळे आपल्याला ते फारच भावतात. असे विचार, वाक्य वाचताना क्षणभर का होईना आपल्याही काळजात कळ येतेच. असंच नुकतंच एक वाक्य माझ्या वाचनात आलं, 'नात्यालाही expiry असते'. वाचलं आणि तत्क्षणी असह्य अशा मनोवेदनेनं मन कळवळलं.
नाती आपल्याला जन्माने मिळतात. फक्त एकच नातं आपल्या वाढत्या वयाबरोबर आणि आपल्या स्वभावानुसार मिळतं ते म्हणजे मैत्रीचं. मिळतं अंहं जुळतं. कधी सारख्या स्वभावाच्या दोन व्यक्तींचं मैत्र जुळतं तर कधी विरुद्ध स्वभाव असूनही मैत्र जुळतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मैत्रीचं, नात्याचं रुपही बदलतं. काही नाती, मैत्री अतिशय कठीण परिस्थितीतही बरोबरीने खंबीर साथ देतात आणि त्या कठीण काळातून आपण सुखरुप बाहेर येतो. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अशी काही नाती, मैत्री टिकून असतात. उत्तरोत्तर अशी नाती दृढ होत जातात.
कधी नात्यातील किंवा घट्ट मैत्री असलेलं कुणी शिक्षणाच्या, व्यवसायाच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात, परदेशात स्थायिक होतात. सुरुवातीच्या काळात सतत संपर्कात असतात. मग वाढत्या जबाबदाऱ्या, वेळेचा अभाव यामुळे हळूहळू संपर्क कमी होत जातो. कालांतराने अशा नात्यातील संबंध अगदी कारणापुरतेच उरतात. मात्र मनात कुठलीही कटूता, किल्मिष नसल्यानं क्वचित काही निमित्तानं भेट झाली तर अगदी पूर्वीच्याच हक्काने, प्रेमाने भेटतात.
कधी कधी मात्र क्वचित परिस्थितीवश पण बहुतेक वेळा हेतूपुरस्सर व्यक्तीचं वागणं, बोलणं बदलतं. समोरच्या व्यक्तीला टाळलं जातं, दुर्लक्ष केलं जातं किंवा गृहित धरलं जातं. अशावेळी त्यांना समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचारही करावासा वाटत नाही. साहजिकच समोरची व्यक्ती किंचित का होईना दुखावतेच. आणि वारंवार जेव्हा असंच काहीसं घडू लागतं तेव्हा आपल्याला नात्यातून, मैत्रीतून वगळलं जातंय, अंतर निर्माण होतय याची जाणीव समोरच्या व्यक्तीला होते. मग मात्र नातं संपुष्टात यायला सुरुवात होते. आणि अशाच एखाद्या प्रसंगानंतर ते नातं कायमचं संपतं. खरंतर खूप वेदना होतात मनाला पण वारंवार आपल्याला बाजूला सारलं जातंय, गृहित धरलं जातंय याची जाणीव प्रत्येक प्रसंगात सोसण्यापेक्षा नातं संपवण्याचा निर्णय घेतला जातो. अशावेळी हे नातं, मैत्री सावरण्यासाठी त्या व्यक्तीकडून प्रयत्नही केला जात नाही. अशावेळी मनोमन भुमिकांची अदलाबदल करुन समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेता येऊ शकतात. पण असा विचारही केला जात नाही. आणि चुकून असं झालं तरी पुन्हा हे नातं पूर्वीसारखं सांधणं शक्यच नसतं. कारण आपली ही माणसं हक्काची, प्रेमाची माणसं आहेत हा आपला विश्वास किती अयोग्य होता या जाणीवेनं समोरच्या व्यक्तीचं मन कायमचं दुखावतं. आणि मग पुन्हा कुणावर विश्वास ठेवायची हिंमतही होत नाही. खरंतर घटना कधी कधी लहानशा असतात, क्वचित कधी महत्त्वाच्या, मोठ्या असतात. जिव्हेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिव्हेमुळे झालेली जखम मात्र कधीच बरी होत नाही. अगदी काळाचं औषधही त्यावर उपयुक्त ठरत नाही. फक्त काही काळानंतर अशी व्यक्ती त्या जखमांसहित जगायला शिकते. आणि म्हणूनच जेव्हा हे नेहमी घडू लागतं तेव्हा अगदी स्थितप्रज्ञ व्यक्तीचंही मनोबल उरत नाही. आणि मग अशा नात्याला पूर्णविरामच मिळतो.
हे वाचताना तुमच्याही मनात काही घटना, व्यक्तींनी फेर धरला असेल, हो नं? सगळीच नाती, मैत्री जन्मभर साथ देत नाहीत हेच सत्य आहे. औषधं, खाद्यपदार्थ आणि इतर काही वस्तू यांना अंतिम मुदत असते, पण नात्याला अंतिम मुदत? मात्र दुर्दैवानं 'नात्यालाही expiry असते' हे अगदी शब्दशः खरंय.
मैत्री शैशवातली
निरागस असणारी
मैत्री कुमारवयीन
कट्टीबट्टी करणारी
मैत्री यौवनातली
जीवाला जीव देणारी
मैत्री वार्धक्यातली
जीवापाड जपणारी
मैत्री आयुष्यभराची
स्वप्नातच लाभणारी
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment