! त्वदीय पादपंङ्कजं नमामि देवी नर्मदे !
नर्मदा मैया ही मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून वाहणारी प्रमुख नदी. शिवकन्या नर्मदा ही रेवा, अमरजा, मैकलकन्या नावांनेही ओळखली जाते. मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक हे नर्मदा नदीचं उगमस्थान. म्हणूनच नर्मदेला मैकलकन्या या नावानंही ओळखतात. नर्मदेच्या मार्गात अनेक धबधबे, दृतवाह आहेत त्यामुळे 'उड्या मारत, खळखळ करत' जाणारी या अर्थाने रेवा हे सार्थ नांव. नर्मदेला हे नांव श्री रामांनी दिलं असं मानतात. भारतातील सगळ्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा ही एकच अशी नदी आहे की जी पश्चिम दिशेकडे जाऊन पुढे सागराला मिळते. आपल्याकडे अठरा पुराणं आहेत. आणि नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असं तिला वरदान आहे.
नर्मदेच्या पात्रात मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात. तसंच तिच्या पात्रातील काळ्या पाषाणांपासून शिवलिंग बनवतात. याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात भगवान शिव विद्यमान असतात असा पुराणात उल्लेख आहे. भरतखण्डात नर्मदेपेक्षा आकाराने मोठ्या नद्या असल्या तरीही नर्मदेचं प्राचीनत्व आणि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व या वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा फक्त नर्मदा नदीचीच केली जाते.
या परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कंडेय ऋषी. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त नर्मदा नदीच नाही तर तिला मिळणाऱ्या ९९९ नद्यांचा धारा- प्रवाह न ओलांडता त्यांच्या उगमाला वळसा घालून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी परिक्रमा केली. २७ वर्षं लागली त्यांना या परिक्रमेला. अनेक ऋषी मुनींनी नर्मदा तीरी साधना करुन देह ठेवला आहे.
ही परिक्रमा पायी चालत किंवा वाहनानेही करतात. साधारण ३००० किमी अंतराच्या या परिक्रमेत असंख्य प्राचीन मंदिरं, ऋषीमुनींचे आश्रम यांचं दर्शन घेता येतं. पायी चालत परिक्रमा करताना अवघड वाटेवरुन, जंगलातूनही जावं लागतं. पण श्रध्देने चालणाऱ्या प्रत्येकाची काळजी स्वतः मैया घेते. अतिशय सुंदर अनुभूती या परिक्रमेत मैया आपल्याला देते.
त्यामुळे नर्मदा परिक्रमा असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी आमचे कान टवकारले जायचे. कारण नर्मदा परिक्रमा करायची, अर्थातच आधी वाहनाने अशी खूप तीव्र इच्छा होती. त्यामुळे याविषयी कुठे काही ऐकलं तरी लगेच त्याबद्दल माहिती घेत होतो.
खूप वेगवेगळ्या यात्राकंपन्या नर्मदा परिक्रमा आयोजित करतात. अशाच एका आम्हाला हव्या तशा अध्यात्मिक यात्रेची आम्हाला माहिती मिळाली. पण माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. २०-२२ दिवस मुलींना सोडून कसं जायचं हा विचार मनात येत होता. पण मुलींनी आलेली संधी सोडू नका, नर्मदा मैय्या बोलवतेय, तुम्ही कुठलीही काळजी न करता जाऊन या अशा दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आश्वस्त होऊन आम्ही परिक्रमेला जायचं नक्की केलं.
आमची परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होणार होती. ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या सायंकाळी सर्वांनी एकत्र जमायचं होतं. त्याआधी एक दिवस आम्ही इंदोरला पोहोचलो. तिथल्या अतिथी निवासात रहाण्याची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. त्याप्रमाणे इंदोरला पोहोचल्यावर तिथे जाऊन सारं आवरुन आधीच ठरवलेल्या गाडीने उज्जैनला गेलो. तिथे श्री महाकालेश्वरचं दर्शन घेऊन जवळच्या हरसिध्दी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर कालभैरव, बडा गणपती, सांदिपनी आश्रम हे सारं करुन इंदोरला ५६ दुकान येथे जाऊन इंदोरच्या खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. रात्री इंदोरला राहून दुसऱ्या दिवशी परत थोडं इंदोर फिरुन, भेटीगाठी घेऊन ओंकारेश्वरला पोहोचलो.
ओंकारेश्वरला ठरल्यानुसार सर्वजणं सायंकाळी एकत्र जमलो. चहापान झालं, परिक्रमेसाठीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता केली. नंतर फराळ करुन उशिरा श्री ओंकारेश्वरच्या दर्शनाला गेलो. रात्री ११.१५ वाजता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत येऊन निद्राधीन झालो ते दुसऱ्या दिवशीच्या मांधाता परिक्रमेच्या विचारातच.
मांधाता परिक्रमा म्हणजे नर्मदा आणि कावेरी संगमस्थित मांधाता पर्वतावर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला केली जाणारी परिक्रमा. ही परिक्रमा साधारण ७ किमी अंतराची आहे. ओंकारेश्वरच्या कोटी तीर्थ या स्थानापासून परिक्रमेची सुरुवात होते. ही पायी चालत किंवा नावेतूनही करता येते. या मार्गात नर्मदा आणि कावेरी यांचा संगम होतो. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. ही परिक्रमा अतिशय रमणीय आनंददायी आहे. या परिक्रमेतच ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात चणा डाळ अर्पण केली असता सर्व पापातून, ऋणातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.
अशी ही सुंदर मांधाता परिक्रमा नावेतून करुन, ऋणमुक्तेश्वराचं दर्शन करुन आणि एक सुंदर अनुभव घेऊन आम्ही दुपारी परत आलो.
सायंकाळी ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर परिक्रमेच्या संकल्प पूजेसाठी गेलो.
मांधाता पर्वतावरील ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. मांधाता पर्वताचा आकार ओम चिन्हासारखा आहे. इथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर अनेक मंदिरं आहेत. परिक्रमेच्या दृष्टीने ओंकारेश्वरचं महत्व अनन्यसाधारण आहे. परिक्रमा आरंभ ओंकारेश्वर, नेमावर किंवा अमरकंटक यापैकी कुठूनही केला तरीही नर्मदा जल ओंकारेश्वरला चढवल्यावरच परिक्रमेची सांगता होते अशी मान्यता आहे.
संकल्प पूजेपूर्वी नर्मदा स्नान करायचं असतं. स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो खरं पण मनात गोंधळ होता. पाण्याची भिती, थोडी उत्सुकता, थोडी लज्जा अशा संमिश्र भावना मनात दाटल्या होत्या. अनेक स्त्रिया तिथे मुक्तपणे स्नान करत होत्या. मग मीही नकळत पाण्यात उतरले. पावलांना जलस्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. साऱ्या संमिश्र भावना क्षणात नाहीशा झाल्या आणि उरली ती फक्त मैयाच्या उबदार स्पर्शाची जाणीव. लहान बाळ जसं आईच्या कुशीत शिरल्यावर सुखावतं तशी सुखावले मी. छान स्नान करुन प्रसन्न मनाने संकल्प पूजा केली.
संकल्प पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रावेरखेडी येथे पोहोचून मैयाची यथासांग पूजा आरती केली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं समाधीस्थान. इ.स. १७४० मध्ये उत्तरेच्या मोहिमेवर असतांना वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. नर्मदा तीरीच त्यांचं समाधी स्थान आहे.
तिथूनच पुढे सियाराम बाबांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतलं आणि मुक्कामाला निघालो.






No comments:
Post a Comment