कोल्हापूरपासून ६० किलोमीटरवर आणि नरसोबाच्या वाडी पासून अवघ्या २० किलोमीटरवर वसलेलं शिरोळ तालुक्यातील एक छोटसं गांव खिद्रापूर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेलं हे गांव.
या गावाला भेट द्यायची इच्छा आजवर काही ना काही कारणाने पुढे जात होती अखेर नुकताच तो योग आला आणि मनाला व दृष्टीला जणू शाही मेजवानीच मिळाली.
भारतीय स्थापत्य कलेतलं एक सुवर्णपर्ण म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. बाराव्या शतकात शिलाहार राजांच्या काळात बांधलेलं हे कोपेश्वराचं अप्रतिम, देखणं मंदिर.
मंदिराचा प्रवेशमार्ग अगदी साधाच. त्यामुळे सुरुवातीला आत काय पहायला मिळणार याची किंचितही कल्पना येत नाही. मात्र प्रवेशद्वारातुन शिरल्यावर आपल्या समोरच उभं असतं ते काळ्या पाषाणातलं अप्रतिम शिल्पमंदिर.
खरंतर मंदिरात प्रवेश केल्यावर आपण सर्वप्रथम देवदर्शन करतो. मात्र इथे आल्यावर मी आधी मंदिराच्या बाह्यभागाच्या निरिक्षणातच दंग झाले. अर्थात नंतर काही क्षणातच आत जाऊन आधी देवदर्शन घेतलं.
मंदिराची रचना ताऱ्याच्या आकाराची आहे. संपूर्ण मंदिर ९५ हत्तींच्या पाठीवर उभं आहे. प्रत्येक हत्तीच्या पाठीवर देवदेवता कोरलेल्या आहेत. पुर्ण मंदिरात अप्रतिम अशा कोरीवकामाने नटलेले १०८ खांब आहेत. आणि या सर्वावर कळस म्हणजे ४८ खांबांवर तोललेला १३ फुट व्यासाचा स्वर्गमंडप. आणि त्याखाली असलेली तेवढ्याच व्यासाची गुळगुळीत काळ्या पाषाणाचीच रंगशीळा. छतविरहित असा हा स्वर्गमंडप एकमेवाद्वितीय म्हणावा असाच आहे. त्या आकाशगवाक्षातून पहाताना अक्षरशः भान हरपून जातं. त्याच्या ४८ खांबांवरचं कोरीवकाम म्हणजे स्थापत्य कलेचा देखणा आविष्कारच. प्रत्येक खांब वेगळ्या पद्धतीने कोरलेला आहे. गोलाकार, चौकोन, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपल्याला प्रत्येक खांबात पहायला मिळतात.
मुख्य मंदिरापासून काहीसा विलग असलेला हा स्वर्गमंडप, त्यानंतर आच्छादित सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
कोपेश्वर म्हणजेच शंभू महादेव. अर्धांगिनी दक्ष कन्या सतीच्या जाण्याने दक्ष राजावर कोपलेला तो कोपेश्वर. त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे आले ते भगवान विष्णू. श्री विष्णूंचं नांव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि त्यांच्या बाजूलाच थोडा उंच धोपेश्वर.
गर्भगृहातील सर्व भिंती आणि खांबांवर अतिशय रेखीव अशा देवदेवता कोरलेल्या आहेत. गर्भगृहात प्रकाश थोडा कमी आहे. परंतु काही क्षणांनी आपल्याला मुर्तींचे व्यवस्थित अवलोकन करता येते.
मंदिराचा अंतर्भागच नाही तर बाह्यभागही अप्रतिम अशा शिल्पसौदर्याने सजलेला आहे. बाह्य भागावर व्याल, किर्तीमुख, गणेश, विष्णूचे अवतार, दुर्गा, सुरसुंदरी हे सारे अत्यंत रेखीव असे कोरलेले आहेत.
याचबरोबर मंदिराच्या बाह्य भागावर रामायण महाभारतातील काही कथाही कोरलेल्या आहेत. संपूर्ण मंदिरच अशा विविध प्रकारच्या शिल्पकलेने नटलेले आहे.
भारतीय स्थापत्यकला, विज्ञान, गणित, संस्कृती यांचा सुरेख संगम म्हणजे हे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. ९०० वर्षांपूर्वीही हे सारं किती प्रगत होतं याचं हे एक उत्तम उदाहरण.
मोगलांच्या आक्रमण काळात बऱ्याच मुर्तींचे चेहरे उध्वस्त केले गेले आहेत. पण तरीही मंदिराचे सौंदर्य अबाधित आहे.
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने हे मंदिर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव असं हे शिल्पमंदिर प्रत्येकाने आवर्जून पहावं असंच आहे.
- स्नेहल मोडक

No comments:
Post a Comment