श्रावणाच्या नुसत्या उल्लेखानेही आपलं मन मोहोरतं, हो ना? आता तर श्रावण सुरु होऊन आठवडा झालाय. पण या आठ दिवसांतच साऱ्या सृष्टीचं रुप बघा किती खुललंय. वसुंधरेवर मस्त हिरवी मखमल पसरलीय. त्या एका हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध. कुठे पाचूसारखा गर्द हिरवा तर कुठे राव्यासारखा उत्फुल्ल पोपटी. आणि त्यावर रंगफुलांची नक्षी. किती सुंदर दिसतोय हा सारा साज. साऱ्या तरुवेलीही पर्णसंभारानी बहरल्यात. या हिरव्या मखमलीतून जाणाऱ्या लाल मातीच्या रानवाटाही श्रावणधारांनी सजल्यात. साथीला आहे पक्ष्यांचं मधुर कुजन. खरंच किती नितांत सुंदर मनमोहक दिसतेय सारी अवनी. तिच्या या सौंदर्याने आपलं मनही असंच उत्साहानं फुललंय.
श्रावण मासी चाले उनपावसाचा खेळ
उमटे अवकाशी इंद्रधनुचा सुरेख मेळ
अवनीच्या हिरव्या शालूवर थेंबांची नक्षी
सजते सुंदर रंगगंधी पुष्पांना घेऊन कुक्षी
पाचूच्या वनी खळाळती निर्झर ते शुभ्र
दिसे कनकगोल सुरेख सरताच ते अभ्र
सुरेल मधुरव विहगांचा ऐकू येई कानी
अन उलगडे अवचित मोरपिसारा रानी
अनाहत नाद अवखळ झऱ्यातून नादतो
कधी सहज साथ त्यास मेघमृदुंगही देतो
मधुगंधी, फुलपंखी श्रावण हा मनभावन
पसरे हिरवी मखमल अन वाहे गंधित पवन
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment