गिरनार परिक्रमा वर्षातून फक्त एकदाच कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात करता येते. गतवर्षी कोविड निर्बंधांमुळे परिक्रमा होऊ शकली नाही. त्यामुळे या वर्षीच्या परिक्रमेची सारेच दत्तभक्त आसुसून वाट पहात होते.
आम्हीही वेळेतच रेल्वेचं आरक्षण केलं होतं. यावेळी आमच्याबरोबर आधीपेक्षा जास्त लोकं दर्शन आणि परिक्रमेसाठी येणार होती. साहजिकच सर्वाच्या एकत्रित यात्रेची सर्व व्यवस्थाही आधीच केली. आणि यात्रेला जायच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पण यावर्षीही परिक्रमेला परवानगी नसल्याचं स्पष्ट झालं आणि मन थोडं नाराज झालं. त्याच नाराजीतून एक दिवस मनात परिक्रमा नसेल तर यात्रा करण्यात काय अर्थ आहे असा विचार आला. कारण इतर वेळी दर्शन घडत असतंच. फक्त परिक्रमा वर्षातून एकदाच. मन बेचैन असतानाच 'सारं मनासारखं होईल, दर्शनाला ये' अशी जाणीव मनाला कुणीतरी करुन दिली, आणि तो भास होता कि अजून काही हा विचार न करता यात्रेला जायचं नक्की ठरवलं.
ठरलेल्या दिवशी रेल्वेने सर्वांचा एकत्रित प्रवास सुरु झाला. आमच्याबरोबर काही सहकारी मित्र यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच त्यांच्या सहकार्यामुळेच एवढ्या लोकांच्या यात्रेचे सेवा म्हणून आयोजन करणं शक्य होतं.
प्रवासातील सर्वांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ती जबाबदारीही एका मित्रानी घेतली होती. पण काही कारणानं ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि आमची गाडी सुटली. पुढील स्थानकात ही गाडी गाठण्यासाठी ते निघाले पण गर्दीमुळे तिथेही ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि त्या स्थानकावरुनही आमची गाडी पुढे निघून गेली. मग मात्र बाकिच्या सहकाऱ्यांची काळजी वाढली. एवढ्या लोकांसाठी बनवलेलं अन्न तर वाया जाणार आणि त्या मित्राची यात्राही चुकणार असं वाटू लागलं. मग ते अन्न तिथेच संस्था, मंदिर अशा ठिकाणी देऊन त्यांनी तरी दुसऱ्या गाडीने जुनागढला पोहोचावे असा विचार करत असतानाच दुसऱ्या गाडीची माहिती मिळाली. ती गाडी लगेच सुटणारी होती. ताबडतोब ते सहकारी सामानासहित त्या गाडीजवळ पोहोचले. त्या गाडीत चढायला आजूबाजूला असलेल्या लोकांनी आपणहून मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार वाटेत ती गाडी आमच्या गाडीच्या पुढे निघून गेली, आणि आम्हाला थोडं बरं वाटलं. सुरतला ते सामानासहित आमच्या गाडीत चढले आणि सर्वांची काळजी संपली. सर्वांनीच मनापासून श्री दत्तगुरुंना नमस्कार केला. पहिल्यांदा जेव्हा त्यांना गाडी चुकली तेव्हाच साऱ्यांना काळजी वाटू लागली होती. दुसऱ्या स्थानकातही जेव्हा गाडी गाठणं त्यांना अशक्य झालं तेव्हा सर्वांच्या काळजीची जागा चिंतेनं घेतली होती. पण का कुणास ठाऊक मी मात्र शांत होते. माझं अंतर्मन मला सांगत होतं ते सहकारी जेवणासहित वेळेत आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. दुसऱ्यांदाही गाडी गाठता आली नाही मग आता ते कसे आपल्यापर्यंत पोहोचणार याची यत्किंचितही कल्पना मला नव्हती पण ते पोहोचणार याची मनाला खात्री होती आणि अगदी तसंच घडलं ते वेळेतच आमच्यापर्यंत जेवणासहित पोहोचले ही श्री दत्तगुरुंनी दिलेली एक अनुभूतीच.
दुसऱ्या दिवशी पहाटे जुनागढला पोहोचलो. तिथून भवनाथ तलेटी येथे आम्ही आधी आरक्षित केलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सारं भराभर आवरुन लगेच गुरुशिखर दर्शनाला निघालो.
गुरुशिखरावर दर्शनाला जाण्यासाठी उडन खटोलाचंही आधीच आरक्षण केलं होतं. पण तिथे जाण्याआधी रिवाजाप्रमाणे पहिल्या पायरीजवळ जाऊन श्री मारुतीरायाचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन आणि पूजा, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ आलो. खूपच गर्दी होती पण आधी आरक्षण केलं असल्याने लगेचच आम्हाला उडन खटोलाने अंबाजीटुक पर्यंत जायला मिळालं. अंबाजीटुकला पोहोचलो, अंबामातेचं दर्शन घेऊन लगेच पुढे निघालो. थोड्याच वेळात गोरक्षनाथटुक ला पोहोचलो. त्याचदिवशी गोरक्षनाथ जयंती होती. अतिशय छान योगायोग होता. गोरक्षनाथांचं अतिशय छान दर्शन घडलं. तिथं जरा थांबून परत पुढे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. श्री दत्तात्रेयाच्या चरणी नतमस्तक झाले आणि साऱ्या देहात चैतन्याची सुक्ष्म थरथर जाणवली. साऱ्या चिंता थकवा क्षणात नाहीसा झाला. गर्दी खूपच होती तरीही अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि तृप्त झाले. नंतर पायऱ्या उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. तिथे प्रत्यक्ष पादुकांवर मस्तक टेकवून दर्शन घेता येतं. ते दर्शन घेऊन अन्नछत्रासाठी धान्य, रक्कम अर्पण करुन प्रसाद घेण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. तिथे सकाळची वेळ असल्याने शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद ग्रहण करुन वरच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या सभागृहात आलो. पण काही कामासाठी ते सभागृह बंद होते त्यामुळे त्याबाहेर बसूनच थोडंसं गुरुचरित्र वाचन केलं आणि प्रसन्न चित्ताने परतीच्या मार्गाला लागलो. परत एकदा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक पर्यंत आलो. अंबामातेचं दर्शन घेऊन उडनखटोलाने तलेटी मुक्कामी पोहोचलो. अतिशय सुंदर दर्शन आणि प्रसाद मिळाल्यामुळे जेवायची इच्छाच नव्हती. त्यामुळे थोडा आराम केला.
संध्याकाळी पुढील दर्शनासाठी सोरटी सोमनाथ ला निघालो. त्याआधी मार्गातील भालका तीर्थ इथे दर्शनाला गेलो. वृक्षतळी विश्रांतीसाठी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या पावलाला एका पारध्याने मारलेला बाण चुकून लागला आणि मानवदेहधारी श्रीकृष्णानी तिथेच अंतिम श्वास घेतला ती जागा म्हणजेच भालका तीर्थ. तिथे आता तलाव म्हणजेच तीर्थ आणि बाजूलाच प्रशस्त रेखीव मंदिर आहे. मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेले असताना बाण लागलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे आणि पायाशी मस्तक झुकवलेल्या अवस्थेतील पारध्याची मूर्ती आहे. हे दर्शन करुन पुढे सोरटी सोमनाथांचं दर्शन घेतलं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे सोमनाथ मंदिर. हे दर्शन करुन तलेटी मुक्कामी परत आलो.
कार्तिकी एकादशीच्या आधी पंधरा दिवसांपर्यंत यावर्षीही परिक्रमेला परवानगी नव्हती. पण आठवडाभर आधी निर्णय बदलला आणि फक्त साधू - संत अशा चारशे लोकांनाच परिक्रमा करता येईल. फक्त तीन दिवस आणि पहाटे चार ते सात या वेळेत च परिक्रमेला सुरुवात करता येईल असं जाहीर करण्यात आलं. पण त्यात बाकी लोकांना जायला मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळे सगळेच भाविक नाराज होते. माझ्या मनात मात्र परिक्रमेविषयी संदेह नव्हता. आमची यात्रा द्वादशीला सुरु होणार होती. त्यामुळे तोपर्यंत नक्की काहीतरी श्री दत्तगुरु कृपेने घडणार आणि ते आमच्याकडून परिक्रमा पूर्ण करुन घेणार यावर माझा विश्वास होता. परिक्रमा एकादशी ला रात्री बारा वाजता सुरु होते. त्याआधी रात्री अकरा वाजता आम्हाला निरोप मिळाला. आम्ही ज्या आश्रमात उतरणार होतो तिथल्या प्रमुखांनी परिक्रमेला सर्व लोकांना परवानगी मिळाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या बरोबर येणाऱ्या सर्वाना ही बातमी कळवली आणि सर्वांच्या मनात उत्साह संचारला.
गुरुशिखर दर्शन आणि सोमनाथ दर्शन करुन दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पहाटे चार ते सात यावेळेतच सुरु करायला परवानगी देण्यात आली होती. दरवर्षी परिक्रमेत भाविक चार दिवस वास्तव्य करतात. परिक्रमा मार्गात खाऊ आणि पाणी मिळण्यासाठी छोटी दुकानं असतात. पण यावर्षी ही दुकानं आणि वास्तव्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानगी नव्हती. दोन वर्षांच्या निर्बंध काळात मानवी हस्तक्षेप नसल्याने जंगलातील प्राणी मुक्त संचार करत होते. अशात परिक्रमेच्या निमित्ताने लोक जंगलातून फिरताना एखाद्या प्राण्याने हल्ला करण्याची शक्यता असल्याने वास्तव्यास परवानगी देणे योग्य नव्हते. म्हणून फक्त दिवसभराच्या परिक्रमेला परवानगी मिळाली. वाटेत खाणं पिणं मिळणार नसल्यामुळे बरोबर खाऊ पाणी घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. आदल्या दिवशी परिक्रमा करताना कुणालातरी सिंहाचं दर्शन झालं होतं अशी बातमी आम्हाला मिळाली होती. त्यामुळे एकट्या दुकट्याने न जाता समुहाने मार्गक्रमणा करावी असं सुरुवातीलाच सगळ्यांना सांगीतलं. सुरुवातीचा सात आठ किमी चा उंच चढावाचा गाडीरस्ता संपला आणि पायवाटेला सुरुवात झाली. आजूबाजूचं जंगल न्याहाळत आरामात चालणं सुरु होतं. बघता बघता समोर पूर्व दिशा सोनकेशरी रंगांनी उजळली. आणि केशररंगी रविराजाचं सुरेख आगमन झालं. सूर्योदयाचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात बध्द करित आम्ही पुढे चालत होतो.
सिंह आणि इतर प्राणी दिसण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही जंगलात नीट पहात कोनोसा घेतच चाललो होतो. पायवाटेने चालत असतानाच दाट जंगल सुरु झालं आणि आमचं निरिक्षणही वाढलं. काही वेळाने अचानक थोडी खसफस ऐकू आली आणि आम्ही शांत उभं राहून पाहू लागलो आणि झाडीतून हरणं पळताना दिसली. पण ती आमच्यापासून लांब होती आणि चटकन निघून गेली त्यामुळे छायाचित्र घेणं शक्य झालं नाही. पण त्यानंतर मात्र माझी उत्सुकता खूपच वाढली. आणि आज मला सिहांचं दर्शन व्हायलाच हवं आहे असं मोठ्यांदा बोलून गेले. पुढे मी जंगलात जास्तच निरखून बघत चालू लागले. थोडा वेळ गेला आणि मला बाजूच्या जंगलात कुणीतरी प्राणी गेल्याचं दिसलं. कुठला प्राणी असावा हे पहाण्यासाठी मी थोडी पुढे जाणार तोच दोघंतिघं तिथंच उभे असलेले दिसले. त्यांनीही खूणेनच कुणाचीतरी चाहूल लागल्याचं सांगितलं. आम्ही तिथे असलेले सारे क्षणात स्तब्ध राहून निरखू लागलो आणि अचानक अगदी काही फुटांवर आम्हा सर्वांना तिचं दर्शन झालं. तिथे वनराणी निवांत बसली होती. आम्ही अतिशय स्तब्धतेनं तिला पहात होतो. नजरेला जरी ती स्पष्ट दिसत असली तरी दाट झाडीमुळे छायाचित्र मात्र किंचित अस्पष्टच येत होतं. आम्ही पहात असताना जरी शांत असलो तरी बहुधा तिला आमची चाहूल लागली असावी. तिने हलकेच मान वळवून आमच्या दिशेने काही क्षण बघितलं आणि पून्हा मान फिरवून निवांत बसली. आम्ही शांतपणे सिंहिणीला पहात असतानाच एका जंगल अधिकाऱ्याची गाडी तिथे आली. आम्हाला पाहून लगेच गाडी थांबवून ते उतरले आणि आम्हाला तिथे थांबू नका असं सांगितलं. अर्थात आमच्या सुरक्षेसाठीच त्यांनी आम्हाला थांबू दिलं नाही. पण आमची सिंह पहाण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली. लेकराने मायपित्याजवळ एखादा लडिवाळ हट्ट करावा आणि त्यांनी तो लगेच पूर्ण करावा, तद्वत माझा हट्ट श्री दत्त गुरुनी सहज पूर्ण केला होता. अतिशय आनंदात आणि भारावलेल्या अवस्थेत मी पुढे चालू लागले.
परिक्रमा मार्गात तीन डोंगर चढून उतरावयाचे आहेत. साधारण अर्ध्या अंतरावर भगवती मातेचे मंदिर आहे. आदल्या दिवशी मार्गात कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही असं कळलं होतंच. परंतु आम्ही भगवती मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तिथे भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली दिसली. कुणाला पूर्ण भोजन नको असेल तर गोड बुंदी आणि गाठी असा प्रसादही दिला जात होता. आम्हीही बुंदी आणि गाठींचा थोडासा प्रसाद घेऊन पुढे निघालो.
परिक्रमेला सुरुवात केल्यावर काही तासांनी पाऊस गुलाबपाणी शिंपडून गेला होता. मात्र भगवती मंदिरानंतर साधारण तासाभरात जोरदार पाऊस सुरु झाला. वाटेत कुठेही थांबण्यासारखी परिस्थिती नसल्याने आम्ही भिजतच चालत राहिलो. वीस - पंचवीस मिनिटं पडलेल्या जोरदार पावसामुळे आम्ही नखशिखांत भिजलो होतो. परंतु परिक्रमा पूर्ण होण्यासाठी बरंच अंतर चालायचं असल्यामुळे फारसं न थांबता चालतच राहिलो. भिजलो असलो तरी गारव्यामुळे चालताना त्रास कमी होत होता. सारे चढ उतार पार करत, जंगलाचा, पावसाचा आनंद घेत, नामस्मरण करीत अखेर शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. शेवटचा सात - आठ किमीचा रस्ताही गाडीरस्ता आहे. चांगला रस्ता असूनही दिवसभराच्या चालण्यामुळे तो रस्ता संपता संपेनासा होतो. अखेर सावकाश चालत उरलेला रस्ता चालत गेलो आणि ज्याची अगदी आसुसून वाट पाहिली होती ती परिक्रमा पूर्ण झाली. 'सारं मनासारखं होईल दर्शनाला ये' ही मला झालेली जाणीव श्री दत्तात्रेयांच्या कृपेने शब्दशः खरी ठरली होती.स्वयं श्री दत्तगुरुंनी आम्हाला दर्शन आणि परिक्रमा घडवली होती. ही परिक्रमा आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लावणारी आहे पण मला मात्र श्री दत्तगुरु बरोबर असल्याची जाणीव सतत होत होती.
बाहेर आल्यावर सर्वात आधी चहा प्यायला गेलो. चहा पिऊन परत ताजंतवानं होऊन मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन सर्वजणं बेट द्वारकेला निघालो. द्वारकेला पोचायला साधारण तासभर असताना धुवांधार पाऊस सुरु झाला. मात्र ओखा येथे पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. आम्ही सारी लोकं येईपर्यंत धक्क्यावर नौका ठरवण्यासाठी पुढे गेलो आणि पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. आम्ही मागे फिरुन इमारतीमध्ये पोहोचेपर्यंत चिंब भिजलो. पाऊस थांबल्यावर नौकेतून बेट द्वारकेला पोहोचून मंदिरातगेलो. मंदिरात आरती सुरु असल्याने दर्शन बंद होतं. आरती संपल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर दर्शनासाठी चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं. तिथून नौकेतून आम्ही परत फिरलो. आणि त्या परतीच्या प्रवासात समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे आम्हाला नखशिखांत समुद्र स्नान घडलं. आधी पावसात चिंब भिजलो होतोच ते कमी कि किय म्हणून परत समुद्र स्नानही घडलं होतं. थंडीने गारठलो होतो पण तरीही खूप छान वाटत होतं. तिथून निघून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. नंतर तिथून द्वारकेला जाऊन पुन्हा द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तलेटीला परतलो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment