सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या बरोबरच भान हरपून विठुरायाच्या गजरात, भजनात तल्लीन व्हावं, श्वासागणिक विठुरायाचा नापजप करावा, आणि वारी प्रत्यक्ष अनुभवावी ही अनेकांप्रमाणेच माझीही इच्छा. अर्थात या वर्षीही ही इच्छा पूर्ण होता होता राहिली. पण माऊलींच्या कृपेने हा योग नक्की कधीतरी येईल हा विश्वास आहे. मात्र या निमित्ताने एक अनुभव शब्दबद्ध करावा असं वाटलं आणि मी व्यक्त झाले.
खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे ही. इथल्याच एका आयोजकांनी आयोजित केलेल्या यात्रेला आम्ही दोन कुटुंबं गेलो होतो. बरोबर इतर यात्रेकरुही होतेच. दोन सतरा आसनी गाड्यांमधून आम्ही सारे यात्रेकरु गेलो होतो. गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर, गोंदवले इ. स्थानदर्शन अशी ती यात्रा होती.
पंढरपूरला पहाटे पोहोचलो. सगळं आवरुन विठुरायाच्या दर्शनाला निघालो. कार्तिकी एकादशीचा तिसराच (तृतीया) दिवस होता. चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने, उत्साहाने आणि विठ्ठलाच्या जयघोषने फुलून गेला होता. आम्ही सगळेही त्याचाच एक भाग होऊन दर्शन रांगेत सहभागी झालो. सकाळी आठ वाजता आम्ही रांगेत उभे होतो. पण एकूण गर्दी बघता दर्शनाला साधारण किती वेळ लागेल याची चौकशी केली असता 'काळजी करु नका दोन तीन तासात दर्शन होईल' अशीच उत्तरं मिळाली. आणि आम्ही रांगेत थांबायचं ठरवलं. निर्णय घेतला खरा पण आजूबाजूची परिस्थिती अतिशय किळसवाणी होती. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. अगदी खरं सांगायचं तर नाक मुठीत धरुन आणि डोळ्यांना झापडं लावूनच आम्ही उभे होतो. साधारण तासाभरात आम्ही रांगेतून एका इमारतीत प्रवेश केला. सुरुवातीला वाटलं आता थोड्याच वेळात आपल्याला विठुरायाचं दर्शन घडेलं. पण मग लक्षात आलं ही रांग प्रचंड मोठी आहे. त्या इमारतीचे काही मजले रांगेतून गेल्यावर मग मुख्य मंदिरातल्या रांगेत आम्ही पोहोचणार होतो. आणि प्रत्येक मजल्यावर ती रांग फिरवत फिरवत खाली आणलेली होती. ही परिस्थिती लक्षात आल्यावर मग मात्र आम्हाला खूपच काळजी वाटायला लागली. त्या इमारतीतही बिलकुल स्वच्छता नव्हती. जिकडे तिकडे कचरा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या अशी गलिच्छ अवस्था होती. केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही हे सारं सहन करायचा प्रयत्न करत होतो. साधारण दोन मजले रांगेतून फिरत फिरत गेल्यावर मात्र माझा आणि माझ्या मैत्रिणीचा संयम संपला. दर्शन राहुदे आपण परत जाऊया असं वाटायला लागलं. कारण आमच्या बरोबर आमची मुलंही होती. आणि तीही इतकी लहान की अगदी कडेवर, हाताशी अशी परिस्थिती होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर्शनाला एवढा वेळ लागेल याची पूर्वकल्पना नसल्याने मुलांसाठी खाऊ पाणी हेही फारसं बरोबर घेतलेलं नव्हतं. अखेर मैत्रिणीच्या कुटुंबाने परत फिरायचा निर्णय घेतला पण आम्ही मात्र कसे कोण जाणे पण दर्शनासाठी थांबलो.
रांग पुढे सरकत होती वेळ जात होता तसतसं मुलींना सांभाळणंही कठीण होऊ लागलं होतं. मुलींना कडेवर घेऊन हात आणि सतत उभं राहून पायही बोलायला लागले. मुलींची तहानभूक पुरवायलाही काही नव्हतं. बरोबरचा खाऊही संपला. तिथे काही खाऊ मिळणंही शक्य नव्हतं. मग मात्र माझा संयम पूर्णच संपला. मनोमनी मी त्या विठुरायाला बोल लावू लागले, तुझं दर्शन घेण्यासाठी तू आम्हाला थांबवलंयस पण त्याचा नको इतका त्रास माझ्या अगदी लहान मुलींनी का सोसायचा? आम्ही तुझ्या दर्शनासाठी कितीही त्रास सहन करु शकतो पण मुलींना आज जो त्रास होतोय तो माझ्या सहनशक्ती पलिकडचा आहे, आणि त्याला माऊली तुच जबाबदार आहेस. असे बोल लावतच मी मुलींना सांभाळत रांगेत उभी होते. कधी एकदा दर्शन घेऊन बाहेर पडतो असं झालं होतं.
