वटपौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं आणि रेल्वेचं आरक्षणही केलं. पण प्रत्यक्षात जायला मिळणार की नाही हे मात्र पावसावर अवलंबून होतं.
परंतु पाऊस सुरु झाला नसल्याने आम्ही जायचं नक्की केलं. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघायचं होतं. निघताना नेहमीप्रमाणे श्री दत्तगुरुंना गिरनार दर्शन घडवून आणा अशी प्रार्थना केली आणि अचानक माझ्या मनात शब्द उमटले "दत्तगुरु तुम्ही आम्हाला बारावं गिरनार दर्शन घडवणार आहात. प्रत्येक वेळी मला तुम्ही खूपच सुंदर अनुभूती दिली आहे. यावेळी मला दृष्य स्वरुपात काही अनुभूती द्याल का" मनात ही प्रार्थना उमटली आणि पुढच्या क्षणी भानावर आले मी. मलाच कळेना मी हे काय मागतेय दत्तगुरुंजवळ... दृश्य अनुभूती? कसं शक्य आहे हे? पण विचार करायला वेळ नव्हता. निघायची वेळ झाली होती.
पौर्णिमेच्या दिवशी पहाटे जूनागढला पोहोचलो. तिथून तलेटीला गेलो. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन भराभर सारं आवरुन दर्शनाला निघालो. नित्याप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ पोहोचलो. गर्दी कमी असल्याने फार वेळ थांबावं लागलं नाही. उडन खटोलाने निघालो साधारण अर्धं अंतर गेलो आणि उडन खटोलाची गती कमी झाली. भन्नाट वारा आणि दाट धुक्यामुळे गती कमी झाली होती. वरती पोहोचलो तेव्हा गिरनार धुक्याने पूर्ण वेढलेला होता. अतिशय अप्रतिम दृश्य होतं. गार वारा सुटला होता. त्या वातावरणात आम्ही शिखरावर पोहोचलो. गर्दी कमी असल्याने अतिशय सुंदर दर्शन झालं. दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झाले अन मन एकदम शांत झालं.
अखंड धूनीजवळ येऊन नित्याप्रमाणे आधी गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. मग दर्शन घेऊन शिधा आणि देणगी अर्पण केली. आणि भोजनप्रसाद घेण्यासाठी निघालो. तेवढ्यात आमच्या मित्रानी थांबवून प्रसाद मिळाला का विचारलं. आम्हाला नेहमीचा प्रसाद तर मिळाला होता. पण त्यांनी जेव्हा देणगी तेव्हा त्यांना एका भक्ताकडून वेगळ्याच प्रसादाबद्दल माहिती त्यांना मिळाली. आणि त्या माहितीनुसार तो प्रसाद त्यांनाही मिळाला. आम्हाला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. मित्रांच्या सांगण्यावरुन आम्ही पुन्हा गुरुजींशी बोललो. त्यांनी जरा गर्दी कमी होईपर्यंत थांबायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही भोजनप्रसाद घेतला. गुरुजींनी आमचा प्रसाद मित्राच्या हाती दिला.
बारा पौर्णिमा गिरनार दर्शन घडल्यावर तिथे विशेष प्रसाद दिला जातो. आणि हा प्रसाद म्हणून रुद्राक्ष माला आम्हाला किंचितही पूर्वकल्पना नसताना अचानकपणे मिळाली. प्रसाद मिळाला आणि मला घरुन प्रार्थना करुन निघताना मनात उमटलेले शब्द आठवले. त्याक्षणी मात्र मला डोळ्यातलं पाणी थांबवणं अशक्य झालं. दृश्य अनुभूती? होय श्री दत्तगुरुंनी ही दृश्य अनुभूती देऊन अगदी सहजपणे माझी इच्छा पूर्ण केली होती.
खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे ही आमच्यासाठी. कारण मुळात गिरनार दर्शनाची ओढ पूर्वीपासून होती. पण अनेक लोकांप्रमाणे आपणही गिरनारला दहा हजार पायऱ्या चढून जाऊ शकतो का अशी साशंकता मनात होती. अखेर श्री दत्तात्रेयांच्या कृपेने गिरनार दर्शनाचा पहिला योग आला आणि आम्ही दहा हजार पायऱ्या चढून दर्शन घेऊन परत दहा हजार पायऱ्या उतरुन आलो. आणि 'एकदातरी' असं म्हणता म्हणता या वटपौर्णिमेला बाराव्या वेळी दर्शन घडलं. अर्थातच ही सारी श्री दत्तात्रेयांचीच कृपा.
प्रत्येक गिरनार दर्शनाच्या वेळी मला जशी श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची, त्यांच्या आशीर्वादाची प्रचिती ते देतात तशी ती खरंतर प्रत्येक भक्ताला देत असतात. आपल्या श्रध्देची, भक्तीची कवाडं उघडी असली की आपल्याला त्याची जाणीव होते असं मला वाटतं.
खरंतर वटपौर्णिमा म्हणजे धुवांधार पाऊस. पण यावेळी मात्र गिरनारवर तसा पाऊस नव्हता. मात्र अतिशय आल्हाददायक आणि नयनरम्य असं वातावरण होतं गिरनारवर. आपण जितक्या वेळा गिरनारला जातो तितक्या वेळा आपल्याला त्याचं वेगळेपण जाणवतं. प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्याने नटलेला असतो. कितीही वेळा गिरनारवर गेलं, थांबलं तरी मनाचं समाधान होतच नाही.
| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त |
दुलई धुक्याची ल्यायला गिरिनारायण
शोभती काठावरी नक्षीदार सोनकिरण
रेशमी धुक्यात हलकेच उषा अवतरली
परि दशसहस्त्र पायरी धुक्यात हरवली
अवचित येता नभातूनी ते रवीकिरण
धुक्याची दुलई होते विरळ काही क्षण
हळूच गेला भास्कर पुन्हा कृष्णमेघात
हरवला गिरनार सारा मग दाट धुक्यात
बरसल्या अवचित मृगाच्या रेशीमधारा
अन ओलावूनी सुखावला गिरनार सारा
धुक्यात चाले उनपावसाचा खेळ वेगळा
ध्यानस्थ गिरनार भासे अवखळ आगळा
- स्नेहल मोडक




No comments:
Post a Comment