यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला दत्तगुरुंच्या दर्शनाला काही कारणाने जायला जमणार नव्हतं. दर्शनाला तर जायचंच होतं पण गुरुपौर्णिमेच्या आधी की नंतर ते ठरत नव्हतं. अखेर अखंड धुनीच्या दर्शनाचा योग साधून दोन दिवस आधीच जायचं ठरवलं.
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून फराळाचे पदार्थ तयार करुन घेऊन सकाळी लवकर आम्ही पाचजणं गाडीने निघालो. सुरुवातीलापासूनच रिमझिम पाऊस आम्हाला साथ देत होता. वातावरण अगदी मस्त होतं. प्रवास छान सुरु होता. महाराष्ट्राची सीमा पार करेपर्यंत पाऊस कमी जास्त होता. गुजरातच्या हद्दीत प्रवेश केला आणि मग मात्र पावसाचा जोर वाढत चालला. रस्त्यावर पाणी साचू लागलं. त्यातच वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु होती. यातूनच आमचा प्रवास सुरु होता. मात्र पाऊस आणि वाऱ्याचा जोर मधेमधे खूपच वाढत होता. जिकडे तिकडे पाणी साठलं होतं. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत थांबत थांबत प्रवास सुरु ठेवला. राजकोटच्या पुढे मात्र पाऊस कमी झाला होता. अखेर साधारण साडेअकरा वाजता आम्ही तलेटी मुक्कामी पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून नित्याप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि उडन खटोलाजवळ पोहोचलो. खरंतर आदल्या दिवशी प्रवासात असतानाच उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्हाला संपर्क करुन एकादशी दिवशी उडन खटोल वाईट हवामानामुळे बंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी हवामान ठिक असेल तर उडन खटोला सुरु होईल असंही सांगितलं होतं. सकाळी आम्ही निघालो तेव्हा पायथ्याशी वारा पाऊस जवळजवळ नव्हता. म्हणून आम्ही उडन खटोला सुरु होईल या अपेक्षेने गेलो परंतु तो सुरु होणारच नव्हता. प्रत्यक्ष गिरनारवर खूप वाईट हवामान आहे. चढून जाणार असल्यास अतिशय सांभाळून जा असा इशाराही तिथले स्थानिक लोकं सगळ्यांनाच देत होते. उडन खटोला बंद असल्याने दहा हजार पायऱ्या चढणे शक्य नाही म्हणून काही भाविक परत फिरत होते. आम्ही चढून जायचं आणि दर्शन घ्यायचंच असं ठरवलं आणि परत पहिल्या पायरीशी येऊन चढायला सुरुवात केली.
पहिल्या दिडदोनशे पायऱ्या चढेपर्यंत वातावरण खूपच सुंदर होतं. अगदी रिमझिम पाऊस, सुखावणारा गार वारा, पुढे धुक्याचा विरळ पडदा आणि जोडीला केकारव... खूप प्रसन्न वातावरणात उत्सहाने आम्ही पायऱ्या चढत होतो. आमच्या मागे पुढे मात्र खूपच कमी भाविक होते. आदल्या रात्री चढायला सुरुवात करुन दर्शन घेऊन परत येणारे लोक भेटत होते. त्यांना पाहून, त्यांच्याशी बोलून वरच्या वाईट हवामानाचा अंदाज आम्हाला येत होताच. अंदाजे तिनशे पायऱ्या चढून गेल्यावर त्याची प्रचिती यायला सुरुवात झाली. आम्ही जवळपास हजारएक पायऱ्यांवर पोहोचेपर्यंत वाऱ्यापावसाचा जोर फारच वाढला. पायऱ्या चढण्याचा आमचा वेग कमी होऊ लागला.
साधारण पंधराशे पायऱ्या चढलो आणि निसर्गाने आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली. इतका वेळ सुसह्य असणारा जोरदार वारा पाऊस वाढला. जोरदार घोंघावणारा वादळी वारा, सन्नाट कोसळणारा पाऊस यामुळे तोल सावरत पायऱ्या चढणं कठिण होऊ लागलं.
जेमतेम दोन तीन फुटांपर्यंतच समोरचं दिसेल एवढा सन्नाट पावसाचा दाट पडदा, पायऱ्यांवरुन खळखळ करत वाहणारं फेसाळतं पाणी आणि काळजात धडकी भरवणाऱ्या आवाजात वाहणारा वादळी वारा, भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच थांबत थांबत आमच्यासह सारेजण पायऱ्या चढतच होते. सुरुवातीपासूनच घातलेल्या रेनकोटमधूनही सगळेजणं नखशिखांत भिजले होते. अतिशय वाईट परिस्थिती होती पण मार्गक्रमण सुरुच होतं.
जैन मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत निसर्गाचा रौद्रावतार वाढतच चालला होता. त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचायलाही वेळ लगला होता. हळूहळू मनात साशंकता निर्माण होऊ लागली होती. दर्शन होणार की नाही याची चिंता वाटू लागली. अंबाजी टुकवर पोहोचेपर्यंत परिस्थिती बिकट झाली होती. तिथपर्यंत पोहोचायला वाईट हवामानामुळे आम्हाला नेहमीच्या दिडपट वेळ लागला होता. अंबाजी टुकवर पोहोचत असतानाच इथूनच परत फिरावं असा विचार माझ्या मनात येऊ लागला. कारण मला कळत होतं की या परिस्थितीत दर्शन घेऊन परत पायथ्याशी पोहोचायला आम्हाला खूप रात्र होणार होती. आमच्याबरोबर परतीच्या पायऱ्या उतरताना कुणी सोबत असण्याची शक्यता फारच कमी होती.
तिथल्या दुकानदारांकडून माहिती मिळाली होती की आदल्या दिवशी याहून फारच वाईट परिस्थिती होती. साधारण दोनहजार पायऱ्यांच्या वर पुढे कंबरभर पाणी साठलं होतं. आणि त्या पाण्याला खूप ओढ होती. त्यामुळे सारे लोक, अगदी डोलीवालेही परत फिरले होते. शिखर दर्शन अगदीच कमी लोकांना जे त्यावेळेआधी किंवा नंतर गेले त्यांनाच घडलं होतं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ही मोठीच गोष्ट होती. म्हणून तुम्ही शिखरापर्यंत जाणारच असाल तर खूपच काळजी घ्या असं प्रत्येक दुकानदार आवर्जून सांगत होता.
हे सारं ऐकून आणि वाढत्या रौद्ररूपाचा अंदाज घेऊन आमच्या पुढेमागे असणाऱ्या भाविकांपैकी काही भाविक अंबाजी टुकपासून परत फिरले. त्यामुळे दर्शनाला पुढे जाणारे लोक फारसे नव्हते. काही अगदी तरुण लोकंच पुढे जाताना दिसत होते. मीही अंबाजी टुकपासूनच 'परत फिरुया म्हणजे पूर्ण अंधार पडायच्या आधी तरी आपण पायथ्याशी पोहोचू' असंच म्हणत होते. आमच्या बरोबरच्या एका मित्रांची तब्येत अंबाजी टुकच्या आधीच थोडी बिघडली होती. त्यामुळे डोली मिळाली तर दर्शन घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यादिवशीही डोलीवाले अगदीच कमी होते. अंबाजी टुकवर डोलीची व्यवस्था झाली आणि ते दर्शनाला गेले. आता आम्ही चौघंच उरलो होतो. पण सगळ्यांच मत होतं दर्शनाला जायचंच. कदाचित पुढे वारा पाऊस थोडा सुसह्य असेल त्यामुळे आपल्याला कमी त्रास होईल, असं मी सोडून सर्वांना वाटत होतं. अखेर सगळ्यांची इच्छा आणि दत्तगुरुंवरील श्रध्दा यामुळे पुढे जायचं ठरवलं. कळत होतं श्री दत्तगुरुच सगळ्यांची परिक्षा घेतायत. त्यामुळे आपण प्रयत्न करायचा, दर्शन देणं न देणं त्यांची इच्छा असा विचार करुन पुढे निघालो. अर्थातच फारच कसोटीची वेळ होती. पण गोरक्षनाथ टुकवर पोहोचेपर्यंत खरोखरच वारा पाऊस थोडा कमी झाला.
गोरक्षनाथ टुकवर पोहोचलो. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्यांना 'आम्हाला श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडवा' अशी प्रार्थना केली आणि थोडा वेळ तिथे थांबलो. त्या मंदिरासमोरच्या एका छोट्याशा मठीत एक साधक रहातात. त्यांच्याशी थोडं बोलायची संधी मिळाली. त्यांनी आम्हाला थोडं थांबून चहा पिऊन जायचा आग्रह केला. अर्थातच आमच्यासाठी तो प्रसाद होता. चहा तयार होईपर्यंत गिरनारबद्दल काही अनुभूती त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. स्वयं श्री दत्तगुरु आणि गोरक्षनाथ यांचं अजूनही सातत्यानं गिरनारवर येणंजाणं आहे, याची प्रचितीही त्यांना आली आहे. त्यांचं म्हणणं होतं की स्वयं श्री दत्तात्रेय ज्या मार्गाने ये-जा करतात त्या मार्गावर आपल्याला चालायला मिळतंय हि किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही या भयप्रद परिस्थितीतही इथवर आलात हेही श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच. हे सारे अनुभव ऐकून तिथे थांबलेले त्यांचे परिचित आणि आम्ही खरंच भारावलो होतो. माझ्या मनाला आपण दर्शनाला जायचं ठरवलं ते किती योग्य केलं याची जाणीव झाली. खरंच एवढी मोठी कसोटी बघणारे श्री दत्तात्रेयच आणि त्यात यश (दर्शन) देणारेही तेच. त्या साधकांनी खास आमच्यासाठी केलेला वाफाळता चहा पिऊन आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला (उतरायला) सुरुवात केली.
थोड्या पायऱ्या उतरेपर्यंत जरा कमी असलेला वारा पाऊस आणि धुकं परत वाढलं. पुन्हा सन्नाट पाऊस आणि भणाणता वारा सुरु झाला. पुन्हा एकदा तोल सावरत पुढे जाणं सुरु ठेवलं. कमंडलू कुंडाची कमान ओलांडली आणि परत पावसाचा जोर कमी झाला. आमच्या मागेपुढे इतर कुणीच नव्हतं. पुढच्या पायऱ्या चढताना हळूहळू पाऊस अगदी कमी होत शिखरावर पोहोचेपर्यंत पाऊस जवळजवळ थांबला. आणि आम्ही उरलेल्या पायऱ्या जरा भरभर चढून गेलो आणि मंदिरात पोहोचलो.
मंदिरात प्रवेश केला आणि सर्वात आधी तिथेच कठड्यावर बसलेल्या शुभ्र कबूतराने आमचं स्वागत केलं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते तिथंच बसल्याचं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. मी त्या कबूतराला हळूच स्पर्श केला आणि त्यानेही माझ्या स्पर्शातली माया ओळखून माझं बोट हलकेच चोचीत पकडलं. त्याला धान्याचे दिलेले दाणेही त्याने माझ्या हाताच्या तळव्यावरुन अलगद टिपले. परत एकवार स्पर्श करुन मी पुढे झाले. श्री दत्तगुरुंचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि नेहमीसारखेच डोळ्यात अश्रू तरळले. एवढी कठीण परिक्षा त्यांनी घेतली होती आणि त्यात यशही त्यांनीच दिलं होतं. पण ही एकच भाग्याची गोष्ट नव्हती तर अजून एक मोठं भाग्य त्याक्षणी आम्हाला लाभलं होतं. मंदिरात आम्ही आणि दोन पूजारी यांच्याव्यतिरिक्त कुणीच माणसं नव्हती त्यामुळे आम्हाला पहिल्यांदाच श्री दत्तगुरुंच्या चरणपादुकांसमोर सात-आठ मिनिटं बसायला मिळालं. खरोखरच आजवरची माझी इच्छा त्याक्षणी स्वयं दत्तात्रेयांनी पूर्ण केली होती. जेवढा वेळ तिथे बसायला मिळालं तेवढा वेळ मला अश्रू अनावर झाले होते. इतक्या भयप्रद परिस्थितीतून पायऱ्या चढताना झालेला त्रास, मनात दाटलेली काळजी सारं एका क्षणात नाहीसं झालं आणि जाणवलं 'याचसाठी केला होता अट्टाहास'... अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं दत्तगुरुंनी. नंतर भाविक दर्शनासाठी येऊ लागले आणि आम्ही प्रसाद घेऊन तिथून निघालो.
थोडं खाली उतरुन अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. उडन खटोला बंद असल्याने आम्ही पायऱ्या चढून वर पोहोचेपर्यंत अखंड धुनी प्रज्वलित होऊन गेली होती. त्यामुळे प्रज्वलित धुनीचं दर्शन आम्हाला मिळालच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे धुनीचं दर्शन घेतलं आणि शिधा, देणगी अर्पण केली. तिथेही इतर कुणी लोकं नसल्याने गुरुचरित्राचं वाचन धुनीसमोरच बसून करायला मिळालं. वाचन करुन भोजनप्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पायऱ्या उतरायला (चढायला) सुरुवात केली आणि पुन्हा वाऱ्यापावसाचा जोर वाढला. कमंडलू कुंडापासून गोरक्षनाथ टुकपर्यंत परत थांबत थांबत आलो. पुन्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्या साधकांशी थोडं बोलून पुढे निघालो. आता पायऱ्या फक्त उतरायच्या होत्या. पण पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने आम्हाला सावकाश उतरावं लागत होतं. पण हळूहळू पावसाचा जोर कमी झाला आणि आम्हाला पायऱ्या उतरणं थोडं सोपं झालं. पूर्ण अंधार पडण्यापूर्वी शक्य तितक्या पायऱ्या उतरायचा आमचा प्रयत्न सुरु होता. कारण या वादळी पावसामुळे मार्गावरील विद्युतदिवे सुरु असण्याची शक्यता फारच कमी होती. जैन मंदिरापर्यंत बऱ्यापैकी दिसत होत. मग मात्र अंधार पडला आणि आमच्या अंदाजानुसार दिवेही अगदी खूप अंतरावर अधुनमधून सुरु होते. मग भ्रमणध्वनीच्या उजेडात आमचं चालणं सुरु झालं. आम्ही फक्त चौघंच होतो मागेपुढे कुणीच नव्हतं.
अंदाजे हजारएक पायऱ्या उतरायच्या बाकी असताना आम्हाला दोघंजणं भेटले. साधारण सत्तरीच्या वयाचे वडिल आणि आमच्या वयाची त्यांची मुलगी असे ते दोघंच होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं. मग तेही आमच्या बरोबर चालू लागले. मधेमधे थांबत पायऱ्या उतरणं सुरुच होतं. मध्येच आमच्या चौघांपैकी दोघंजणं बोलता बोलता थोडं पुढे गेले. आणि वाटेत भेटलेले दोघं सावकाश उतरत असत्याने जरा मागे राहिले. त्यांच्यासाठी आम्ही दोघं जरा एका ठिकाणी थांबलो. जेमतेम बसलो आणि अगदी समोरुन जोराची गुरगुर ऐकू आली. आम्ही दोघंही तटकन उठलो आणि शब्दही न बोलता चालायला लागलो. चार पायऱ्या उतरलो आणि मागून त्या मुलीचा आवाज आला 'ताई थांबा' म्हणून. आम्ही तिथेच थांबलो, ते दोघं आले आणि त्यांनी विचारलं तुम्ही आत्ता काही आवाज ऐकला का? आमच्या लक्षात आलं की तो आवाज त्यांनीही ऐकला होता. जंगलच्या राजाचं गुरगुरणं होतं ते. प्रत्यक्ष दिसला नसला तरी क्षणभर का होईना भीती वाटणं साहजिकच होतं. उरलेल्या पायऱ्या उतरुन अखेर आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आमचं मुक्कामाचं ठिकाण जवळच असल्याने लगेच तिथे गेलो.
खरंतर उडन खटोला ने जाऊन दर्शन घेऊन परत येऊन दुपारी लगेच परतीच्या प्रवासाला निघायचं ठरवलं होतं. पण दर्शन घेऊन येईपर्यंत रात्र झाली होती त्यामुळे नाईलाजास्तव त्या रात्री तलेटीलाच मुक्काम करुन तिसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. निघतानाच भेटलेल्या काही परिचितांकडून आदल्या दिवसापासून गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तुफान वारा पाऊस आहे अशी माहिती मिळाली होती. तरीही शक्यतो घरी पोहोचायचंच असं ठरवून निघालो. पण आमची परिक्षा अजून संपली नव्हती. धुवांधार पाऊस, वादळी वारा सुरुच होता. रस्त्यावर पाणी साचत होतं. त्यातूनच हळूहळू आम्ही पुढे जात होतो. पण नंतर वाहनकोंडीत अडकणं सुरु झालं. रस्त्यावर लहान गाड्यांपेक्षा अवजड वाहनंच खूप होती.
अशाच एका अवजड ट्रकच्या बाजूने आमची गाडी जात असताना त्या ट्रकमधून अचानक गाडीच्या टपावर खूपच जोरात काहीतरी आपटलं. एवढा मोठा आवाज ऐकून आम्ही सगळेच हादरलो. पण गडी थांबवून पहाणं अशक्य होतं. वाहनकोंडीतून गाडी थोडी बाहेर आल्यावर लगेच बाजूला थांबवली. टपावर नीट पाहिलं असता एखादी अणुकुचीदार वस्तू जोरात आपटल्यावर जसे खड्डे पडतील तसे दोन लहानशा खुणा टपावर पडलेल्या दिसल्या. गाडीला किंवा कुणालाच काही इजा झाली नाही ही गुरुकृपाच.
थोडा थोडा वेळ करत किमान चार तास तरी आमचे त्या वाहनकोंडीत वाया गेले आणि आमचा उशिरा का होईना घरी पोहोचण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर महामार्गावरच निवास व्यवस्था शोधून तिथेच मुक्काम केला.
चौथ्या दिवशी पहाटेच पुढचा प्रवास सुरु केला. सुरुवातीपासूनच पाऊस होता. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत पुढे जात होतो. महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचलो तरीही पाऊस सुरुच होता. साधारण साडेतीन तासांच्या प्रवासानंतर सांभाळून गाडी चालवत असतानाच एका खड्ड्याने प्रसाद दिलाच. गाडीचं मागचं चाक पूर्ण फाटलं. सुदैवाने जवळच वाहनदुरुस्तीच दुकान होतं. तिथल्या माणसाने लगेच चाक बदलून दिलं. अर्ध्या तासात गाडीचं चाक बदलून आम्ही पुढे निघालो. पुढच्या दिडदोन तासात घरी पोहोचणार असतानाच पुन्हा एकदा खड्ड्याचा प्रसाद मिळाला.
पुढच्या अर्ध्या तासात गाडीचं पुढचं चाक खराब झालं. आणि तेही अशा ठिकाणी की जवळपास दुरुस्तीची सोयच नव्हती. पाऊस थांबायचं चिन्ह दिसत नव्हतं. सुदैवाने जवळच एक घर होतं. तिथे जाऊन चौकशी केली असता कळलं की आठ दहा किलोमीटर अंतरावर दुरुस्तीचं काम होऊ शकतं. मग त्या घरातल्या माणसानेच एक रिक्षा बोलावली. आमच्या बरोबरचे रिक्षा घेऊन त्या कामासाठी गेले. आम्ही दोघं त्या घरात बसलो. या सगळ्यात तासाभरापेक्षा जास्त वेळ गेला. तेवढा वेळ आम्ही त्या घरात बसलो होतो. घर अगदी साधं चिव्याचं मातीनं लिंपलेल्या भिंती आणि वर पत्रे असंच होतं. आदली रात्र त्या घरातल्या लोकांनी जागून काढली होती. वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून गेले तर काय या चिंतेने ते झोपू शकले नव्हते. पण अशा घरात रहाणारी माणसं मनाने मात्र श्रीमंत होती. कुठलीही ओळख नसताना अगदी सहज मदत केली होती त्यांनी आम्हाला. जोराच्या वाऱ्यापावसात बाहेर उभं राहू न देता आम्हाला घरात बसायला सांगितलं होतं. आपली कामं बाजूला ठेवून आमच्याशी छान गप्पाही मारल्या. चहा नाश्तयाचाही आग्रह केला पण आम्ही वाटेत नाश्ता करुन निघालो होतो. आणि त्यांना आम्ही गेल्या गेल्याच थोडाफार खाऊ दिला होता.
गाडीचं चाक नवीनच लावलं, आणि त्या घरच्या लोकांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. पुढचा उरलेला प्रवास फारच सावधपणे आणि सावकाश करुन अखेर दुपारी उशीराने घरी पोहोचलो.
यावेळची गिरनार यात्रा म्हणजे आमची खरंच कसोटी होती. अर्थातच श्री दत्तगुरुंनीच परिक्षा घेतली आणि त्यांनीच आम्हाला या मोठ्या परिक्षेत उत्तम यश दिलं आणि सुंदर दर्शन घडवलं.
|| अवथुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
गुरुपौर्णिमा अन गिरनार गणित जमेना
परि गुरुशिखर दर्शनाविण चैन पडेना
सुरु होती घालमेल मनाची चार दिवस
गिरनार दर्शना गेलो आधी दोन दिवस
निघालो मिळून सगळे सकाळी गाडीने
संगतीला होतेच वारा पाऊस जोडीने
पावसाचे पाणी रस्त्यावर लागले साचू
पाण्यात खड्ड्यात गाडी लागली नाचू
कसेबसे हळूहळू पुढे जातच राहिलो
मध्यरात्री अखेर मुक्कामी पोहोचलो
पहाटे आवरुन निघालो गुरुदर्शनाला
वादळी वाऱ्याने बंद होता उडनखटोला
मग दशसहस्त्र पायरी जशी लागलो चढू
तसा वाऱ्यापावसाचा जोर लागला वाढू
सन्नाट पावसात समोरचं काही दिसेना
भन्नाट वाऱ्यात तोल सावरता येईना
विचार केला इथूनच माघारी फिरावं
पण मग गुरुशिखर दर्शन कसं घडावं
निसर्गाचं रौद्र रूप मात्र वाढतच होतं
संगतीलाही बरोबर फार कुणी नव्हतं
गुरुश्रध्देने हळूहळू पुढे जात राहिलो
अखेर एकदाचे मंदिरात पोहोचलो
दत्तगुरंच्या चरणी नतमस्तक झालो
अन क्षणात भीती, थकवा विसरलो
अवघड परिक्षा घेणारे स्वयं दत्तगुरुच
प्रयत्नांती यश देणारेही स्वयं दत्तगुरुच
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment