आपल्या सगळ्यांचच आयुष्य असंख्य स्वप्नांनी भरलेलं असतं. अर्थातच त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात तर काही मात्र अपूर्णच राहतात. पण काहिही झालं तरी आपण मात्र 'मी' 'माझं' या कोषातंच गुंतून रहातो. खरंतर निसर्गही आपल्याला 'मी' पण विसरुन जगायची शिकवण देत असतो. निसर्ग स्वत: रिक्त होऊन आपल्याला सारं काही भरभरून देत असतो. आपल्यालाही असं 'मी' पण विसरुन जगता आलं तर...
आयुष्यात कधी पान अळवाचे व्हावे
विसरुन मानापमान सारे निर्लेप व्हावे
आयुष्यात कधी नितळ जल व्हावे
सुखदुःखात अलगद विरघळावे
आयुष्यात कधी अथांग सागर व्हावे
जीवन भरती ओहोटीसम जाणावे
आयुष्यात कधी झाड प्राजक्ताचे व्हावे
लयलूट सुगंधाची करुनी रिक्त व्हावे
आयुष्यात कधी स्वच्छंद विहग व्हावे
क्रोध मोह सोडूनी मनमुक्त विहरावे
आयुष्यात कधी छान फुलपाखरू व्हावे
रंग ठेवूनी मनामध्ये क्षणात उडूनी जावे
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment