Pages

Tuesday, November 19, 2024

डोंगर तुकाई

           गिरनार दर्शन आणि परिक्रमा पूर्ण करुन घरी आलो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी अंबाजोगाईला निघालो. दरवर्षी दीपावली नंतर कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी आम्ही जातोच. गेली कित्येक वर्षं आम्ही दर्शनासाठी जातोय. योगेश्वरी देवीच्या दर्शनाबरोबरच परळी वैजनाथाचंही दर्शन घेतोच. या प्रघाताप्रमाणेच यावेळीही अंबाजोगाईला निघालो. लवकर पोहोचणार असल्यानं आधीच परळी वैजनाथाचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. परळीला पोहोचायच्या थोडं आधी अचानक मनात कधीपासून जायचं असलेल्या एका स्थानी आधी जावं असं आलं. त्या स्थानाबद्दल माहिती होती पण ते नक्की कुठे आहे हे माहित नव्हतं. मग लगेच आंतरजालावर थोडा धांडोळा घेतला आणि तिथं जायचं नक्की केलं. 

             परळी वैजनाथ पासून ४ किमी. अंतरावर चांदापूर गावाच्या पश्चिमेला असलेलं हे स्थान म्हणजे ' डोंगर तुकाई '. हे स्थान ' डोंगर तुकाई ' किंवा ' अंबा भवानी आरोग्य मंदिर ' या नावानं ओळखलं जातं. इथं पार्वती मातेचं मंदिर आहे. इथं पार्वती मातेच्या दोन आख्यायिका प्रचलित आहेत. प्रभू श्रीराम वनवासात असताना परळी वैजनाथ येथे काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी एकदा त्यांच्या एकपत्नीत्वाची परिक्षा घेण्यासाठी देवी पार्वती सीतामाईचं रुप घेऊन श्रीरामांसमोर आली. मात्र श्रीरामांनी आपल्या ज्ञानचक्षूद्वारे ती पार्वती माता असल्याचं ओळखलं आणि त्यांच्या मुखातून ' तू का आई ' असे शब्द बाहेर पडले. तेव्हापासून तिथं  ' पार्वती माता ' ' तुकाई ' या नावानं ओळखली जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार परळी वैजनाथ मधील ' आयाजीत ' नावाचा एक ब्राह्मण भक्त तुळजापूरला ' भवानी ' मातेच्या वारीस नित्यनेमानं जात असे. मात्र वृध्दापकाळामुळे त्याला वारीला जाणं शक्य होईना तेव्हा देवीनं ' मीच तुझ्याकडे येईन ' असं सांगितलं. तिनं अट घातली की ' तू पुढं चालत रहा, मागं वळून बघायचं नाही '. त्याप्रमाणं हे चालत डोंगर तुकाई पर्यंत आले. इथं देवीच्या खडावांचा आवाज बंद झाला म्हणून त्या ब्राह्मणानं मागं वळून पाहिलं आणि त्याक्षणी देवी अदृश्य होऊन मूर्ती रुपात तिथंच विराजमान झाली. या आख्यायिकांमुळं हा डोंगर ' डोंगर तुकाई ' म्हणून ओळखला जातो. तसंच या मंदिराचं दुसरं नांव ' अंबा आरोग्य भवानी मंदिर ' हे इथं असलेल्या अनेक औषधी वनस्पतींमुळं मिळालंय. या डोंगरावर खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत आणि संजीवनी वनस्पतीही इथं होती असं सांगतात.

           तुकाई देवी बरोबरच हे मंदिर दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.  या स्थानी 'श्री दत्तात्रेयांचे' द्वितीय अवतार ' नृसिंह सरस्वती ' हे एक वर्ष गुप्त रुपात राहिले होते. या मंदिरात तुकाई देवीची मूर्ती आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला एक भुयार आहे. या भुयारातून ४-५ दगडी पायऱ्या उतरुन एकावेळी एक व्यक्तीच खाली जाऊ शकते. पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर अगदी छोटसं गर्भगृह आहे. या ठिकाणी छोट्या पाषाणी शिवलिंगावर ' नृसिंह सरस्वती ' यांच्या पादुका आणि त्यामागे मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहात एकावेळी जेमतेम २-३ व्यक्तीबसू शकतील एवढीच जागा आहे. हे स्थान प्रति गाणगापूर म्हणूनही ओळखतात. श्री नृसिंह सरस्वती या ठिकाणी गुप्त रुपात राहिल्यानं श्री दत्तात्रेयांच्या इतर स्थानांइतकंच हे स्थानही महत्त्वाचं आहे. 

              आम्ही कित्येक वर्षं परळी वैजनाथाच्या दर्शनाला जातोय. पण ' श्री नृसिंह सरस्वतींच्या ' या स्थानी जाण्याचा योग यावेळी आला. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती. मंदिरात नित्यपुजा करणाऱ्या माऊलीं व्यतिरिक्त कुणीच नव्हतं. आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तुकाई देवीचं दर्शन घेऊन बाजूच्या  भुयाराच्या पायऱ्या जपून उतरुन खाली गर्भगृहात गेलो. मी चरणपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं. अगदी अचानकच मनात इथं यावं असं आलं आणि सुंदर दर्शन घडलं. इथं दर्शनाला यायचं ऐनवेळी ठरवल्यानं आणि तिथं आजूबाजूला काहीच न मिळाल्यानं नैवेद्य अर्पण करता आला नाही. पण तिथल्या माऊलींनीच आम्हाला प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं आणि खूप समाधान वाटलं. 

                  ' नृसिंह सरस्वतींचं ' दर्शन घेऊन आम्ही ' परळी वैजनाथाचं ' दर्शन घ्यायला गेलो. नुकतीच त्रिपुरी पौर्णिमा झाल्यानं इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण रांगेतून जाऊन 'वैजनाथाचं' सुंदर दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही अंबाजोगाईला मुक्काम केला.

                  दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. मंदिरात लवकर गेल्यामुळं गर्दी नव्हती. इथं नेहमीप्रमाणं देवीला अभिषेक करुन दर्शन घेऊन आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आता अंबाजोगाईला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळं आता भाविकांचा ओघही वाढलाय. आम्ही दर्शन घेऊन परत रुमवर येताना दरवर्षी प्रमाणं सीताफळं खरेदी केली. इथली सीताफळं अतिशय मधुर चवीची असतात. अंबाजोगाई श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराबरोबरच सीताफळांसाठीही प्रसिद्ध आहे. सीताफळ घेऊन आवरुन लगेचच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

- स्नेहल मोडक

    






No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...