Pages

Tuesday, November 19, 2024

डोंगर तुकाई

           गिरनार दर्शन आणि परिक्रमा पूर्ण करुन घरी आलो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी अंबाजोगाईला निघालो. दरवर्षी दीपावली नंतर कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी आम्ही जातोच. गेली कित्येक वर्षं आम्ही दर्शनासाठी जातोय. योगेश्वरी देवीच्या दर्शनाबरोबरच परळी वैजनाथाचंही दर्शन घेतोच. या प्रघाताप्रमाणेच यावेळीही अंबाजोगाईला निघालो. लवकर पोहोचणार असल्यानं आधीच परळी वैजनाथाचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. परळीला पोहोचायच्या थोडं आधी अचानक मनात कधीपासून जायचं असलेल्या एका स्थानी आधी जावं असं आलं. त्या स्थानाबद्दल माहिती होती पण ते नक्की कुठे आहे हे माहित नव्हतं. मग लगेच आंतरजालावर थोडा धांडोळा घेतला आणि तिथं जायचं नक्की केलं. 

             परळी वैजनाथ पासून ४ किमी. अंतरावर चांदापूर गावाच्या पश्चिमेला असलेलं हे स्थान म्हणजे ' डोंगर तुकाई '. हे स्थान ' डोंगर तुकाई ' किंवा ' अंबा भवानी आरोग्य मंदिर ' या नावानं ओळखलं जातं. इथं पार्वती मातेचं मंदिर आहे. इथं पार्वती मातेच्या दोन आख्यायिका प्रचलित आहेत. प्रभू श्रीराम वनवासात असताना परळी वैजनाथ येथे काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी एकदा त्यांच्या एकपत्नीत्वाची परिक्षा घेण्यासाठी देवी पार्वती सीतामाईचं रुप घेऊन श्रीरामांसमोर आली. मात्र श्रीरामांनी आपल्या ज्ञानचक्षूद्वारे ती पार्वती माता असल्याचं ओळखलं आणि त्यांच्या मुखातून ' तू का आई ' असे शब्द बाहेर पडले. तेव्हापासून तिथं  ' पार्वती माता ' ' तुकाई ' या नावानं ओळखली जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार परळी वैजनाथ मधील ' आयाजीत ' नावाचा एक ब्राह्मण भक्त तुळजापूरला ' भवानी ' मातेच्या वारीस नित्यनेमानं जात असे. मात्र वृध्दापकाळामुळे त्याला वारीला जाणं शक्य होईना तेव्हा देवीनं ' मीच तुझ्याकडे येईन ' असं सांगितलं. तिनं अट घातली की ' तू पुढं चालत रहा, मागं वळून बघायचं नाही '. त्याप्रमाणं हे चालत डोंगर तुकाई पर्यंत आले. इथं देवीच्या खडावांचा आवाज बंद झाला म्हणून त्या ब्राह्मणानं मागं वळून पाहिलं आणि त्याक्षणी देवी अदृश्य होऊन मूर्ती रुपात तिथंच विराजमान झाली. या आख्यायिकांमुळं हा डोंगर ' डोंगर तुकाई ' म्हणून ओळखला जातो. तसंच या मंदिराचं दुसरं नांव ' अंबा आरोग्य भवानी मंदिर ' हे इथं असलेल्या अनेक औषधी वनस्पतींमुळं मिळालंय. या डोंगरावर खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत आणि संजीवनी वनस्पतीही इथं होती असं सांगतात.

           तुकाई देवी बरोबरच हे मंदिर दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.  या स्थानी 'श्री दत्तात्रेयांचे' द्वितीय अवतार ' नृसिंह सरस्वती ' हे एक वर्ष गुप्त रुपात राहिले होते. या मंदिरात तुकाई देवीची मूर्ती आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला एक भुयार आहे. या भुयारातून ४-५ दगडी पायऱ्या उतरुन एकावेळी एक व्यक्तीच खाली जाऊ शकते. पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर अगदी छोटसं गर्भगृह आहे. या ठिकाणी छोट्या पाषाणी शिवलिंगावर ' नृसिंह सरस्वती ' यांच्या पादुका आणि त्यामागे मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहात एकावेळी जेमतेम २-३ व्यक्तीबसू शकतील एवढीच जागा आहे. हे स्थान प्रति गाणगापूर म्हणूनही ओळखतात. श्री नृसिंह सरस्वती या ठिकाणी गुप्त रुपात राहिल्यानं श्री दत्तात्रेयांच्या इतर स्थानांइतकंच हे स्थानही महत्त्वाचं आहे. 

