प्राण्यांप्रमाणेच सजीवत्वाची सारी लक्षणं झाडातही असतात. म्हणूनच झाडही सजीवच मानलं गेलंय.
जमिनीखाली स्वताभोवतीचं कठीण असं कवच भेदून बीज अंकुरतं. आणि भूवरी अवतरतात ती पोपटी हिरव्या रंगाची नाजूक इवलीशी दोन पर्णं. आणि मग आकाराला येत ते छोटंसं रोपटं. माती आणि हवेतून पाणी आणि अन्नद्रव्यं मिळवत यथावकाश त्याचं रुपांतर मोठ्या वृक्षवेलीत होतं. कालानुरूप फुलाफळांनी ही झाडं वेली बहरतात. कालंतराने सृष्टि नियमानुसार नैसर्गिक किंवा अनैसर्गिकपणे (वृक्षतोड, वादळं) नाशही पावतात. तसंच त्यांच्या बीजापासून नवीन रोपही अकुंरतात. खरंच सजीवत्वाची सारी लक्षणं जनन, पोषण, निर्मिती, अंत ही सारी वृक्षवेलीत आढळतात.
पण सजीवत्वाच्या एका मुख्य लक्षणापासून मात्र या वृक्षवल्ली वंचित आहेत. ते म्हणजे स्थलांतरण. सारे सजीवमात्र स्थलांतर करु शकतात पण झाड मात्र अचल उभं असतं. बीज अंकुरल्यापासून नाश होईपर्यंतचा सारा काळ ते स्थिर उभं असतं. उन,वारा, पाऊस वादळं सारं काही झेलत कणखरपणे वर्षानुवर्ष उभं असतं. आणि अगदी एका जागी उभं राहूनही सदैव फळाफुलांनी बहरत असतं. पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि वाटसरुंची सावलीही असतं.
तरुवेलींनाही भावना असतात हे सिद्ध झालंय. आपलं अस्तित्व, आपला स्पर्श, आपलं बोलणं त्यांना सहज कळतं हा माझाही अनुभव आहे. मीही घरातल्या कुंड्यांमधल्या झाडांशी रोज नित्यनेमाने बोलते, त्यांना अलवार स्पर्श करते. मग झाडंही छान तरारुन येतात.आपण गावाहून परत आल्यावर पुरेशा पाण्याअभावी झाडं मलूल होतात. पण फक्त अपुरं पाणी एवढंच कारण नसतं तर आपली अनुपस्थितीही झाडांना जाणवते. पाण्याबरोबरच पुन्हा त्यांच्याशी बोलणं, गोंजारणं सुरु केलं की मलुल झालेली झाडं पुन्हा छान टवटवीत होतात. या माझ्या त्यांच्याशी बोलण्यातूनच असेल कदाचित पण झाडांचं अचलत्व मला फार जाणवतं, विचार येतो मनात आपल्याला कधी असं अचल रहाणं जमेल का? वर्षानुवर्ष स्थिर उभं राहूनही आनंदात जगायला ?
एकदा मला वृक्षतरु व्हायचंय
अचल उभं राहून बघायचंय
इवल्या बीजातून छान अंकुराचंय
पाचूसम रेखीव पर्णांनी खुलायचंय
उन वारा पाऊस मला झेलायचंय
वादळातही भक्कम उभं रहायचंय
मृदेच्या आधारे मुळांना घट्ट रुजवायचंय
आत्मविश्वासाने पुन्हा पुन्हा बहरायचंय
पाखरांना पर्णफांद्यांवर खेळवायचंय
मधुर किलबिलाटात त्या दंग व्हायचंय
जर मी प्राजक्ताचं झाड असेन
नाजुक फुलांनी मी सदा बहरेन
पखरण रंगगंधी फुलांची करेन
रिते होण्यातले मर्म मी जाणेन
जर मी बकुळीचं झाड असेन
ईवल्या फुलांनी सुरेख मोहरेन
सडा मी चांदणफुलांचा घालेन
वाळल्या फुलांनाही गंध देईन
जर मी एखादा वटवृक्ष असेन
घनदाट फांद्या मग मी पसरेन
येतील कुणी सुरपारंब्या खेळाया
थकल्या पांथस्था देईन मी छाया
जर मी सुरेख आम्रतरु असेन
ऐन वसंतात मी मुक्त मोहरेन
कोकिळेच्या कुजनाने बहरेन
आम्रफलांनी रसना तृप्त करेन
जमेल का मला स्थिर रहायला
अचल राहून आनंदात जगायला
एकदा मला वृक्षतरु व्हायचंय
अचल उभं राहून बघायचंय....
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment