आमच्या गिरनार यात्रेत गिरनार दर्शनानंतर आणखी काही तीर्थस्थानी आम्ही नेहमीच जातो. त्यातलंच एक स्थान द्वारका.
द्वारकाधिशांच्या द्वारकेचे गोमती द्वारका आणि बेट द्वारका असे दोन भाग आहेत. द्वारकाधिश गोमती द्वारका येथून राज्यकारभार चालवत होते. आणि बेट द्वारका येथे त्यांचे वास्तव्य होते. बेट द्वारका भर समुद्रात आहे. अर्थातच तिथे नावेतून जावे लागते. साधारण वीस मिनिटांचा नावेचा प्रवास आहे.
बेट द्वारकेला जाता येतानाच्या या छोट्या समुद्र सफरीचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच. ही छोटी सफर नितांतसुंदर बनवण्यासाठी आपल्या संगतीला असतात सुंदर समुद्रपक्षी. खूप मोठ्या प्रमाणात हे समुद्रपक्षी या नावेच्या प्रवासात आपल्याला पहायला मिळतात. शुभ्र पांढरा रंग अन पंखाजवळ थोडा राखाडी काळा रंग आणि कर्कश आवाज ही यांची ओळख.
मासे टिपण्यासाठी लांब अंतरापर्यंत उडत जाणे ही खासियत.
..

बेट द्वारकेला जाताना नावेत चढण्याआधी तिथे विक्रीस असलेले समुद्रपक्ष्यांचे खाद्य बरोबर घेतात. नाव किनाऱ्यापासून आत समुद्रात जाऊ लागते आणि मग सुरु होतो एक रमणीय खेळ. आपण घालत असलेले खाद्य खाण्यासाठी समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या नावेच्या आजूबाजूला ऊडू लागतात.हवेतल्या हवेतच खाद्य पकडून खाणारे समुद्रपक्षी पहाणे अतिशय मनोरंजक असते. आपण घातलेले खाद्य खाण्यासाठी मासे येतात आणि खरंतर त्या माशांना खाण्यासाठी हे समुद्रपक्षी आपल्या नावेबरोबर येतात. एकूणच अतिशय विलोभनीय दृश्य असते. या रमणीय खेळात नावेचा प्रवास संपवून आपण बेट द्वारकेला कधी पोहोचतो ते कळतही नाही.
समुद्रपक्षी सर्वत्र सहज आढळतात. मात्र इतक्या जवळून त्यांना पहाण्याची संधी बेट द्वारकेला जाता येताना नक्की मिळते. एकदा तरी हा अनुभव जरुर घ्यावा.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment