पारिजात नुसतं नांवही त्याच्या नाजूक सुगंधी फुलाइतकंच लयदार आहे ना. प्राजक्त, हरसिंगार, शिऊली, शेफालिका, रागपुष्पी, खरपत्रक, नालकुंकुमा ही या झाडाची आणखी काही सुंदर नांवं.
पण एक सुगंधी फुलाचं झाड एवढीच याची ओळख नाही बरं का. याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. पारिजातकाच्या पानांचा काढा मलेरिया, सांधेदुखी, गुडघेदुखी, सायटिका या आजारांवर उपयुक्त आहे.
पारिजातकाचं हे झाड, खरं तर वृक्षच हिमालयाच्या पायथ्याशी खूप जास्त प्रमाणात आणि इतरत्रही नैसर्गिक रित्या उगवतं. घराच्या अंगणातही हौसेने हे झाड लावलेलं पहायला मिळतं.
पारिजातकाचं हे सुंदर, बहुगुणी व स्वर्गीय झाड पृथ्वी वर कसं आलं याच्या काही कथा पुराणकाळापासून आपण ऐकत आलो आहोत. त्यातलीच एक कथा मी काव्यात गुंफली आहे.
हट्ट सत्यभामेचा असे पूर्ण जाहला
स्वर्गीय पारिजात तिच्या अंगणी फुलला
नाजूक गंधकेशरी पखरण होई अंगणी
मात्र अंगणातल्या महाली वसे रुक्मिणी
सौख्य प्राजक्ताचे दोघींस न लाभले
शोधिती मुळ अन कुठे पडती फुले
राहिली का अशीच प्रीतीची तृष्णा
जाणले ना कधी ह्रुदयीच्या कृष्णा
राज्ञीपद हरीने रुक्मिणी भामेस दिधले
परि असीम प्रेम कान्ह्याचे राधेस लाभले
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment