सध्याच्या कोरोनाकाळात पर्यटनावर खूप निर्बंध घातले आहेत. अर्थात आपल्या सुरक्षिततेसाठीच हे निर्बंध असल्यामुळे पर्यटनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
कोकण + समुद्र + आंबे = मे महिना हे समीकरणही गेल्या वर्षापासून जुळवणं अवघड झालंय. वर्षासहलींचाही आनंदानुभव घेता येत नाहीय. गडकिल्ल्यांवर जाणे, समुद्र किनारी फिरणे सारं काही सध्या जवळजवळ बंद आहे.
कोकणात रहाणाऱ्या लोकांचा समुद्र हा नित्य जीवनाचाच एक भाग आहे. आपल्या मनोभावनेप्रमाणे प्रत्येक वेळी वेगळा भासणारा हा समुद्र वारंवार अनुभवण्यासारखाच असतो. पण काही कारणास्तव कोकणातून इतरत्र स्थायिक झालेल्या लोकांना समुद्र अधुनमधूनच अनुभवायला मिळतो.
पण सध्याच्या काळातला सागराचा हा दुरावा मात्र कधी संपेल याचीच सगळे लोकं वाट बघत असतील, हो ना?
विरह तुझा मज अपार झाला
सागरा कधी भेटशील मला
सरला काळ किती भेट न घडली
तव दर्शनाची आस मज लागली
अथांग निळजळी नौका डोलती
शुभ्र फेसाळ लाटा किनारी खुलती
जळात मत्स्य अन वरी समुद्रपक्षी
ओल्या वाळूत रेखिती खेकडे नक्षी
अस्ताचलास जेव्हा रविबिंब टेकते
सागर निळाई मग सोनवर्खी होते
उमटती पाऊलखुणा वाळूवरी
स्पर्शजलाने शहारा येई तनुवरी
वाळूत आठवणींची चित्रं रेखिते
कधी अलगद शंखशिंपले वेचिते
कातर हळव्या क्षणी स्तब्ध बसते
उत्फुल्ल क्षणी शुभ्र लाटांशी खेळते
येता किनारी तुझिया मी सुखावते
कधी ऐकत गाज निद्राधीन होते
किती काळ सुख हे ना लाभले
दुरुनही तुझे दर्शनही ना घडले
विरह तुझा मज अपार झाला
सागरा कधी भेटशील मला
- स्नेहल मोडक


No comments:
Post a Comment