वैशाखाच्या काहिलीने सारी धरती तप्त झालेली असते. आपलं तनमनही त्रस्त झालेलं असतं. सारी धरणी मृगधारांची आसुसून वाट पहात असते. अखेर मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वाजत गाजत रेशीमधारा बरसतात. बिजलीचा नृत्याविष्कार आणि त्याला मेघमृदुंगाची साथ आणि बरोबरीने बरसणाऱ्या जलधारा यामुळे तृषार्त अवनी तृप्त होते. मृदगंधाने दरवळते. मग या वर्षाऋतूच्या आगमनाने सारी वसुंधरा हिरवा शालू लपेटते. सुजलाम सुफलाम होते. आणि मग वेळ येते ती ऋतु बदलाची. चार महिने छान संगत करणाऱ्या पावसाची निरोपाची वेळ जवळ येते. आणि इतके दिवस शांतपणे रिमझिणारा बरसणारा पाऊस सरताना मात्र आपलं थोडंसं का होईना रौद्र रुप दाखवतो.
अगदी अचानक आभाळ भरुन येतं आणि पाऊस कोसळायला सुरुवात होते. पावसाबरोबरच जोरदार वाजंत्री वाजू लागते. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा वीजांचा लखलखाट आणि पाठोपाठ होणारा गडगडाट काळीज कातरणारा वाटू लागतो. सरता पाऊस चार सहा दिवस साधारण ठराविक वेळी सुरु होतो. मग रोज ती वेळ जवळ आली की मन आधीच हळवं कातर होतं. इतके दिवस हवासा असलेला पाऊस आता मात्र थांबावा असं वाटायला लागतं. मनात काळजी दाटत असली तरीही सरता पाऊस नकळत एक हुरहूर मात्र लावून जातो.
माध्यान्ह जराशी कलते
अन आकाश काजळते
सौदामिनी ती लखलखते
मेघमृदुंगही ते कडकडते
बरसता जलधारा क्षणात
भिजते अवनी त्या जळात
अंधारसावल्या दाट होतात
मेघसरी धुवांधार बरसतात
चहुकडे पाणीचपाणी होते
वाट घराची तयात हरवते
रात्रही ती वादळीच असते
मन मनाचा आधार शोधते
मग अशा सरत्या पावसात
दाटते किंचित भय मनात
दाटते किंचित भय मनात
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment