एक अतिशय नादमधुर शब्द म्हणजे श्रावण. गर्द पाचुचा साज ल्यायलेली अवनी म्हणजे श्रावण. व्रतवैकल्यं, लेकीसुना, सख्यासयांचं एकत्र जमणं म्हणजे श्रावण. उन पावसाचा सुंदर खेळ म्हणजे श्रावण.
भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण हे नांव देण्यात आलं.
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा / सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक वारी एखादं व्रत किंवा देवदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्री महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
श्रावणात शिवामुठ वाहणे, मंगलागौर पूजन, जिवती पूजन या व्रतांबरोबरच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सारखे महत्वाचे सण साजरे केले जातात. या निमित्ताने लेकीसुना, सख्यासया एकत्र येतात. मांगल्याचं प्रतिक असलेला उत्साहाने भरलेला , घननीळ बरसणारा असा हा श्रावण.
खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा
थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा
बरसूनी सरी सोनपिवळे उन पसरे
अलवार नभी मग इंद्रधनू अवतरे
हिरव्या पाचूची धरतीवर होई शिंपण
रंगगंधीत फुलांची असे त्यावर गुंफण
दरीडोंगरी वाहती अवखळ नितळ झरे
नाद खळाळता तयाचा थेंबातूनी पसरे
दिवस नागपंचमी अन मंगळागौरीचे
सख्यासयांनी सहजमुक्त खेळण्याचे
अर्पावे श्रीफळ सागरा नारळी पुनवेला
सोहळा कान्ह्याचा होई जन्माष्टमीला
खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा
थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment