Pages

Monday, May 10, 2021

प्रिय झिंगु



       


        


        


            रात्रीचे सव्वादोन वाजले होते. मी नित्याप्रमाणे निद्रादेवीची आराधनाच करत होते. रोजच्या सारखी एवढ्या अपरात्रीही कावळ्यांची कावकाव सुरु होती. त्यात अजून एका आवाजाची भर पडली होती ती बुलबुलच्या कलकलाटाची.पण त्या सगळ्या आवाजांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत मी निद्रेच्या अधीन होण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात लेक विचारत आलीच बुलबुल एवढा कलकलाट का करतायत. मग मात्र थोडं लक्ष देऊन आवाज ऐकला आणि जाणवलं त्यातलं वेगळेपण.  नंतर मात्र लगेच आम्ही दोघी बाहेर गेलो. 

           समोरच दोन मांजरं दिसली आणि लक्षात आलं बुलबुल त्या मांजरांवरच ओरडतायत. आम्ही मांजरांना तिथून हाकलून दोन पावलं पुढे गेलो आणि आमचा अंदाज खरा ठरला. (बुलबुलचं पिल्लू ) तू घरट्यातून खाली पडला होतास आणि तुला पकडायला ती दोन्ही मांजरं आली होती. मी चटकन तुला उचलून घेतलं आणि ताबडतोब बुलबुलचा कलकलाट थांबला. अतिशय घाबरलेल्या तुला  शांत करण्याचा प्रयत्न केला. मग तुझं घरटं शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अर्थात घरटं सापडलंच नाही. मधल्या वेळेत लेकीने घरातून पुठ्ठयाचा छोटा खोका आणला होता. त्यात झाडाची पानं घालून तुला आम्ही त्यात ठेवलं होतं. मादी बुलबुल सारखी घिरट्या घालत शांतपणे बहुतेक आम्हाला घरटं दाखवायचा प्रयत्न करत होती. पण आम्हाला घरटं दिसलंच नाही. अखेर बुलबुलच्या जोडीला जाता येईल पण इतर कुणी जाऊ शकणार नाही याची काळजी घेत तुझ्यासहित तो खोका झुडुपात थोडा उंचावर ठेवला. बुलबुलच्या मादीला तिचं पिल्लू तिथं असल्याचं कळलंय याची खात्री करुन आम्ही घरात आलो.

           या सगळ्या प्रकारात पहाटेचे साडेचार वाजले होते. झोप येणं शक्यच नव्हतं. तासभर आराम करुन मी उठलेच. गुढीपाडवा होता त्यादिवशी. त्यामुळे कामांची जरा गडबडच होती. पण त्या गडबडीतही दोन-तीन वेळा तू झुडुपात सुरक्षित असल्याची खात्री करुन आले. दुपारी जेमतेम जेवण झालं आणि परत बुलबुलचा जोरदार कलकलाट सुरु झाला. बाहेर जाऊन बघितलं तर खोका झुडुपातून खाली पडला होता आणि तू दिसत नव्हतास. अखेर खूप शोधल्यावर जवळच्याच एका झाडाच्या बुंध्याशी तू सापडलास आणि मग मात्र मी तुला खोक्यात ठेवून सरळ घरात घेऊन आले. बुलबुलच्या जोडीला मी पिल्लू घरात आणल्याचं कळलं होतं ते दोघं खिडकीवर शांत बसून राहिले होते.

           तुला घरात आणलं पण आता खायला काय द्यायचं कळेना. मग एक लेक आंतरजालावर माहिती काढायला लागली तर दुसरी जवळच्या दुकानात ( पेट शॉप ) तुझ्यासाठी खाऊ आणायला धावली. नंतर तुला खोक्यासह खिडकीतल्या जाळीत सुरक्षित ठेवलं. तिथे बुलबुल तुला खाणं भरवायला सहज येऊ शकत होते. पण इतर पक्षी, मांजरं येणं शक्य नव्हतं.

           आपल्या घरात लहान बाळ आल्यावर जसं आपलं सगळं जग बाळाभोवती एकवटतं अगदी तसंच आम्हीही सतत तुझ्या भोवती राहू लागलो. सुरुवातीचे दोन- तीन दिवस तुला तळव्यावर घेऊन तुझ्या डोक्यावरुन हळूवार बोट फिरवलं की तू छान झोपायचास. ज्या सहजतेने तू झोपायचास त्या सहजतेने तुझं नामकरण झालं ' झिंगु '.

            तुला आम्ही न दिसता हाक मारली शीळ घातली तरी लगेच कळायचं आम्ही दिसेपर्यंत मान तिरकी करत करत तू आम्हाला शोधायचास आणि आमच्या हातावर येऊन बसायचास. तुला आमच्या तळहातावर आणि खांद्यावर बसायला फारच आवडायचं आणि आम्हालाही आवडायचं तुझं असं बिनधास्त खांद्यावर येऊन बसणं.  मादी बुलबुल दिवसभर खाणं आणून भरवायची तरी आम्हीही भरवायला हवं असायचं तुला. भात, पोळी, केळं, चिकू हे तुझं आवडतं खाद्य.याशिवाय मादी किडे-मकोडेही आणून तुला भरवत होती.

            तुझी वाढ आणि प्रगती हळूहळू सुरु होती. आम्हाला तू  मिळालास तेव्हा साधारण ८-१० दिवसांचा होतास. खरंतर १५-२० दिवसांचं पिल्लू बऱ्यापैकी उडायला लागतं. पण तेवढा अजून तू प्रयत्न करत नव्हतास. कदाचित उंचावरुन पडल्यामुळे तुझी प्रगती थोडी हळू होत असावी. तुला छान उडता यावं म्हणून आमच्यापरिने आम्ही प्रयत्न करतच होतो. तुला आकाशात छान विहरताना पहायचं होतं आम्हाला. मात्र तुझी मस्ती, उड्या मारणं छान सुरु होतं. छोट्या झाकणात ठेवलेलं पाणी प्यायला आणि मोठ्या डब्यातल्या पाण्यात मस्त खेळत अंघोळही करायला शिकला होतास तू.

            तुला खिडकीत ठेवल्यापासून भल्या पहाटे बुलबुलची जोडी खिडकीत यायची. आधी कलकलाटाने आणि मग मंजूळ स्वरांनी तुला आणि आम्हालाही उठवयाची. मग सुरु व्हायचा त्यांचा तुला  खाद्य भरवण्याचा कार्यक्रम. तुलाही  चार दिवसांत छान कंठ फुटला होता त्यामुळे तुही मस्त किलबिलाट करायचास. ८ मे च्या पहाटेही नेहमीप्रमाणे तुझ्या मंजुळ स्वरांनी मला जाग आली. मी उठून रोजच्या कामात गुंतले. पहाटेची कामाची गडबड संपवून मी तुझ्याजवळ आले.तुला खाणं देताच तुझं उड्या मारणं सुरु झालं. समोरच्या झाडावर बुलबुलची जोडी बघून तू उडायचा प्रयत्न करतोस का बघावं म्हणून तुला खिडकीच्या जाळीवर ठेवलं. लेक तुझ्याजवळ होती आणि मी तुझ्यावर लक्ष ठेवायला बाहेर गेले.  दोन तीन मिनिटांनी जोडीचा आवाज ऐकून तू उडायच्या ऐवजी खाली उडी मारलीस. आणि नुसत्या उड्या मारतच पुढे जाऊ लागलास .

                मांजराची चाहूल लागताच मी तुला उचललं आणि खिडकीत ठेवायच्या आतच तू माझ्या हातातून निसटलास आणि खाली उडी मारलीस. मी परत तुला उचलणार त्याक्षणीच नियतीने डाव साधला. मांजराच्या रुपात काळाने तुझ्यावर झडप घातली. मी तुला वाचवण्यासाठी मांजराच्या मागे धावले पण माऊ झाडावर चढून पलिकडे निघून गेलं. आमच्या डोळ्यांदेखत आमच्या झिंगुला माऊने कायमचं हिरावून नेलं. अतिशय लळा लावून तू पुढल्या प्रवासाला निघून गेलास. तुझा पुढला प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना. तू प्रत्यक्षात जरी आता या जगात नसलास तरी सदैव आमच्या स्मरणात राहशील.

            'जीवो जीवस्य जीवनम्' हा जरी सृष्टीचा नियमच असला तरी स्विकारणं कठीण आहे.         

            


अर्ध्या रात्रीच्या कलकलाटाने बाहेर पाहिलं

घरट्यातून खाली पडलेल्या तुला घरात आणलं

       भल्या पहाटे जागवायचास किलबिलाटाने

       नाही येत झोप खिडकीतल्या सुन्या घरट्याने

भरवत होतो खाऊ तुला करीत होतो रक्षण

एकाच  इच्छेने करु नये कुणी तुझे भक्षण

        पहात तुझी मस्ती ओंजळीत तुला घेत होतो

        सारा दिवस तुझ्याच अवतीभोवती रहात होतो

मुक्त गगनभरारी घेताना तुला पहायचं होतं

फांदीवर बसलेल्या तुला ओळखायचं होतं

         पंखातलं बळ पहाण्यासाठी क्षणभर तुला सोडले

         क्षणात माऊने तुजवर घातली झडप अन मी हरले

तुझ्यासाठी आकांताने धावले मी माऊच्या मागे

परि चपळाईने माऊ झाडावरून गेली छतामागे

         का रे इतका लळा लावूनी गेलास तू कायमचा

         जाताजाता मात्र झालास घास माऊच्या पिल्लाचा

 

- स्नेहल मोडक


No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...