यावर्षी जुलै महिन्यात 'अमरनाथ यात्रे'बरोबरच 'वैष्णोदेवी'चंही दर्शन आम्ही घेऊन आलो होतो. त्यामुळं परत लगेच नवरात्रात 'वैष्णोदेवी'च्या दर्शनाला जायचं नव्हतं. मग अगदी गेल्या ३-४ महिन्यांपासून जायचं असलेल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला म्हणजेच 'अंबाजोगाई'ला जायचं ठरवलं.
घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच 'योगेश्वरी देवी'च्या दर्शनासाठी जायचं आणि तिसऱ्या माळेला दर्शन, अभिषेक करुन लगेच घरी परत यायचं ठरवलं. आणि जाताना किंचित वाट वाकडी करुन अजून एक दर्शन घ्यायचंही ठरवलं.
'अंबाजोगाई'ला नेहमी आम्ही 'अहिल्यानगर' ( अहमदनगर) मार्गेच जातो. त्याप्रमाणं तिथपर्यंत जाऊन तिथून 'नगर' - 'वांबोरी' मार्गावरुन 'डोंंगरगणू' गावातून 'मांजरसुंबा' या गावातील 'सोन्याच्या डोंगरा'वरील एका मंदिराजवळ पोहोचलो. 'नगर' ते 'पाटोदा बीड' पर्यंत असलेली डोंगररांग ही 'गर्भगिरी पर्वतरांग' म्हणून ओळखली जाते. 'नवनाथ भक्तिसारा'मध्ये या 'गर्भगिरी' पर्वताचा उल्लेख आहे. या पर्वतालाच 'सोन्याचा डोंगर' म्हणूनही ओळखलं जातं.
स्वर्गलोकीची राजकन्या 'पद्मिनी' हिला तिला मिळालेल्या शापामुळं पृथ्वीवर स्त्री राज्यात ' मैनावती' या नावानं मानवदेह धारण करावा लागतो. कालांतरानं ती स्त्री राज्याची राणी होते. त्यानंतर ती आपल्या तप सामर्थ्यानं नाथपंथाचे पहिले गुरु 'मच्छिंद्रनाथ' यांनी स्वतः समवेत रहावे असे वरदान मिळवते. त्यानुसार ' गुरु मच्छिंद्रनाथ ' हे स्त्री राज्यात प्रवेश करतात. आणि 'राणी मैनावती' सह राज्य कारभार पाहू लागतात. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्ती होते. 'गुरु मच्छिंद्रनाथांचे' प्रथम शिष्य 'गुरु गोरक्षनाथ' हे आपल्या गुरुंना भेटण्यासाठी गावोगावी फिरत असताना त्यांना हा सारा वृत्तांत कळतो. आणि ते नाथपंथाचं कार्य आणि संन्यस्त जीवन सोडून संसारपाशात अडकलेल्या आपल्या 'गुरु मच्छिंद्रनाथ' आणि त्याचा पुत्र 'मीननाथ' यांना स्त्री राज्यातून बाहेर काढतात.
राज्यातून बाहेर पडताना 'मैनावती' मच्छिंद्रनाथांच्या झोळीत त्यांच्या नकळत एक सोन्याची वीट ठेवते. पुढं मजल दरमजल करत जंगलातून जाताना मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याची परिक्षा पहाण्यासाठी चोरांची भीती वाटत असल्याचं सांगत आपली झोळी आणि पुत्र 'मीननाथ' याला गोरक्षनाथांना सांभाळायला सांगतात. गोरक्षनाथांना जेव्हा ती झोळी जड लागते तेव्हा ते उघडून पहातात. त्यांना त्यात सोन्याची वीट दिसते आणि मच्छिंद्रनाथांना वाटणाऱ्या चोरांच्या भीतीचं कारण कळतं. ते मच्छिंद्रनाथांच्या नकळत ती वीट जंगलात भिरकावतात. आणि त्याच वजनाचा दगड झोळीत ठेवतात. जंगल पार करुन एका पर्वतावर पोहोचल्यावर जेव्हा मच्छिंद्रनाथांना हे कळतं तेव्हा ते दुःखी होतात. त्यांना त्या यात्रेनिमित्त सर्व देवदेवतांना आमंत्रित करुन मोठा यज्ञयाग करण्यासाठी ती वीट हवी असते. गोरक्षनाथांना हे कळताच ते गुरुंची क्षमा मागतात. आणि गुरुंचं दुःख दुर करण्यासाठी आपल्या सिध्दी सामर्थ्यानं संपूर्ण पर्वतच सोन्याचा करतात. गंधर्वांना बोलावून साऱ्या देवदेवता, गंधर्व, ऋषीमुनींना आमंत्रित करतात. मोठा यज्ञयाग, भोजन समारंभ करतात. बराच काळ चाललेला हा सोहळा संपल्यावर सारे देवदेवता आपआपल्या निवासस्थानी निघाले त्यावेळी हा सोन्याचा पर्वत कुबेराने झाकोळून टाकला. यानंतर गोरक्षनाथांनी तिथं काही काळ तपस्या केली.
हे सर्व कार्य ज्या स्थानी घडलं तिथं 'गुरु गोरक्षनाथ ' यांचं भव्य आणि अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं आहे. काळ्या पाषाणातील अत्यंत रेखीव अशी गोरक्षनाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रदक्षिणा मार्गावर 'हिंगला देवी', 'श्री दत्तात्रेय' आणि ' मच्छिंद्रनाथ' यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरात जाण्यासाठी थोड्या पायऱ्या आहेत. तसंच आता मंदिरापर्यंत रस्ताही करण्यात आला आहे. त्यामुळं थेट मंदिरापर्यंत आपल्या वाहनानं जाता येतं.मंदिरात प्रवेश करताना एखाद्या गडावर प्रवेश करत असल्यासारखं वाटतं. कारण संपूर्ण मंदिराला एखाद्या किल्लयासारखीच तटबंदी केली आहे. आजूबाजूचा सारा परिसर शांत, हिरवागार निसर्गरम्य असाच आहे. डोगरावरुन पायथ्याच्या गावांचं विहंगम दृश्य दिसतं. अतिशय शांत, पवित्र आणि रमणीय असा हा मंदिर परिसर आहे.
आम्ही मंदिरात गेलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती. मंदिरात प्रवेश करुन 'गोरक्षनाथा'समोर नतमस्तक झाले आणि तृप्ततेबरोबरच एक वेगळीच अनुभूती आली. बरोबर नेलेला नैवेद्य अर्पण करुन प्रदक्षिणा घालून सभामंडपात थोडावेळ शांत बसलो. इथं येण्याआधी माझं नुकतंच परत एकदा 'नवनाथ भक्तीसारा'चं पारायण पूर्ण झालं होतं. त्यामुळं हे दर्शन घडणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. हे दर्शन घेऊन निघालो आणि रात्री आम्ही अंबाजोगाईला पोहोचलो. लगेचच मंदिरात गेलो. पण दर्शनाला भाविकांची खूपच मोठी रांग होती. मग बाहेरुनच दर्शन घेऊन मुक्कामी आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मंदिरात जाऊन 'योगेश्वरी देवी'चं दर्शन घेऊन, अभिषेक केला. नवरात्रानिमत्त दर्शनासाठी खूपच गर्दी होती. मात्र आमचा अभिषेक, दर्शन अतिशय सुंदर रितीनं घडलं. योगेश्वरी मातेचं दर्शन म्हणजे अपार तृप्ती आणि आनंद. खरंतर तिच्यासमोरुन बाजूला व्हावसंच वाटत नाही. बाळाला जसं सतत आईच्या कुशीत रहावंसं वाटतं अगदी तशीच भावना असते मातेसमोर. पण भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळं तिथं जास्त वेळ थांबता येत नाही.
योगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन पुढे परळीला आधी 'अंबा आरोग्य भवानी' मातेचं दर्शन घ्यायला गेलो. इथं 'नृसिंह सरस्वती' एक वर्ष गुप्त रितीनं राहिले होते. भवानी मातेच्या मंदिरातच बाजूलाच अगदी छोटासा मार्ग असलेलं (एकावेळी एक व्यक्तीच प्रवेश करु शकेल ) एक तळघर आहे. इथंच 'नृसिंह सरस्वती ' एक वर्ष वास्तव्यास होते. हि दोन्ही दर्शनं घेण्यासाठी आम्ही इथं गेलो. या मंदिरातही नवरात्रानिमित्त खूपच गर्दी होती. 'अंबा भवानी' मातेचं खूप सुंदर दर्शन आम्हाला मिळालं पण गर्दीमुळं नृसिंह सरस्वती यांच्या दर्शनाचा मार्ग बंद ठेवला होता. त्यामुळं 'नृसिंह सरस्वती' यांच्या दर्शनाचा योग यावेळी आला नाही. नवरात्राव्यतिरिक्त इथं फारशी गर्दी नसते. त्यामुळं 'नृसिंह सरस्वतींंचं' दर्शन सहज घेता येतं. आम्ही आधीही हे दर्शन घेतलं असल्यानं बाहेरुनच नमस्कार करुन आम्ही पुढे 'परळी वैजनाथा'च्या दर्शनाला गेलो. इथं फारशी गर्दी नसल्यानं बिल्वदलं, गंगाजल अर्पण करुन अतिशय सुंदर दर्शन घेता आलं. नवरात्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अतिशय सुंदर असा दर्शन योग आला आणि अतिशय समाधान वाटलं.
परळी वैजनाथाचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करुन सायंकाळी घरी परत आलो.
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment