लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. याआधी तो जम्मू काश्मीर चा एक भाग होता. लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे असून ते पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.
हिमालयातील चहूबाजूंनी दिसणारी उंचच उंच हिमाच्छादीत गिरीशिखरं, खोल दऱ्या, त्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या नितळ निळ्या पाण्याच्या नद्या, अवतीभवती असलेली हिरवाई, दुर्गम रस्ते, अनोखी भूरुपे अशा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा लेह लडाख. याचमुळे लडाखला गेल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव येतो.
सुर्योदयाचा अप्रतिम नजारा पहात आम्ही पहाटे लेह विमानतळावर उतरलो. कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणारी बर्फाच्छादीत गिरीशिखरं पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. विमानातून उतरण्याआधीच लेहचं तापमान ६ अंश असल्याचं सांगितलं होतं. अर्थात आम्ही थंडीपासून संरक्षण करण्याच्या पूर्ण तयारीनेच गेलो होतो. विमानतळावरुन आम्ही रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आणि तो संपूर्ण दिवस आराम केला. संध्याकाळी अर्धातास जवळच्या भागात थोडंसं फिरुन आलो. ११५०० फुट उंचीवर असलेल्या लेह मध्ये रहाण्यासाठी आपलं शरीर अनुकूल होणं ( high altitude acclimatization) गरजेचं असतं. एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी थोडी कमीच असते. त्यामुळे लेहला पोचल्यावर एक दिवस संपूर्ण आरामाची गरजच असते.
दुसऱ्या दिवसापासून आमचं स्थलदर्शन सुरु झालं. सर्वात आधी लेहमधल्या हेमिस येथील बौद्ध मठ पहायला आम्ही गेलो. हा मठ लेहपासून साधारण ४५ किमी अंतरावर आहे. अकराव्या शतकातील हा मठ लडाखमधील सर्वात श्रीमंत मठ समजला जातो. दरवर्षी इथे जूनमध्ये हेमिस फेस्टिव्हलचे आयोजन केलं जातं. त्यावेळी हजारो पर्यटक इथे हजेरी लावतात. हा मठ पहायला बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं. लाकडी कोरीव काम केलेल्या इमारती, शांत पवित्र वातावरण अगदी अनुभवण्यासारखं.
यानंतर आम्ही पोहोचलो शे पॅलेस पहायला. इथेही खूप वरपर्यंत पायऱ्या चढून जावं लागतं. १६ व्या शतकातली मठ आणि बाजूलाच खास उन्हाळ्यात रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा असं याचं स्वरुप आहे. इथे शाक्यमुनी बुध्दाची लडाखमधील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची रेखीव मूर्ती आहे. सोनं आणि तांबं या धातूंच्या मिश्रणातून ही मूर्ती घडवली आहे. या मठाच्या बाजूलाच असलेला पॅलेस राजा नामग्याल यांनी बांधलाय. मात्र आता तिथे खूप काही पहाण्यासारखं नाही.
हे सारं पाहून त्यादिवशी लेहमध्येच मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो नुब्रा खोऱ्याकडे. इथे जाण्यासाठी खारदुंग-ला ही सर्वात उंच खिंड पार करावी लागते. वाहनाने जाता येईल अशी ही सर्वात उंचावर असलेली, श्योक खोरं आणि नुब्रा खोरं यांना लेह शहराशी जोडणारी ही खारदुंग-ला खिंड वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. १८००० फूट ऊंचीवर असलेल्या या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असल्यामुळे इथे १५-२० मिनीटांवर थांबणं अशक्य असतं.
ही खिंड पाहून पुढे गेल्यावर येतो तो दिस्किट मठ. इथेही खूप साऱ्या पाय-या चढाव्या लागतात. १४ व्या शतकातील या मठातही अतिशय शांत पवित्र वातावरण आहे. या मठात बुध्दाचा ३२ मी. उंचीचा सुवर्ण पुतळा आहे. या मठाच्या जवळच मोकळ्या जागेवर मैत्रेय बुध्दाचा १०६ फुट उंचीचा सुंदर पुतळा आहे.
यानंतर आम्ही पोहोचलो ते नुब्रा खोऱ्यातील वाळवंटात. ज्याला हिमालयातील थंड वाळवंट म्हटलं जातं ते सॅन ड्यून किंवा कोल्ड डेझर्ट. अतिशय अप्रतिम आणि विस्तिर्ण असं हे वाळवंट. फक्त इथेच आपल्याला भारतातील एक आश्चर्य पहायला मिळतं ते म्हणजे मंगोलियन जातीचे दोन कुबड असलेले उंट. हे उंट पहायला आणि त्यावर बसून फिरायला पर्यटक इथं नेहमीच गर्दी करतात. हे सारं पाहून आम्ही जवळच असलेल्या हुंदेर या छोट्या गावातील रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.
सकाळी लवकर निघालो भारत पाकिस्तान सीमारेषेवरचं शेवटचं थांग हे गाव पहायला. या छोट्या गावातून पायवाटेने चालत या गावतील घरं, लोकं, त्यांचं रहाणीमान हे सारं पहात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. तिथून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला भारत-पाक सीमारेषा पहाता येते.
ते पाहून आम्ही थांग जवळच्या तुरतुक या भारत पाक सीमारेषेवरच्या दुसऱ्या गावात पोहोचलो. हे भारतातील शेवटची चौकी असलेलं ठिकाण आहे. यापुढे पाकिस्तान मधील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग सुरु होतो. १९४७ च्या युध्दात तुरतूक गावावर पाकिस्तानने कब्जा केला होता. नंतर १९७१ साली झालेल्या युध्दात भारताने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. श्योक नदीवरील पूल पार करुन गावातून पायवाटेने चालत इथल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता येतं. इथंही दुर्बिणीच्या सहाय्याने भारत पाक सीमारेषेवरच्या दोन्ही देशांच्या चौक्या पहाता येतात. हे एकच ठिकाण असं आहे की जिथे पाकिस्तानची चौकी आपल्या चौकीपेक्षा थोडीशी उंचावर आहे. ते पाहून परत फिरताना वाटेत एक छोटं संग्रहालय आहे. त्यातून बाल्टि लोकांच्या संस्कृतीचा परिचय होतो. पुलाच्या दुसऱ्या बाजूला अजून एक लहानसं संग्रहालय आहे. मुळात तो एक लहानसा राजवाडा होता. तोच आता संग्रहालय म्हणून ओळखला जातो. बाल्टिस्तानच्या राजाने खास उन्हाळ्यात फक्त ३ महिने रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा. आता तिथे त्या काळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, राजगादी हे पहायला मिळतं. हे पाहून आम्ही परत हुंदेरमधल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच पॅनगाॅंग लेक च्या दिशेने निघालो. याआधीच्या साऱ्या प्रवासातले रस्ते अतिशय वळणाचे, चढ उताराचे, एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या असे असले तरी ठिक होते पण पॅनगाॅंग सरोवराकडे जाणारा रस्ता मात्र फारच खराब होता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही तर नुसत्या दगडातूनच जावं लागतं. अर्थात याला तिथली परिस्थिती कारणीभूत आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ता नीट राहणं अशक्यच. तसंच रस्त्याचा काही भाग प्रत्क्ष नदीपात्रातून जात असल्यामुळेही नुसता दगडाळ आहे. पण तरीही विलक्षण अशा निसर्ग सौंदर्यामुळे हा त्रास बिलकुल जाणवत नाही. हिवाळ्यात बर्फवृष्टीत मात्र हा मार्ग बंद होतो. थोडं आधीपासूनच आपल्याला पॅनगाॅंग सरोवराचं दर्शन घडू लागतं. जेव्हा प्रत्यक्ष त्या सरोवरापाशी आपण पोहोचतो तेव्हा अक्षरशः भान हरपून पाहत राहतो. स्फटिकासारखं नितळ निळंशार पाणी आणि एका बाजूने असलेल्या पर्वतरांगा असलेलं हे अतिशय अप्रतिम असं हे सरोवर साऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे सरोवर खाऱ्या पाण्याचं असूनही हिवाळ्यात पूर्णपणे गोठतं. या सरोवराचा ३० टक्के भागच आपल्या भारतात आहे , उर्वरित ७० टक्के भाग चीनमध्ये आहे. हे अप्रतिम सरोवर पाहून आम्ही लेह येथे मुक्काम करण्यासाठी निघालो. पॅनगाॅंग सरोवर पाहून लेह ला येताना चांगला खिंड पार करावी लागते. ही खिंडही १७००० फूट उंचीवर आहे. इथेही ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे १५-२० मिनीटांपेक्षा जास्त थांबणं शक्य होत नाही.
लेह ते नुब्रा व्हॅली या संपूर्ण प्रवासात आपल्याला श्योक नदी सदैव साथ देते.
पॅनगाॅंग सरोवर ते लेह या पूर्ण प्रवासात लांब पर्वतमाथ्यांवर उतरलेले ढग आणि सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. लेहला लवकर पोहोचलो म्हणून खरेदीसाठी मार्केटमध्ये जायचं ठरवलं पण पूर्ण प्रवासातलं ढगाळ वातावरण लेहमध्ये ही अवतरलं होतं. तिथेही दूरवरच्या डोंगरात सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी दिसत होती. गार वारा सुटलेला व थंडीचा कडाका वाढला होता. रात्रीतून तापमान उणे अंशात जाणार असल्याचं जाणवलं आणि मार्केटला जाणं रद्द केलं.
कारगिलहून सकाळी लवकर निघून पोहोचलो लामायुरु मठात. हा मठही खूप पूर्वीच्या काळातील आणि सर्वात मोठा आहे. इथे सर्वात जास्त प्रमाणात बौद्ध भिक्षू वास्तव्यास आहेत. या मठात जाण्यासाठी मात्र अगदी थोड्याच पाय-या चढाव्या लागतात.
लामायुरु आणि आसपासचा भाग मूनलॅण्ड म्हणून ओळखला जातो. इथल्या अविश्वसनीय अशा वेगळ्या भौगोलिक रचनेमुळे या भागाला मूनलॅण्ड म्हणतात. अतिशय वेगळ्या प्रकारचे पर्वत आणि दरीखोरं इथे पहायला मिळतं.
यानंतर आम्ही पोहोचलो संगम येथे. इंडस आणि झंस्कार या दोन नद्यांचा हा संगम अतिशय सुंदर आहे. या संगमाच्या बाजूला उथे आहेत थंड वाळवंटातील पर्वत. इंडस ही संपूर्ण उत्तर भारतातून वाहणारी नदी आणि तिला मिळणारी लडाखमधील झंस्कार नदी. हा संगम लडाखमधील निमू गावात होतो. ही झंस्कार नदी हिवाळ्यात जेव्हा पूर्ण गोठते तेव्हा तिच्यावरुन पूर्ण चालत जाता येतं. हा चादर ट्रेक या नावानं प्रसिद्ध आहे. यासाठी दरवर्षी इथे खूप लोक जातात.
तिथून पुढे निघून पोहोचलो ते मॅग्नेटिक हिल येथे. लेह- श्रीनगर मार्गावरील उंच सखल भूपृष्ठ असलेलं हे ठिकाण आहे. इथे उताराच्या दिशेने गियर विरहित स्थितीत उभी केलेली गाडी चढावाच्या दिशेने जाताना पहायला मिळते. चमत्कारारीक आणि दृष्टीभ्रम अशी वाटणारी ही घटना पहाण्यासाठी पर्यटक इथे येतात.
लेह ते द्रास या पूर्ण प्रवासात आपल्याला इंडस नदीचं सुंदर दर्शन होत रहातं.
यानंतर परत आम्ही लेहला मुक्काम करण्यासाठी आलो.
दुपारीच लेहला पोहोचलो होतो. त्यादिवशी वातावरणही एकदम ठिक असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणं शक्य झालं. लेहचं मार्केटही पहाण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. अतिशय गजबजलेल्या या मार्केटमध्ये स्थानिक लोकांबरोबर पर्यटकही आवर्जून खरेदी करतात. इथे तिबेटी कलाकुसरीच्या विविध वस्तू, चांदी व इतर धातूंच्या वस्तू, मूर्ती, पश्मिना शाली, जर्दाळूचं तेल व जाम, सुकवलेले जर्दाळू, इतर सुकामेवा, गालिचे, ध्यानधारणेसाठी उपयुक्त धातूचे सिंगींग बाऊल्स इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.
संपूर्ण प्रवासात प्रचंड थंडी होती. ६ अंशापासून सुरु झालेलं तापमान कारगिल मुक्कामात -२ अंशावर आलं होतं. परंतु आम्ही पूर्ण तयारीनिशी गेल्यामुळे थंडीचा आणि कमी ऑक्सिजन पातळीचा आम्हाला बिलकुल त्रास झाला नाही. आणि त्यामुळेच लेह लडाखचं विलक्षण पण नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य आम्हाला मनसोक्त अनुभवता आलं.
पुन्हा पुन्हा जावं असं वाटणारं लेह लडाख म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. प्रत्येकाने किमान एकदातरी नक्की अनुभवावं.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment