मे महिना सरता सरता विविध माध्यमांतून हवामान खात्याने वर्तविलेले वर्षाऋतूचे अंदाज झळकायला लागतात. अमुक तारखेला पाऊस अंदमानमध्ये येणार. अमुक तारखेला केरळमध्ये येणार आणि पुढच्या चार दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पर्जन्यराजा व्यापणार. बातम्या ऐकून उन्हाच्या काहिलीने अतिशय त्रस्त झालेलं आपलं तनमन त्या रेशीमधारांची चातकासारखी वाट पहायला लागतं. वैशाख वणव्याने तप्त अवनीही पर्जन्यराजाची आसुसून वाट पहात असते.
अमलताश, गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा हे सारे गर्द फुलांची पखरण घालून रिक्त होऊ लागतात. पक्ष्यांची घरटी बांधायची लगबग सुरु होते. आंबा,फणस, करवंद, जांभळं यांचा हंगाम संपत येतो. सारी आगोठची कामं आवरती घेतली जातात.
वर्षाऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. आकाशात अधूनमधून कृष्णमेघ दिसू लागतात. सहस्ररश्मी कृष्णमेघांबरोबर लपंडाव खेळू लागतो. शेतकरी वर्ग उल्हसित मनाने शेतीच्या कामांची जुळवाजुळव सुरु करतो. पर्जन्यराजाच्या स्वागताची सारी तयारी होते. आणि सुरु होतं त्याच्या प्रत्यक्ष येण्याची वाट पहाणं.
पण... हो हा पण यावेळी फारच लांबलाय, हो ना?
सध्या वातावरणात सातत्याने विचित्र बदल घडतायत. पावसाचं आगमन काही ना काही कारणाने लांबतंय. उन्हाची काहिली शांत होण्याची शक्यता दुरावतेय. भास्कराचा मृगनक्षत्री प्रवेश होऊनही दिवस सरलेत. पण अजूनही जलधारा हव्या तशा बरसत नाहीयेत. शेतकरी वर्गाला हळूहळू चिंता ग्रासतेय. अजूनही गावोगावी पाण्यासाठी वणवण सुरु आहे. भेगाळली भुई पावसाच्या सरींसाठी आसावलीय. पाऊस लगेचच सुरु नाही झाला तर हळूहळू माध्यमांद्वारे धरणांमधला पाणीसाठा जेमतेम इतकेच दिवस पुरेल अशा आशयाच्या बातम्या देण्यास सुरुवात होईल.
सध्या पृथ्वीवरील तापमानात अतिवाढ होतेय. अतिरेकी प्रदुषणामुळे ही तापमानवाढ होते असं म्हटलं जातंय. पण याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी दुष्काळ पडतोय तर काही ठिकाणी पूर येतायत. हिमनग वितळू लागल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय. ऋतुचक्रही बदलत चाललंय. परिणामी वर्षाऋतही बदलतोय. जून महिना सरत आला तरीही पाऊस अजूनही नीट सुरु झाला नाहीय. आपल्याकडूनच होत असलेल्या वाढत्या प्रदूषणामुळं आपल्यालाच त्याचे भयंकर दुष्परिणाम सोसावे लागतायत.
म्हणूनच खिन्नपणे म्हणावं लागतयं - पाऊस अजूनही रुसून आहे. बघा नं वाढतं औद्योगिकीकरण, जंगलतोड, जीवाश्म इंधनाचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर या साऱ्या गोष्टींचा किती वाईट परिणाम होतोय. त्या पर्जन्यराजालासुध्दा तप्त वसुंधरेला तृप्त करावसं वाटत नाहीय.
हल्ली विविध माध्यमांतून या तापमानवाढीवर बोललं जातंय. ही तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले जातायत. प्रदूषण कमी करण्याचे, वृक्षारोपणाचे पर्याय राबविले जातायत. पण तरीही बहुधा हे खूपच कमी प्रमाणात होतंय. कारण अजूनतरी या प्रयत्नांमुळे तापमानवाढ कमी होत नाहीय. आणि अजूनही पूर्वी सारखा पाऊस पडत नाहीय. पृथ्वीवरील जलसंपदा सातत्याने कमी होतेय. भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण होण्याची चिंता सतावतेय. अर्थातच तापमानवाढ, प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने सार्वत्रिक स्तरावर प्रयत्न केले तरच यश येईल. पण तोपर्यंत तरी पाऊस अजूनही रुसून आहे....
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment