नेहमी कोकणात जातायेताना एकदा तरी दत्तधामला जावं असं वाटायचं. पण प्रत्येक वेळी काही कारणामुळे जाणं अशक्य व्हायचं. पण यावेळी कोकणातून परत येताना नुकताच श्रीक्षेत्र दत्तधामला जायचा योग जुळून आला आणि खूप समाधान वाटलं.
हे दत्तधाम पाटण तालुक्यातील हेळवाक या गावात असलं तरी इथे चिपळूणहून कुंभार्ली घाटातून जाता येतं. हा घाट पार केल्यावर लगेच साधारण ४-५ किमी अंतरावरच हे स्थान आहे.
आम्ही चिपळूणहून सकाळी लवकर निघालो. कुंभार्ली घाट सुरु झाला आणि वातावरण एकदम बदललं. घाटात मस्त पावसाळी वातावरण होतं. छान गार वारा सुटला होता. घाटातून दिसणारे लांबवरचे डोंगर मात्र खाली उतरलेल्या ढगांमध्ये जणू अदृश्य झाले होते. अप्रतिम दृश्य होतं घाटातलं. अर्थातच त्या वातावरणात गाडी थांबवून खाली उतरण्याचा मोह आवरणं अशक्यच. साहजिकच गाडी थांबवून खाली उतरलो. थोडा वेळ थांबून घाटातला गार वाऱा अनुभवून तिथलं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून पुढे दत्तधामला निघालो.
कुंभार्ली घाट पार केल्यावर मात्र उजव्या बाजूला लक्ष ठेवत पुढे जावं लागतं. साधारण ४-५ किमी वर दत्तधामची एक लहानशी पाटी दिसते. या व्यतिरिक्त दत्तधामची कुठलीही खूण रस्त्यावरुन दिसत नाही. त्या पाटीजवळच रस्त्यावरुन बाजूला गाडी उभी करायला मोकळी जागा आहे. तिथे उतरुन पाटीजवळ आलं की आत जाणारी वाट दिसते. पण तिथूनही आतमध्ये नक्की काय आहे याची कल्पना येत नाही.
दत्तधामच्या पाटीजवळून आपल्याला दिसतं ते फक्त दाट जंगल आणि त्यातून जाणारी पायवाट. या पायवाटेने जरासं पुढं गेल्यावर एक छोटासा पक्का बांधलेला पूल लागतो. ही कोयनेची एक उपनदी कापणी. हा पूल पार करुन पुढं गेल्यावर आपल्याला दत्तधामचं प्रवेशद्वार दिसतं. इथे पोचल्यावर आपली उत्कंठा अजूनच वाढते.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायऱ्या सुरु होतात. वळदार रस्त्याने सुबक अगदी कमी उंचीच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन्ही बाजूला गर्द जंगल आहे. दाट सावली, सुखावणारा गंधित वारा, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यामुळे या तीनशे पायऱ्या चढताना बिलकूल त्रास होत नाही. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला आधार आणि सुरक्षेसाठी लोखंडी कठडा आहे. आणि त्या दाट जंगलातही कठड्याजवळ बऱ्याच ठिकाणी लाल जास्वंदीची झाडं आहेत. अतिशय मनमोहक अशी ही जास्वंद सगळीकडे भरभरुन फुलली होती. आम्ही सकाळी लवकर पोहोचल्यामुळे वातावरण खूप शांत प्रसन्न होतं.
थोड्याशा पायऱ्या चढून वर गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटसं रामदूत हनुमान मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तिथल्या सुंदर वातावरणात पायऱ्या चढून केव्हा मंदिराजवळ पोहोचलो कळलंही नाही.
मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार ओलांडून आत गेल्यावर समोर येतं ते दक्षिणेकडील गिरनार म्हणजेच हे श्रीक्षेत्र दत्तधाम.
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी आपल्या वास्तव्यासाठी एक अतिशय शांत असं स्थान निर्माण करावं असं परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे यांना सांगितलं होतं. त्यानूसार मामासाहेब जागेच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांचे उत्तराधिकारी श्री.शिरिषदादा कवडे हे कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. ते कोयना धरणावर अभ्यास दौऱ्यावर आले असताना तिथला रम्य, शांत परिसर पाहून तिथली थोडी जागा मामासाहेबांना अर्पण करावी असं त्यांना वाटलं, पण तो विषय तेवढ्यावरच राहिला. कालांतराने त्यांचे मित्र त्याच ठिकाणी आले असता त्यांना कानात कुणीतरी हिच ती जागा असं बोलल्याचं जाणवलं. त्यांनी तात्काळ शिरिषदादांना संपर्क केला. मग मामासाहेबांना हे सारं सांगून ही जागा विकत घेण्यात आली. हे स्थान म्हणजेच आजचं दत्तधाम.
सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं हे अतिशय निसर्गरम्य स्थान अजूनही फारसं प्रसिद्ध नाहीय. चिपळूण मधून कुंभार्ली घाटातून साधारण बत्तीस किमी. वरचं हे स्थान म्हणजे दत्त आणि नाथ संप्रदायाची प्राचीन तपोभूमीच. इथं गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केलं होतं. त्यांना याठिकाणीच भगवान श्री परशुरामांकडून श्री विद्या प्राप्त झाली. त्यामुळे या स्थानाचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे.
गुरु गोरक्षनाथांना ज्याठिकाणी अनुग्रह प्राप्त झाला त्याठिकाणीच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती सांगलीतील एका कारखानदाराने स्वतासाठी बनवून घेतली होती परंतु त्यांना ती मूर्ती मामासाहेब यांना देण्याचा दृष्टांत झाला आणि ती मूर्ती मामासाहेबांकडे आली . तीच मूर्ती या दत्तधाममध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलीय. तसंच श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचीही पंचधातूची मूर्ती इथं आहे. इथं असलेल्या शिवलिंगाबद्दलही एक अद्भुत कथा ऐकायला मिळते. हिमालयात एका साधूला स्वयं भगवान शंकरांनी हे शिवलिंग देऊन ते मामासाहेबांना देण्याची आज्ञा केली. त्यानूसार साईरामबाबांनी हे शिवलिंग मामासाहेबांना दिले.
आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथल्या गुरुजींची पूजा पूर्ण होतच आली होती. त्यांनी आम्हाला तिथेच बसायला सांगितलं. आम्ही तिथे असलेल्या चटईवर बसून त्यांची पूजा पहात मनोमनी नामस्मरण सुरु केलं. अतिशय शांत आणि पवित्र वातावरण होतं. अतिशय पवित्र अशा स्थानाचं दर्शन आणि तिथेच बसून नामस्मरण हा खूपच मोठा योग आला होता. डोळ्यात येणारं पाणी निग्रहानं परतवत मी नामस्मरण सुरु ठेवलं होतं. पूजा झाली आणि आम्ही दर्शन घेतलं. बरोबर नेलेला नैवेद्य अर्पण करुन तीर्थ प्रसाद घेतला. खूप दिवसांपासून लागलेली दर्शनाची आस पूर्ण झाली आणि अतीव समाधान लाभलं.
मुख्य मंदिराव्यतिरिक्त अजून सहा दर्शन स्थानं इथं आहेत. मुख्य मंदिराच्या समोरच श्री वरदविनायकाचं मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला दत्त आश्रम आहे. तिथेच मामासाहेबाचं नामसमाधी मंदिर आहे. तसंच कमंडलू तीर्थ आणि विश्रांती शिलास्थान जवळच आहे. मात्र याठिकाणी दत्तजयंती दिवशीच भाविकांना दर्शन घेता येतं. मुख्य मंदिराच्या थोडं पुढे छोटंसं गुरुपादूका मंदिर आहे. इथे मात्र रोज दर्शन घेता येतं. मंदिर दर्शनासाठी रोज ठरलेल्या वेळेतच उघडं असतं. सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंतच दर्शन घेता येतं. तसंच दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद असतं.
मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय शांत, पवित्र पण रमणीय आहे. मंदिरात तीनशे पायऱ्या चढून जावं लागतं. पण किंचितही त्रास होणार नाही असा सुंदर गर्द जंगलातून जाणारा हा मार्ग आहे. एकदा तरी आवर्जून दर्शनाला जावं इतकं अप्रतिम असं हे दत्तधाम.
अतिशय अप्रतिम असं हे श्रीक्षेत्र दत्तधाम प्रसिद्धी पासून मात्र थोडं दूरच आहे. कदाचित स्वयं श्री नृसिंह सरस्वती स्वामींची शांत परिसरात वास्तव्य करण्याची इच्छा होती म्हणूनच इथे फारशी वर्दळ दिसून येत नाही आणि याची फारशी प्रसिद्धीही श्रीपाद सेवा मंडळाकडून केली जात नाही.
इतकं शांत पवित्र असं हे स्थान शब्दांकित करण्याचा मी प्रयत्न करण्याचं कारणही जरा विलक्षणच. दत्तधामला जाऊन दर्शन घेऊन अतिशय समाधानाने आम्ही घरी परत आलो. दुसऱ्या दिवसापासून आमचं कामाचं रोजचं वेळापत्रक सुरु झालं. तीन चार दिवसांत जास्तीची कामं उरकली आणि आज दुपारी घरातच जरा निवांत फेऱ्या मारत होते आणि अचानक कानाशी शब्द ऐकू आले दत्तधाम विसरलीस का तू? क्षणभराने जाणवलं हा अनुभव आपण अजून शब्दबद्ध केला नाहीय. तरीही मी दुर्लक्ष करुन फेऱ्या मारुन झाल्यावर निवांत बसून डोळे मिटले आणि परत दत्तधाम एवढाच शब्द जोरात ऐकू आला. खाडकन डोळे उघडले आणि मग मात्र हे सारं शब्दांत मांडायचा प्रयत्न केलाय.
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||







- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment