Pages

Saturday, January 2, 2021

दत्तजयंती - गिरनारी

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती असे दत्तगुरु

ॐ द्राम ॐ मंत्र तयांचा नित्य स्मरु


      यावर्षी दत्तजंयती किती तारखेला आहे एवढेच फक्त दिनदर्शिकेत पाहिले होते. दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी कुठे जायचा विचारही मनात नव्हता.

       नात्यांमधले विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम यातच मन गुंतलं होतं. त्या गडबडीतच एकदा काम करताना अचानक मनचक्षूंसमोर गिरनारच्या गुरुशिखरावरची श्री दत्तात्रेयांची अतिशय मोहक अशी मुर्ती साकार झाली. कामात गुंतलेले माझे हात आणि मन एकदम स्तब्ध झाले. अगदी काही क्षणांसाठी विद्युल्लता लखलखावी तसं झालं. आणि जाणिव झाली ती स्वयं दत्तगुरुंनी दिलेल्या संकेताची. दत्तजयंतीला गिरनार दर्शन आम्ही करावं हे तत्क्षणीच जाणवलं.

         गिरनारला जायचंच असं जरी मनाने ठरवलं तरी वेळेचा प्रश्न होता. पण अखेर त्यातून मार्ग काढून ऐनवेळी जायचं नक्की केलं. अर्थात आम्ही गिरनारला यावं ही स्वयं दत्तगुरुंचीच इच्छा असल्यामुळे जाणं शक्य झालं.

          दत्तजयंती दिवशी पहाटे गिरनार चढायला सुरुवात केली. रिवाजानुसार लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचे दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली. मग उत्साहाने पायऱ्या चढायला सुरुवात केली.

           पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि क्षणार्धात मन गुरुशिखरी दत्तगुरुंच्या चरणी पोहोचलं. का कुणास ठाऊक पण साधारण पाच-सहाशे पायऱ्या चढल्यावर उत्साहाची जागा संभ्रमाने घेतली. शरिराची साथ कमी पडतेय की काय असं वाटायला लागलं. परंतु मनाची जिद्द, सर्वांचं प्रोत्साहनआणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयं पवनपुत्रांनी दिलेली साथ यामुळे पुन्हा ऊत्साह वाढला.

              पहिल्या पायरीपासूनच तुफान वारा सुटला होता. जणू आमची प्रार्थना ऐकून स्वयं पवनपुत्रच आम्हाला गुरुशिखरी न्यायला आले होते. 

               अंबाजीमातेचं दर्शन घेऊन पुढे निघालो. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरुशिखरी पोहोचलो.


                दत्तजयंती निमित्त दर्शनासाठी खूप गर्दी होती. पण आम्हाला अतिशय सुंदर दर्शन झालं. ज्याक्षणी मी दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले त्याचक्षणी पापण्यांचे बंधन झुगारून आसू ओघळले. पहिल्या दोन्हीवेळेसारखंच यावेळीही मी अश्रु थांबवू शकले नाही. मन शांत तृप्त झालं.

                 दत्तगुरुंचे दर्शन घेऊन अखंड धुनीचे दर्शन घेतलं. दत्तजयंती निमित्त तिथे केलेल्या दत्तयागाच्या दर्शनाचा लाभ झाला त्याचबरोबर भोजन प्रसादाचाही लाभ झाला.

                  भोजन ग्रहण करुन परतीच्या मार्गाला लागलो.थोड्या वेळाने पहिल्या पायरीपासून आमच्यासमवेत असणारे पवनपुत्र अचानक गुप्त झाले. काही वेळाने नेहमीचा हलका वारा सुटला. आणि स्वयं हनुमानजीच एवढा वेळ आमच्यासमवेत होते याची परत एकदा खात्री पटली.


                    अंबाजीमातेच्या मंदिरापर्यत परत आलो. वेळेच्या कमतरतेमुळे आणि औत्सुक्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या रोप-वे ने गिरनारच्या पायथ्याशी पोहोचलो. रोप-वे ची अतिशय उत्तम सोय गिरनारला झाली आहे. अवघ्या दहा मिनिटांत पाच हजार पायऱ्या रोप-वे ने चढता उतरता येतात. अर्थात दहा हजार पायऱ्या चढा-उतरायचा अनुभव वेगळाच अन हवाहवासा वाटणाराच आहे.

                      गिरनार दर्शनाचा योग असाच नेहमी यावा आणि मन शांत तृप्त व्हावं हिच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.


अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

जय गिरनारी


                                                                          - स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...