Pages

Thursday, August 19, 2021

ऋतु हिरवा

                    आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.


गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला

         फुलपाखरासम मी वनी विहरले

         तनामनास माझिया जणू पंख लाभले

स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले

जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले

        तरुवेली अन रानफुलांत मी रमले

        मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले

मन होऊन पाखरु आकाशी झेपावले

सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले

        तृप्त मनात अलगद गीत उमलले

        अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले

गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला


-स्नेहल मोडक

Monday, August 9, 2021

आला श्रावण श्रावण

                एक अतिशय नादमधुर शब्द म्हणजे श्रावण. गर्द पाचुचा साज ल्यायलेली अवनी म्हणजे श्रावण. व्रतवैकल्यं, लेकीसुना, सख्यासयांचं एकत्र जमणं म्हणजे श्रावण. उन पावसाचा सुंदर खेळ म्हणजे श्रावण. 

                भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण हे नांव देण्यात आलं. 

                 श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा / सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक वारी एखादं व्रत किंवा देवदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्री महादेवाच्या  उपासनेला विशेष महत्त्व आहे.

                 श्रावणात शिवामुठ वाहणे, मंगलागौर पूजन, जिवती पूजन या व्रतांबरोबरच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सारखे महत्वाचे सण साजरे केले जातात. या निमित्ताने लेकीसुना, सख्यासया एकत्र येतात. मांगल्याचं प्रतिक असलेला उत्साहाने भरलेला , घननीळ बरसणारा असा हा श्रावण.



खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा

       बरसूनी सरी सोनपिवळे उन पसरे

       अलवार नभी मग इंद्रधनू अवतरे

हिरव्या पाचूची धरतीवर होई शिंपण

रंगगंधीत फुलांची असे त्यावर गुंफण

        दरीडोंगरी वाहती अवखळ नितळ झरे

        नाद खळाळता तयाचा थेंबातूनी पसरे

दिवस नागपंचमी अन मंगळागौरीचे

सख्यासयांनी सहजमुक्त खेळण्याचे

        अर्पावे श्रीफळ सागरा नारळी पुनवेला

        सोहळा कान्ह्याचा होई जन्माष्टमीला

 खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

 थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा


- स्नेहल मोडक

Thursday, August 5, 2021

खेळ

                  भास आभासांचा, स्वप्नकल्पनांचा खेळ अविरत सुरु असतो मनात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद मनात सतत उमटत असतात. मन जसं क्षणात सुखावतं तसं क्षणात दुखावतंही. कधी हळवं होतं तर कधी वेदनेनं तळमळतं. कधी कुणाच्या विरहात कातर होतं तर कधी कुणाची आसुसून वाट पहातं. कधी भावनांच्या खेळात हरवतं तर कधी आठवणीत रमतं. न सांगताही आपल्या माणसाला आपलं मन कळावं असं प्रत्येकाला वाटत असतंच, हो ना?

                  .

रात्रंदिन खेळ चाले गूढ स्वप्नांचा

संपेल ना कधीही भास कल्पनांचा

       अविरत असे मनात कल्लोळ भावनांचा

       अलवार हलतो हिंदोळा स्वप्न कल्पनांचा

मिटल्या अधरी होई शब्दावीण संवाद

अबोल संकेत नयनातुनी घालती साद

        आस भेटीची नित्य मनास लागते

        स्वप्नातल्या जगी मन झोपेत जागते

गुंफूनी भावनांना सुरेल गीत मोहरते

मनीमानसी भावशब्दांच्या स्वप्नी रमते

         मुग्ध कळ्या भावनांच्या उमलतील का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

-स्नेहल मोडक

Sunday, August 1, 2021

मैत्री

            रेशीम बंधी, निरपेक्ष आणि हक्काचं नातं म्हणजे मैत्री. सदैव साथ देणारी, समजून घेणारी मैत्री कधी हक्काने रागावते, वादही घालते. पण तो राग वादावादी म्हणजे चहाच्या पेल्यातलं वादळच जणू. एका भेटीतच सारा रागरुसवा नाहीसा होतो. जिथं सगळ्या मनभावना व्यक्त करता येतात असं एकमेव नातं मैत्रीचं. अव्यक्त भावनाही जिला कळतात ती फक्त मैत्री. निरंतर विश्वासाचं नातं म्हणजे मैत्री. आयुष्यात असंख्य लोकांशी आपली ओळख होते, संबंध जुळतात पण घट्ट मैत्री मात्र काही जणांशीच जुळते. मैत्री म्हणजे जणू श्वासच.


सप्तसुर झंकारती जसे वीणेमधूनी

उलगडते मैत्रीही लयशब्दामधूनी

       उनपावसात जसे इंद्रधनू अवतरते

       लटक्या रुसव्यात मैत्री अधिक खुलते

गंध जसा चिरकाल असे बकुळीला

सुखदुःखात मैत्रीच असे सोबतीला

       दाटले मेघ बरसूनी जसे होती रिक्त

       व्यक्त होऊनी मैत्रीत व्हावे मन मुक्त

गंधभरले फुल चाफ्याचे जसे बागेतले

मैत्री म्हणजे अत्तर आठवणींच्या कुपीतले

       आदिपासून अंतापर्यंत एकच आस

       सदा असावी साथ मैत्री जणू श्वास


- स्नेहल मोडक





कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...