              आम्ही कित्येक वर्षं परळी वैजनाथाच्या दर्शनाला जातोय. पण ' श्री नृसिंह सरस्वतींच्या ' या स्थानी जाण्याचा योग यावेळी आला. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती. मंदिरात नित्यपुजा करणाऱ्या माऊलीं व्यतिरिक्त कुणीच नव्हतं. आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तुकाई देवीचं दर्शन घेऊन बाजूच्या  भुयाराच्या पायऱ्या जपून उतरुन खाली गर्भगृहात गेलो. मी चरणपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं. अगदी अचानकच मनात इथं यावं असं आलं आणि सुंदर दर्शन घडलं. इथं दर्शनाला यायचं ऐनवेळी ठरवल्यानं आणि तिथं आजूबाजूला काहीच न मिळाल्यानं नैवेद्य अर्पण करता आला नाही. पण तिथल्या माऊलींनीच आम्हाला प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं आणि खूप समाधान वाटलं. 

                  ' नृसिंह सरस्वतींचं ' दर्शन घेऊन आम्ही ' परळी वैजनाथाचं ' दर्शन घ्यायला गेलो. नुकतीच त्रिपुरी पौर्णिमा झाल्यानं इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण रांगेतून जाऊन 'वैजनाथाचं' सुंदर दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही अंबाजोगाईला मुक्काम केला.

                  दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. मंदिरात लवकर गेल्यामुळं गर्दी नव्हती. इथं नेहमीप्रमाणं देवीला अभिषेक करुन दर्शन घेऊन आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आता अंबाजोगाईला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळं आता भाविकांचा ओघही वाढलाय. आम्ही दर्शन घेऊन परत रुमवर येताना दरवर्षी प्रमाणं सीताफळं खरेदी केली. इथली सीताफळं अतिशय मधुर चवीची असतात. अंबाजोगाई श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराबरोबरच सीताफळांसाठीही प्रसिद्ध आहे. सीताफळ घेऊन आवरुन लगेचच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

- स्नेहल मोडक

    






Sunday, November 17, 2024

गिरनार परिक्रमा

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

             साधारणपणे जुलै महिना सुरु झाला की दत्तभक्तांना वेध लागतात ते गिरनार परिक्रमेचे. रेल्वेचं आरक्षण ४ महिने आधी होत असल्यानं सारे भक्त त्या तारखेकडे अगदी पूर्ण लक्ष ठेवून असतात. कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या ४-५ दिवसातच करता येणारी गिरनार परिक्रमा ही दत्तभक्तांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे मिळेल त्या रेल्वेचं आरक्षण या महिन्यात केलं जातं. आणि परिक्रमा काळात तलेटीमध्ये मुक्काम करण्यासाठी हाॅटेल, आश्रम यांचंही आरक्षण खूप आधीच करावं लागतं. त्यासाठी आम्ही जानेवारी महिन्यापासूनच‌ आरक्षणाच्या प्रयत्नात असतो. दीपावलीची धामधूम संपता संपता परिक्रमेचे खरे वेध लागतात. दर्शन आणि परिक्रमेच्या प्रवासाची तयारी सुरु होते आणि प्रत्यक्ष प्रवासाचा दिवस येतो.

             आम्हाला थेट जुनागढचं रेल्वे आरक्षण मिळालं नव्हतंच. त्यामुळं आम्ही सारे १२ तारखेला रेल्वेने आधी गांधीनगरला पोहोचलो. तिथून दुसऱ्या रेल्वेने जुनागढसाठी रवाना झालो. पहाटे जुनागढला उतरलो. परिक्रमेला भाविकांची अलोट गर्दी होत असल्यानं तलेटीला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी वाहनांना परवानगी नसते. त्यामुळं थोड्या अंतरापर्यंत वाहनानं आणि पुढं चालत आम्ही सारे मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनासाठी निघालो. रोपवेसाठी अर्थातच प्रचंड गर्दी होती. मात्र सारी व्यवस्था एकदम छान होती. रांगेतून पुढे सरकत अखेर रोपवेने आम्ही अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथून लगेचच पायऱ्या चढायला सुरुवात केली. गोरक्षनाथांच दर्शन घेऊन कमंडलू कुंडाच्या कमानीच्या थोडं पुढे गेलो आणि तिथूनच दर्शनासाठी रांग सुरु झाली. रांगेतून शिखरावर पोहोचून मंदिरात प्रवेश केला आणि नैवेद्य आणि इतर वस्तू अर्पण केल्या. हे सारं करेपर्यंत नजरेसमोर फक्त श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकाच होत्या. ज्या क्षणी नतमस्तक झाले त्याक्षणी पापण्या ओलावल्याच. सलग दोन पौर्णिमेनंतर दर्शन घडलं होतं. अर्थात कोजागिरी पौर्णिमेला माउंट अबू मधल्या गुरुशिखराचं सुंदर दर्शन घडलंच होतं. पण गिरनारचं स्थान आमच्यासाठी अत्यंत विशेष आहे. नेहमीप्रमाणं आमचं दर्शन घेऊन होईपर्यंत तिथले पंडितजी एकदम शांत होते. त्यामुळं किंचितही घाईगडबड न होता शांतपणे सुंदर दर्शन घडलं. गिरनारला जायच्या २-३ दिवस आधी माझ्या मनात नेहमीप्रमाणं नैवेद्यसाठी काय न्यायचं असा विचार आला आणि क्षणात मनोमनी उत्तर मिळालं बुंदीचे लाडू. खरंतर दीपावली नुकतीच संपली होती त्यामुळं मनात फराळाच्या पदार्थांपैकी काही न्यावं असं आलं असतं तर ते अगदी साहजिक होतं. पण बुंदीचे लाडू न्यावे ही दत्तगुरुंचीच इच्छा. कारण नेहमीच मी दत्तगुरुंना विचारुनच नैवेद्य नेते. मनातला हा विचार मी नंतर विसरुन गेले. निघायच्या आदल्या दिवशी दुग्धालयातून इतर वस्तूंबरोबर काजू कतली नैवेद्यासाठी घेतली. नंतर अजून काही खाऊ घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेले तर तिथे समोरच सुरेख केशरी बुंदी लाडवांचं पाकिट दिसलं आणि क्षणात जाणीव झाली की हेच तर दत्तगुरुंना हवय. तेच बुंदीचे लाडू घेऊन गिरनारला प्लास्टिक बंदी असल्यानं छान डब्यातून मी गुरुशिखरावर श्री दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण केले. श्री दत्तात्रेयांच्या इच्छेनुसार नैवेद्य नेता आला या अतीव समाधानातच ओलावलेल्या पापण्यांनी मी तिथं बसलेल्या पंडितजींना नमस्कार केला त्यावर त्यांनी ' माताजी परिक्रमा हो गयी? ' असं विचारल्यावर मी 'कल करेंगे' असं सांगितलं. तर 'आरामसे जाके आओ' म्हणाले. सहसा न बोलणाऱ्या पंडितजीनी एवढी चौकशी केल्यावर मला आशीर्वाद मिळाल्यासारखं खूप छान वाटलं. दर्शन घेऊन थोड्या पायऱ्या उतरुन एका ठिकाणी थांबून गुरुचरित्राचं नित्याचं वाचन केलं. नंतर परत थोडं खाली उतरुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेतला आणि अंबाजी मंदिराजवळ येऊन रोपवेनं दुपारी १२ वाजताच पायथ्याशी आलो.‌

              गिरनार दर्शन हा दत्तभक्तांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. तिथं अनेक भाविक सेवेसाठीही जातात. अर्थात त्यासाठी त्यांना ३० ते ५१ दिवसांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर त्यांना सेवेसाठी बोलावतात. मात्र गेल्या काही पौर्णिमांपासून अखंड धुनीजवळ सेवेसाठी येणाऱ्या सेवेकऱ्यांची भाविकांना मदत होण्याऐवजी मनस्ताप होऊ लागलाय. अलीकडे या सेवेकऱ्यांच्या अरेरावीच्या, उर्मटपणाच्या आणि मग्रुरीच्या वागण्या-बोलण्यामुळे आपलं डोकं आपण कितीही शांत ठेवायचा प्रयत्न केला तरीही ते शक्य होत नाहीय. कितीही शांत राहिलं तरी सेवेकऱ्यांच्या उद्दामपणामुळे अखेर शाब्दिक चकमक होतेच. माझ्यासह खूप भाविकांचा कल आता असं पौर्णिमेला किंवा गर्दीच्या वेळेला गिरनार दर्शनाला न येण्याकडे होऊ लागलाय. श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाच्या सौख्यापेक्षा या सेवेकऱ्यांमुळे होणारा मनस्ताप जास्त त्रासदायक ठरतोय. सेवेकऱ्यांना भाविकांना ज्या सुचना द्यायच्या असतात त्या नम्रपणे देऊ शकतात ज्यामुळे वादविवादाची वेळ येणार नाही. पण त्यांना साधं सरळ  बोलणं जमत नाही नम्रपणा दूरची गोष्ट.  

             आमचा एक ग्रुप ११ तारखेलाच गिरनारला पोहोचल्यानं त्यांचं त्यादिवशी दर्शन आणि १२ तारखेला परिक्रमा पूर्ण झाली होती. आणि त्यादिवशी परिक्रमेला भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी रात्रीच परिक्रमा सुरु करावी का विचार करत होतो पण वेळेचा अंदाज घेता रात्रीच्या अंधारातच आम्ही दुसऱ्या डोंगरावर आम्ही पोहोचू आणि तिथे बिलकुल विद्युत दिवे नसल्यानं चढायला त्रास होईल हे लक्षात आलं. हा डोंगर अगदी खडा आणि मोठमोठ्या दगडांनी भरलेला आहे. त्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. त्यामुळं पहाटे २-३ वाजेपर्यंत परिक्रमा सुरु करायची असं ठरलं. त्या सायंकाळी तिथेच आजूबाजूला फिरुन भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन रात्रीचं भोजन करुन थोडं निद्राधीन झालो. रात्री १ वाजता उठून आन्हिकं आवरुन परिक्रमेला निघालो. 

             प्रत्यक्ष परिक्रमा जिथून सुरु होते तिथून आम्ही पहाटे ३ वाजता परिक्रमेला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी २-४ भाविक परिक्रमेला निघालेले दिसत होते. पहिल्या ३-४ किमी. चढावाच्या रस्त्यानंतर तर काही वेळ आम्ही दोघंच मार्गक्रमण करत होतो. मधेच २-४ जणं पुढे निघून जात होते. नीरव शांतता, मिट्ट काळोख, आजूबाजूला जंगल आणि त्यात टाॅर्चच्या थोड्याशा प्रकाशात चालणारे आम्ही, अतिशय सुंदर वातावरण होतं. काही वेळानंतर मात्र आमच्या मागेपुढे काही भाविक चालत होते. दुसरा डोंगर चढून उतरताना हळूहळू पूर्वेला केशर ऊधळत रवीराजाचं आगमन होऊ लागलं. पहिले दोन डोंगर पार करेपर्यंत भाविकांची फारशी गर्दी नव्हती त्यामुळं आम्हाला जरा भरभर चालत येत होतं. कालिमातेच्या मंदिरात पोहोचून तिचं दर्शन घेऊन पुढे निघालो आणि इथून गर्दीचा ओघ वाढला. मग चालण्याचा वेग आपोआपच मंदावला. पण  दमल्यावर वाटेत थांबत थांबत कलिंगड, लिंबू सरबत, शहाळं, उसाचा रस, यांचा आस्वाद घेत तिसरा डोंगर चढून उतरुन आमची परिक्रमा दुपारी २ वाजता अतिशय सुंदर रितीने पूर्ण झाली. परिक्रमा करत असताना गतवर्षीच्या आठवणीनंही अंगावर शहारा येत होता. गतवर्षी आम्ही ज्या दिवशी परिक्रमेला गेलो होतो त्याचदिवशी बिबट्यानं एका लहान मुलीवर हल्ला केल्यानं ती मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळं सारी परिक्रमा काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळं अलोट गर्दी झाली आणि सगळ्यांनाच आत्यंतिक त्रास झाला होता. ते सारं या परिक्रमेत आठवत होतं. खरंतर त्यावेळीच मी दत्तगुरुंना सांगितलं होतं की इतका शारीरिक आणि मानसिक त्रास झालाय की आम्ही  पुढल्या वर्षी परिक्रमेला बिलकुल येणार नाही. पण आपली इच्छा आणि दत्तगुरुंची इच्छा नेहमी एकच नसते. मी कितीही येणार नाही म्हणलं तरी स्वयं श्री दत्तगुरुंनी यावर्षीही ३८ किमी. अंतराची ही परिक्रमा घडवलीच. तीही कुठलाही त्रास होऊ न देता. ही परिक्रमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण ही आमची पाचवी परिक्रमा होती. आणि ही पाचवी परिक्रमा दत्तात्रेयांनी अतिशय सुंदर रितीने घडवली होती. मुक्कामी पोहोचल्यावर थोडा आराम करुन सायंकाळी परत थोडं फिरुन आलो. 

             यावर्षी आमच्याबरोबर दोनशेहून अधिक भाविक २ ग्रुपमध्ये विभागून दर्शन आणि परिक्रमेसाठी आले होते. एवढ्या मोठ्या यात्रेचं नियोजन जरी माझा सहचर करत असला तरी त्याच्या सहकारी मित्रांची अमुल्य साथ ही अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्या सहकार्यामूळेच ही यात्रा उत्तम रित्या पूर्ण होते. आणि आमच्यासह बरोबरच्या साऱ्या भाविकांना दर्शन आणि परिक्रमा करणे सहजशक्य होते. 

             त्रिपुरी पौर्णिमेला सकाळी लवकर तलेटीहून निघून सोरटी सोमनाथच्या दर्शनासाठी दोन मोठ्या बसने निघालो. सोमनाथ दर्शन घेऊन येताना भालका तीर्थ, नाग मंदिर इथंही दर्शन घेऊन रात्री राजकोटला पोहोचलो. तिथून रात्रीच्या रेल्वेने प्रवास सुरु केला आणि यात्रेची सांगता केली.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक




Monday, November 11, 2024

मंदिर

उजळली ज्योत निरांजनात

जागले चैतन्य तनामनात

     दर्शन त्रैमूर्ती नी पादुकांचे 

     सौख्यनिधान श्रध्देयाचे

दीपतेज ते लखलखले

तेजात गुरुमंदिर उजळले

     प्रसन्नचित्ते कर जुळती

     कुशलमंगल सदा प्रार्थती

मिटल्या नेत्री त्रैमूर्ती दिसे

मनी निरंतर श्रध्दा वसे

     पहाटसमय शुभ जाहला

     सदनी अष्टभाव दाटला

- स्नेहल मोडक



Tuesday, November 5, 2024

खिडकी

कधी सोनवर्खी कवडसे पाहते

अन वंदन त्या भास्करास करते

कधी मंजुळ किलबिलाट ऐकते

चिमणचारा मग तयांस घालते

सरतो दिन अन पश्चिमा रंगते

थकली काया क्षणभर दंगते

पुनवेस टिपूर चांदणे दिसते

आठवांची माळ हळूच ओघळते

थेंब पावसाचे ओंजळीत धरते

तुषारांनी मुखकमल हे भिजते

गुज मनीमानसीचे कधी करते

हळव्या कातर भावनाही जाणते

रात्रंदिन बारोमास साथ करते

  ती माझी हक्काची खिडकी असते

    ती माझी हक्काची खिडकी असते

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...