अखेर नऊ तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सायंकाळी पाच वाजता आम्हाला पंढरीरायानं दर्शन घडवलं. तिथे असलेले गुरुजी प्रत्येक भाविकाला दर्शन घेताच बकोटीला धरुनच बाजूला करत होते. क्षणभरही थांबू देत नव्हते. ते बघून माझा त्रागा अजूनच वाढला. पण बहुदा त्या लोभस सावळ्या रुपालाच आम्हाला सुंदर दर्शन घडवायचं होतं. त्यामुळे असेल कदाचित पण त्या गुरुजींनी बिलकुल घाई केली नाही, आणि शांतपणे दर्शन घेऊ दिलं. माऊलींच्या चरणी मी नतमस्तक झाले आणि नकळतच डोळे भरुन आले. बाजूला होऊन मनोमनी दर्शन घडल्याचा आनंद व्यक्त केला पण त्याचवेळी त्या माऊलींना व्यथित मनाने सांगितलं आज दर्शन घडवलंत पण मुलींना झालेला त्रास मी विसरु शकत नाही. मुलींना असा त्रास होणार असेल तर आम्हाला दर्शनाला यायची बिलकुल इच्छा नाही. दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो. दिवसभर जवळजवळ उपवास घडला होता तो चार घास भोजन ग्रहण करुन सोडला, आणि एक नकोसा अनुभव घेऊन पुढील प्रवासाला निघालो.
आम्ही दरवर्षी दीपावली नंतर अंबाजोगाईला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. तिथून मग आजूबाजूला फिरुन परत येतो. त्याप्रमाणे तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट इ. ठिकाणी जाऊन दर्शन घेत होतो. पण पंढरपूरच्या पहिल्यावहिल्या दर्शनाच्या नकोशा अनुभवानंतर पंढरपूरला परत दर्शनाला जायचं नाही हे ठाम ठरवलं होतं. त्यामुळे पंढरपूरला जात नव्हतो.
काही वर्षांनी असंच अंबाजोगाईहून परत येताना आमच्याबरोबर असलेल्या सगळ्यांची इच्छा म्हणून परत एकदा पंढरपूरला गेलो. मंदिराजवळ पोहोचलो आणि आधी दर्शनाला किती वेळ लागेल याची पूर्वीप्रमाणेच चौकशी केली. तेव्हाही दोन तीन तासात दर्शन होईल असंच उत्तर मिळालं आणि मी लगेच दर्शन न घेता परत निघुया असं म्हटलं. तेव्हा तिथला एक फुलवाला म्हणाला आलाच आहात तर मुखदर्शन तरी घ्या. मग विचारलं तर म्हणाला ते दर्शन लगेच होईल. म्हणून मग मुखदर्शन घेण्यासाठी गेलो. अर्थात तिथेही रांग होतीच. पण पंधर वीस मिनिटांत मुखदर्शन घेता आलं. तेवढ्यावरच समाधान मानून सारे परत फिरलो. मुलींना तासनतास रांगेत उभं रहायला लावून, त्रास देऊन दर्शन घ्यायचं नाही या माझ्या निर्णयावर मी ठाम होते. त्यामुळे चटकन मुखदर्शन करुन परत एकदा विठुरायाला माझा तो निर्णय परत एकदा सांगून मी मंदिराबाहेर आले. अर्थात समोरुन नाही तर एवढं तरी दर्शन घडल्याचा आनंद सगळ्यांना झाला होता.
त्यानंतर परत एक वर्षी अंबाजोगाईला आमच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना पंढरपूरला जायचंच होतं. म्हणून परत एकदा नाईलाजाने आणि रांग असेल तर आम्ही थांबणार नाही या अटीवरच आम्ही पंढरपूरला गेलो. आधीप्रमाणेच दर्शनासाठी किती वेळ लागेल याची चौकशी केली. तेव्हा पहिल्यांदाच असं कळलं की दर्शनाला अजिबात गर्दी नाहीय. मग मात्र आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि मी जागीच स्तब्ध झाले. मंदिरात तो जगन्नियंता राजस विठुराया आणि आम्ही यांच्याव्यतिरिक्त फक्त गुरुजी होते. अक्षरशः भान हरपून मी फक्त त्या पांडुरंगाकडे पहात होते. काही क्षणांनी त्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन एकदम शांत झालं. अश्रुभरल्या डोळ्यात ते लोभस रुप साठवत बाजूला झाले. त्यादिवशी माऊलींनी माझी इच्छा पूर्ण केली होती. क्षणभरही वाट पहायला न लावता थेट दर्शन घडवलं होतं. पहिल्यांदा दर्शन घेताना माझी झालेली तडफड माऊलींनी जाणली होती. काही वर्षांनंतर का होईना आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. मन तृप्त तृप्त झालं होतं.
दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला आणि अर्थातच एरवीही या अनभुवांची परत परत आठवण येते आणि जाणवतं किती जपतो आपल्या प्रत्येकाचं मन तो जगन्नियंता. त्याच्या कुठल्याही निर्गुण रुपासमोर आपण अनन्यभावाने शरण गेलो तर तो यथावकाश सारं काही मनासारखं घडवतो हे नक्की.
अखेर 'देव भावाच भुकेला' हेच खरंय.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment