श्रावणाचा मास सरे भादवा आला
खरंच श्रावण सरता सरता आपण सर्वजण भाद्रपद महिन्याची अतिशय आतुरतेने वाट पहात असतो. खरंतर सण आणि व्रतवैकल्यांनी श्रावण भरलेला असतो. पण आपल्या लाडक्या आराध्यदैवताचा, बाप्पाचा उत्सव भाद्रपद महिन्यात असतो. म्हणूनच आपण गणेश चतुर्थीसाठी, बाप्पाच्या सोहळ्यासाठी आसुसलेले असतो.
श्रावण संपायच्या आधीच गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झालेली असते. अगदी घराच्या साफसफाई पासून फराळाचे पदार्थ करणे, बाप्पासाठी सुंदर मखर, आरास करणे, पुजेची तयारी करणे सारं काही उत्साहात सुरु असतं.
भाद्रपद सुरु होतो आणि आधी येतं हरितालिका व्रत. भाद्रपद तृतीयेला हे व्रत करतात. पार्वतीमातेनं भगवान महादेव आपल्याला पती म्हणून लाभावेत यासाठी बारा वर्षं अरण्यात राहून कठोर तपस्या केली. भाद्रपद तृतीयेला नदीतीरी वाळूचं शिवलिंग स्थापून विविध फुलं, पत्री अर्पून पूजन केलं. उपवास, जागरण केलं. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
म्हणून भाद्रपद तृतीयेला सुवासिनी आणि कुमारिका सकाळी लवकर हरितालिका पुजन, दिवसभराचा उपवास, रात्री परत पुजन आणि थोडे खेळ खेळून, जागरण करुन हे व्रत करतात.
आणि मग वेध लागतात ते गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केलं जाणारं हे महत्त्वाचं धार्मिक व्रत आहे. गणपतीच्या अवतारांपैकी गणेश या अवताराचा जन्म यादिवशी झाला असं मानलं जातं. या दिवशी गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. षोडशोपचारी पूजा करुन विविध फुलं दुर्वा, पत्री वाहिल्या जातात.
भाद्रपद चतुर्थीला सकाळी लवकर गणरायाची अशी षोडषोपचारी पूजा संपन्न होते. आणि मग अथर्वशीर्षांच्या आवर्तनांच्या तालावर मोदक करुन होतात. एकवीस मोदकांसह नैवेद्याचं सुरेख ताट बाप्पाला अर्पण केलं जातं. सकाळ संध्याकाळ बाप्पाची पूजाअर्चा, नैवेद्य अशी यथासांग सेवा सुरु असते.
हरितालिकेच्या आणि गणपतीच्या पूजेला विविध फुलं, दुर्वा, पत्री लागतात. त्या खुडण्याच्या निमित्ताने आपलं निसर्गाच्या सान्निध्यात जाणं होत. या साऱ्या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचीही माहिती होते. श्रावण सरींनी मखमली हिरवाईची दुलई ल्यायलेल्या धरतीचं सुंदर रुप या निमित्ताने अनुभवता येतं.
गणांचा अधिपती अशा या गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरुपात लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सुरु केला.
काळाच्या ओघात गणेशोत्सव दिड, पाच, सात किंवा दहा दिवस साजरा केला जातो.
गणरायाची सेवा उत्साहात सुरु असतानाच आगमन होतं गौरींच. आणि मग बाप्पाच्या पूजेबरोबरच गौरीपुजनाचीही लगबग सुरु होते. या गौरी विहिर, तलाव, नदी अशा पाणवठ्यावरुन आणायच्या असतात त्या निमित्तानेही आपलं निसर्गाजवळ जाणं होतं.
अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असं हे तीन दिवसाचं व्रत आहे. याला ' ज्येष्ठागौरी व्रत ' असं म्हणतात. गौरींच पूजन वेगवेगळ्या स्वरुपात केलं जातं. सोन्या चांदीचे, पितळेचे मुखवटे, तेरडयाची एकत्र बांधलेली रोपं किंवा पाच खडे अशा वेगवेगळ्या पध्दतीने हे गौरी पूजन केलं जातं. अशा या सोन्याच्या पावलांनी येणाऱ्या ज्येष्ठागौरींचं व्रत अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी करतात.
गौरी आगमन, पूजन, सुवासिनी भोजन, विसर्जन हे सारं मनापासून केलं जातं.
यानंतर येते अनंत चतुर्दशी, विसर्जनाचा दिवस. दहा दिवस घरी आलेल्या बाप्पाला अतिशय जड अंतःकरणाने निरोप दिला जातो तो पुढल्या वर्षी लवकर परत येण्याचं आश्वासन घेऊनच.
भाद्रपद मासी असे खास गणेशचतुर्थी
दर्शन देण्या सदनी येई मंगलमूर्ती
करुनी औक्षण होई स्वागत गणरायाचे
विनायकासाठी सजे आसन खास मखराचे
तबकी हिरवी दुर्वादले जपाकुसुम रक्तवर्ण
विविध फुलपत्री लेऊनी सजे धुम्रवर्ण
करुनी षोडशोपचारी पूजा आरतीचा थाट
नैवेद्यासाठी अर्पण करावे मोदकांचे ताट
पूजन ओंकाराचे असे सुखद सोहळा
निमित्ते जमतो मैत्री नात्यांचा मेळा
उत्सव गिरीजात्मजाचा जरी खास असे
गणगोत जमल्याविना मात्र सुनासुना भासे
गणाधीशा तू सुखकर्ता तू दूखहर्ता
संकटी रक्षावे शरण तुला विघ्नहर्ता
लाभो आयुरारोग्य हेच ईशचरणी प्रार्थूया
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment