उत्तराखंड मधील चारधाम यात्रेचा योग जून महिन्यात आला. आणि केदारनाथच्या दर्शनानंतर आम्हाला आस लागली ती पशुपतीनाथ च्या दर्शनाची. पण पाऊस, दसरा, दीपावली अशा कारणांमुळे लगेच हा योग येणारच नव्हता. पण नवीन वर्ष सुरु होऊन जानेवारी संपला आणि मग मात्र मला पशुपतीनाथ च्या दर्शनाचे वेध लागले.
चारधाम ला आमच्या बरोबर असलेल्या बाकी कुणालाही यायला जमणार नसल्याने आम्ही दोघांनीच जायचं ठरवलं. काही यात्रा कंपन्यांकडून माहिती घेऊन एका यात्रा कंपनी बरोबर जायचं नक्की केलं. त्यानुसार विमाचाचं जायचं यायचं तिकीट काढलं आणि तयारीला लागलो. कारण हे सगळं ऐनवेळी ठरवल्यामुळे तयारीला फारच कमी वेळ होता.
ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या भल्या पहाटे आम्ही निघालो. सकाळच्या विमानाने वाराणसीला पोहोचलो. विमानतळावरुन गाडीने आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. हाॅटेलवर पोहोचलो पण रुम मिळायला किमान तासभर लागणार होता. रुम रिकाम्या झाल्या आहेत पण स्वच्छता करायला तासभर लागेल असं तिथल्या मॅनेजरने सांगितलं. एक रुम स्वच्छ करुन लगेच देणं शक्य असतानाही त्यांनं असं उर्मटपणे सांगताच माझ्या मनात साशंकता निर्माण झाली. काही न बोलता सामान तीथे ठेवून आम्ही जेवायला बाहेर गेलो.
जेवणासाठी हाॅटेल शोधत असतानाच तिथून राजघाट जवळच असल्याचं कळलं. मग आधी सरळ राजघाटावरच गेलो. गंगामैयाचं पहिलं दर्शन घेतलं आणि मग जेवून मुक्कामी परत आलो. थोड्या वेळाने रुम ताब्यात मिळाली. थोडा आराम करुन आम्ही परत बाहेर पडलो. रिक्षाने श्री काशी विश्वेश्वर मंदिरात गेलो. दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. साधारण अर्ध्या तासात आम्हाला श्री काशी विश्वेश्वर चं दर्शन घडलं. मात्र सायंआरतीच्या आधी थोडा वेळ प्रत्यक्ष गाभाऱ्यातून दर्शन बंद होतं. त्यामुळे स्पर्श न करता पण अगदी समोरुन छान दर्शन घडलं. त्यानंतर आम्ही कालभैरव मंदिरात गेलो. तिथेही मोठी रांग होती पण तिथल्या फुलवाल्याने आम्हाला वेगळ्या बाजूने दुसऱ्या रांगेतून जायला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि अगदी दहा मिनिटांतच कालभैरवाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. ही दोन्ही दर्शन घेऊन आणि थोडीशी खरेदी करुन आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो.
आमची यात्रा दुसऱ्या दिवशीपासून सुरु होणार होती. त्यानुसार सकाळी नाश्ता करुन आमच्या यात्रा आयोजकाने ठरवलेल्या रिक्षाने आम्ही आधी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेलो. आज मात्र दर्शनासाठी फारच मोठी रांग होती. किमान दोन तास रांगेत उभं राहिल्यानंतर आम्हाला कालभैरवाचं परत एकदा सुंदर दर्शन घडलं. तिथून आम्ही सारे नंदेश्वर घाटावर गेलो. घाटावरुन खाली उतरुन गंगामैयाचं दर्शन घेऊन गंगास्नान केलं. बरोबर गंगाजल घेऊन घाटावर येऊन पंडितजींकडून गंगापूजन, अभिषेक आणि पिंडदान हे सारे विधी केले. आणि मग नावेने श्री काशी विश्वेश्वर च्या दर्शनासाठी निघालो. गंगामैयाच्या शांत संथ लाटांवर आमची नाव डुलत निघाली तसं माझं मनही गंगालहरींर अलवार तरंगायला लागलं. आपल्यात काशीयात्रा फार महत्त्वाची मानली गेलीय. आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा करावी मान्यता आहे. त्यामुळे अगदी ऐनवेळी ठरवूनही आम्हाला काशी यात्रेचं भाग्य लाभलं, गंगास्नान आणि श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घडतय या विचारानं मन भरुन आलं होतं. गंगेचं विशाल पात्र आणि किनारी बांधलेले प्रशस्त घाट पहात, छायाचित्रं काढत आम्ही प्रसिद्ध अशा मणिकर्णिका घाटाच्या बाजूला असलेल्या ललिता घाटावर उतरलो. तिथून वर चढून आम्ही दर्शनासाठी बांधलेल्या काॅरिडारमधून मंदिराजवळ पोहोचलो. पण दर्शनासाठी इथे प्रचंड मोठी रांग होती. त्यामुळे आम्ही परत बाहेर येऊन सुगम दर्शनाची तिकीटं काढली आणि त्या रांगेत उभं राहिलो. साधारण तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश केला. बरोबर नेलेली हारफुलं, बिल्वदल आणि नैवेद्य प्रत्यक्ष अर्पण करुन, श्री काशी विश्वेश्वरासमोर नतमस्तक झाले. मन अगदी प्रसन्न तृप्त झालं. आदल्या दिवशी सायंकाळी थोडं लांबून दर्शन झालं होतं पण आता मात्र स्वहस्ते सारं अर्पण करता आलं त्यामुळे खूपच समाधान वाटलं. प्रसाद घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलो. आमचे सारे सहयात्री दर्शन घेऊन येईपर्यंत आम्ही बाहेरच सारं पहात, फिरत होतो.
मंदिराच्या आसपासचा परिसर फिरुन, तिथल्याच एका दुकानात कचोरी, पापडी चाट चा आस्वाद घेऊनआम्ही दोघं परत इतरांची वाट पहात घाटावर येऊन बसलो. हवेत छान गारवा होता त्यामुळे थोड्या वेळाने चहा प्यावा असं वाटू लागलं पण त्यासाठी परत घाट चढून वर जाण्यापेक्षा इथेच चहा मिळाला तर बरं होईल असं मी म्हणत असतानाच वरुन आमच्या मागून एक चहावाला पायऱ्या उतरुन आमच्या जवळ आला आणि आम्हाला त्याच्याकडे अतिशय छान चवीचा, वाफाळता लेमन टी मिळाला. एकदम ताजंतवानं वाटलं.
आम्ही तिथं बसलो असतानाच बाजूलाच घाटावरती एक पशुपतीनाथाचं पुरातन मंदिर पहात होतो. पण जाण्याचा मार्ग नक्की कुठून आहे ते कळत नव्हतं. मग त्या चहावाल्यालाच सारी माहिती विचारली आणि पुन्हा थोड्या पायऱ्या चढून त्या मंदिरात गेलो. अगदी नेपाळी पध्दतीने बांधलेलं हे पशुपतीनाथ मंदिर सुंदरच आहे. श्री काशी विश्वेश्वराचं दोनदा अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं, आता पशुपतीनाथाचंही असंच सुंदर दर्शन घडावं आणि माझी सेवा भगवान शिव चरणी रुजू व्हावी, त्याची छान अनुभूती मिळावी अशी प्रार्थना मी नुकतीच चहा पिण्यापूर्वी केली होती. आम्ही पशुपतीनाथ मंदिरात गेलो तर तिथं पंडितजी आणि फक्त आम्ही दोघंच होतो. पशुपतीनाथाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. आणि स्वतः पंडितजीनी आम्हाला शिवपिंडी वर जल अर्पण करायला दिलं, तीर्थ प्रसाद दिला. मन अगदी तृप्त झालं. तिथे थोडा वेळ थांबून परत घाट उतरुन खाली पायऱ्यांवर येऊन बसलो.
आमचे सहयात्री दर्शन घेऊन परत येईपर्यंत सांजावलं. आणि सारे घाट, गंगामैया विद्युत रोषणाईने उजळून निघाली. दिवसभर गंगामैयाच्या सानिध्यात रहायला मिळालं आणि सायंकाळ नंतरचं गंगामैया आणि साऱ्या घाटांचं चमचमतं रुपही पहायला मिळालं. अखेर काही सहयात्री आल्यावर आम्ही एका नावेतून निघालो. पुढील काही घाट पाहून नावेतूनच गंगाआरतीचा सोहळा अनुभवून आम्ही परत नंदेश्वर घाटावर आलो. सारा दिवस काशीच्या पावन भूमीत, आणि गंगामैयाच्या सानिध्यात छान पार पडला. या रात्रीही आमचा मुक्काम काशी येथेच होता.
तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करुन अयोध्येला प्रस्थान केलं. एकूण यात्रेकरु खूप असल्याने दोन बसेस नी आम्ही अयोध्येला निघालो. साधारण दोन तासाचा प्रवास झाला आणि आमची बस थांबली. काय झालं हे कळताच थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आमच्या थोडसं पुढे असलेल्या आमच्या दुसऱ्या बसचा लहानसा अपघात झाला होता. भरधाव वेगाने अचानक रस्ता बदलणाऱ्या कारला वाचवण्यासाठी ट्रकने अचानक लेन बदलली आणि त्या ट्रकवर ही बस आदळली. बसचं नुकसान झालं पण सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. यामुळे आमच्या दोन्ही बस दोन अडीच तास तिथेच थांबल्या. मात्र नवीन बस यायला फारच वेळ लागणार हे कळताच अपघातग्रस्त बसमधून स्वयंपाकाचं सारं साहित्य काढून आमच्या बसमध्ये ठेवलं आणि आमचं सामान त्या बसमध्ये. हे सारे सोपस्कार करुन अखेर आमची बस अयोध्येला निघाली. मात्र अयोध्येला पोहोचायला सायंकाळ उलटून गेली त्यामुळे त्यादिवशी श्री रामरायाचं दर्शन राहून गेलं. दुसरी बस रात्री उशिरा आली त्यानंतर आम्हाला आमच्या बॅगा मिळाल्या.
चौथ्या दिवशी सकाळी आम्ही दर्शनासाठी रिक्षाने निघालो. सर्वात आधी आम्ही दर्शनासाठी गेलो ते हनुमानगढी येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी. इथेही दर्शनासाठी अतिशय गर्दी होती. पण शिस्तीत रांगेतून दर्शन हा प्रकारच नव्हता. दर्शनासाठी नुसती लोटालोट सुरु होती. जागोजागी सुरक्षा रक्षक असूनही अशी वाईट परिस्थिती होती. अखेर आम्हीही त्या गर्दीचा एक भाग होऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. प्रत्यक्ष दर्शन मात्र छान झालं. तिथून आम्ही श्री रामरायाच्या दर्शनासाठी गेलो. सुमारे पाचशे वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अतिशय भव्य अशा मंदिरात नुकतीच बालस्वरुपातील प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली असल्याने श्री रामांच्या दर्शनाची अतीव ओढ लागली होती. मंदिराच्या प्रचंड मोठ्या परिसरात प्रवेश केला आणि मन अतिशय उल्हसित झालं. अतिशय सुंदर व्यवस्था, जागोजागी माहिती फलक, सुरक्षा रक्षक, माहिती आणि मदतीसाठी तत्पर कर्मचारीवर्ग यामुळे दर्शनासाठी एवढी प्रचंड गर्दी असूनही बिलकुल गडबड गोंधळ नव्हता. प्रचंड गर्दी असूनही रांगेत उभं राहिल्यापासून अगदी अर्ध्या तासात श्री रामरायाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. बिलकुल घाईगडबड न करता शांतपणे काही क्षण श्रीरामांसमोर नतमस्तक होता येतं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. अतिशय रेखीव असं शाळिग्रामात घडवलेलं, अत्यंत सुरेख कमलनयन असलेलं असं हे सगुण साकार रुप पाहून मन भारावलं. सभागृहात प्रवेश केल्यापासूनच श्रीरामांचं छान दर्शन आपल्याला घडत असतं. आपल्याला मंदिरात अर्पण करण्यासाठी काहीही न्यायला परवानगी नाही. पण आपण दर्शन घेऊन परतताना आवर्जून प्रसाद दिला जातो. इथून बाहेर पडून मार्गावरच असलेल्या श्रीराम जानकी मंदिरात गेलो. इथेही खूप छान दर्शन झालं. तिथूनच नंतर राम दरबार इथे दर्शनासाठी गेलो. इथेही श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. हा राम दरबाराच्या बाजूचं मोठं सभागृह सीता की रसोई या नावानं ओळखलं जातं. अजूनही याच रसोईमध्ये प्रसाद भोजनाचा स्वयंपाक केला जातो. इथेच एका मंदिरात पूर्ण राम दरबारातील मूर्ती आणि त्याच बरोबर बाबरी मशीद उत्खननात मिळालेली श्रीराम आणि सीतामाईच्या सोन्या- चांदीच्या मूर्ती आहेत. सारी दर्शनं घेऊन हाॅटेलमध्ये परत येऊन सामान घेऊन आमच्या बसेस पुढे गोरखपुरला निघाल्या. गोरखपुरला श्री गोरक्षनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. मंदिरात पोहोचायला सायंकाळ उलटून गेल्याने संपूर्ण मंदिर आणि प्रांगण विद्युत रोषणाईने उजळून निघालं होतं. हे मंदिरही अतिशय सुंदर आणि भव्य आहे. रंगबिरंगी फुलांची सुंदर बाग, रंगीत कारंजे यांनी मंदिराची शोभा वाढवलीय. हे सारं नयनरम्य दृश्य पहात, छायाचित्रात बध्द करत आम्ही मंदिरात गेलो. गोरक्षनाथांची सुंदर रेखीव मूर्ती इथे प्रतिष्ठापित केलीय. शांतपणे छान दर्शन घडलं, मन प्रसन्न झालं.
गोरक्षनाथ मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला पुढे रात्रभर प्रवास करुन सकाळी काठमांडू ला पोहोचायचं होतं. पण त्यासाठी रात्री नऊ वाजण्यापूर्वी भारत नेपाळ सीमारेषा ओलांडण्यासाठी परवानगी मिळणं अत्यावश्यक होतं. पण ही सीमारेषा जिथे आहे त्या सुनौली गावात पोहोचायलाच आम्हाला नऊ वाजले. त्यानंतर प्रत्येक यात्रेकरुचं ओळखपत्र तपासण्यात आलं पण आम्हाला पोहोचायला उशीर झाल्यानं सीमारेषा पार करुन पुढे प्रवास करायला परवानगी मिळाली नाही. अखेर आमच्या बसेस भारताच्या हद्दीतच थांबवाव्या लागल्या. पण आमची ओळखपत्र तपासणी झाल्यानं आम्हाला नेपाळच्या हद्दीत असलेल्या हाॅटेलमध्ये मुक्काम करायची परवानगी मिळाली. त्यामुळे आमच्या सामानाशिवायच आमची तिथल्या दोन हाॅटेलमध्ये एका खोलीत ४-४ जणं अशी व्यवस्था कशीबशी करण्यात आली. बसमध्ये रात्रभर बसून रहाण्यापेक्षा निदान एवढी तरी व्यवस्था झाली हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू.
- स्नेहल मोडक








No comments:
Post a Comment