Pages

Friday, July 2, 2021

मी एक झाड - शेवग्याचे

                     ऐका कथन आयुष्याचे

                 माझा जन्म एका मोठ्या गृहसंकुलाच्या आवारात झाला. तिथल्या कसदार मातीत मी छान रुजलो. दिसामाजी वाढू लागलो. बघता बघता माझ्या इवल्याशा रोपट्याचं झाडात रुपांतर होऊ लागलं. आवारात खूप हिरवाई असल्यामुळे विविध पक्ष्यांचा अधिवास होता. मी थोडासा मोठा होताच ते सगळे पक्षी माझ्याही अंगाखांद्यावर खेळू लागले, विसावू लागले. खूप खुश झालो मी. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटात दिवस कधी संपायचा कळायचही नाही.

                   सरत्या काळाबरोबर मी मोठा होत होतो. माझ्या फांद्याचा विस्तार आणि उंची छान वाढत होती. पक्ष्यांचं विसावणंही वाढलं होतं. त्याचबरोबर माझं अवनीशी जुळलेलं नातंही अधिक घट्ट, खोल झालं होतं.

                  अवघ्या काही काळातच माझं रुपांतर मोठ्ठया झाडात झालं अन एक दिवस माझ्या एका फांदीवर इवलीशी कळी आली. काही दिवसांतच कळ्याफुलांनी मोहरलो मी. आणि मग पक्ष्यांबरोबरच रंगीबेरंगी फुलपाखरं ही माझ्या फुलांभोवती रुंजी घालू लागली. खूपच सुखावलो मी. काही दिवसांनंतर हिरव्या लांबसडक आणि दळदार शेंगांनी अंगोपांग बहरलो.

                  कोवळी पालवी, फुलं आणि शेंगांचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित असल्यामुळे इथली लोकं माझ्या पानाफुलांचा आणि शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करत. दिवस खूप छान चालले होते. मी वारंवार शेंगानी बहरत होतो.  पक्षी, फुलपाखरं यांनाही माझा आधार हवासा वाटत असावा. माझ्या एका बाकदार फांदीवर एक बुलबुलची जोडी नियमित बसायची. हिंदोळ्यावर झुलल्यासारखं वाटायचं बहुधा त्यांना. फांदीवर बसून सुरेल कुजन करायची. खूप आवडायचं मला ते ऐकायला.

                  वादळ,वारा,पाऊस झेलत मी मुळं घट्ट रोवून ताठ उभा होतो बरेच वर्ष. अधुनमधून जोरदार वाऱ्यापावसात माझी एखादी फांदी तुटून बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर पडायची. पण कुणाचं काही नुकसान होत नव्हतं.  तसंच त्या घरातील कुणाचीही काही तक्रार नसायची. एकंदरीत माझा कुणाला त्रास नव्हता पण उपयोग मात्र नक्की होता. त्यामुळे माझं जगणं बहरणं सुखनैव सुरु होतं.

नुकत्याच होऊन गेलेल्या मोठ्या वादळानंतरही मी ताठ उभा होतो.

                   अचानक एक दिवस माझ्या बाजूला इमारतीबाहेरच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याचं काम सुरु झालं. यंत्राच्या सहाय्याने आधीचा कोबा तोडण्याचं काम सुरु झालं. आणि इतकी वर्षं मातीत घट्ट रुजलेल्या माझ्या मुळांना या यंत्राचे हादरे सहन करणं अवघड होऊ लागलं. पण तरीही मी धरणीच्या आधाराने घट्ट उभा होतो. मात्र इथल्या लोकांनाच बहुदा मी नकोसा झालो होतो. काम सुरु असतानाच एक दिवस मला काही कळायच्या आधीच माझी मुळं मातीतून अर्धवट वर काढली गेली आणि मुळांचा आधार सुटल्यामुळे मी बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर कलंडलो. खरंतर खूप घाबरलो होतो मी पण कशाचातरी आधार देऊन मला परत उभं करतील ती लोकं असं वाटत होतं. पण व्यर्थ होतं ते वाटणं. कारण लगेच त्यांनी माझ्या भोवती जाड दोर गुंडाळला आणि खाली खेचून मला धराशयी केलं. खूप तडफडलो मी पण बाजूच्या घरातल्या लोकांशिवाय इतर कुणालाही माझं तडफडणं जाणवलंही नाही. धराशयी होऊनही आशेवर होतो मी पण काही क्षणातच माझ्या साऱ्या फांद्या माझ्यापासून विलग केल्या गेल्या. आणि जमिनीवर माझा फक्त असहाय्य बुंधा उरला. 

                 मधल्या काळात माझं शेंगांनी बहरणं सुरु असताना माझ्या अगदी जवळच अजून एक माझंच रोप रुजलं होतं. तेही छान वाढत होतं. मी जेव्हा कायमचा उध्वस्त झालो तेव्हा बाजूचं लहान झाड उभं आहे ते तरी मोठं होईल याचं समाधान होतं पण चार दिवसांनीच अचानक ते झाडही माझ्या अजूनही जमिनीवर पडलेल्या बुंध्यावरच तोडून टाकलं आणि काही वेळातच आम्हा दोघांचही अस्तित्व कायमचं संपवलं.


                 वाचलंत ना कथन शेवग्याच्या झाडाचं? एक झाड तोडलं त्याची कसली कथा असा विचार मनात आला असेल ना? पण निसर्गाशी एकरुप होणाऱ्या, हिरवाईचं महत्व जाणणाऱ्या लोकांना असं नक्कीच वाटणार नाही. झाडांनाही भावना, जाणीव असते, त्यांनाही वेदना होतात हेही विज्ञानाने सिध्द केलंय. ' झाडे लावा, झाडे जगवा' याकडे दुर्लक्ष करुन सगळीकडे हिरवाई कमी / नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत. हे गृहसंकुलही याला अपवाद नाही असं खेदाने म्हणावं लागतंय. एवढं मोठं शेवग्याचं झाड तोडण्याचं कारण,' पडायलाच आलं होतं म्हणून पाडलं' असं सांगितल्यावर मनोवेदना अजूनच वाढली. नुकत्याच झालेल्या मोठ्या वादळातही ज्या झाडाची फांदीही न पडता ताठ उभं होतं ते झाड पडायला आलं होतं हे कारण खरं असू शकतं का? त्यानंतर दुसरं लहान झाड कुठलंही कारण न सांगता तोडलं तेव्हाही कुणी काही करु शकलं नाही.

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...