दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांमधून झालीय. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ याचा संपूर्ण अर्थ म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजेच दीपावली. दीपावलीस अजूनही वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. निलमत पुराणात हा सण दीपमाला या नावाने ओळखला जातो. दीपावलीचं मूळ नांव यक्षरात्र होतं असं हेमचंद्रानी नोंदवलंय. कनोजचा राजा हरिश्चंद्र यानी दीपप्रतिपदुत्सव असं या सणाला नांव दिलं होतं.
अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस दिवाळी सणाचे असतात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. तिमीर दूर करुन प्रकाश देणारा दीप मांगल्याचं प्रतिक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्याही जीवनातील अंध:कार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. आनंद, कृतज्ञता, सौख्य समृध्दी यांच प्रतिक म्हणजे दीपावली. रंगावली, पणत्या, आकाशकंदील, रोषणाई या साऱ्यांनी घर सुशोभित करतात. गोड अन खमंग फराळाचे पदार्थ नैवेद्यासाठी आणि सर्वांसाठी केले जातात.
अश्विन वद्य द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखला जातो. वसु म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे म्हणजे द्वादशी. यादिवशी सवत्स धेनूची पूजा करुन पुरणाचा नैवेद्य दिला जातो.
अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी म्हटलं जातं. यादिवशी घरातील द्रव्यायालंकारांची पूजा करतात. अपमृत्यू टळावा यासाठी यादिवशी यमदीपदान केलं जातं म्हणजे सायंकाळी दाराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावतात. या दिवसाला धन्वंतरी दिन म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजनही केलं जातं.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करुन प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं होतं त्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहाटे अभ्यंगस्नान करतात. तैलमर्दन करुन, सुवासिक उटणं लावून सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. अलक्ष्मीचं मर्दन करुन आपल्यातील अहंभाव नष्ट होऊन आत्मतेज पसरावं हा उद्देश असतो.
अश्विन अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मी ही चंचल आहे असा समज आहे. ती स्थिर रहावी म्हणून तिचं पूजन केलं जातं. द्रव्य आणि सुवर्णालंकारांची पूजा यादिवशी केली जाते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा करतात. यादिवशी बलीराजाची पूजा करुन इडा पिडा टळो आणि बलीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. तसंच यादिवशी सुवासिनी पतीला औक्षण करतात. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भावाबहिणीच्या अतूट रेशमी नात्याचं प्रतिक असा हा सण. या दिवशी यम आपली बहिण यमी हिच्याकडे जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया या नावानंही ओळखतात. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते आणि भाऊ औक्षणानंतर ओवाळणी देऊन बहिणीचा सन्मान करतो.
रात्रभर जागून सर्वांनी मिळून तयार केलेला आकाशकंदील आणि फराळ, सगळीकडे केलेली पण्त्या आणि रांगोळ्यांची आरास, भल्या पहाटे उठून केलेलं अभ्यंगस्नान, मंदिरात जाऊन घेतलेलं देवदर्शन आणि त्यानिमित्ताने पाहिलेले सगळीकडचे आकाशकंदील, फटाक्यांची आतिषबाजी, पहाटे आकाशवाणीवरुन ऐकलेली दिवाळीची विशेष गाण्यांची मैफल यात कालानुरुप थोडा बदल झालाय खरा. पण तरीही अतिशय उत्साहाचा, सौख्य समृध्दीचा असा सण म्हणजेच दीपावली.
अंध:काराचा नाश करुन तेजाने लखलखणारी, सौख्यमयी, आनंदमयी हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी. आपल्या सर्वांच्या जीवनात हा तेजाचा लखलखाट सदैव रहावा.
..
सरले नवरात्र अश्विनही सरत आला
लक्ष लक्ष दीप लावित कार्तिक आला
उष्णवात संपूनी शीतलता आली
रखरखती अवनी शांत जाहली
आकाशदिव्यांनी आसमंत सजले
दीप रंगावलीने अंगणही उजळले
खमंग मधुर फराळाचे ताट भरले
आस्वाद घेण्या गणगोत हे जमले
सुरु होतसे दीपावली अभ्यंगस्नाने
होते धनवृद्धीही मंगल लक्ष्मीपूजने
बली प्रतिपदा हा कार्तिक प्रथमदिन
औक्षणे पूजने मागावे नित्य सुदिन
बहिणभावाच्या घट्ट रेशमी नात्याचा
दिवस असे तो खास भाऊबीजेचा
फराळ आतिषबाजी लक्ष दिवे रंगावली
भासते उत्फुल्ल नित्य नवी दीपावली
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment