टिपूर चांदणं पाहताच किती उल्हसित होतं ना मन आणि येते प्रिय व्यक्तीची आठवण.
चांदण्या रात्री सागरकिनारी फिरण्याची मजा काही वेगळीच. अमावस्येच्या रात्री धीरगंभीर भासणारा समुद्र पौर्णिमेच्या चांदण्यात मात्र अगदी उत्साहाने फेसाळणारा भासतो.
अशा चांदणराती सागरकिनारी फिरताना प्रिय व्यक्तीचा हात हाती असेल तर मग....
कधी टिपूर चांदण्या राती
जावे सहज सागरतीरावरती
ओल्या वाळूवरी मुक्त फिरावे
हलकेच पावलांचे ठसे उमटावे
तरंग उठती मग मनावरी
जशी लहर हलकी सागरावरी
होताच लाटांचा पावलाना स्पर्श
तनमनास होई असीम हर्ष
नभी टिपूर चांदणे चमचमते
समुद्री पाणी शुभ्र फेसाळते
अशात तू असता मजसंगे
मन वेडे माझे स्वप्नी रंगे
हात तुझा हाती असता जन्मभरी
भय न मजला कसले क्षणभरी
कधी टिपूर चांदण्या राती
जावे सहज सागरतीरावरती
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment